( ७ फेब्रुवारी १८१२–९ जून १८७०). विख्यात इंग्रज कादंबरीकार. लँडपोर्ट (आता पोर्टस्मथचा एक भाग) येथे मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण गरिबीमुळे अपुरे राहिले. लहानपणीच लंडनमधील एका वखारीत (वेअरहाउस) नोकरी करावी लागली. त्यानंतर कारकुनी व वृत्तपत्रीय वार्ताहराचे काम केले. ‘बॉझ’ ह्या टोपण नावाने व्यक्तिचित्रणपर वृत्तपत्रीय लेख लिहिले. १८३६ मध्ये त्याचे पहिले पुस्तक स्केचिस बाय बॉझ हे प्रसिद्ध झाले. द पिकविक पेपर्स ह्या त्याच्या पहिल्याच विनोदी लेखमालेने निर्माण झालेल्या कादंबरीमुळे लोकप्रियता मिळविली. त्यानंतर त्याने एकाहून एक सरस अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील ऑलिव्हर टि्वस्ट (१८३७–३९), निकोलस निकलबी (१८३८–३९), द ओल्ड क्यूरिऑसिटी शॉप (१८४०–४१), बार्नबी रज् (१८४०–४१), डॉथी अँड सन (१८४६–४८), डेव्हिड कॉपरफील्ड (१८५०), ब्लीक हाउस (१८५२–५३), हार्ड टाइम्स (१८५४), लिट्ल डॉरिट (१८५५), ए टेल ऑफ टू सिटीज (१८५९), ग्रेट एक्स्पेक्टेशन्स (१८६०–६१), अवर म्यूच्युअल फ्रेंड (१८६४–६५) आणि अपूर्ण राहिलेली द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड (१८७०) विशेष उल्लेखनीय होत. ह्यांव्यतिरिक्त नाटके, लघुकथा, प्रवासवर्णन वगैरे लेखन त्याने केले.
त्याच्या बहुतेक कादंबऱ्या नियतकालिकांतून क्रमशः प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे कथानकांच्या बांधणीला विस्कळीतपणा आला; व्यक्तिचित्रणांना प्राधान्य आले. व्यक्तिचित्रकार म्हणून डिकिन्झ प्रसिद्ध आहे. व्हिक्टोरियन समाजाच्या सर्व थरांतील–विशेषतः मध्यम वर्गीय व दरिद्री समाजातील–व्यक्तिचित्रे त्याने प्रभावीपणे रंगविली. व्यक्तिगत लकबींचे वा चमत्कृतींचे त्याला अधिक आकर्षण दिसते. राहणीतील व वागण्यातील चमत्कृतींचे वा लकबींचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केल्यामुळे त्याच्या लेखनात विनोद निर्माण होतो; पण ह्या विनोदामागील भूमिका जीवनाच्या कारुण्यावर सहृदयतेने भाष्य करण्याची–सर्व्हँटीझ, स्मॉलिट, फिल्डिंग, गोल्डस्मिथ आदी लेखकांच्या विनोद-परंपरेतील–आहे. व्यक्तिवैशिष्ट्यांचे बारकाव्याने वर्णन केल्यामुळे ही व्यक्तिचित्रणे जिवंत स्वरूपाची वाटतात. कोणत्याही समाजव्यवस्थेशी तडजोड न करता सहानुभूतीपूर्वक आविष्कृत केलेली व्यक्तिचित्रणे हे डिकिन्झच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण मानावे लागेल. तत्कालीन समाजातील घडामोडी तसेच राजकारण, अर्थकारण, शिक्षणसंस्था, न्यायदानाची अधिष्ठाने, वैद्यकव्यवसाय ह्या सर्वांतील यांत्रिकता, मानवतेचा अभाव आणि स्वार्थीपणा ह्यांचे अतिशय परिणामकारक चित्रण त्याच्या कादंबऱ्यांमध्ये दिसते. मार्टिन चझल्विट ह्या कादंबरीत अमेरिकन वृत्तपत्रव्यवसायावर त्याने परखड टीका केली.
डिकिन्झच्या कादंबरीलेखनात नीटस घाट दिसत नाही व त्यामुळे त्याच्यावर बरीच प्रतिकूल टीका झाली आहे; परंतु डेव्हिड कॉपरफील्ड, ए टेल ऑफ टू सिटीज, द ग्रेट एक्स्पेक्टेशन्स अशा काही कादंबऱ्यांमध्ये आकृतिबंधाचे सौंदर्य दिसून येते. डॉस्टोव्हस्की, टॉलस्टॉय वगैरे लेखकांच्या तुलनेने डिकिन्झचे मानवी स्वभावाचे विश्लेषण किंवा सामाजिक प्रक्रियांची जाणीव सखोल नाही; पण त्याच्या लेखनातील मानवी करुणा व चैतन्य ह्यांमुळे त्याला श्रेष्ठ साहित्यिक दर्जा मिळाला आहे. इंग्रजी कादंबरीवाङ्मयात डिकिन्झ हा एक अत्यंत महत्त्वाचा कादंबरीकार मानला जातो. गॅड्स हिल येथे तो निधन पावला. जॉन फॉर्स्टर आणि जी. के. चेस्टर्टन ह्यांनी लिहिलेली त्याची चरित्रे प्रसिद्ध आहेत.
संदर्भ : 1. Butt, John; Tillotson, Kathleen, Dickens at work, London. 1957.
2. Fielding, Kenneth J. Charles Dickens : A Critical Introduction, London, 1958.
3. Ford, George; Lane, Lauriat, Jr. Ed. The Dickens critics, Ithaca, New York, 1961.
4. Garis, Robert, The Dickens Theatre : A Re-Assessment of the Novels, London, 1965.
5. House, Arthur Humphrey, The Dickens World, London, 1941.
6. Johnson, Edgar, Charles Dickens : His Tragedy and Triumph, 2 Vols., New York, 1953.
7. Leavis, F. R.; Leavis, Q. D. Dickens the Novelist, 1971.
लेखिका: मु. गो. देशपांडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/30/2020