(२१ जून १९१०–१८ डिसेंबर १९७१). आधुनिक रशियन कवी. स्मोलेन्स्क प्रांतातील एका खेड्यात जन्म. ‘नोवाया इज्बा’ (१९२५, इं. शी. न्यू हट) ही त्याची पहिली कविता स्मोलेन्स्क व्हिलेज या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. स्त्रानामुराविया (१९३६, इं. शी. द लँड ऑफ मुराविया) या दीर्घकाव्याने त्याला कीर्ती लाभली. या कवितेत खेड्यातील सामाजिक स्थित्यंतराचे चित्रण आहे. त्याच्या अन्य प्रमुख काव्यांमध्ये ‘वासीली त्योर्किन’ (१९४२–४५) ही एका सैनिकाच्या युद्धविषयक अनुभूतींचे चित्रण असलेली प्रदीर्घ कविता, तसेच ‘दोम उ दरोगी’ (१९४६, इं. शी. हाउस ऑन द रोड), ‘जा दाल्यू दाल्’ (१९५८–६०, इं. शी. डिस्टन्सेस बियाँड डिस्टन्सेस), ‘त्योर्किन ना तोम स्वेते’ (१९५४–६३, इं. शी. त्योर्किन इन द अदर वर्ल्ड) इत्यादींचा समावेश होतो. होमलँड अँड स्ट्रेंज लँड (१९४७) हा त्याचा लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. त्याने नोवी मीर (इं. शी. न्यू वर्ल्ड) या वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक या नात्याने केलेले कार्य विशेष महत्त्वाचे आहे. १९६२–७० या कालखंडात त्याने अनेक तरुण व उदयोन्मुख लेखकांना संधी देऊन पुढे आणले. त्यांत प्रख्यात साहित्यिक सोत्झेनित्सीनचाही समावेश होतो. त्याने साहित्यविषयक लिखाणही केले आहे. त्याला मिळालेल्या विविध शासकीय पारितोषिकांत (१९४१, १९४६, १९४७, १९६१) लेनिन पारितोषिकाचाही (१९६१) अंतर्भाव होतो. मॉस्को येथे दीर्घकालीन आजारानंतर त्याचे निधन झाले.
लेखक : १) म. प. (इं.) पांडे,
२) श्री. दे. (म.) इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/6/2019