बिहार राज्यातील पाटणाच्या खालोखाल वस्तीचे व भारतातील एक प्रथम श्रेणीचे औद्योगिक शहर. लोकसंख्या उपनगरांसह ४,५६,१४६ (१९७१). याचे लोहमार्ग स्थानक टाटानगर हे मुंबई–नागपूर–कलकत्ता लोहमार्गावर कलकत्त्यापासून २६० किमी. वायव्येस आहे. १९०७ मध्ये सुवर्णरेखा व खारकई या नद्यांमधील साक्ची या गावी मुंबईचे दूरदर्शी उद्योगपती जमशेटची नसरवानजी टाटा यांनी ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ हा लोखंड-पोलादाचा कारखाना काढला. छोटा नागपूर पठाराच्या आग्नेय कड्यावरील खनिजसमृद्ध प्रदेशातील लोहधातुक येथे शुद्ध करून बीड व अनेक गुणधर्मांचे पोलाद येथे बनविले जाते. कारखान्याने सु. ८ चौ. किमी. जागा व्यापली असून आता त्याभोवती शेतीअवजारे, पोलादी तारा, खिळे, स्कू, जस्ताचे पाणी दिलेले नळीचे पत्रे, निरनिराळ्या जाडीचे लोखंडी पत्रे, सळया, विजेच्या तारा, रेल्वे एंजिने व त्यांचे सुटे भाग, आगगाड्यांची चाके आणि आस, टायर, पोलादी नळ इ. अनेकविध वस्तूंच्या कारखान्यांची गर्दी झालेली आहे. नगररचना योजनापूर्वक केलेली असून प्रशस्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, घरे, बाजार, करमणुकीची साधने, शाळा, महाविद्यालये इत्यादींची सोय करून स्वच्छता व सौंदर्य यांकडे लक्ष दिलेले आहे. येथील जूबिली पार्कने ८१ हे. क्षेत्र व्यापले आहे.
कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ड्युइसबुर्क : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन–वेस्ट...
दांडेली : कर्नाटक राज्यातील उ. कॅनरा जिल्ह्याच्या ...
जपानचे एक प्रमुख औद्योगिक शहर व बंदर व आयची जिल्ह...
रशियाच्या स्व्हर्डलॉफ्स्क प्रांतातील एक औद्योगिक श...