অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई टिळक

(१८६८?–२४ फेब्रुवारी १९३६). मराठी लेखिका आणि कवयित्री. कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी. माहेरचे नाव मनूताई (मनकर्णिका) गोखले. १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला असावा. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. प्रथम ह्या घटनेने लक्ष्मीबाईंना धक्का बसला, तरी त्यानंतर ५ वर्षांनी त्यांनीही पतीप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला. लक्ष्मीबाईंचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्यापुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार, असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली आहे. पुढे काव्यरचनेसाठी टिळकांचे उत्तेजनही त्यांना मिळत गेले. रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले ख्रिस्तायन हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर सु. १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले सु. १०।।· अध्याय रेव्हरंड टिळकांचे असून सु. ६४।। अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते. एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्‍या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत. त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून भरली घागर (१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार तीत आढळून येतो. बालगीते, देशभक्तिपर गीते अशीही काही रचना त्यांनी केलेली असून तीही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले, तो त्यांचा ग्रंथ म्हणजे स्मृतिचित्रे. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाले. लक्ष्मीबाईंचे पुत्र देवदत्त ह्यांनी लिहावयास घेतलेल्या रेव्हरंड टिळकांच्या चरित्रासाठी केवळ सामग्री पुरविण्याच्या हेतूने लक्ष्मीबाईंनी आपल्या आठवणी लिहून काढावयास प्रारंभ केला. पुढे श्रीपाद कृष्णांना त्यांचे जमात आणि देवदत्तांचे स्नेही भा. ल. पाटणकर ह्यांच्याकडून लक्ष्मीबाईंच्या ह्या लेखनाची वार्ता समजली. पाटणकारांकडून ह्या आठवणी वाचून घेतल्यानंतर त्या प्रकाशात आल्याच पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली. श्रीपाद कृष्णांचे पुत्र प्रभाकर कोल्हटकर ह्यांच्या संजीवनी ह्या पाक्षिकातून स्मृतिचित्रे प्रथम प्रसिद्ध झाली.

लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची निर्मिती आत्मप्रेमातून झालेली नाही. जाणीवपूर्वक एखादी साहित्यकृती निर्माण करण्याची इच्छाही ह्या लेखनामागे नव्हती. तथापि लक्ष्मीबाईंच्या जीवनातील नानाविध अनुभवांचे कडूगोड सौंदर्य त्यातून सहजगत्या व्यक्त झाले. स्मृतिचित्रांची अकृत्रिम भाषाशैली, त्यांतून प्रत्ययास येणारी वृत्तीची निरागसता, मानवतेवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा, स्वतःलाच हसणारी आणि स्वतःबरोबरच सभोवतालच्यांना सदैव प्रसन्न ठेवणारी लोकविलक्षण, मिस्किल विनोदबुद्धी ह्या सर्वच गोष्टींची मोहकता कधीही न कोमेजणारी अशी आहे. व्यक्ती, प्रसंग एवढेच नव्हे तर एक संपूर्ण कालखंड जिवंतपणे वाचकांसमोर उभा करण्याचे सामर्थ्य स्मृतिचित्रांच्या पानापानांत आहे. शालेय शिक्षणाचा संस्कार न झालेल्या लक्ष्मीबाई यांनी एका अत्यंत सुसंस्कृत मनाने आपल्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आठवणी लिहावयास घेतल्या खऱ्‍या; परंतु प्रत्यक्षात त्या आठवणींचे स्वरूप असे झाले आहे, की त्यांची व्याप्ती ह्या सीमित जीवनापुरती मर्यादित न राहता त्यांतून अगदी स्वाभाविकपणे प्रकट होत गेले आहे, ते विविधरंगी, विविधढंगी मानवतेचे चित्र. आत्मचरित्रात्मक लेखन आपली मूळ प्रकृती न सोडता श्रेष्ठ कालकृतीच्या पातळीवर कसे पोहोचू शकते, ह्याचे मराठीतील एकमेव उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे.

१९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नासिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. नासिक येथेच त्या निधन पावल्या.

त्यांचे पुत्र देवदत्त टिळक (१८९१–१९६५) ह्यांनी मराठीत दर्जेदार बालसाहित्यनिर्मिती केली आहे. लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर ख्रिस्तायनाचा अखेरचा – ७६ वा–अध्याय त्यांनी लिहिला तसेच स्मृतिचित्रांच्या चौथ्या भागातील १२ ते २० ही नऊ प्रकरणे लिहून लक्ष्मीबाईंच्या निधनापर्यंतचा वृत्तांत दिला, टिळक दांपत्याच्या पुस्तकांचे साक्षेपी संपादनही केले. ज्ञानोदयाचेही ते अनेक वर्षे संपादक होते.

संदर्भ : १) अशोक टिळक

२) संपा. स्मृतिचित्रे (अभिनव आवृ.), नासिक, १९७३.

लेखक : वा. ल. कुळकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate