विनोद हा जीवनाशी अपरिहार्यपणे संबद्ध असल्याने तो प्राचीन मराठी साहित्यातही थोड्या फार प्रमाणात का होईना, प्रकट होणे अपरिहार्य होते. श्रीचक्रधरांचे जीवन चित्रित करणाऱ्या लीळाचरित्र या मराठीतील आद्य चरित्रग्रंथात तसेच तुकाराम, एकनाथ यांच्या काव्यांत काही उत्तम विनोदस्थळांच्या आढळ होतो. मात्र अर्वाचीन मराठी साहित्यातील विनोदाला प्राचीन साहित्यातील विनोदाची परंपरा आहे, असे म्हणता येत नाही. गद्यवाङमयाची सातत्यपूर्ण परंपराच राहिली नव्हती. इंग्रजी सत्तेच्या आगमनानंतर, इंग्रजी साहित्याच्या द्वारा, इंग्रजांचा प्रभाव येथील सामाजिक, वाङमयीन, सांस्कृतिक जीवनावर पडला. त्यातून निर्माण झालेल्या काही आधुनिक वाङमयप्रकारांप्रमाणे स्वतंत्र विनोदी साहित्याचे दालनही विसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्माण झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही वर्तमानपत्रांतून परमतखंडनार्थ कधी कधी उपहासाचा वापर केलेला आढळतो. रंजनार्थ व पानपूरके म्हणून चुटके, आख्यायिका छापलेल्या आढळतात. संगीत सौभद्रसारख्या स्वतंत्र व फाल्गुनरावसारख्या रूपांतरित नाटकात विनोदाची निर्मिती केलेली दिसते. तरी विनोद वाङमय या नावाने ओळखला जावा असा स्वतंत्र वाङमयविभाग निर्माण करण्याचे व एका नव्या वाङमयप्रथेला जन्म देण्याचे श्रेय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याकडे जाते.
कोल्हटकरांनी १९०२ मध्ये आपला पहिला विनोदी लेख ‘साक्षीदार’ हा विविधज्ञानविस्तारमध्ये लिहिला.सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे ह्यां त्यांच्या विनोदी लेखसंग्रहाची पहिली आवृत्ती १९१० मध्ये व बत्तीस लेखांची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी या नावे १९२३ मध्ये प्रसिद्ध झाली. कोल्हटकरांनी आधुनिक मराठी साहित्यात केवळ विनोदी वाङमय म्हणता येईल, अशा लेखनाची प्रथा सुरू केली; एवढेच नव्हे, तर विनोदी वाङमयाचे अत्यंत संपन्न स्वरूपही दाखविले. जीवनदर्शन व रंजन या द्विविध प्रेरणांतून त्यांनी विशेषत: उपहासरूप व कोटीरूप ही दोन विनोदरूपे निर्माण केली. सामाजिक जीवनातील व्यंगांचे भेदक परंतु तितकेच विनोदात्मक चित्रण करून व्यंगरहित जीवनाची जाणीव करून देणे ही जीवनदर्शनाची मूल्यनिष्ठ प्रेरणा त्यांच्या उपहासरूप विनोदाच्या मुळाशी आहे.
धार्मिक, सामाजिक, वाङमयीन व सांस्कृतिक जीवनातील अनेकविध व्यंगांचा प्रखर उपहास त्यांनी ‘शिमगा’, ‘श्रावणी’, ‘गणेशचतुर्थी’, ‘धर्मांतर’, ‘यश:सिद्धीचे सोप व अचूक मार्ग’ , ‘साहित्यसंमेलनाची तयारी’ ‘वर्तमानपत्रकर्ता’, ‘चोरांचे संमेलन’ ‘गवई’ इ. लेखांतून केला आहे. वास्तवातील अनुभवांची मोडतोड करून तो विक्षिप्त (वि + क्षिप् = विपरीत ठिकाणी ठेवणे) रूपात ठेवणे ह्यामुळे जे विनोदरूप निर्माण होते, त्याला कोटीरूप असे येथे संबोधले आहे. अशा विनोदाच्या मुळाशी मुख्य प्रेरणा असते ती रंजनाची. ह्या प्रेरणेतून ‘आमचे बैठे खेळ’, ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ इ. उत्कृष्ट लेख कोल्हटकरांनी लिहिले आहेत. श्रीपाद कृष्णांच्या विनोदी लेखनाला जो सकसपणा प्राप्त झाला आहे तो त्यांच्या समृद्ध वाङमयीन व्यक्तिमत्वामुळे. ते माणुसकीवर श्रद्धा ठेवणारे; समता, स्वातंत्र्य या मूल्यांची कदर करणारे व अव्वल दर्जाची सौंदर्यग्राही दृष्टी असलेले लेखक होते.
समकालीन जीवनाला मूल्यनिष्ठ दृष्टीने सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती होती. म्हणूनच विषमतेवर आधारलेला, व्यक्तीच्या स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याचा संकोच करणारा हिंदू धर्म त्यांच्या उपहासाचा एक प्रमुख विषय झाला. धार्मिक, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातून उपहासविषय निवडताना त्यांच्या मनात मूल्यभाव होता. व्यंगाचा उपहास करून अव्यंग जीवनाची स्पृहा निर्माण करणे हा त्यांच्या उपहासपर लेखनाचा हेतू. आपणाला जो सिद्धांत मान्य असेल, त्याच्या विरोधी असणारा अपसिद्धांत घटकाभर खरा मानल्यास त्यापासून निघणारी अनुमानपरंपरा आपल्या पूर्वानुभवांशी किती विसंगत व हास्यापद ठरते, हे दाखविणे ही त्यांची उपहासनिर्मितीची पद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.त्यांचा जो कोटीरूप विनोद आहे, त्यामध्ये त्यांची विरुद्ध कल्पनांचा न्यास साधणारी वरच्या दर्जाची कल्पकता आढळते. शब्दवापरातील चोखंदळपणा, वाक्यरचनेतील सहेतुकता व एकंदर निर्मितीमागील परिश्रमशीलता ही वैशिष्ट्ये त्यांच्या सार्या्च विनोदी लेखनात दिसतात.
श्रीपाद कृष्णांनी मराठीमध्ये स्वतंत्र विनोदी लेखनाचे प्रवर्तन केले हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहेच; परंतु त्यांच्या वाङमयाचा ठसा अनुगामी लेखकांवर उमटलेला जो दिसतो, तो त्यांच्या विनोदाच्या गुणवत्तेचा निदर्शक आहे. त्यांनी आपल्या विनोदी लेखाचे स्वरूप प्राधान्याने निबंधात्मक ठेवले असले, तरी त्यांनी मुखवटा धारण करणारी सुदामा, बंडूनाना, पांडुतात्या ही काल्पनिक पात्रे निर्माण करून ती विविध घटनाप्रसंगांतून नेली; विनोदासाठी स्फुट विषय निवडले; विनोदनिर्मितीसाठी कल्पनांचा विरोधात्मन्यास साधणारी शैली निर्माण केली व या शैलीवैशिष्ट्यांचा त्यांनी समर्थपणे उपयोग केला. श्रीपाद कृष्णांची जीवनदृष्टी व मूल्यनिष्ठा आत्मसात करता आली नाही, तरी पुढील अनेक लेखकांनी त्यांच्या शैलीचे अनुकरण करून विनोदी लेखन केलेले दिसते. ‘मराठी भाषेतील विनोदपीठाचे आचार्य’ असे न.चिं. केळकर यांनी केलेले त्यांचे वर्णन रास्त म्हणावे लागते.
कोल्हटकरांचे शिष्यत्व अभिमानाने मिरवणाऱ्या राम गणेश गडकरी यांनी नाटककार म्हणून तसेच विनोदी लेखक म्हणून अफाट लोकप्रियता मिळविली. त्यांनी आपले विनोदी लेखन ‘बाळकराम’ या टोपणनावाने प्रसिद्ध केले. त्यांचे सर्व विनोदी लेखन संपूर्ण बाळकराम (१९२५) या पुस्तकात ग्रंथित केलेले आहे. विनोदनिर्मितीला अत्यंत आवश्यक असलेली तरल कल्पनाशक्तीची देणगी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती व उत्तम भाषाप्रभुत्व त्यांना लाभले होते. या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या नाटकातील विनोद, तसाच त्यांचा स्फुट लेखनात्मक विनोदही अत्यंत लोकप्रिय ठरला. त्यांच्या नाटकातील विनोद स्वतंत्र निर्मिती असल्यासारखा स्वतंत्र प्रवेशातून प्रकट होऊन वाचकांचे रंजन करतो. प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ह्या त्यांच्या नाटकांतील गोकुळ, नुपूर-कंकण, सुदाम, इंदु-बिंदू; महेश्वर (कामण्णा) ह्या पात्रांच्या ठिकाणी गडकऱ्या नी एकेक हास्यजनक वैगुण्य कल्पून विनोदनिर्मिती केली आहे.
त्यांच्या ‘कवींचा कारखाना’ मधील उपहास, ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’ – मधील ‘विहिणीची रेवडी’, ‘गुळाचा गणपती’ इ. पदार्थांच्या विडंबनपर कृती वर्णन करताना साधलेला कोटीबाजपणा सरस आहे. ‘वरसंशोधन’, ‘लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी’ आणि ‘लग्न मोडण्याची कारणे’ हे लेख कोल्हटकरांच्या अनुकरणातून, विवाहसंस्थेला प्राप्त झालेल्या बाजारी स्वरूपाचा उपहास करून सामाजिक दोषदिग्दर्शनाच्या व सुधारणेच्या हेतूने लिहिल्यासारखे भासत असले, तरी तसा फारसा गंभीर हेतू त्यांच्या मनात असल्याचे जाणवत नाही. ते अतिरेकी कल्पनांच्या मागे इतके ओढले जातात व एवढी अतिशयोक्ती करतात, की तिची परिणामक्षमता कमी होते. लेखक म्हणून मानवतावादाची बैठक नसल्याने ठकीच्या कुरूपतेचा ते मनसोक्त उपहास करतात. कोल्हटकरांप्रमाणेच त्यांनी बाळकराम, तिंबूनाना व भांबूराव ही पात्रे निर्माण केली खरी; परंतु त्यांनी जिवंत तर नव्हेच; निव्वळ सुसंगत व्यक्तिमत्वेसुद्धा प्राप्त होत नाहीत.
त्यांच्या चांगल्या विनोदाची उदाहरणे म्हणून ‘कवींचा कारखाना’, ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’, ‘सकाळचा अभ्यास’, ‘छोट्या जगूचा रिपोर्ट’ अशा थोड्याच कृतींचा निर्देश करणे शक्य आहे. त्यांचा विनोद वा.म. जोशी यांच्या शब्दांत सांगावयाचे, तर अतिशयोक्तीच्या उलटसुलट कोलांट्या उड्या मारणारा आहे. लेखक म्हणून मानवतावादी बैठक, पुरोगामी जीवनसन्मुख दृष्टिकोण व मूल्यनिष्ठा यांचा त्यांच्या ठिकाणी अभाव असल्याने त्यांच्या विनोदाला सखोलपणा व गुणवत्ता प्राप्त होत नाही. कोल्हटकरांनी प्रचलित केलेल्या उपहासपर व कोटीरूप विनोदाचीच त्यांनी प्राधान्याने निर्मिती केली. स्तिमित करून टाकणारी कल्पनाशक्ती व विनोदनिर्मितीच्या तंत्रावरील प्रभुत्व इ. शैलीवैशिष्ट्यांनी गडकऱ्या चा विनोद अतिशय लोकप्रिय मात्र ठरला.केवळ विनोदी लेखन करून चिं.वि. जोशी यांनी स्वतःसाठी मराठी वाङमयात अढळ स्थान निर्माण केले.
केवळ विनोद (विशुद्ध विनोद) म्हणून ओळखले जाणारे विनोदरूप मराठी वाङमयात त्यांनी प्रथमतःच संपन्न स्वरूपात आविष्कृत केले. एरंडाचे गुर्हायळ (१९३२), वायफळाचा मळा (१९३६) ह्या त्यांच्या पहिल्या दोन पुस्तकांतील ‘कंपॉझिटरचा सूड’ ‘स्मरणशक्तीचे प्रोफेसर’, ‘मुशियन वाङमयाचा परिचय’ इ. लेखनकृतींमध्ये शब्दनिष्ट व उपहासरूप विनोद प्रकट होतो. मात्र त्यांनी चिमणरावांचे चर्हाट (१९३३) पासून चौथे चिमणराव (१९५८) पर्यंत चिमणराव व त्याचा गोतावळा यांवरील कथांतून महाराष्ट्रातील पांढरपेशा मध्यमवर्गीयांचे तीन पिढ्यांच्या जीवनांचे अनेक अंगांनी भरघोस चित्रण केले आहे. स्फुट विनोदी गोष्टींत अवतरणाऱ्याह भीमाआजी खाणावळवालीच्या आत्मकथेतून (‘चार दिवस सुनेचे’) टिळककालीन पुण्यातील कौटुंबिक जीवन राजकीय – सामाजिक ताणांसह प्रकट होते. पुढच्या पिढीतील चिमणरावांचे जीवन त्यांचे कुटुंबीय, गुंड्याभाऊसारखे नातलग, गुलाब दिघे, प्रो. हवालदार यांसारखी घरोब्यातील मंडळी यांसह आविष्कृत होते. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि मोठी झालेली मोरूमैनाची पिढीही त्यांनी रंगविली आहे. त्यांनी सु. तीन तपे निष्ठावंतपणे विनोदी वाङमयाची निर्मिती केली.
विडंबनाच्या द्वारा चांगल्या प्रतीचा उपहास ते साधू शकतात हे लंकावैभव (१९४७) सारख्या वृत्तपत्रीय नीतीचा व रीतीचा उपहास करणाऱ्याभ पुस्तकातून तसेच ‘मुशियन वाङमयाचा परिचय’ सारख्या आधीच्या लेखांतून त्यांनी दाखवून दिले आहे. मात्र उपहासावर त्यांनी आपला वाङमयप्रपंच थाटला नाही. विनोदनिर्मिती करणाऱ्याह तांत्रिक वैशिष्ट्यांचा उपयोग करून वास्तव जीवनाचे चित्रण करणारा केवल विनोद निर्माण करणे हे चि.वि. जोशी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ठरते. सर्वसामान्य माणसांच्या नात्यांतील प्रेमळपणा, गुंतागुंत, त्यांच्यामधील हेवेदावे, त्यांची स्वार्थपरता तसाच त्यांचा चांगुलपणा या साऱ्या चे चिं.वि. जोशी लेखकाच्या भूमिकेवरून आकलन व चित्रण करतात. ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ , ‘बोळवण’ इ. कथा उत्कृष्ट ठरल्या आहेत.
कोल्हटकर-गडकऱ्या सारखा बुद्धिविलास व कल्पनावैभव ते प्रकट करीत नाहीत. आपल्या पात्रांचा बौद्धिक मगदूर लक्षात घेऊन त्यांच्या कुवतीच्याच कोट्या त्यांच्या तोंडी ते घालतात. पात्रांची भाषाही प्रादेशिक, सांस्कृतिक व बौद्धिक वैशिष्ट्यांनुसार वापरतात. भाषेचे कृत्रिम वळण मोडून घरगुती पद्धतीची भाषा विनोदी लेखनात त्यांनीच प्रथम अवलंबिली. पात्रांच्या मूर्खपणाचा सौम्य उपहास ते करतात; त्यामध्ये मर्मभेदक प्रहार मात्र नसतो. लेखकाच्या ठिकाणी अभिप्रेत असलेला व्यापक सहानुभाव, मानवतावादी दृष्टिकोण, जीवनसन्मुख मूल्यनिष्ठ दृष्टी त्यांच्या ठिकाणी असल्याने त्यांचा विनोद श्रेष्ठ दर्जाचा ठरला असून आजही रसिकांच्या अंतःकरणापर्यंत तो पोहोचू शकतो.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात विनोदाची निर्मिती करून अफाट लोकप्रियता मिळविणारे लेखक म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे हे होत. त्यांच्या विनोदाचा आविष्कार स्फुट लेखनापेक्षा नाटक, चित्रपट, व्याख्याने यांमधूनच मुख्यतः झाला आहे. रविकिरण मंडळातील कवींची लेखनशैली, विषय, वृत्ती यांतील हास्यापद वाटणाऱ्या बाबींचे विडंबन त्यांनी झेंडूची फुले (१९२५) या संग्रहातून अत्यंत प्रभावीपणे केले व विडंबनाचा एक नवा प्रकार मराठीमध्ये आणला. उपहासिनी (१९३६) हा प्रातिनिधिक विडंबनकवितांचा संग्रह दि.वि. देवांनी प्रसिद्ध केला. अत्रे ह्यांच्या ब्रँडीची बाटली (दुसरी आवृ. १९४४), साखरपुडा (१९४२) या कथासंग्रहांतील ‘जांबुवंत दंतमंजन’, ‘गुत्त्यात नारद’ यांसारख्या कथांतील विनोद अतिशोयक्ती, कल्पनाचमत्कृती व उपहास यांवरच आधारलेला असून ते गडकरी शिष्य असल्याचा प्रत्यय देणारा आहे. त्यांच्या विनोदाचा विमुक्त आविष्कार साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५) यांसारख्या नाटकांतून व ब्रह्मचारी, पायाची दासी, मोरूची मावशी यांसारख्या चित्रपटांतून होतो.
रावबहाद्दूर, भद्रायू इ. विनोदी पात्रांची निर्मिती त्यांनी कोणत्या ना कोणत्या छांदिष्टपणाच्या वा व्यंगाच्या आधारे केलेली असली, तरी त्यांचे मानवी रूप लक्षात यावे असाही त्यांचा प्रयत्न असतो. कमालीचा विमुक्तपणा हे अत्र्यांऱ्याऱ्याऱ्याच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कल्पनेची भरारी, चमत्कृतिपूर्णता, वेधक कोटीबाजपणा ही गडकऱ्यापचीच वैशिष्ट्ये त्यांच्या ठिकाणी आढळतात. उत्तम गद्यशैलीमुळे त्यांचा विनोद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. अत्र्यांऱ्याऱ्याऱ्यानी आपल्या उत्तरकाळात विनोदाकडे साधन व त्यातल्या त्यात शस्त्र म्हणूनच पाहिले व त्याचा उपयोग राजकीय प्रचारासाठी वृत्तपत्रांतून व व्याख्यानांतून केला. तेव्हा त्यांच्या विनोदाला जालीम उपरोधाचे व अनेकदा शिवराळपणाचे रूप आलेले दिसते. मात्र विडंबने, नाटक – चित्रपट व व्याख्याने यांद्वारा महाराष्ट्रात विनोद लोकप्रिय करण्याचे कार्य त्यांनी केले हे नि:संशय.
पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर (१८७९-१९३१) यांनी वृत्तपत्रातून जे विनोदी लेखन केले त्यांपैकी सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख (१९१५) हे सौम्य उपहास व संयम यांमुळे वाचनीय ठरले. वा.म. जोशी यांच्या स्मृतिलहरी (१९४२) मधील प्रेमगर्भ विनोदाचा दर्जा फारच वरचा आहे. शामराव ओक यांचा कल परिहासापेक्षा उपहासाकडे अधिक आहे, हे त्यांच्या धोत्र्याऱ्याऱ्याऱ्याचे कळे (१९४४), परिहास (१९५५) या संग्रहांवरून जाणवते. अनुरूप वातावरणाची निर्मिती, संवादांचा चटकदारपणा व विडंबनाचे कौशल्या ही त्यांच्या विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये होत. वि.वि. बोकील ह्यांचे सगळेच लेखन खुसखुशीत म्हणण्याजोगे आहे; मात्र लक्षणीय विनोदाची निर्मिती त्यांच्या हातून घडते असे दिसत नाही. अ.वा. वर्टी यांच्या कथांमध्ये चमत्कृतीचा उपयोग करून विनोदात्म कथानकाची निर्मिती केलेली असते व त्यापाठीमागे त्यांचा प्रेममूलक दृष्टिकोण असतो, हे त्यांच्या दंतकथा (१९४७), टालडुप्पो वांगिमाडू (१९५०) ह्यांसारख्या कथासंग्रहांतील कथांतून जाणवते.
स्वातंत्र्योत्तर काळात विनोद नवनवीन शैलींत आणि विविध रूपांतून प्रगट होऊन त्याचा विकास झाला. काही चांगल्या दर्जाचा विनोद जीवनदर्शनाच्या प्रेरणेतून, मूल्यनिष्ठेतून निर्माण झाला, तर रंजनाच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या कोटीरूप विनोदाचे काही चांगले नवे आविष्कार प्रकट झाले.
१९४० नंतरचे विशेष महत्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय विनोदी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे होत. बुद्धिमान गद्य विडंबनकार म्हणून त्यांचा प्रथमतः ‘महाराष्ट्रातील सहानुभाव संप्रदाय’, ‘लोकमात पण (सापत्न)’ ‘अंगुस्तान विद्यापीठ’, ‘त्याचे व्यवच्छेदक लक्षण’ इ. खोगीरभरती (१९४९), नस्ती उठाठेव (१९५२) या संग्रहांतील लेखांच्या द्वारा प्रभाव पडला. नंतर त्यांनी विनोदरूपाचे नवनवे आविष्कार करून आपली स्वत:ची अशी खास भर मराठी विनोदी वाङमयात घातली. ‘चितळे मास्तर’, ‘अंतू बरवा’, ‘नारायण’ ही व्यक्तिचित्रे व्यक्ती आणि वल्ली, १९६२) लिहून व्यक्तिचित्रे विनोदात्म करता येतात हे त्यांनी दाखवून दिले आणि केवल विनोदाचा एक नवा आविष्कार साधला. अनेक सांस्कृतिक अंगांनी युक्त असणारे कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या एका चाळीमधील सामूहिक जीवनाचे विनोदात्म चित्र त्यांनी बटाट्याची चाळ (१९५८) मध्ये रेखाटले आहे. मात्र त्यामधील लेखांना विडंबन – उपहासाची जोड त्यांनी दिली आहे.
संपूर्ण प्रवासवर्णन विनोदाच्या सुरात लिहिणे हा पु.ल. देशपांडे यांनी केलेला विनोदाचा एक नवा आविष्कार अपूर्वाई (१९६०) मध्ये प्रगट झाला. पूर्वरंग (१९६५) हे त्यांचे अशा प्रकारचे दुसरे उल्लेखनीय पुस्तक. एका विशिष्ट संस्कृतीत घडलेल्या व्यक्तीच्या मनावर जेव्हा परकीय संस्कृतीचे आघात होतात, तेव्हा विनोददृष्टी असणाऱ्या ला विनोदनिर्मितीची सामग्री सुलभपणे मिळू शकते, हे पु. लं. नी. समर्थपणे दाखविले आहे. पु.ल. देशपांडे हे यशस्वी आणि लोकप्रिय नाटककारही आहेत. नाटकातील पात्रांना व्यंगचित्राचे रूप न देता, वास्तव चित्रण करून, विनोदाची निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न तुझे आहे तुजपाशी (१९५७) मध्ये यशस्वी झालेला आहे. आचार्य आणि काकाजी या व्यक्तिरेखा मराठी माणसाच्या ओळखीच्या होऊन बसल्या आहेत. पु.ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी युक्त आहे. साहित्याप्रमाणेच संगीत, चित्र, नाट्य इ. कलांची त्यांना उत्तम जाण आहे. चोखंदळ विनोददृष्टीच्या जोडीला मानवतावादी दृष्टिकोण व मूल्यात्मकतेची जाणीव; संगीत, चित्र, नाट्य इ. कलांची जाण यांमुळे आलेली विदग्धता व आदर्शाच्या ओढीने आलेली चिंतनशीलता यांमुळे त्यांच्या विनोदाला गुणवत्ता प्राप्त झाली आहे. साहित्य व नाटक यांप्रमाणेच व्याख्याने आणि एकपात्री प्रयोग यांच्या द्वारा त्यांचा विनोद महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचला आहे.
लघुकथा या साहित्यप्रकारात कोटी, उपहास व केवल विनोद या तीनही प्रकारचा उत्तम विनोद ग्रामीण कथेत द.मा. मिरासदार व शंकर पाटील यांनी प्रकट केला आहे. मिरासदरांनी ‘माझ्या बापाची पेंड’, ‘व्यंकूची शिकवणी’ (बापाची पेंड) या कथांमध्ये स्थानांतर हे तंत्रवैशिष्ट्य वापरून विक्षिप्ताच्या धर्तीचा कोटीरूप विनोद उत्तम साधला आहे. तर ‘माझी पहिलीच चोरी’ या कथेत उपहासरूप विनोद चांगल्या प्रतीचा आहे. वास्तवाचे यथातथ्य चित्रण करतानाच त्यामधील विरोधात्म घटकांचा विनोदनिर्मितीसाठी उपयोग करून लिहिलेल्या शंकर पाटीला यांच्या ‘नाटक’, ‘टिपिशन’, ‘आफत’ (वळीव, १९५८) इ. कथा कलादृष्ट्या उत्कृष्ट आहेत. ‘धिंड’ सारख्या कथांत ते विक्षिप्ताचा वापरही चातुऱ्याने करतात.
गंगाधर गाडगिळांच्या ‘खरं सांगायचं म्हणजे’ , ‘बसचं तिकिट’ ‘दोन चाके’ (खरं सांगायचं म्हणजे, १९५४) इ. कथा विक्षिप्ताचे रूप धारण करणाऱ्या कोटीरूपातील कथा होत. त्यांत त्यांनी उपहासाचाही धागा गोवला आहे. बंडू-स्नेहलता या दोघाच्या ठिकाणी काही स्थिर स्वरूपाची स्वभाववैशिष्ट्ये निर्माण करून, त्यांना नवरा व बायको या वर्गाचे प्रतिनिधी केले आहे. बंडूसारखे अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करणारे व विनोदनिर्मितीला कारणीभूत होणारे व्यक्तिचित्र मराठीत सर्वस्वी नवे ठरते (बंडू, १९६१). गाडगिळांचा हा विनोद विक्षिप्ताच्या स्वरूपाचा असला, तरी मानवी मनावर प्रकाश टाकण्याचेही तो कार्य करतो. त्यांचे फिरक्या (१९७६) हे कोणत्याच वाङमयप्रकारचे बंधन स्वतःवर लादून न घेता विमुक्त शैलीत केलेले विनोदी लेखन आहे. काही वास्तवातील तर काही काल्पनिक व्यक्ती घेऊन त्यांना विविध प्रसंगांत दाखविले आहे. गाडगिळांच्या फिरक्या रंजन करता करताच मानवी जीवनव्यवहाराचेही दर्शन घडवितात.
जयवंत दळवींनी ‘मी बोका होतो’ (विक्षिप्त कथा, १९७३) अशासारख्या उत्तम कोटीरूप कथा लिहिल्या आहेत. उपहासकथा (१९७४), सारे प्रवासी घडीचे (१९६४), कशासाठी पोटासाठी (१९६५), ही त्यांची इतर विनोदी पुस्तके. साहित्यिक आणि साहित्यविश्वातील घटनांवर त्यांच्या ठणठणपाळाने (निवडक ठणठणपाळ, १९६९) खुसखुशीत विनोदाची निर्मिती सातत्याने केली आहे. विनोदात्म शैलीचा एक महत्वाचा आविष्कार म्हणजे लीलाधर हेगडे यांचे राजकीय जीवनावरील उपहासपर लेखन. प्र.के. अत्रे व दत्तू बांदेकर यांनी राजकीय जीवनावर उपहासपर लेखन केले, तर हेगडे यांनी गुंतागुंत (१९६७), फेडाफेडी (१९७१) या पुस्तकांतील लेखनात राजकीय उपहासाला विशिष्टाच्या पातळीवरून व्यापक पातळीवर नेण्याचे कार्य केले आहे. राजकीय जीवनातील व्यंगे हास्यापद करून अव्यंग राजकीय जीवनाची प्रतीती देण्याचे सामर्थ्य त्यांच्या उपहासात आहे.
अशा प्रकारे विनोदाचे काही नवे आविष्कार करून चांगल्या दर्जाच्या विनोदी वाङमयाची निर्मिती अलिकडच्या पंचवीसएक वर्षात विविध लेखकांनी घडविली आहे. १९६० नंतर विनोदी म्हटल्या जाणाऱ्याय वाङमयाची विपुल प्रमाणात निर्मिती झालेली दिसते. वि.आ. बुवांनी केवळ १९६१ ते १९७१ या दशकात ५६ पुस्तके लिहिली. रमेश मंत्र्यांऱ्याऱ्याऱ्यानी १९७९ या एका वर्षात २५ नवी पुस्तके लिहिली. विनोदासाठी मासिके निघतात तशीच वार्षिकेही निघतात. विनोदाचा चाहता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु अधिक चांगल्या दर्जाचे विनोदी साहित्य त्या प्रमाणात निर्माण होतान दिसत नाही. बाळ गाडगीळ, सुभाष भेंडे, बाळ सामंत इ. लेखक वाङमयीन स्वरूपाचे विडंबनात्मक लेखन आवडीने करतात असे दिसते. काही ठराविक विषयांवर (उदा., स्त्रियांवरील विनोदी लेखन) अनेक लेखक लिहितात. विनोदाला शृंगाराची जोड देऊन रंजकता वाढविण्याचा प्रयत्न इंद्रायणी सावकार, बा.भ. पाटील, वि.आ. बुवा, वसंत मिरासदार इ. लेखक करताना दिसतात. केवळ उथळ रंजनपरतेच्या ऐवजी रंजनाच्या जोडीनेच जीवनदर्शनाचे कार्यही विनोद साधू शकतो, ही जाणीव जर वाढीला लागली तर मराठीमधील विनोद आणखी संपन्न होऊ शकेल.
लेखक: गो. मा. पवार
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/21/2020
जळगाव जिल्ह्यातील वेले (ता. चोपडा) येथील विनोद पाट...
अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जा...