(५ जुलै १८८६–२४ जानेवारी १९४७). फ्लेमिश कादंबरीकार. ल्येअर येथे जन्मला. Pallieter (१९१६, इं. भा. १९२४) ह्या त्याच्या प्रादेशिक कादंबरीने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. जगातील सुखे ही ईश्वरी देणगी आहे, अशा भूमिकेतून लिहिलेल्या ह्या कादंबरीत जीवनासक्तीचे एक विलोभनीय दर्शन घडते. ह्या कादंबरीचा नायक पॅलिएटर ह्याची व्यक्तिरेखा जागतिक साहित्यात चिरस्थायी झालेली आहे. Boerenpsalm (१९३५) ह्या कादंबरीत त्याची जीवनविषयक जाणीव अधिक सखोल आणि व्यापक झालेली दिसते. कादंबऱ्यांखेरीज कथा, चरित्रे असे लेखनही त्याने केले. ल्येअर येथेच तो निधन पावला. त्याच्या साहित्याचे अनुवाद अनेक भाषांत झालेले आहेत.
लेखक: अ. र. कुलकर्णी
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/18/2020