इंग्रजी सिक्षण घेतलेल्या पहिल्या महाराष्ट्रीय सुशिक्षित पिढीतील बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडूरंग, स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, जोतीराव फुले, विष्णु परशुरामशास्त्री पंडित इत्यादिकांनी मराठी निबंध लेखनास प्रारंभ केला. ही निबंधवाड्मयाची परंपरा अखंड रीतीने आतापर्यत ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विस्तारत गेली. कविता, कथा, नाटक या मराठी वाड्मयप्रकारांस ब्रिटिशपूर्व कालातील शेकडो वर्षाची संस्कृतमधील परंपरा जशी उपलब्ध होती, तशी निबंध ह्या वाड्मयप्रकारास नव्हती.
पश्चिमी - विशेषत: इंग्रजी भाषेतील – वैचारिक वाड्मयातील निबंध हा आकृतिबंध मराठी आधुनिक सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये निर्माण केला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेला. इंग्रजीतील ‘एसे’ या शब्दाचाच पर्यायशब्द ‘निबंध’ हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधनामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य अथवा वृत्ती या रूपाचे नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये ‘निबंध’ ही संज्ञा आहे. परंतु मराठीचे निबंध या नावाचा जो अधिकृतबंध रूढ झालेला आहे, त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधाचे नाही. त्याचे स्वरूप हे इंग्रजीमधील ‘एसे’ या गद्यप्रकाराचे आहे. निबंध या वाड्मयप्रकारची काटेकोर व्याख्या करणे कठीण आहे.
काही निबंध हे इतिहास या प्रकारातही मोडतात (...ऐतिहासिक निबंध – १९३१ – चिं. वि. वैद्य ), तर काही निबंध वस्तुस्थिताचे वर्णन, या स्वरूपात उपलब्ध होतात. उदा., गोविंद नारायण माडगावकरकृत मुंबईचे वर्णन ( १९६३ ). परंतु साधारणपणे दिग्दर्शन करता येण्यासारखी व्याख्या करता येते ती अशी : कोणत्याही विषयाचे सांगोपांन आणि आवश्यक तेथे अनेक मतांचा परामर्श घेणारे, साधकबाधक युक्तिवादाच्या आधाराने विविध मूल्यांचे मापन करणारे, नीटनेटके, मुद्देसूद, फार विस्तार नसलेले गद्यरूप विवेचन म्हणजे निबंध होय. त्यात प्रसंगत: भावनांचा आविष्कारही असतो.
आलंकारिक किंवा वक्तृत्वाची शैली त्यात आवश्यक तेथे वापरलेली असते. विशेषत: मानवी जीवनाशी, मानवी हिताहिताशी प्रत्यक्ष परिणामकारक संबंध असलेल्या, म्हणून प्रसंगी विवाद्य होणाऱ्या, विषयांचे सुसंबद्ध किंवा मुद्देसूद विवेचन म्हणजे निबंध होय. शुद्ध विज्ञान व तंत्रविज्ञान ह्यांसंबंधी केलेल्या विवेचनास निबंध म्हणता येते काय? येत असावे. माणसाच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, भावनात्मक किंवा सामाजिक जावनाशी संबद्ध विषय हे निबंधाचे महत्त्वाचे विषय ठरतात. जेव्हा निबंधाचा विषय अनेक प्रकरणांमध्ये विस्ताराने ग्रथित केलेला असतो, तेव्हा त्या दीर्घ निबंधास प्रबंध म्हणण्याची प्रथा आहे. परंपरागत लोकभ्रम किंवा अज्ञान किंवा अंधश्रद्धा ह्यांचे निरसन करण्याकरता किंवा विचार आणि नवी आचारपद्धती समजावून देण्याकरता केलेले निबंधलेखन प्रभावी ठरते.
निबंध हा वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेला एक गद्य वाङ्मयप्रकार होय. निबंधवाङ्मयाने गतानुगतिकता सोडून स्वतंत्रपणे साधकबाधक विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीची स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची बौद्धिक पात्रता वाढीस लागते. गतिशील समाजातील परंपरा आणि रूढी यांचे समीक्षण करून नव्या परंपरा आणि रूढी निर्माण करण्याची शक्ती त्यामुळे समाजात निर्माण होते.
मराठी निबंधवाङ्मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली. मुद्रणयंत्रे किंवा मुद्रणसंस्था मुंबईत स्थापन झाली. त्यानंतर निबंधाचा जन्म झाला. १८४१ मध्ये भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक काढले; १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनीच १८४० मध्ये दिग्ददर्शन नावाचे मासिक काढले. जांभेकरांनी दर्पणाचा उल्लेख असा सांगितला : ‘स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि एथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे या इच्छेने’ दर्पणाचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रकारितेमध्ये अजूनही जी निर्भय, स्पष्ट, बाणेदार लेखनप्रवृत्ती आढळते, तिचे अग्रदूत म्हणून भाऊ महाजन यांचा निर्देश करणे उचित ठरेल.
प्रभाकर साप्ताहिक काढल्यानंतर त्यांनीच १८५३ मध्ये धूमकेतु हे साप्ताहिक आणि १८५४ मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. शुद्ध वैचारिक लेखनास अथवा निबंधवाङ्मयास वाहिलेले मराठी ज्ञानप्रसारक हे ‘उपयुक्त ज्ञानप्रसारक सभे’चे मासिकक निघाले ( १८५० ). मराठी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक १८४२ मध्ये प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. यात हिंदुधर्माची टीका प्रसिद्ध होऊ लागली. यातील हिदुधर्मविरोधी मतांचे खंडन करण्याकरिता १८४४ साली मोरभट्ट दांडेकरांचे उपदेश-चंद्रिका हे मासिक निघू लागले. मिशनऱ्यांच्या चळवळीला आळा घालण्याकरिता विचारलहरी ( १८५२ ) हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे आणि सद्धर्मदीपिका हे बापू सदाशिव शेट यांचे ( १८५५ ) नियतकालिका निघाले. वृत्तपत्रसृष्टीत पुण्याचे ज्ञानप्रकाश ( १८४९ ) व मुंबईचे इंद्रप्रकाश ( १८६२ ) यांचे स्थान महत्त्वाचे ठरले. ð विष्णु परशुरामशास्त्री पंडित ( १८२७ – ७६ ) हे इंदपप्रकाशचे संपादक. ह्या पत्रातून बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारीविवाह इ. विषयांवर त्यांनी आपले पुरोगामी विचार परखडपणे मांडले.
महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीला उत्कृष्ट बौद्धिक विवेकयुक्त रूप देणारे विद्वान लेखक ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश या वृत्तपत्रांनी आपल्या भोवती गोळा केले. या साऱ्या नियतकालिकांनी सामाजिक न्यायबुद्धीच्या वाढीस आवश्यक असा विचारविनिमय व वादविवाद यांचे सामाजिक जीवनात महत्त्व स्थापन केले; सुधारणांची महती पटविली; राष्ट्रीयतेचे भरणपोषण केले; विचाराचे नवेनवे विषय हाताळले: अन्यायाच्या विरूद्ध सनदशीर रीतीने आंदोलन निर्माण करून त्याला सतत दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करीत असता मराठी गद्यशैली लवचिक, विचारांच्या अंगोपांगाची तर्कशुद्ध जुळणी करणारी, डौल व शोभा आणणारी ढंगदार बनली. राजकीय, धार्मिक. सामाजिक किंवा सांस्कृतिक अशा सर्वच बाबींवर त्यांनी लेखन केले. गोपाळ हरि देशमुख ऊर्फ ⇨लोकहितवादी ( १८२३ – ९२ ) हे त्यांच्यापैकीच होत. त्यांची गाजलेली शतपत्रे भाऊ महाजनांच्या प्रभाकर मधूनच प्रसिद्ध झाली. मराठी वृत्तपत्रसृष्टीला तिच्या प्रारंभापासून पुढे सतत दीर्घकाळ विद्वान, व्यासंगी, बहुश्रुत तळमळीच्या व्यक्तींचे साहाय्य लाभलेले दिसते. या मंडळींनी धर्मातर, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, जातिभेद, लोकशाही, जनतेची दु:खे आणि त्यांचे हक्क, राज्यकर्त्याचे अन्याय, अर्थकारण व अन्य सांस्कृतिक घडामोडी अशा विविध व वैचित्र्यपूर्ण विषयांवर प्रांजळ मतप्रकटीकरण केले.
वाचकांची चिकित्साबुद्धी आणि जिज्ञासा वाढवून त्यांना बहुश्रुत केले; त्यांच्यात वास्तव दृष्टी निर्माण केली; एकाच प्रश्नाच्या निरनिराळ्या बाजू खंडन-मंडनांच्या द्वारा प्रकट होऊ लागल्याने कोणत्याही प्रश्नाचा चौरसपणे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली; या वृत्तीतून नवा आशय आणि नवे आविष्कारतंत्र घेऊन मराठी निबंध वाड्मय जन्मले. ते विविध विषयांचा परामर्श घेत, विस्तार पावत आजपर्यत अखंडपणे वाढत आहे. अनेक निबंध संग्रह वा लेखसंग्रह त्याच प्रवाहात अस्तित्वात येत आहेत. एक एका लेखकाचे वा अनेक लेखकांचे निबंधसंग्रह प्रसिद्ध झाले व होत आहेत. उदा., विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला एका लेखकाची, तर महाराष्ट्र जीवन ( परंपरा,प्रगती आणि समस्या ) हा गं. बा. सरदारसंपादित निबंधसंग्रह अनेक लेखकांचा.
१८३२ – ७४ हा निबंधवाङ्मयाचा प्रथम सर्जनकाल म्हणून निर्दिष्टि करता येतो. या कालात र्हस्व निबंध म्हणजे सुटसुटीत पंचवीस-तीस पृष्ठांच्यापेक्षा अधिक न लांबणारा निबंध आणि दीर्घ निबंध म्हणजे प्रकरणवारीने एका सबंध पुस्तकाचा आकार घेणारा असा निबंध ( प्रबंध ) निर्माण हेऊ लागला. १८३२ ते १८४९ या काळात जी नियतकालिके प्रकाशित होत होती, त्यांत संपादकीय लेख, स्फुटे, पुस्तक-परीक्षणे, वृत्ते आणि वाचकांची पत्रे असे जे गद्यलेखन होई, त्यातून निबंध आकारास येऊ लागला.
उपयुक्त मराठी ज्ञानप्रसारक हे मासिक निबंधांना प्राधान्य देणारे होते. उपयुक्त ज्ञानप्रसारक सभेचे हे प्रकाशन असल्यामुळे तिच्यामध्ये वाचल्या जाणाऱ्या निबंधापैकी काही निवडक निबंध या मासिकात प्रकाशित होत. धर्म आणि चालू राजकारण यांसंबंधी भाषण किंवा लेखन या सभेने वर्ज्य केले होते. सप्टेंबर १८४८ ते एप्रिल १८४९ या कालावधीत
वरील निबंधांमध्ये ऐतिहासिक नवा दृष्टीकोण निबंधलेखकांच्या विचारसरणीमध्ये व्यक्त झालेला दिसतो. हे आधुनिकतेचे एक मुख्य लक्षण आहे. तसेच निबंधलेखातून स्वदेशाभिमानाची भावना भिनू लागलेली दिसते. उदा., ‘एकीपासून लाभ’ या निबंधात असा प्रश्न विचारला आहे, की जर हिंदू एकचित्त असते, तर अन्य देशींचे लोक येथे येऊन मुलुख कसे काबीज करते ? भारताच्या आर्थिक शोषणाची जाणीव किंवा आर्थिक दुरवस्थेची जाणीव यांतील अनेक निबंधांमध्ये दिसते. स. म. दीक्षित यांनी उत्कटपणे स्वदेशीचा पुरस्कार केला आहे. १८६५ च्या अंकात महादेव गोविंद रानडे यांनी ‘प्रजावृद्धी व तिजपासून होणारा परिणाम’ या विषयावर निबंध लिहिला. त्यात वाढती लोकसंख्या आणि समाजाचे आर्थिक जीवन हा मुद्दा मुख्यत: चर्चिला आहे. आर्थिक स्थैर्य व प्रौढ वय या गोष्टी लाभल्याशिवाय पुरूषाने विवाह करू नये असे सुचविले आहे. कुटुंबनियोजनाची संकल्पना या निबंधात गर्भित दिसते.
‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तृव्ये’, ‘मराठे राजेरजवाडे’, ‘मराठे व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हे व त्यांची तुलना’ इ. निबंध रानडे यांनी या सभेच्या अधिवेशनात वाचले होते. ‘नेत्र’, ‘हवाप्रकरण’, ‘कागद करण्याची रीत’ यांसारखे विज्ञान आणि तंत्रसंबंधी विषयांवरही निबंधया सभेत वाचले गेले. मराठी ज्ञानप्रसारकाने निबंधकरांची एक नवीन पिढीच निर्माण केली. काहींची भाषाशैली चित्तवेधक होती; काही निबंध कारांचे विषय विशेष प्रौढ होते; भाषा, भावना व विचार यांतील समतोलपणा हे प्रस्तुत मासिकातील निबंधांचे एक खास वैशिष्ट्य सांगता येईल.
चंद्रिका मासिक १८५४ साली निघाले. त्यात राज्यशास्त्रीय विवेचन प्रसिद्ध होऊ लागले; त्याचबरोबर स्वाभाविकपणे इंग्रज राज्यशासनावरही तिखट टीका प्रसिद्ध होऊ लागली. कृष्षशास्त्री चिपळूणकर यांनी पुणे पाठशालापत्रक ( १८६१ ) हे मासिक सुरू केले. त्यात दादोबांच्या व्याकरणग्रंथाचा विस्तृत परामर्श घेणारे ‘मराठी व्याकरणावर निबंध’ या शीर्षकाचे त्यांचे २५ निबंध प्रसिद्ध झाले. मासिकात दीर्घ निबंध खंडश: प्रकाशित करण्याच्या पद्धतीचा आरंभ कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केला. व्याकरणाविषयक निबंधांत चिपळूणकरांनी नव्या परिभाषेचा तसेच नव्या व्याख्यांचा वापर केला असून व्याकरणाच्या संदर्भात काही मूलभूत स्वरूपाचे विचार मांडले आहेत.
विविधज्ञानविस्तार १८६७ साली जन्माला आले व त्याने मराठी निबंधशैलीमध्ये परिवर्तन घडवून आणले. समाजसुधारणेच्या बाबतीत पुरोगामी विचारांचा त्या मासिकाने विशेष पुरस्कार केला. इंग्रजी विद्येच्या व इंग्रजी राज्यकर्त्याच्या प्रभावाखाली मराठीचा अनादर होऊ लागला आहे, हे पाहून उत्पन्न झालेला खेद डिसेंबर १८७३ च्या अंकात ‘आपल्या भाषेची स्थिति’ या निबंधात तळमळीने व्यक्त झाला आहे. मराठी ज्ञानप्रसारक या मासिकाने गद्य निबंधाची मराठी वाङ्मयात सुस्थिरपणे स्थापना केली आहे त्याचा महिमा पुणे पाठशालापत्रक व विविधज्ञानविस्तार या मासिकांनी अधिक वाढविला; वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकांना एक वेगळे विशिष्ट स्थान मराठी साहित्यिकांत मिळवून दिले. डौलदार व प्रत्ययपूर्ण निबंध लिहिले जाऊ लागले. शुद्धलेखन, व्याकरण, औचित्य आणि विद्धत्ता यांची श्रेयस्कर बंधने निबंधाला पाडली. त्यामुळे समर्थ व सुंदर गद्य निर्माण होऊ लागले.
अव्वल इंग्रजीतील नियतकालिकांनी पुढे आणलेला, मराठी वैचारिक लेखन करणाऱ्यांत सर्वात मोठा व मानाचे स्थान लाभलेला निबंधकार म्हणजे गोपाळ हरि देशमुख तथा लोकहितवादी. सामाजिक, धार्मिक, राजकीय इ. विषयांवर विचार व भावना यांचा सुसंवाद राखून कित्येकदा भावनावेशाने परंतु औचित्य न सोडता शतपत्ररूपाने पुरोगामी विचारांचे निबंध त्यांनी प्रसिद्ध केले. निबंधसंग्रह ( १८६६ ) हा लोकहितवादींचा अन्य एक निबंधग्रंथ. ‘कलियुग’, ‘भिक्षुक’, ‘जातिभेद’, ‘प्राचीन आर्यविद्या व रीति ...’, ‘स्थानिक स्वराज्य संस्था’, ‘ग्रामरचना ...’, इ.
अनेक लेख त्यांनी लिहिले व प्रसिद्ध केले. अनेक इंग्रजी ग्रंथांचीही मराठी भाषांतरे करून ते ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. या कालखंडात बाबा पदमनजी यांचा अपवाद सोडल्यास लोकहितवादी यांच्याइतके विपुल वैचारिक वाड्मय अन्य कुणीही लिहिले नाही. समाज सुधारावा, समृद्ध व्हावा, समाजाचे आद्यात्मिक व नैतिक जीवन विकसित व्हावे, अंधश्रद्धा आणि विचारपराड्मुखता नष्ट व्हावी असे त्यांचे साहित्यिक उदिष्ट होते. ही त्यांची भूमिका त्यांनी स्वत:च शतपत्रांच्या अखेरीस स्पष्ट केली आहे. त्यांची सबंध वैचारिक भूमिका इतिहासनिष्ठ होती. त्यांनी भारताच्या इतिहासाचा जगातील इतर राष्ट्रांच्या इतिहासाशी तुलनात्मक असा अभ्यास केला आणि भारताच्या अदोगतीची मुख्य कारणे शोधली; या अघोगतीतून बाहेर पडून भारताचा भावी विकास कसा होईल यासंबंधी चिंतन केले. या सर्व ऐतिहासिक चिंतनाचे स्वरूप आणि साधने म्हणजे त्यांचा मुख्य वाड्मयप्रपंच होय.
अव्वल इंग्रजीतील नियतकालिकांमधून मुख्यत: मराठी निबंध लेखनाची पद्धती निर्माण झाली, असे वर म्हटलेच आहे; परंतु त्याच सिमारास स्वतंत्र ग्रंथरूपाने आपले निबंध अनेक निबंधकार प्रकाशित करू लागले. या कार्यात ख्रिस्ती मिशनरी लेखकांनीही विशेष भाग घेतला. श्रीमती फॅरार यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ कुटुंबप्रवर्तननीति ( १८३५ ) हा. त्यात शीलसंपन्न कुटुंब कसे असावे, त्यात भाऊ –बहिणी, आई- बाप यांचे – किंबहुना सबंध परिवाराचे – परस्परसामंजस्य कोणत्या पद्धतीने निर्माण करावे यासंबंधी सविस्तर विवरण केले आहे. त्यात मुलगा व मुलगी असा भेद केल्याने होणारे दुष्परिणाम वर्णिले आहेत; स्त्रीवर्गाच्या दु:स्थितीस कारण होणाऱ्या पद्धतींची मीमांसा केली आहे; स्त्रीशिक्षणाचा महिमा वर्णिला आहे. या निबंधात अंत:करणातील उदात्त भावनांना आवाहन केले आहे. भाषाशैली कोमल, शुद्ध व लवचिक आहे; शब्दकळा घरगुती आहे. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन होण्याकरता लोकहितवादींनी पुष्कळ लेखनप्रपंच केला आहे;पण त्यात कठोर टीका आहे.
लोकहितवादींचा विशेष परिणाम त्यांच्या नंतरच्या काही लेखकांवर झालेला दिसतो. उदा., बाबा पदमनजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि जोतिराव फुले. बाबा पजमनजी हे मूळचे हिंदू. विद्यार्थी असतानाच विद्वान ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या सहवासात ते आले. लोकहितवादींची शतपत्रे वाचून ब्राम्हण व हिंदू धर्म यांच्यावरील विश्वास डळमळला. १८५४ मध्ये उघडपणे ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. या धर्मपरिवर्तनाचे वर्णन त्यांनी अरुणोदय या आपल्या आत्मचरित्रात केले आहे. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षकाचा व्यवसाय त्यांनी केला.ऐक्यवर्धक पत्रिका व सत्यदीपिका ही नियतकालिकेही त्यांनी चालविली. आपल्या आयुष्यात त्यांनी शंभरहून अधिक लहानमोठी पुस्तके लिहिली. त्यांतील फार थोडी आज उपलब्ध आहेत. त्यांच्या विपुल व विविध वाङ्मयाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट हिंदु समाज व हिंदू धर्म यांचे दोष दाखवून ख्रिस्ती धर्माचा श्रेष्ठपणा सिद्ध करणे हा होता.
र्हस्व व दीर्घ असे दोन्ही प्रकारचे निबंध त्यांनी लिहिले. अनेक इतिहास व कोश लिहिले. स्त्रीविद्याभ्यास नुबंध (१८५२) हा ५९ पानांचा निबंध स्त्रीशिक्षणाचा महिमा सिद्ध करणारा आहे. हा संवादात्मक निबंध आहे. संयम, सुसंगत युक्तिवाद, देशकल्याणाची, विद्यावृद्धीची व शुद्ध आचारविचारांची आस्था त्यांच्या निबंधात दिसून येते. शैलीत स्भाविक गोडवा आहे. टीकेत कठोरपणा नाही व ख्रिस्ती धर्माच्या प्रशंसेत अनावर अतिशयोक्ती नाही. विवेकनिष्ठा आहे. त्यांच्या अनेक निबंधांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध ( १८८१ ), कुटुंबाची सुधारणा ( १८५५), व्यक्तिचारनिवेधक बोध ( १८५४ ) इ. त्यांचे निबंध याची साक्ष देतात.
विष्णुबुवा ब्रह्मचारी ( १८२५ - ७१ ) ही सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी अत्यंत त्यागी व्यक्ती. स्वयंभू प्रज्ञा. तीव्र स्मरणशक्ती, प्रभावी व वादकुशल वक्तृत्व हे त्यांचे विशेष गुण होत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील वेदोक्त धर्मप्रकाश ( १८५९ ) हा ७०० हून अधिक पृष्ठांचा ग्रंथराज प्रसिद्ध आहे. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ( १८६७ ) आणि वेदोक्त धर्मप्रकाश यांमध्ये आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. ‘सर्व प्रजा एक कुटुंब’ ही मध्यवर्ती कल्पना होय. विष्णुबुवांच्या या आदर्श राज्याच्या कल्पनेला स्वप्नरंजनाचे रूप आहे.
ब्राह्मणांचे कसब ( १८६९ ), गुलामगिरी ( १८७३ ), शेतकऱ्याचा आसूड हे जोतिरावांचे काही उल्लेखनीय निबंध होत. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजनसमाजाची चाललेली पिळवणूक जोतिरावांनी आपल्या निबंधांतून मांडली.ज्यांनी मराठी भाषेचे सविस्तर व्याकरण प्रथम लिहिले त्या मौलिक विचारप्रवर्तक, धर्मसुधारक आणि भाष्यकार दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी ( १८१४ – ८२ ) धर्मविवेचन ( १८६८ ), पारमहंसिक ब्राह्मधर्म इ. निबंध लिहिले. त्यांचा सर्वोत्कृष्ट निबंध म्हणजे यशोदा पांडुरंगी या त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना होय.
दुसरे एक थोर विद्वान म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर हे होत. दादोबांच्या मराठी व्याकरणाचे मनन करून त्यांनी लिहिलेल्या व्याकरणविषयक निबंधांचा निर्देश पूर्वी आलेला आहेच. तथापि आधुनिक भौतिक विज्ञानांचा परिचय करून देण्याकरता सुबोध मराठीत इंग्रजी ग्रंथांच्या आधारे त्यांनी लिहिलेल्या अनेकाविद्यामूलतत्त्वसंग्रहाचा ( १८६१ ) उल्लेखही आवश्यक आहे. या ग्रंथात भौतिक विज्ञानाशिवाय इतरही अनेक निबंध आहेत. मराठी निबंधाला विज्ञान व्यक्त करण्याचे सामर्थ्य यावे; परंतु त्याचे ललित रूपही आकर्षक रहावे .या उद्देशाने कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी यशस्वी रीतीने प्रयत्न केला आहे.
गोविंद नारायण माडगावकर ( १८१५ – ६५ ) व विश्वनाथ नारायण मंडलीक ( १८३३ – ८९ ) हे दोन निबंधकारही उल्लेखनीय होत. शुचिर्मृतपणा ( १८४९ ), ऋणनिपेधक बोध (१८५० ), सत्यनिरूपण ( १८५२ ) हे माडगावकरांचे काही पुस्तकरूप निबंध. सवयी आणि अभ्यास ह्या दोन विषयांवर मंडलिकांनी निबंध लिहिले आहेत. ह्या दोन्ही निबंधकारांची भूमिका उपदेशकाची दिसते.
विष्णुशास्त्री चिपळूणकर ( १८५० – ८२ ) यांची निबंधमाला आधुनिक मराठी गद्याचा पहिला उत्कर्षबिंदु होय. निबंधमाला १८७४ ते १८८१ अखेरपर्यत चाललेले मासिक. या मासिकाचे एकंदर ८४ अंक निघाले. या ७ वर्षाच्या काळात निबंधमालेत एकंदर २७ विषयांवर लहान – मोठे निबंध लिहिण्यात आले, ते सर्व स्वत: विष्णुशास्त्री यांनीच लिहिले. या ७ वर्षाच्या काळात ज्या खळबळ उत्पन्न करणाऱ्या घटना घडल्या, त्यांचा उत्कट प्रभाव मालकारांच्या मनावर पडून त्याची प्रतिक्रिया या निबंधांमध्ये निर्माण झालेली आढळते. धर्मिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील तत्कालीन संघर्ष या निबंधांमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. यात मराठी शैली प्रगल्भ, ओजस्वी, शब्दालंकर आणि अर्थालंकारांनी दिपवणारी, विचारांना आव्हान देणारी, वाचकास अंतर्मुख करून चिंतनशील बनवणारी अशी बनली आहे.
त्या कालखंडात परंपरागत रूढ समाजव्यवस्थेवर व धार्मिक भावनांवर तीक्ष्ण प्रहार करणारे, परंपरेपासून विच्छेद करून नव्या वैचारिक अधिष्ठानावर उभे राहणारे, ब्राह्मो समाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, आर्यसमाज इ. नव्या नव्या संस्था निर्माण करणारे सुधारकांचे अग्रणी जुना, जीर्ण भारत बदलून नवा, आधुनिक भारत निर्माण करण्याच्या प्रबोधनास प्रथमच प्रवृत्त झाले होते. रूढ कल्पनांवर हे सुधारक सतत प्रहार करू लागले होते. त्याचबरोबर जवळजवळ ६० – ७० वर्षे ख्रिश्चन मिशनरी हिंदु धर्माची नालस्ती करणारा प्रचार करीत होते व त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्याची सहानुभूतीही लाभली होती. हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचाराची छाया या भारतीय नवप्रबोधनावरही उमटलेली दिसत होती. मालाकारांनी ह्या विरूद्ध आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रिय, पवित्र, हद्याशी बाळगलेल्या व जीवनात भिनलेल्या परंपरेवर आघात म्हणजे सर्वस्वाचा घात असे साधारण समाजास वाटत होते.
ह्या परंपरावादी साधारण जनमानसाशी संवादी अशी ही प्रखर प्रतिक्रिया मालाकारांच्या निबंधमालेच्या रूपाने प्रकट झाली. ब्राम्हो समाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज आणि अन्य सुधारक नवशिक्षित हे राष्ट्राला नवचैतन्य प्राप्त होऊन त्याचा कायापालट व्हावा याच उद्देशाने प्रवृत्त झाले होते; परकीय ब्रिटिश राज्यसत्तेच्या तोजाचे नवशिक्षितांचा वर्ग दिपून गेला होता.याची जाणीव नसलेल्या सामान्य जनांशी त्यांचा संपर्कच नव्हता. परंतु त्या सत्तेचे शोषणतंत्र अधिक स्पष्ट दिसू लागले होते. अगोदर ब्रिटिशपूर्वकाळात अवनत होऊन जीर्ण झालेल्या भारत राष्ट्रांचे आर्थिक जीवन या परकीय शोषणामुळे अधिकच दैन्यमय होऊ लागले होते. या राष्ट्राने परकीयांपुढे संपूर्णपणे शरणागती पतकरली होती. हा देश पूर्ण थंड गोळा होऊन पडला होता. ह्याचे निराशाजनक दर्शन ज्या थोड्या प्रज्ञावंतांना होऊ लागले होते, त्यांचे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर होत.
वर उल्लेखिलेल्या प्रबोधनकारांच्या पेक्षा राष्ट्राच्या राजकीय गुलामगिरीचे अगदी वेगळे निदान विष्णुशास्त्रीयांनी केले. हे राष्ट्र पराभूत होऊन गुलाम झाले, याचे कारण कालमहिमा होय; दुसरे काही नाही. ह्या राष्ट्राच्या प्रकृतीला काही झाले नाही; कोठेही कसलीही व्याधी नाही; चक्रनेमिक्रमाने उत्कर्षापकर्ष चालू असतात; हे सगळ्याच राष्ट्रांना लागू आहे. ह्या राष्ट्राला आधुनिक ज्ञानाने संपन्न करा; ते पुन्हा उत्कर्षाला जाईल. त्याला जागृत करा; त्याची मानखंडना करू नका; सगळे सुधारक या राष्ट्राची मानखंडना विनाकारण करत आहेत, अशा आशयाचा हा विष्णुशास्त्रांचा सगळ्या प्रबोधनकारांपेक्षा वेगळा दृष्टिकोण होता. तो त्यांनी आपल्या निबंधमालेमध्ये मांडला आहे.
विष्णुशास्त्र्यामचे भाषा आणि साहित्यिविषयक निबंध सौम्य आणि सर्वसंमत होण्यासारखे आहेत. परंपरेचे जीव तोडून समर्थन त्यांनी सामाजिक सुधारणेच्या संदर्भात केले असले, तरी साहित्यिविषयक लेखांमध्ये त्यांनी इंग्रजी भाषेचा महिमा मान्य केला आहे. काव्यशास्त्राविषयक विचारांच्या संदर्भात त्यांनी म्हटले आहे, की ‘काव्यविवेचनविषयक ग्रंथ इंग्रजी भाषेप्रमाणे संस्कृतात नसल्यामुळे काव्याचे स्वरूप काय, कवीस कोणते गुण आवश्यक आहेत. कवित्व ही ईश्वरी देणगी होय किंवा ती प्रयत्नामुळे मिळते वगैरे गोष्टीचे निरूपण केलेले त्या भाषेत कोठेच सापडत नाही’ ( विद्वत्व आणि कवित्व ). ‘आमच्या देशाची स्थिति’ हा निबंधमालेच्या अखेर अंक ७७ ते अंक ८४ पर्यत लिहिलेला प्रदीर्घ निबंध आहे. हा निबंध फार उशिरा म्हणजे १९१० साली ब्रिटिश सरकारने विनाकारण जप्त केला व त्याच्या प्रसारास कायद्याने बंदी केली; पुढे २७ वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली.
हा निबंध भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनातील परंपरानिष्ठ, पुराणमतवादी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारा, भारतीय वाङ्मयातील पहिला मूलभूत निबंध होय. भारतीय राष्ट्रवादाचे दोन प्रवाह; त्यांतील चिपळूणकरांचा हा पहिला आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेचा सर्वागीण पुरस्कार करणारा व पुरोगामी आधुनिक बुद्धिवादावर आधारलेला दुसरा राष्ट्रवाद होय. या दुसऱ्या राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यामधील थोर महाराष्ट्रीय प्रज्ञावंत म्हणजे महादेव गोविंद रानडे होत. मराठी निबंधकार म्हणून या राष्ट्रवादाच्या प्रवाहाचे दोन वेगवेगळे प्रतिनिधी सांगायचे झाले, तर लोकहितवादी हे दुसऱ्या प्रकारच्या राष्ट्रवादाचे आणि चिपळूणकर हे पहिल्या प्रकारच्या राष्ट्रवादाचे अध्यर्यू म्हणून सांगता येतात.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या विचारांना तात्विक म्हणजे शास्त्रीय स्वरूप देणाऱ्यांमधले अग्रगण्य निबंधकार गोपाळ गणेश आगरकर ( १८५६ – ९५ ) होत. त्यांनी आपले महत्त्वाचे निबंध स्वत: संपादित केलेल्या केसरी ( १८८१ – ८७ ) आणि सुधारक ( १८८८ – ९५ ) या नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले. धर्म, सामाजिक व धार्मिक चालीरीती, समाजरचना व राज्यसंस्था ह्यांच्यामध्ये बदल करण्याचा, सर्व मानवांची आणि स्त्री-पुरूषाची समानता मानून परंपरेमध्ये बदल करण्याचा अधिकार माणसांना आहे; धर्म किंवा धार्मिक आचारविचार यांना इतिहास आहे आणि तो विकासाचा इतिहास आहे,
असा विकासवादाचा सिद्धांत आगरकरांनी इंग्रज तत्वज्ञ व समाजशास्त्र हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्ट्यूअर्ट मिल, बेथॅम, तसेच फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्तेअर इ. पश्चिमी विद्वानांच्या ग्रंथांचे मनन करून मान्य केला. आगरकरांचा काळ हा महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा काळ होता. काव्य, ललित वाङ्मय, कला, नाट्य, साहित्य, राजकारण, अर्थव्यवस्था इत्यादिकांची चिकित्सा करून त्याप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरविणे, त्याकरिता वैचारिक संघर्ष चालू ठेवणे हे या प्रबोधनाचे स्वरूप होते. राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही संवादी गोष्टी होत. विशिष्ट प्रकारच्या राजकीय सुधारणा या त्यांस अनुरूप अशी सामाजिक स्थिती नसेल, तर राबवता येणार नाहीत व विशिष्ट तर्हेची सामाजिक सुधारणा स्थिरावयास राजकीय संस्थादेखील त्यास संवादी किंवा अनुरूप असाव्या लागतात. राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ह्या परस्परावलंबी आहेत. आधी सामाजिक का आधी राजकीय, असा वाद आगरकर व टिळक यांच्यामध्ये निर्माण झाला.
या दोन्ही प्रवृत्तींना समान महत्तव आहे, व त्या हातात हात घालून चालल्या पाहिजेत अशा मताचे आगरकर होते. टिळक हे आधी राजकीय व नंतर सामाजिक या मताचे होते. आता स्वातंत्र्यप्रापतीनंतर आगरकरांच्या मताचे य़थार्थत्व पटू लागले आहे. परंपरागत विषम समाजरचना, अंधश्रद्धा, जातिभेद. अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक रूढी लोकशाही जीवनपद्धतीशी विसंगत आहेत व त्यामुळे लोकशाहीला धोका पोहोचू लागला आहे, ही गोष्ट निदर्शनास येऊ लागली आहे. आगरकरांनी लिहिलेल्या निवडक निबंधांचे संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
आगरकरांच्या सामाजिक-राजकीय निबंधांबरोबरच ‘कवि, काव्य, काव्यरति’; ‘शेक्सपिअर, भवभूती व कालिदास’ हे त्यांचे वाङ्मयीन निबंध अजूनही लक्षणीय आहेत. त्यांच्या विकारविलसिताच्या प्रस्तावनेचाही ह्यात अंतर्भाव होतो. मराठी निबंधसाहित्यात आगरकरांनी मोलाची भर घातली आहे. मराठीतील सामाजिक सुधारणेचा आशय असलेले नाट्य, काव्य इ. ललित साहित्य हे आगकरांच्या मानवता वादी विचारसरणीच्या प्रकाशात वाढले आहे.
भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाला जनतेच्या आंदोलनाचे स्वरूप देणाऱ्या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या म्हणजे श्रेष्ठ विभूती दोनच होत. पहिले ⇨ बाळ गंगाधर टिळक ( १८५६ १९२० ) व दुसरे महात्मा गांधी. टिळक हे सर्वागीण बिद्वान आणि ‘य: क्रियावान स पण्डित:’ या बोधवाक्याप्रमाणे आपल्या विचारांप्रमामे जन्मभर स्वत: आचरण करणारे वैचारिक नेते होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी भारताचा भूतकाळ भव्य होता, असे मोठ्या आग्रहाने प्रतिपादले; परंतु ते प्रमाण देऊन सिद्ध केले नाही. टिळकांनी वेदांचे आणि भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे खोल अध्ययन करून ओरायन, आर्टिक्टक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य हे तीन ग्रंथ लिहून प्रकाशित केले ( त्यांपैकी गीतारहस्य हा श्रेष्ठ मराठी प्रबंधाचा नमुना आहे ).
चिपळूणकर जसे परंपरेला कसलाही धक्का लावू नये अशा मताचे होते, तसे टिळक नव्हते. आगरकर व टिळक या दोघांच्या विचारांची पद्धती बुद्धिप्रधान, तार्किक युक्तिवादावर आधारलेली होती. समाजसुधारणा राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर लोकांनी करावी व लोक आपोआप करतीलच असा आगरकरांपेक्षा वेगळा द्दिष्टीकोण टिळकांनी प्रतिपादला. टिळकांच्या केसरीतील व अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या समग्र लेखांचा संग्रह अनेक खंडांमध्ये आज उपलब्ध आहे. दीर्घ निबंध या द्दष्टीने गीतारहस्य हा ग्रंथ मराठी साहित्याचा एक सुंदर अलंकार म्हणून कायम टिकणारा आहे.
टिळकांच्या प्रभावाखाली काम केलेले व चतुरस्त्र विद्वान असलेले अनेक निबंधकार झाले. त्यांत काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, नरसिंह चिंतामण केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर इत्यादिकांचे लेखसंग्रह अनेक खंडांत प्रसिद्ध झालेले आज उपलब्ध आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हेही टिळकांच्या प्रभावळीतले. ह्या साऱ्यांबरोबरच विनायक दामोदर सावरकर हेही मराठीचे ओजस्वी निबंधकार म्हणून आणि निबंधांच्या द्वारे राजकीय आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांची प्रेरणा देणारे, विपुल साहित्य निर्माण करणारे, महाराष्ट्र साहित्यात दीर्घकाळ अविस्मरणीय लेखक म्हणून मानले जातील.
त्यांचा गाजलेला व ब्रिटिश राज्यकर्त्याना धोक्याचा वाटलेला प्रदीर्घ निबंध म्हणजे १८५७ चे भारताचे स्वातंत्र्यसमर. त्यांचे सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे, पारंपरिक भावनांना धक्का देणारे अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचे निबंध आहेत. समग्र सावरकर वाङ्मय ह्या त्यांच्या लेखसंग्रहांतील खंड तिसरा - ‘निबंध’ ह्या ग्रंथातील ‘ क्ष- किरणे’, ‘जात्युच्छेदक निबंध व इतर स्फुट निबंध’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ हा निबंधसमुच्चय सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी विचार सांगणारा आहे. सामान्य हिंदुभावनेला धक्का देणारा त्यांचा प्रसिद्ध निबंध म्हणजे ‘गाय : एक उपयुक्त पशु. माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हा होय. त्याच्याच जोडीला ‘पुन्हा एकदा गाय – हानिकारक धर्मभावना’ हाही वाचावा.
निबंध- प्रबंधाच्या संदर्भात ज्ञानकोशकार केतकरांचे नावही आवर्जून उल्लेखिले पाहिजे. त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड हे इतिहास व संस्कृतिविषयक प्रदीर्घ निबंधच होत. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ( १९२८ ) हाही त्यांचा एक ग्रंथरूप निबंधच होय.रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी सुरू केलेले विविधज्ञानविस्तार हे मासिक ( १८६७ – १९३७ ) वैचारिक लेखनाचे म्हणजे निबंधसाहित्याचे मुख्य माध्यम ठरले. हे विद्वान लेखकांचे व्यासपीठ बनले. राजारामशास्त्री भागवत. वा. बा. केळकर. विनायक कोंडदेव ओक, नी. ज. कीर्तने, जनार्दन बाळाजी मोडक. वामन आबाजी मोडक, मं. वि. तेलंग, पुरूषोत्तमपंत नाडकर्णी हे अशा लेखकांपैकी काही होत. त्यानंतर विविधज्ञानविस्ताराचे स्थान घेणारे लेकशिक्षण हे मासिक गीर्वाणलघुकोश हा संस्कृत-मराठी कोश तयार करणारे ज. वि. ओक यांनी सुरू केले ( १९१२ ).
हे काही वर्षे चालले. नंतर प्रसिद्ध गांधीवादी शंकरराव देव यांनी नवभारत हे वैचारिक विषयाला वाहिलेले मासिक १९४७ साली सुरू केले; ते १९५७ पासून वाई प्राज्ञपाठशाला मंडळाने चालू ठेवले. त्याचे संपादक म्हणून वि. म. वेडेकर यांनी प्रथम अनेक वर्षे काम केले; नंतर गोवर्धन पारीख व त्यानंतर मे. पुं. रेंगे हे संपादक म्हणून काम पहात आहेत. स्वातंत्र्योत्तर कालात अनेक नाणावलेले निबंध नवभारताने प्रसिद्ध केले. निबंध हा साहित्यप्रकार मराठीमध्ये कायम रूजला आहे.
लेखक - लक्ष्मणशास्त्री जोशी
माहिती स्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/8/2024
पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषे...
अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.
अपभ्रंश भाषेतील वाङ्मयनिर्मिती.
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.