অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अक्षयकुमार दत्त

अक्षयकुमार दत्त

(१५ जुलै १८२०– ? १८८६). बंगाली साहित्यिक. नडिया जिल्ह्यातील चुपीग्राम गावी जन्म. पिता पीतांबर दत्त, माता दयामयी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. फार्सी व संस्कृतचाही त्यांनी अभ्यास केला. नंतर कलकत्त्यास ते इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, जर्मन शिकू लागले. तथापि वडिलांच्या आकस्मिक निधनाने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. गणित, विज्ञान, भूगोल इ. विषयांत त्यांची चांगली गती होती. अक्षयकुमार प्रथम शिक्षक होते. त्यांनी देवेंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या तत्त्वबोधिनी पत्रिका या प्रसिद्ध नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली (१८४३). तरुणपणी अक्षयकुमारांचा ईश्वरचंद्र गुप्त (१८१२–५९) यांच्याशी संबंध आला. अक्षयकुमार ब्राह्मधर्माचे पुरस्कर्ते होते आणि ब्राह्मधर्मिय चळवळीच्या इतिहासात त्यांचे नाव चिरंतन झालेले आहे. प्रथम त्यांनी त्या काळी प्रचलित असलेल्या पद्धतीस अनुसरून पद्यात ‘असंगमोहन’ नावाची एक रम्याद्‌भुत कथा लिहिली होती. आता ती उपलब्ध नाही. अक्षयकुमारांचे बहुतेक लिखाण तत्त्वबोधिनी पत्रिकेत प्रसिद्ध झाले. त्यांचा पहिला गद्यग्रंथ भूगोल.  नंतर चारुपाठ  (३ भाग, १८५३–५९), पदार्थविद्या  (१८५६), बाह्य वस्तूर सहित मानवप्रकृतीर संबंध–विचार (२ खंड–१८५१,५३), धर्मनीति  (१८५६) हे त्यांचे प्रसिद्ध झालेले ग्रंथ लोकादरास विशेष पात्र ठरले. अक्षयकुमारांनी इतिहास, भूगोल, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. नानाविध विषयांवर निबंध, प्रबंध लिहिले. दोन खंडांत लिहिलेला भारतवर्षीय उपासक संप्रदाय (१८७०, ८३) हा त्यांचा श्रेष्ठ ग्रंथ समजला जातो.

अक्षयकुमारांची भाषा आणि लेखनशैली सोपी, सरळ व चमकदार आहे. बंगाली गद्याची सुधारणा करण्यात ते ईश्वरचंद विद्यासागरांचे प्रमुख सहकारी होते. बंगालमधील नवयुगनिर्मितीत अक्षयकुमारांचा वाटा उल्लेखनीय आहे. पाश्चात्त्य वैज्ञानिक पद्धतीने ज्ञानविज्ञानाच्या परिशीलनाची प्रथा प्रथम अक्षयकुमारांनीच बंगालमध्ये आणली.

लेखक : १) सुकुमार (बं.) सेन,

२) सरोजिनी (म.) कमतनूकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate