काव्यशास्त्रविषयक एक संस्कृत ग्रंथ. अकराव्या शतकाच्या मध्यास होऊन गेलेल्या मम्मटाने हा लिहिला. काव्यप्रकाशाच्या दहा उल्लासांपैकी (विभागांपैकी) पहिल्यात काव्याचे हेतू, प्रयोजन व प्रकार–उत्तम, मध्यम व अधम–यांचा विचार केलेला असून दुसऱ्यात शब्द व अर्थ ह्यांचे परस्परसंबंध व अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीन शब्दशक्तींचे (वृत्तींचे) विवेचन केले आहे. आर्थी व्यंजनेचे महत्त्व तिसऱ्या उल्लासात येते. चौथ्या उल्लासात ध्वनीचे विविध प्रकार आणि रसाचे प्राधान्य यांचा परामर्श घेऊन उत्तम काव्याची चर्चा केली आहे. मध्यम म्हणजेच गुणीभूत व्यंग्य काव्याच्या आठ प्रकारांचा प्रपंच पाचव्यात मांडून सहाव्यात अधम काव्याचा म्हणजे चित्रकाव्याचा प्रपंच केला आहे. सातव्या उल्लासात काव्यगत म्हणजे शब्द, अर्थ आणि रस ह्या संदर्भांतील दोषांचे विवरण दिले आहे. आठव्यात काव्यगुणांचे महत्त्व सांगितले आहे. नवव्यात शब्दालंकारांची आणि दहाव्यात अर्थालंकारांची सविस्तर चर्चा सोदाहरण केलेली आहे. मम्मट प्राधान्याने ध्वनिवादीच असला, तरी ध्वनीच्या प्रकारांत त्याने रसध्वनीलाच निरपवाद प्राधान्य दिलेले आहे. काव्याच्या इतर अंगांचा परामर्शही त्याने योग्य त्या प्रमाणात घेतलेला आहे.
या ग्रंथातील कारिका व त्यांवरील वृत्ती यांच्या कर्तृत्वाविषयी वाद असला, तरी त्या एकाच लेखणीतून उतरल्या असाव्यात, असे दिसते. बलदेव विद्याभूषण यांच्या मते कारिका भरताच्या आहेत आणि सहा कारिका भरताच्या नाट्यशास्त्रातील आहेत यात वाद नाही; परंतु रससिद्धांताचे विवरण भरताच्याच आधारे केले जाते, म्हणून केवळ तेवढ्यापुरत्याच कारिका भरताच्या घेतलेल्या दिसतात. त्या त्या विषयांवर भामह, उद्भट, वामन इत्यादिकांचीही मते मम्मटाने उद्धृत केली आहेतच. मंगलाचरणापूर्वी लेखकाने स्वतःचा तृतीय पुरुषी निर्देश करण्याची पद्धती सर्रास रूढ असल्याने, ती भिन्न कर्तृकत्वाची निदर्शक ठरू शकत नाही; तसेच कारिकेत वृत्तसौकर्यार्थ आलेले बहुवचन अविवक्षित असल्याचा निर्वाळा वृत्तिकाराने दिला, एवढ्यावरूनही तो कारिकाकाराहून भिन्न असल्याचा निर्णय देता येत नाही. उलट वृत्तीला स्वतंत्र मंगलाचा श्लोक नाही आणि दुसऱ्याच कोणाच्या तरी कारिकांवर भाष्य लिहित असल्याचे कोठेही सूचित केलेले नाही. भरताच्या कारिका घेताना मात्र त्याचा स्पष्ट निर्देश केला आहे. तसेच मालारूपकाचे विवेचन करताना `माला तु पूर्ववत्' हा निर्वाळा कारिकेत येतो. परंतु आधीच्या कोणत्याच कारिकेत मालालंकाराचा उल्लेख नाही. वृत्तीत मात्र मालोपमेचा विचार केलेला आहे. यावरून दोन्हींचा कर्ता एकच ठरतो.
काव्यप्रकाशाचा परिकर अलंकारापर्यंतचाच भाग मम्मटाचा असून पुढील भाग अल्लट अथवा अलक याने पूर्ण केला, असे राजानक आनंदाने काव्यप्रकाशविमर्शनात म्हणले आहे. परंतु या प्रश्नाचा निर्विवाद निर्णय अजून लागलेला नाही. काही हस्तलिखितांतून तसा उल्लेख मात्र आढळतो.
या गंथ्रावर टीका वा भाष्ये लिहिणे भूषणावह मानले जात असे. या ग्रंथाची भाषा सरळ व सोपी असून त्याची विवरणपद्धतीही सुलभ व सुस्पष्ट आहे. आज कित्येक वर्षे तो काव्यशास्त्रावरील एक प्रमुख आधारग्रंथ बनून राहिला आहे.
संदर्भ : १. अर्जुनवाडकर, कृ.श्री.; मंगरूळकर, अरविंद, संपा. काव्यप्रकाश, पुणे,१९६२.
२.झळकीकर, वामनाचार्य, संपा. काव्यप्रकाश (बालबोधिनी टीकेसह), मुंबई, १८८९.
लेखक: ग. मो. पाटील
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/25/2020
पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुविय भागामध्ये रात्...
फायटोप्लॅंकटन या एकपेशीय शेवाळातील क्रिप्टोफाईट्स...
धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील...
एका वर्षामध्ये प्रकाशाने जेवढे अंतर पार केले त्या ...