६ जून १६०६
३० सप्टेंबर १६८४
फ्रेंच नाटककार. जन्म रूआन येथे. कोर्नेयने रूआन येथेच कायद्याचा अभ्यास केला; पण वकिली मात्र केली नाही. रूआन येथेच त्याने १६५० पर्यंत न्यायाधीश म्हणून काम केले. लॅटिन भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व होते. विद्यार्थिदशेपासूनच सेनीका आणि ल्यूकन ह्या रोमन साहित्यिकांचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव होता. Melite (१६३०) ही यशस्वी सुखात्मिका लिहून त्याने नाट्यलेखनास आरंभ केला. त्यानंतर त्याने La Galerie du Palais (१६३२) व La Place Royale (१६३३) ह्यांसारख्या काही सुखात्मिका लिहिल्या. कार्दीनाल रीशल्यने पुरविलेल्या कथानकांवरून नाटके लिहिणाऱ्या संघात तो काही काळ होता; परंतु कोर्नेयसारख्या स्वतंत्र प्रतिभेच्या नाटककाराला हे काम फारसे रुचण्यासारखे नव्हते. रीशल्यचा रोष पतकरून त्याने ते सोडून दिले. Medee (१६३५) ही त्याची पहिली शोकात्मिका फारशी यशस्वी ठरली नाही; परंतु त्यानंतरची Le Cid (१६३७) ही शोक-सुखात्मिका (ट्रॅजिकॉमेडी) मात्र युगप्रवर्तक ठरली. ह्या नाटकाने त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. गिल्येन द कास्त्रो इ बेल्यव्हीस (१५६९–१६३१) ह्या स्पॅनिश नाटककाराच्या Las Mocedades del Cid ह्या नाट्यकृतीवर ते आधारलेले होते. घराण्याच्या इभ्रतीखातर स्वतःच्या प्रेयसीच्या पित्याला ठार करणारा नायक रोद्रिग Le Cid मध्ये कोर्नेयने रंगविलेला आहे. नाटकाच्या अखेरीस रोद्रिगच्या व्यथित प्रेयसीला रोद्रिगशीच विवाह करण्याची राजाज्ञा होते; ह्या दृष्टीने हे नाटक सुखान्त मानले, तरी त्याचा एकूण परिणाम गंभीर शोकात्मिकेचाच आहे. कोर्नेयच्या ह्या नाट्यकृतीत नाट्यदोष आहेत की नाहीत, या प्रश्नावर फार मोठा वाद झाला. त्यात अखेरीस फ्रेंच अकादमीचे हस्तक्षेप करून कोर्नेयला प्रतिकूल असा अभिप्राय दिला (ह्या प्रकरणी रीशल्यचा हात असावा, असा समज आहे). ह्या घटनेमुळे विषण्ण होऊन पुढील तीन वर्षे कोर्नेयने काही लिहिले नाही, असे दिसते. १६४० मध्ये मात्र त्याचे Horace हे नाटक रंगभूमीवर आले व त्यानंतर Cinna (१६४१?), Polyeucte (१६४२?), La Mort de Pompee (१६४३?) ही नाटके त्याने लिहिली. कर्तव्यपालनासाठी आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती दडपून टाकणाऱ्या मनोविजयी नायकांचे त्यांत चित्रण आहे. ह्या शोकात्मिकांच्या पाठोपाठ Le Menteur (१६४३) आणि La suite du Menteur (१६४४ ?) ह्या श्रेष्ठ सुखात्मिका त्याने लिहिल्या. Rodogune (१६४५?) आणि Nicomede (१६५१?) ह्या दोन शोकात्मिका म्हणजे त्यांची अखेरची यशस्वी नाटके. त्यानंतरची त्याची नाटके श्रेष्ठ नाटdयकृतींच्या कसाला फारशी उतरत नाहीत. कोर्नेयच्या शोकात्मिका म्हणजे फ्रेंच नाट्यसाहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. झां रासीनसारख्या पुढील नाटककारांना उपकारक अशी पार्श्वभूमी त्याने निर्माण करून ठेवली.
संदर्भ : 1. Brasillach, C. Corneille, Paris, 1938.
2. Lockert, Lacy; Trans. Chief Plays of Corneille, 1952.
3. Nelson, Robert, Corneille, His Heroes and Their World, Philadelphia, 1963.
4. Yarrow, P.J. Corneille, London, 1964.
लेखक : विजया टोणगावकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2020
एक सुप्रसिद्ध राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार...
5 नोव्हेंबर 1843 रोजी विष्णुदासांनी "सीता स्वयंवर"...