অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हान्स झाक्स

हान्स झाक्स

(५ नोव्हेंबर १४९४–१९ जानेवारी १५७६). एक बहुप्रसू जर्मन कवी आणि नाटककार. जन्म न्यूरेंबर्ग येथे. तेथल्याच ‘लॅटिन स्कूल’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर चर्मकार व्यवसायात उमेदवारी केली आणि त्यात प्राविण्य संपादन केले. १५११ ते १५१६ ह्या काळात दक्षिण आणि मध्य जर्मनीत प्रवास करून त्याने ‘माइस्टरसिंगर’ची (इं. अर्थ मास्टरसिंगर) कला आत्मसात केली. मास्टरसिंगर्स हे संगीत जाणणारे कवी मुख्यतः कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वर्गातून आलेले होते. पूर्वकालीन बारा श्रेष्ठ कवींचा (मास्टर्स) वारसा ते सांगत. संगीत आणि काव्यकला शिकण्यातून आणि शिकविण्यातून बंधुत्वकल्पनेवर आधारलेले त्यांचे संघ (गिल्ड्‌स) आणि सिंगशूलेन किंवा गीतशाळा तयार झाल्या. स्वतः झाक्स हा न्यूरेंबर्ग येथील गीतशाळेत १५१७ मध्ये शिक्षक म्हणून काम करू लागला.

डी विटेंबेर्गिश नाख्टिगाल  (१५२३, इं. शी. द नाइटिंगेल ऑफ विटनबर्ग) ह्या रूपककाव्यामुळे तो प्रथम प्रसिद्धीस आला. धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर ह्याच्या विचारांचा पुरस्कार ह्या काव्यात त्याने केला होता. प्रॉटेस्टंट विचार व्यक्त करणारे आणखीही काही लेखन त्याने केले. तथापि १५२७ मध्ये न्यूरेंबर्गच्या कौन्सिलने त्याच्या लिखाणावर बंदी आणल्यानंतर त्याने आपले आयुष्य चर्मकाराच्या व्यवसायास वाहून घेतले. काव्यलेखन केले; परंतु वादग्रस्त ठरणार नाही असे.

झाक्सची साहित्यनिर्मिती विपुल आणि बहुढंगी आहे. १५६७ च्या नववर्षदिनी त्याने आपल्या साहित्यकृतींची एक जंत्री तयार केली व तीनुसार त्याच्या ह्या वर्षापर्यंतच्या साहित्यकृतींची संख्याच ६,००० हून अधिक भरते. त्यांत ४,२७५ माइस्टरलीडर (इं. अर्थ मास्टर साँग्ज, मास्टरसिंगर संप्रदायातील गीते), सु. २०८ नाटके इत्यादींचा समावेश होतो.

झाक्सच्या महत्त्वाच्या काही कृती अशा : श्वांके किंवा छोटी विनोदी कथाकाव्ये : सेंक्‌ट पेटर मिट डेअर गाइस (१५५५, इं. शी. सेंट पीटर अँड द गोट), दास स्काल्बरब्रूटेन (१५५७, इं. शी. काफब्रूडिंग), डेअर म्युलर मिट डेम श्टुडेंटेन (१५५९, इं. शी. द मिलर अँड द स्टूडंट). फास्टानाख्टस्पील किंवा कार्निव्हलमध्ये करावयाची नाटके : डेअर फारेंडे शूलर इम पाराडाइस (१५५०, इं. शी. द रोमिंग प्यूपिल इन पॅरडाइस), दास हायसे आयझन (१५५१, इं. शी. द हॉट आर्यन).

त्याची विनोदी कथाकाव्ये विशेष लोकप्रिय ठरली. झाक्सच्या नाट्यकृती म्हणजे केवळ संवादात्मक कथा होत. आकृतिबंधाची कसलीच जाणीव न ठेवता, मनाला येईल तशी अंक-प्रवेशांची विभागणी त्यांत केलेली आढळते.

झाक्सने त्याच्या साहित्यकृतींतील विषय बायबल, ग्रीक-लॅटिन-इटालियन साहित्ये, जर्मानिक आख्यायिका, ऐतिहासिक घटना व दैनंदिन जीवन ह्यांतून निवडले. समकालीन जीवनाचे भान मात्र त्याने कधीच हरवले नाही. त्याच्या व्यक्तिरेखा म्हणजे न्यूरेंबर्गचे तत्कालीन नागरिकच होत. साहित्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण मुख्यतः बोधवादी आहे. वास्तववादी प्रवृत्ती, नैतिकतेची तीव्र जाणीव, प्रॉटेस्टंट पंथाविषयीचे प्रेम त्याच्या साहित्यकृतींतून प्रत्ययास येतात.

वॅगनर ह्या विख्यात जर्मन संगीतकाराने माइस्टरसिंगर फोन न्यूरेंबर्ग  ह्या आपल्या संगीतिकेत झाक्सची प्रभावी व्यक्तिरेखा उभी केलेली असून गटेसारख्या साहित्यश्रेष्ठीने ‘द पोएटिक मिशन ऑफ हान्स झाक्स’ अशा शीर्षकार्थाची एक कविता लिहून झाक्सचा गुणगौरव केला आहे.

लेखक : प्रमोद देव

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate