जन्म : १ ऑगस्ट १८७९
मृत्यू : १५ जून १९३१
मराठी पत्रकार, लेखक आणि वक्ते. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकीलआणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते. अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव ह्यांनी केल्यामुळे अच्युतराव त्यांचे नाव लावीत. बी.ए.एल्एल्.बी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सातारा आणि नागपूर येथे अनुक्रमे शिक्षक व वकील म्हणून काम केले. १९०७ मध्ये देशसेवक ह्या पत्राचे संपादक होऊन जहाल राष्ट्रवादी राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्याबरोबरच त्यांची अनेक चढउतारांनी भरलेली राजकीय आणि वृत्तपत्री कारकीर्द सुरू झाली. ह्या कारकीर्दीत १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचा जहाल भाषेत पुरस्कार केल्याबद्दल आणि १९३० मध्ये गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.
त्यांनी १९१५ साली काढलेल्या संदेश ह्या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीचा गंभीर चेहरामोहराच बदलून टाकला. भावनेला आवाहन करणारे, तसेच कल्पकतेने आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवून टाकणारे अग्रलेख, ‘संदेशचा अहेर’, ‘बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, ‘चहा, चिवडा, चिरूट’, ‘संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, चित्तवेधक बातम्या, आकर्षक मथळे ह्यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी चालू केलेल्या मेसेज (१९१७) ह्या इंग्रजी वृत्तपत्राचा मात्र जम बसला नाही. संदेश लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच सरकारी अवकृपेस बळी पडला. पुढे संजय, चाबूक, चाबूकस्वार ह्यांसारखी अनेक पत्रे त्यांनी काढली. पटवर्धन व तुळजापूरकर ह्यांच्या साहाय्याने श्रुतिबोध (१९१२) आणि उषा (१९१३) ही मासिके चालविली. सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख (१९१५), चोरी कशी करावी? (१९२५), अच्युतराव कोल्हटकर स्मारक ग्रंथ (भाग १ ते ३, १९३३–३५) इ. पुस्तकांतून त्यांचे निवडक लिखाण संकलित झालेले आहे.
स्वामी विवेकानंद (आवृ. दुसरी, १९१६), नारिंगी निशाण (१९१७) व संगीत मस्तानी (१९२६) यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. स्वत:ची नाटक कंपनी काढून काही नाटकांतून भूमिका केल्या. काही कादंबऱ्या लिहिल्या, तथापि ‘संदेशकार’ हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा. होती. लोकमान्य टिळकांवरील मृत्युलेख, ‘मराठी काव्याची प्रभात’, ‘शेवटची वेल सुकली’, ‘दोन तात्या’, ‘पुणेरी जोडे’, ‘माधवाश्रमात शिवाजी’ ह्यांसारखे त्यांचे वेचक लेख वृत्तपत्रीय मराठी साहित्याची भूषणे होत.
संदर्भ : गद्रे, अनंत हरि, संपा. अच्युतराव कोल्हटकर स्मारक ग्रंथ, भाग १ ते ३, मुंबई, १९३३, ३४, ३५.
लेखक : स.गं.मालशे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/29/2020