অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उमाशंकर जेठालाल जोशी

उमाशंकर जेठालाल जोशी

(२१ जुलै १९११). आधुनिक काळातील प्रख्यात गुजराती कवी, एकांकिका लेखक, निबंधकार व समीक्षक. जन्म साबरकांठा जिल्ह्यातील बमना ह्या गावी. शिक्षण मुंबई येथे एम्‌. ए. पर्यंत. सुरुवातीस मुंबई येथे ते शिक्षक व नंतर प्राध्यापक होते. नंतर ते गुजरात विद्यापीठात पदव्युत्तर अध्यापनासाठी गेले व पुढे तेथेच गुजरातीचे प्राध्यापक झाले. याच विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ लँग्वेजिस’ संस्थेचे ते संचालक झाले. १९६६–७२ ह्या काळात ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते. असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. संस्कृति  ह्या नियतकालिकाचे ते १९४७ पासून संपादक आहेत. १९५४ ते ७२ ह्या कालावधीत ते साहित्य अकादेमीचे सदस्य होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सभासद आहेत. ‘पेन’ संस्थेचे ते १९७३ पासून उपाध्यक्ष आहेत. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ चेही ते सभासद आहेत.

त्यांनी  चीन, इंडोनेशिया, मलाया, अमेरिका, ग्रेट ब्रिटन इ. देशांचा विविध कारणांनी प्रवास केला. भारत सरकारच्या शैक्षणिक अभ्यास मंडळातील एक प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही देशांना भेटी दिल्या. जपान येथील जागतिक ‘पेन’ मेळाव्यासही ते उपस्थित होते. १९६१ मध्ये रशियास गेलेल्या भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळातही ते होते. गुजरातीशिवाय त्यांना हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली व इंग्रजी ह्या भाषा चांगल्या अवगत असून ह्या भाषांतील साहित्याचाही त्यांचा व्यासंग सखोल आहे. प्रादेशिक व आखिल भारतीय स्तरांवरील विविध व सर्वोच साहित्यिक पुरस्कारही त्यांना लाभले. रणजीतराम सुवर्णचंद्रक (१९३९), महिदा पुरस्कार (१९४४), नर्मद सुवर्णपदक (१९४५), उमा स्‍नेहरश्मी पुरस्कार (१९६६), भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार (१९६७) व नानालाल काव्य पुरस्कार (१९६८) यांचा त्यांत अंतर्भाव आहे.

गुजरातीतील गांधी युगाचे प्रातिनिधिक कवी म्हणून 'सुंदरम्' (१९०८ -  ) यांच्याप्रमाणे उमाशंकर जोशी यांचेही स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे.उमाशंकरांनी विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. विश्वशांती  (१९३१), गंगोत्री (१९३४), निशीथ (१९३९), विराट प्रणय, प्राचीना (पद्यनाट्य, १९४४), आतिथ्य (१९४६), महाप्रस्थान ( १९६५), अभिज्ञा (१९६७) इ. काव्यग्रंथ; सापना भारा (१९३६) व शहीद (१९४८) हे एकांकिकासंग्रह; श्रावणी मेळो  (१९३७), विसामो (१९५९) इ. लघुकथासंग्रह; पारकां जण्यां (दुसरी आवृ. १९४७) ही कांदबरी;

अखो : एक अध्ययन (१९४१), समसंवेदन, अभिरुचि (१९५९), शैली अने स्वरूप (१९६०), निरीक्षा (१९६०), कविनी साधना (१९६१), श्री अने सौरभ (१९६३) इ. समीक्षाग्रंथ; गोष्ठी (१९५१) हा निबंधसंग्रह इत्यादींचा ह्या निर्मितीत समावेश होतो. प्रा. बळवंतराय ठाकोर (म्हरां सॉनेट, १९३५) आणि बालाशंकर (क्‍लान्त कवी, १९४२) ह्यांच्या काव्यांचे त्यानी उत्कृष्ट संपादनही केले आहे. पुराणोमां गुजरात (१९४६) हा त्यांचा महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ आहे. उत्तररामचरित  आणि शाकुंतल (१९५५) हे त्यांनी केलेले संस्कृत नाटकांचे अनुवाद होत.

संस्कृत वृतांत निबद्ध अशा विश्वशांति  ह्या पहिल्या काव्यात त्यांनी विशाल मानवतेचा व विश्वप्रेमाचा संदेश दिला आहे. प्राचीना  व महाप्रस्थान  ह्या दोन काव्यसंग्रहांतही त्यांनी महाभारत, रामायण, जातककथा इ. प्राचीन ग्रंथांतील तेजस्वी पात्रे व प्रसंगांवर रचिलेल्या रूपकांमधून उदात्त मानवतेचेच गुणगान केले आहे. विराट प्रणय ह्या काव्यात त्यांनी मानवसंस्कृतीलाच प्रेयसी कल्पिले आहे. उमाशंकरांच्या काव्यात वैविध्य असून विविध भावभावनांची व अनुभूतींची त्यांनी त्यात कलात्मक अभिव्यक्ती केली आहे. स्वातंत्र, समाजवाद, भव्योदात्तता, कारुण्य, चिंतनात्मकता यांचा त्यांच्या विविध काव्यांतून मनोहर आविष्कार आढळतो. निसर्गाची नाजुक, मनोहर व शिवकराल रूपे त्यांनी समर्थपणे चित्रित केली आहेत. निशीथमध्ये मध्यरात्रीच्या घनघोर अंधःकारासोबतच त्यांनी मानवाला उद्‌बोधनही केले आहे. निशीथला भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार प्राप्त झाला. प्रख्यात कन्नड कवी ⇨ के. व्ही. पुट्टप्प  व उमाशंकर जोशी यांना हा पुरस्कार विभागून मिळाला.

त्यांनी उत्कृष्ट एकांकिका लिहिल्या असून त्यांचे नाट्यरचनाकौशल्य त्यांत प्रकट झाले आहे. जीवनातील नाट्य टिपण्याचे त्यांचे कसब व त्यांची अभिजात काव्यप्रतिभा यांचा सुंदर समन्वय त्यांच्या प्राचीना  व महाप्रस्थानमधील ‘गांधारी’, ‘कर्ण-कृष्ण ’, ‘बाल राहुल’, ‘भरत’, ‘मंथरा’ इ. रूपक काव्यांत आढळतो. ‘अनुष्टुप’ व ‘उपजाती’ वृत्तातील रचनेत त्यांनी प्राचीन अभिजात काव्याची महनीयता जोपासली आहे, तर ‘वनवेली’ सारख्या उन्मुक्त छंदात त्यांनी नाट्यानुकूल अभिव्यक्तीला पूर्ण वाव दिला आहे. ह्या रूपकांतून स्वभावचित्रण, संघर्ष व संवादासारखी नाट्यतत्त्वे चांगली जोपासली असून कवीच्या प्रतिभेचा नवीन उन्मेष त्यांत प्रकट झाला आहे. बटुभाई उमरवाडिया यांनी गुजरातीत एकांकिका लिहिण्यास सुरुवात केली; परंतु उमाशंकर जोशी यांनीच एकांकिकांना सुधारित कलापूर्ण रुप दिले. सापना भारामधील त्यांच्या एकांकिका कलात्मक व ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यांची समीक्षा व निबंधलेखन विद्वत्तापूर्ण, मौलिक व मार्मिक असून त्यांची शैली सरळ, प्रासादिक व आकर्षक आहे.

लेखिका : सु. न. पेंडसे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate