(१५ एप्रिल १८४३ –२८ फेब्रुवारी १९१६). अमेरिकन कथा-कांदबरीकार. जन्म न्यूयॉर्क शहरी एका सुखवस्तू कुटुंबात. त्याचे वडील धर्मशास्त्रवेत्ते होते. विल्यम जेम्स हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ हेन्रीचा वडील बंधू. शिक्षणासाठी हेन्री व विल्यम ह्या दोघांचे यूरोपात काही काळ वास्तव्य झाले. ह्या शिक्षणाने त्यांची दृष्टी व्यापक झाली. ही संधी त्या काळात फारच थोड्या अमेरिकनांना मिळत असे. हेन्रीला साहित्याची आवड लहानपणापासूनच होती. व्यावसायिक स्वरूपाचे शिक्षण घ्यावे, ह्या हेतूने त्याने १८६२ मध्ये ‘हार्व्हर्ड लॉ स्कूल’ मध्ये प्रवेश घेतला होता. तथापि कायद्याच्या अभ्यासाऐवजी सँत-बव्ह, बाल्झॅक, हॉथॉर्न ह्यांसारख्यांचे साहित्य वाचण्यातच त्याचे मन विशेष रमत असे. कथा, ग्रंथपरीक्षणे असे त्याचे आरंभीचे लेखन काँटिनेंटल मंथ्ली, द अटलांटिक मंथ्ली, नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यू ह्यांसारख्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. वॉच अँड वॉर्ड ही त्याची पहिली लघुकांदबरी द अटलांटिक मंथ्लीमधून प्रथम प्रसिद्ध झाली (१८७१). त्याच्या सुरुवातीच्या लेखनावर बाल्झॅक, जॉर्ज एलियट, जॉर्ज सँड, हॉथॉर्न आणि मेरीमे ह्यांचा प्रभाव जाणवतो. १८६९ मध्ये तो पुन्हा यूरोपमध्ये आला. इंग्लंडला त्याने भेट दिली. तेथे जॉन रस्किन, विल्यम मॉरिस आदी साहित्यिकांशी त्याची गाठ पडली. सर्जनशील साहित्यिकाला अनुकूल असे वातावरण अमेरिकेत नाही, असे त्याचे मत झाले होते. तथापि काही काळ त्याने हेतुपूर्वक अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस अमेरिकेबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. १८७६ मध्ये तो लंडनला आला आणि तेथे स्थायिक झाला. तेथे असतानाच डेझी मिलर (१८७९) ही आपली आंतरराष्ट्रीय कीर्तीची कादंबरी त्याने लिहिली. त्यानंतर कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, समीक्षणात्मक लेख, वाङ्मयीन व्यक्तिचित्रे, नाटके असे विपुल लेखन त्याच्या हातून झाले. १९१५ मध्ये त्याने इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले.
सुमारे ४५ वर्षांच्या त्याच्या वाङ्मयीन कारकीर्दीची तीन पर्वे दिसतात. द अमेरिकेन, डेझी मिलर आणि द पोट्रेट ऑफ अ लेडी (१८८१) ह्या तीन कादंबऱ्या पहिल्या पर्वातल्या (१८७१–८१). अमेरिका आणि यूरोप ह्यांचे परस्परसंबंध हा त्याचा आवडता विषय. ह्या तीन कादंबऱ्यांत तो त्याने हाताळलेला आहे. द पोट्रेट ऑफ अ लेडीची नायिका इझबेल आर्चर ही त्याने निर्मिलेल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांपैकी एक होय. दुसऱ्या पर्वात (१८८२–१९००) त्याने लेखनतंत्राचे विविध प्रयोग केले. सूक्ष्म, विश्लेषक स्वभावचित्रण हे त्याच्या ह्या पर्वातील कादंबऱ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. द स्पॉइल्स ऑफ पॉयंटन (१८९७), व्हॉट मेझी न्यू (१८९७) आणि द ऑक्वर्ड एज (१८९९) ह्या कादंबऱ्या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ह्या काळात त्याने काही नाटकेही लिहिली. ती फारशी यशस्वी ठरली नाहीत. तथापि त्याच्या कादंबरीलेखनावर नाट्यलेखनाच्या अनुभवाचा फार परिणाम झाला. द विंग्ज ऑफ डव्ह (१९०२), द अँबॅसडर्स (१९०३) आणि द गोल्डन बोल (१९०४) ह्या त्याच्या लेखनाच्या अखेरच्या पर्वातील (१९००–०४) श्रेष्ठ कादंबऱ्या. केवळ कथाकथन आणि वास्तवदर्शन ह्यांत गुंतून न पडता त्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न ह्या कादंबऱ्यांत दिसतो. प्रतिमा, प्रतीके, आणि रूपके ह्यांचे मार्मिक, कलात्मक उपयोजन ह्या कादंबऱ्यांत केलेले आहे. पात्रांच्या अंतर्जीवनाचे सखोल विश्लेषण त्यांत आढळते.
त्याच्या उल्लेखनीय कथांत ‘अ पॅशनेट पिल्ग्रिम’, ‘द मॅडोना ऑफ द फ्यूचर’, ‘द फिगर इन द कार्पेट’, ‘द टर्न ऑफ द स्क्रू’ इत्यादींचा समावेश होतो.
त्याने लिहिलेले समीक्षात्मक लेखही महत्त्वाचे आहेत. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ कादंबरीकारांवर त्याने केलेले लेखन या दृष्टीने लक्षणीय आहे. संबंधित लेखकाच्या साहित्यकृतींच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांतून दिसतो. त्याने केलेले कांदबरीविषयक लेखन या साहित्यप्रकाराविषयीच्या चर्चेला मार्गदर्शक ठरत आलेले आहे. फ्रेंच पोएट्स अँड नॉव्हेलिस्ट्स (१८७८), हॉथॉर्न (१८७९), नोट्स ऑन नॉव्हेलिस्ट्स (१९१४) हे त्याचे काही उल्लेखनीय समीक्षात्मक ग्रंथ.‘द आर्ट ऑफ फिक्शन’ हा टीकालेख व आपल्या कांदबऱ्यांच्या आवृत्तीला त्याने जोडलेल्या प्रस्तावना कादंबरीकलेचे अधिकारवाणीने केलेले विश्लेषण म्हणून मान्यता पावलेल्या आहेत.
अ स्मॉल बॉय अँड अदर्स (१९१३), नोट्स ऑफ अ सन अँड ब्रदर (१९१४) आणि द मिडल यीअर्स (१९१७) ही त्याची आत्मचरित्रात्मक पुस्तके होत.
हेन्री जेम्सचा वाचकवर्ग त्याच्या हयातीत मर्यादितच होता. तथापि विसाव्या शतकात त्याचे पुनर्मूल्यांकन होऊन मानसशास्त्रयुक्त वास्तववादाचा प्रणेता; निवेदन व रचना यांत सतत प्रयोगशील असणारा; अर्थघन व विचारभावनांची सूक्ष्म कंपने अचूक टिपणाऱ्या जटिल शैलीचा निर्माता असा एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्याचे स्थान मान्य झालेले आहे. जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वुल्फ, डॉरोथी रिचर्ड्सन ह्यांसारख्या अनेक कादंबरीकारांवर त्याचा प्रभाव पडलेला आहे.
ऑक्सफर्ड आणि हार्व्हर्ड विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या त्याला देण्यात आल्या. ब्रिटिश सरकारने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ देऊन त्याचा बहुमान केला (१९१६). लंडनमध्ये तो निधन पावला.
संदर्भ : 1. Anderson, Quentin, The American Henry James, New Brunswick, N. J. 1958.
2. Beach, J. W. The Method of Henry James, New Haven, 1918.
3. Brooks, Van Wyck, The Pilgrimage of Henry James, New York, 1925.
4. Cargill, O. The Novels of Henry James, 1961.
5. Dupee, F. W. Ed. The Question of Henry James : A Collection of Critical Essays, London, 1951.
6. Edel, Leon, Henry James : The Conquest of London, Philadelphia, 1962.
7. Edel, Leon, Henry James : The Middle Years, Philadelphia, 1962.
8. Edel, Leon, Henry James : The Untried Years, 1843–1870, London, 1953.
9. Krook, Dorothy, The Ordeal of Consciousness in Henry James, Cambridge, 1962.
10. Matthiessen, F. O. Henry James : The Major Phase, London, 1944.
11. Putt, S. G. The Fiction of Henry James, 1968.
12. Vaid, K. B. Technique in the Tales of Henry James, Harvard, 1964.
लेखक: म. कृ. नाईक
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/20/2020