অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इव्हान टुर्ग्येन्येव्ह

इव्हान टुर्ग्येन्येव्ह

(९ नोव्हेंबर १८१८–३ सप्टेंबर १८९३). विख्यात रशियन कथा-कादंबरीकार. मूळ रशियन उच्चार ‘तुर्गिन्येफ’. अर्योल येथे एका श्रीमंत जमीनदाराच्या कुटुंबात जन्मला. शिक्षण मॉस्को आणि पीटर्झबर्ग विद्यापीठांत झाले. १८३७ मध्ये पदवीधर झाला. त्यानंतर बर्लिन विद्यापीठात भाषाशास्त्र व मानसशास्त्र ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. विद्यार्थिदशेतच त्याने आपल्या लेखनास सुरुवात केली. ‘स्त्येनो’ (१८३४) ही नाट्यात्मक कविता म्हणजे त्याची पहिली लेखनकृती होय. ‘पराश’ (१८४३) आणि ‘पमेश्शिक’ (१८४६, इं. शी. द लँडलॉर्ड) ही त्याची त्यानंतरची काव्ये. ‘आंद्रेय कोलसव्ह’ (१८४४) ही त्याची पहिली कथा.

१८४३ मध्ये ब्यिल्यीन्स्कई ह्या समीक्षकाशी त्याचा स्नेह जुळला. त्याच्या लेखनामागील विचारांवर याचा प्रभाव पडला. त्याने १८४७ ते १८५२ पर्यंत लिहिलेल्या झापिस्की अखोत्निकामध्ये (इं. शी. अ स्पोर्ट्‌समन्स स्केचिस) ग्रामीण जीवनाची शब्दचित्रे रेखाटली आहेत. शेतमजुरांच्या वेठबिगारीविषयक स्वतःचा निषेधही नोंदविला आहे. तसेच जमीनदार व त्यांचे शेतमजूर यांच्यातील वर्गसंबंधाचा आर्थिक पायाही दाखवून दिला आहे. निसर्गास जवळ असलेल्या व नैतिक सौंदर्याचे अधिष्ठान लाभलेल्या बुद्धिमान, कष्टाळू व देशभक्त अशा शेतकऱ्‍यांच्या विरोधात येथे निष्ठुर अशा जमीनदारांचे चित्र त्याने मांडले आहे. या शब्दचित्रांनी त्याला तात्काळ प्रसिद्धी मिळवून दिली.

तरुण वयातच त्याने आपले पहिले नाटक निअस्तरोझनस्त् (१८४३, इं. शी. केअरलेसनेस) लिहिले. त्याच्या इतर महत्त्वाच्या नाटकांत, ज्यात ‘सामान्य माणसा’चे प्रश्न हाताळले आहेत अशा नाखल्येब्‌निक् (१८४८, इं. शी. पॅरसाइट) व लोकशाही वृत्तीच्या बुद्धिवादी वर्गाविषयी लिहिलेल्या मेस्पात्स व्ह दिरयेव्‌न्ये (१८५०, इं. शी. अ मंथ इन द कंट्री) आदींचा सामावेश होतो.

१८५० ते १८५९ च्या दशकात त्याने अनेक लघुकथा लिहिल्या. उदा., ‘मुमू’, ‘झातिश्ये’ (ए क्वाएट प्लेस), ‘द्‌वेव्‌निक लिश्नेव चिलव्हेका’ (इं. शी. द डायरी ऑफ अ सुपरफ्ल्यूअस मॅन), ‘पिरिपिस्का’ (इं. शी. कॉरस्पॉन्डन्स) इत्यादी. विषयदृष्ट्या पाहता या सर्व लघुकथा त्याच्या शब्दचित्रांशी मिळत्याजुळत्या होत्या. त्याच्या नंतरच्या काही कथा–उदा., ‘आस्या’ (१८५७), ‘पेरव्हया ल्युबोफ्’ (१८६०, इं. शी. फर्स्ट लव्ह) आणि ‘व्हेश्निये व्हदी’ (१८७१. इं. शी. स्प्रिंग टॉरेंट्स) इ. –म्हणजे प्रेमाला वाहिलेल्या खऱ्‍याखुऱ्‍या ऋचाच आहेत.

त्याची रशियन साहित्यास सर्वांत महत्त्वाची देणगी म्हणजे त्याच्या सहा कादंबऱ्‍या होत. सामाजिक-मनोविश्लेषणात्मक असलेल्या या कादंबऱ्‍यांत त्याच्या प्रतिभेचा संपूर्ण आविष्कार झालेला दिसतो. रुदिन (१८५६) या कादंबरीत अठराशेतिशी-चाळिशीच्या दशकातील तरुणाचे चित्र आहे. रुदिन हा फालतू माणसाचा खास प्रतिनिधी आहे. त्याची वाणी आणि कृती यांचा कधीच मेळ बसत नाही. सदैव आपल्याच स्वप्नांत डुंबत असलेला तो एक ध्येयवेडा आहे. द्वऱ्‍यान्स्कये ग्निझ्‌दो (१८५९, इं. शी. अ नेस्ट ऑफ जेंट्ल फोक) या दुसऱ्‍या कादंबरीत श्रीमंतांच्या अड्ड्यांचा ऱ्‍हास होत असल्याचे चित्र त्याने ठळकपणे रेखाटले आहे. येथे तो मोठ्या कौशल्याने फालतू माणसांच्या म्हणजे स्वप्निल व वास्तवापासून दूर असलेल्या श्रीमंतांच्या जीवननाट्यातील अंतर्विरोध, वाणी व कृती यांचा कधीच मेळ नसणाऱ्‍या लिवरेत्स्की या पात्राच्या रूपाने दाखवितो. रशियन उच्चभ्रू समाजात कुणी कर्ता नायक न दिसल्यामुळे त्याने नाकानून्ये (१८६०, इं. शी. ऑन द ईव्ह) या आपल्या पुढील कादंबरीत इन्सारफ या बल्गेरियन क्रांतिकारकास नायक बनविला आहे; नायिका इलेना ही मात्र रशियनच आहे.

अत्सी इ द्येति (१८६२, इं. शी. फादर्स अँड सन्स) या कादंबरीत दोन पिढ्यांतील वैचारिक अंतरांचा शाश्वत यक्षप्रश्न रंगविला आहे. तीत पावेल पित्रोविच या पात्राच्या रूपाने व्यक्तिवाद, आध्यात्मिक पोकळपणा आणि सर्वच गोष्टींबाबत एक प्रकारचा घमेंडी अलिप्तपणा यांचा पुतळा त्याने आपल्यापुढे उभा केला आहे. खतम होत चाललेल्या खानदानी वर्गाच्या या प्रतिनिधीचा, बझारफ या कादंबरीच्या तरुण नायकाच्या जडवादी, व्यवहारवादी कल्पनांशी सतत झगडा दाखविला आहे. बझारफच्या स्वभावातील काही वैचारिक गोंधळ जमेस धरूनही त्याच्यात अठराशेसाठच्या दशकातील लोकशाहीवादी विचारवंतांच्या स्वभावातील काही लक्षणीय खुणा दिसतात. उदा., तरुणांचे उच्च मानवतावादाचे स्वप्न. ही कादंबरी म्हणजे टुर्ग्येन्येव्हच्या सर्जनशीलतेचा कळसच म्हटली पाहिजे.

अठराशेसाठच्या दशकात त्याने सव्ह्‌रेमिन्निक (इं. शी. कंटेपररी) या नियतकालिकाचा आणि रशियातील क्रांतिकारी लोकशाहीवाद्यांचा निरोप घेतला आणि फ्रान्समध्येच बहुतेक वास्तव्य केले. आपल्या दीम (१८६७, इं. शी. स्मोक) आणि नोफ् (१८७७, इं. शी. व्हर्जिन सॉइल) या शेवटच्या दोन कादंबऱ्‍यांत प्रतिगामी खानदानी वर्गास असलेला आपला विरोध कायम ठेवूनही टुर्ग्येन्येव्ह पुष्कळच उदारमतवादी भूमिका घेताना दिसतो. पहिल्या कादंबरीत निराशावादी विचार आहेत, तर दुसरी क्रांतिकारी साम्यवादाबाबत आहे. त्याने आपल्या आयुष्याच्या अखेरीस स्तिखत्वरेनिया व्ह प्रोजे (इं. शी. पोएम्स इन प्रोज) सारख्या अत्यंत काव्यात्म अशा लेखनकृती निर्माण केल्या. त्याच्या आधीच्या लेखनकृतींतील बहुतेक सर्व विषयांशी व ज्ञापकांशी ही गद्यकाव्ये निगडित आहेत. त्यांतील ‘ब्राह्मण’ या नावाची एक कविता तर भारतीय जीवनविषयक तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे.

पुश्कीन आणि गोगोल यांचीच परंपरा पुढे चालवीत त्याने सार्वत्रिक आवाहन असलेल्या लेखनकृती निर्माण केल्या. रशियन स्त्रियांचा उच्च ध्येयवाद आणि त्यांच्या भावनांचे गहिरेपण व शक्ती यांची त्याने केलेली चित्रणे, सामाजिक प्रश्नांची त्याची पक्की उमज, त्याने हाताळलेल्या वाङ्‌मयप्रकारांची विविधता, अगदी मोजक्या शब्दांत भावचित्रे उभी करण्यातला त्याचा हातखंडा, अगाध काव्यात्मतेने ओथंबलेली त्याची अद्‌भुत निसर्गवर्णने, नेमकी, साधी, स्पष्ट आणि गेय म्हणून सर्वमान्य झालेल्या त्याच्या भाषेची व शैलीची किमया हे सर्व गुण त्याला महान रशियन लेखकांच्या पंक्तीत बसवितात. शेक्सपिअर आदी बड्या पाश्चात्त्य लेखकांशीही त्याची तुलना केली जाते. रशियन समाजाच्या बौद्धिक आणि नैतिक विकासात त्याचप्रमाणे, रशियन आणि जागतिक साहित्याच्या इतिहासात त्याचे स्थान मोठे आहे. त्याचा फ्रान्समधील पॅरिस जवळच्या बुझीव्हिल येथे अंत झाला व त्याच्या अखेरच्या इच्छेनुसार पीटर्झबर्ग येथे त्याचे दफन झाले.

जगातील अनेक भाषांत टुर्ग्येन्येव्हच्या साहित्यकृतींचे अनुवाद झालेले आहेत. त्याच्या ‘व्हर्जिन सॉइल’ आणि ‘फादर्स ॲड सन्स’ ह्या कादंबऱ्‍यांचे मराठी अनुवाद वि. वा. हडप ह्यांनी अनुक्रमे झोपी गेलेला देश (१९४६) आणि बाप-लेक (१९४७) ह्या नावांनी केले आहेत.

संदर्भ :1. Freeborn, Richard, Turgenev, the Novelists' Novelist, New York, 1960.

2. Magarshack, David, Turgenev, a Life, New York, 1954.

3. Yarmolinsky, Avrahm, Turgenev : the Man, His Art, and His Age, New York, 1959.

लेखक :१)  म. प. (इं.) पांडे

२) द. य. (म.) राजाध्यक्

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate