অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेम्स जॉइस

जेम्स जॉइस

(२ फेब्रवारी १८८२–१३ जानेवारी १९४१). युगप्रवर्तक आयरिश कादंबरीकर. इंग्रजीतून लेखन. जॉइस डब्लिनमध्ये जन्मला. त्याचे शिक्षणही तेथेच झाले. त्याच्या जीवनातील बराच काळ डब्लिनबाहेर यूरोपात गेला; पण त्याचे अंतःकरण मात्र अखेरपर्यंत डब्लिनमध्येच राहिले. काही काळ इंग्रजीचे अध्यापन करून त्याने आपली उपजीविका केली. १९२० मध्ये तो पॅरिसला स्थायिक झाला तथापि दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सवरील नाझी आक्रमणानंतर (१९४०) तो झुरिकला आला. तेथेच त्याचे निधन झाले.

कादंबरीकार म्हणून जॉइस विशेष प्रसिद्ध असला, तरी त्याने कविताही केलेल्या आहेत. त्याचे पहिले प्रकाशित पुस्तक चेंबर म्यूझिक (१९०७) हा एक काव्यसंग्रह आहे. त्यानंतर त्याच्या १५ वैशिष्ट्यपूर्ण कथा डब्लिनर्स  ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या (१९१४). वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या कथांतून नैतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पक्षघाताने पछाडलेल्या जीवनांचा परिणामकारक आविष्कार जॉइसने घडविलेला आहे. त्यानंतर अ पोट्रेट ऑफ द आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन  (१९१६) ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. १९०४ मध्येच जॉइसने लिहावयास घेतलेल्या आणि नंतर मधेच सोडून दिलेल्या स्टीव्हेन हीरो  ह्या कादंबरीचे हे पुनर्रचित रूप होय ( ह्या सोडून दिलेल्या पूर्वलेखनाचाच एक मोठा भाग १९४४ मध्ये प्रसिद्ध झाला). त्यानंतरच्या यूलिसीझ (१९२२) ह्या कादंबरीने त्याचे नाव जगद्विख्यात झाले. फिनेगान्स वेक (१९३९) ही त्याची अखेरची कादंबरी. एक्झाइल्स (१९१८) ही त्याची एकमेव नाट्यकृती. डब्लिनर्स  पासूनच्या जॉइसच्या सर्वच साहित्यकृती एकाच व्यापक आशयबंधाच्या घटक आहेत, असे जाणवते. त्यांच्यात एक सजीव नातेसंबंध जॉइसलाही अभिप्रेत होता. डब्लिनर्समधील अनेक व्यक्तिरेखा यूलिसीझमध्ये पुन्हा आलेल्या आहेत. अ पोट्रेट... मधील स्टीव्हेन एक्झाइल्समध्ये वेगळ्या नावाने आढळतो; यूलिसीझमध्ये तो स्टीव्हेन ह्या नावानेच येतो.

यूलिसीझ  ही त्याची कादंबरी प्रसिद्ध होण्यात अनेक अडचणी आल्या आणि ती प्रसिद्ध झाल्यावर तिच्यावर टीकेचे काहूर उसळले. तिच्यावर प्रामुख्याने अश्लीलतेचा आरोप करण्यात आला. कादंबरीच्या शेवटी एक स्त्री आपल्या व्यवहाराचे शांतपणे विश्लेषण करते असे वर्णन आहे. त्याचप्रमाणे बोलीभाषेतील ग्राम्य आणि अश्लील शब्दांचा वापरही जॉइस निर्विकारपणे करतो. एकंदरीत शरीराच्या उत्सर्जनक्रियांवर तो अधिक भर देतो असे वाटते; पण कादंबरीच्या एकूण रचनेत हा घटक अल्प असल्याने जॉइसच्या निर्मितीचे गांभीर्य कमी होते, असे नाही.

१६ जून १९०४ रोजी डब्लिनमध्ये राहणाऱ्या लिओपाल्ड ब्लूम या माणसाच्या अंतर्यामी २४ तासांच्या अवधीत जे काही प्रवाहित होते, त्याचे अभिनव शब्दांकन या कादंबरीत झाले आहे. होमरच्या ओडिसी  या महाकाव्याशी समांतर असा हा प्रवाह वाहतो. होमरच्या यूलिसीझने त्रिखंडात संचार केला, जॉइसचा नायक मनाच्या अगणित ज्ञात व अज्ञात प्रदेशांतून भ्रमण करतो. या दोन्ही संचारांतील दुवे प्रत्येक ठिकाणी जुळतातच असे नाही. या समांतर रचनेत वक्रोक्ती व ध्वन्यर्थ यांचा मोठा भाग आहे. होमरच्या पुरातन नायकाचे उदात्त, गूढरम्य व साहसपूर्ण आयुष्य व ब्लूमचे सामान्य वासनाविकारांनी गढूळलेले अस्तित्व यांमधील विरोध जॉइसला अभिप्रेत असावा.

आधुनिक मानसशास्त्राचा साहित्यावर जो परिणाम झाला, त्याच्या परिसीमेचे दर्शन या कादंबरीत होते. आधुनिक जीवनातील आध्यात्मिक अराजकतेची उत्कट व व्याकूळ जाणीव जॉइसला झाली होती. परिणामतः मानवी जाणिवेच्या विघटनेचा संपूर्ण आविष्कार करण्यासाठी एक नवा आकृतिबंध व शैली निर्माण करण्याचा म्हणजे एक प्रचंड व प्रतिभासंपन्न प्रयत्न ही कादंबरी लिहून जॉइसने केला. जीवनाच्या विस्मयकारी, करुण, हास्यास्पद गुंतवळीचे सूत्र पकडण्याचा जॉइसने ध्यास घेतला होता. तात्त्विक दृष्ट्या काल व अवकाश ही कृत्रिम परिमाणे आहेत, असे त्याने मानले. अस्तित्व हे सर्वसापेक्ष आहे आणि आधुनिक कलेने ही सापेक्षताच साकार केली पाहिजे, अशी त्याची धारणा होती. हे करताना अस्तित्वाच्या सूक्ष्म सुट्या तपशिलांचा अविरत संभारच त्याच्या लेखणीतून बाहेर पडत राहिला.

अस्तित्वाचे नवे भान सांकेतिक भाषेतून प्रकट करता येणार नाही, असे त्याला वाटले; जाणिवेचा ओघ नेमकेपणाने पकडण्यासाठी रूढ शब्द व शब्दरचना मोडून नवी रचना करण्याची आवश्यकता त्याला जाणवली. यूलिसीझमधील एकूण २,६०,४३० शब्दांपैकी सु. ३०,००० शब्द त्याने नवीन तयार केले, असा अभ्यासकांचा निर्णय आहे, तर भाषेतील नवनव्या शक्यतांची उकल करीत एका महान शब्दक्रीडेत तो अधिकाअधिक रममाण होत गेला, असा टीकाकारांचा अभिप्राय आहे. सांकेतिक शब्दरचना उसकटून टाकताना त्याने विरामचिन्हांचाही त्याग केला. या भाषाप्रयोगांचे नेमके प्रयोजन वाचकांना कळतेच असे नाही. भाषेच्या या अभिनव प्रयोगाबरोबरच संगीत, चित्रपट, चित्रकला, मनोविश्लेषण व तत्त्वज्ञान यांमधील नव-प्रवाहांचा व तंत्रकौशल्याचा अंतर्भाव त्याने आपल्या लेखनात आणि रचनाशैलीत केला.

फिनेगान्स वेक  ही आपली अखेरची कादंबरी लिहिण्यात जॉइस १६ वर्षे व्यग्र होता. शब्दक्रीडेची आणि नवभाषानिर्मितीची प्रक्रिया ह्या कादंबरीत त्याने टोकाला नेऊन भिडवली. ह्या कादंबरीच्या मानाने यूलिसीझ  अनेकांना सुबोध वाटते.

जॉइसच्या साहित्यकृतींच्या गुणवत्तेबद्दल तीव्र मतभेद असले, तरी त्याची कलाविषयक निष्ठा वादातीत मानली जाते. रूपवादाला आव्हान देणाऱ्या त्याच्या कादंबऱ्यांनी अनेक लेखकांना झपाटून टाकले होते. यूलिसीझमध्ये जॉइसने एका मिथ्यकथेचा करून घेतलेला उपयोग त्याच्या नंतरच्या लेखकांना अनुकरणीय वाटला. आइन्स्टाइनसारख्या विश्वविख्यात वैज्ञानिकाच्या शोधांचा स्वतःच्या स्वतंत्र संशोधनासाठी उपयोग करून घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कार्याइतकेच हे अनुकरण मोलाचे ठरेल, असा टी. एस्. एलियटसारख्या समीक्षकाचा अभिप्राय आहे. माणसाच्या सामान्यत्वाचे महाभारत रचणारा असामान्य साहित्यिक म्हणून जॉइसचे स्थान केवळ इंग्रजी साहित्यातच नव्हे तर जागतिक साहित्यात महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

1. Budgen F. James Joyce and the Making of Ulysses, London, 1934.

2. Campbell, y3wuoeph; Robinson, H. M. A Skeleton Key to Finnegans Wake, London, 1947.

3. Eliot, T. S. Ed. Introducing Joyce : A Selection of Prose, London, 1942.

4. Ellman, Richard, James Joyce, New York, 1959.

5. Gilbert, Stuart, James Joyec's Ulysses : A study, London, 1952.

6. Goldberg, S. L. Joyce, Edinburgh, 1962.

7. Goldberg. S. L. The Classical Tempo: A study of Ulysses, London, 1961.

8. Levin, Harry, James Joyce : A Critical Introduction, Conn., 1941.

9. Magalaner, M.; Kain, R. M. Joyes : The Man, the Work, the Reputation, New York, 1956.

10. Tindall, W. Y. A Reader's Guide to James Joyce, London, 1960.

लेखक : म. द. हातकणंगलेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate