অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य- एकोणिसावे शतक (१७९८–१८३७)

इंग्रजी साहित्य- एकोणिसावे शतक (१७९८–१८३७)

हा इंग्रजी वाङ्‍मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड. त्याची सुरुवात विल्यम वर्ड्‌स्वर्थ (१७७०–१८५०) व अॅसॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२–१८३४) यांच्या लिरिकल बॅलड्स ह्या १७९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाने झाली आणि १८३७ मध्ये राणी व्हिक्टोरिया इंग्‍लंडच्या गादीवर आली तेव्हा हे युग संपले, असे मानण्यात येते. सर्व ललित कलांच्या विकासात दोन ठळक व बऱ्याचशा परस्परविरोधी अशा प्रवृत्ती दिसून आल्या आहेत. स्वच्छंदतावाद व अभिजाततावाद  या नावाने ह्या दोन प्रवृत्तीं ओळखल्या जातात. या प्रवृत्तींमधील फरक साहित्याच्या संदर्भात स्थूल मानाने असा सांगता येईल, की अभिजाततावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा समाजाचा प्रतिनिधी असतो आणि एका विशिष्ट अशा सुसंस्कृत, एकजिनसी वाचकवर्गासाठी लिहीत असतो. सर्वसामान्यतेवर भर, संयम, आदर्शानुसारी नियमबद्धता ही त्याची वैशिष्ट्ये. उलटपक्षी स्वच्छंदतावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा कोणाचाही प्रतिनिधी नसतो आणि तो विशिष्ट वाचकवर्गासाठी लिहीत नसतो. तो स्वत:चाच प्रतिनिधी असतो आणि त्याच्या अंत:करणातल्या घडामोडी, जीवनासंबंधीच्या आणि जगासंबंधीच्या त्याच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ह्याच त्याच्या काव्याचा विषय असतात. भावनांची उत्कटता, संवेदनेची तीव्रता, वैशिष्ट्यदर्शक घटकांवर आणि वेगळेपणावर भर ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये.

इंग्रजी वाङ्‍मयात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा ठळक आविष्कार दोनदा झाला. सोळाव्या शतकातील प्रबोधनाच्या युगात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस. म्हणूनच या दुसऱ्या आविष्कारास स्वच्छंदतेचे पुनरुज्‍जीवन असे म्हणतात. या युगाने नवअभिजात युगातील सांकेतिक सौंदर्यकल्पनांविरुद्ध बंड केले.

इंग्‍लंडमधील स्वच्छंदतावादाच्या खाणाखुणा अठराव्या शतकातच दिसू लागल्या होत्या. अठराव्या शतकातील टॉमसनसारख्या कवीचे निसर्गकाव्य, हॉरिस वॉल्पोलच्या गूढ व भीतिदायक वातावरण निर्मिणाऱ्या कादंबऱ्या, बर्न्‌‌स‌‌, ब्‍लेक, चॅटरटन इत्यादींचे काव्य, बर्कने अंत:प्रेरणांना दिलेले महत्त्व या अशा काही खुणा होत.

अठराव्या शतकाच्या शेवटीशेवटी इंग्‍लंडमध्ये स्वच्छंदतावादाचा उदय झाला, ह्याला नवअभिजाततावादातील साचेबंदपणा, सांकेतिकता, तोच-तोपणा हे जसे कारण, तशी आणखीही कारणे होती. अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी आपण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अस्तित्वात आली. ह्या घटनेमुळे इंग्‍लंडमधल्या व्यापारी कारखानदारांची एक हुकमी बाजारपेठ तर गेलीच; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी, की इंग्‍लंडमधल्या राजसत्तेला आणि सरंजामदारी वर्चस्वाला मोठा धक्का बसला. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि परिणामत: यूरोपमधील एक बलाढ्य राजसत्ता कोसळली. ह्या क्रांतीमागे राजकीय आणि आर्थिक कारणे होती, तशीच समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या विचारांची प्रेरणाही होती. हादेखील परंपरागत समाजव्यवस्थेला मोठा धक्का होता. इंग्‍लंडच्या कारखान्यात वाफेची एंजिने बसविण्यात आली तेव्हा उत्पादनाचा वेग वाढला, कारखाने वाढले, शहरांची लोकसंख्या वाढली, कामगारांची संख्या वाढली आणि औद्योगिक कामागारांचा नवा मोठा शोषित वर्ग अस्तित्वात आला. ह्या सर्व घटनांचा संकलित परिणाम म्हणजे सर्वच क्षेत्रांतील अभिजात आदर्शांना आणि व्यवहारवादी विचारप्रणालींना हादरा बसला. राजा आणि प्रजा, शास्ते आणि शासित, व्यक्ती आणि समाज, स्त्री आणि पुरुष ह्यांचे परस्परसंबंध आणि अधिकार तसेच कला-साहित्याची प्रेरणा आणि हेतू ह्या सर्वच प्रश्नांसंबंधी नव्याने विचार सुरू झाला.

मानवी जीवन घडविण्यात निसर्गाचे महत्त्वाचे स्थान आहे. गूढ, अनाकलनीय अनुभवांना व विविध मानसिक अवस्थांना कलादृष्ट्याही महत्त्व आहे. मानवी मनाचे स्वातंत्र्य मुळातच अनिर्बंध आहे व असले पाहिजे, अशा तऱ्हेच्या नव्या जाणिवा इंग्‍लंडमधील स्वच्छंदतावादाचे स्वरूप स्पष्ट करतात.

बालकाच्या निष्पाप व निरागस भावनेतून पाहिल्यास नित्य परिचयाच्या गोष्टी व अनुभव काही वेगळेच दिसतात व त्यांचे अलौकिक स्वरूप कळते, असे वर्ड्‌स्वर्थने म्हटले. निरागस बाल्यावस्थेच्या तुलनेने प्रौढावस्थेचे आणि चारित्र्य व मन घडविणाऱ्या गोष्टींचे महत्त्व कमी झाले.

वेगळेपण हे स्वच्छंदतावादाचे एक लक्षण असल्यामुळे पुष्कळदा स्वच्छंदतावादी कवी किंवा लेखक नित्याच्या परिचयाचे समकालीन जीवन, वातावरण किंवा अनुभवविश्व ह्यांविषयी लिहिण्याऐवजी स्थलदृष्ट्या किंवा कालदृष्ट्या दूरस्थ जीवनाविषयी लिहितात. इंग्‍लंडमधील काही स्वच्छंदतावाद्यांना प्राचीन व मध्ययुगीन जीवनातील अनुभवांचे विशेष आकर्षण वाटले. उदा. वॉल्टर स्कॉटच्या (१७७१–१८३२) ऐतिहासिक कादंबऱ्या,  जॉन कीट्सचे (१७९५–१८२१) ग्रीक संस्कृतीबद्दलचे प्रेम.

या काळातील सर्वच साहित्यिक निखळ स्वच्छंदतावादी होते, असे नाही, उदा., लॉर्ड वायरन (१७८८–१८२४) व जेन ऑस्टेन (१७७५—१८१७) ह्या कालखंडातील असूनही त्यांच्या लेखनाचे स्वरूप अभिजाततावादाला अधिक जवळचे आहे.

काव्य : स्वच्छंदतावादी कवींच्या दोन पिढ्या आहेत : वर्ड्‌स्वर्थ, कोलरिज व रॉबर्ट साउदी (१७७४–१८४३) हे पहिल्या पिढीतील. बायरन, पर्सी बिश शेली (१७९२–१८२२) व जॉन कीट्स हे दुसऱ्या पिढीतील.

पहिल्या पिढीतील कवी इंग्‍लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ह्या विभागात राहिलेले. फ्रेंच राज्यक्रांतीने तिघेही सुरुवातीस प्रभावित झाले होते; पण क्रांतीनंतर अत्याचारादी ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे तिघांचाही भ्रमनिरास झाला तथापि स्वातंत्र्य, समतादी तत्त्वांसंबंधीची त्यांची निष्ठा ढळली नाही आणि त्यांच्यात समाजाविरुद्ध बंडखोरीही आली नाही. नेहमीचेच जीवन चिंतनाने आणि सहानुभूतीने अधिक शुद्ध आणि गहिरे करावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या काव्याचे विषय मानव व निसर्ग यांचे संबंध, शैशवावस्थेचे जीवनातील स्थान व सामान्य माणसांच्या जीवनातील अनुभव हे होते. साध्या विषयातील अद्‌भुतता दाखविण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्वच होते. त्यांच्या काव्यात चिंतनशील वृत्तीचा परिपोष झाला आहे. ह्या कवींनी काव्याची भाषा व वृत्तरचना ह्यांत परिवर्तन घडवून आणले. अतिशय प्रभावी प्रतीके त्यांच्या काव्यात आढळतात.

निसर्गासंबंधी अत्यंत उत्कटतेची आणि तादात्म्याची भावना, निसर्गवर्णनांतून वेगवेगळ्या मनोवस्थांची निर्मिती, संवेदनक्षमतेबरोबरच चिंतनशीलता ह्या सर्वांच्या द्वारा नित्याच्या अनुभवांतून आणि सामान्य व्यक्तींच्या जीवनातून व्यक्तिमानसाचे उन्नयन करणे, त्याला एक विशाल अनुभूती देणे, त्याच्या ठिकाणी एक गूढ आध्यात्मिक भाव निर्माण करणे, ही वर्ड्‌स्वर्थच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतील.

वर्ड्‌स्वर्थशी तुलना करता कोलरिजचे मन अधिक विश्लेषणपर, तत्त्वचिंतनपर आणि मूलग्राही होते. त्याच्याही काव्यात भावनांची उत्कटता आणि संवेदनशीलता आहे, तोही निसर्गदृश्यांतून विविध मनोवस्था निर्माण करतो, एक अलौकिक सृष्टी निर्माण करून वाचकाला तो एका वेगळ्या विश्वात नेतो. कुशाग्र बौद्धिकता आणि उत्कट भावनात्मकता ही कोलरिजच्या काव्यात एकवटली आहेत.

साउदी हा वर्ड्‌स्वर्थ आणि कोलरिज यांच्या सहवासात राहिला तो राजकवीही झाला. पण त्याच्या काव्यात प्रतिभेचा जोम किंवा जिवंतपणा नाही. त्याच्या काही छोट्याछोट्या कविता मात्र चांगल्या आहेत.

कवी म्हणून वॉल्टर स्कॉटचीही ह्याच पिढीत गणना करावी लागले; कारण त्याच्या कविता बहुतेक १८१४ पर्यंत लिहिल्या गेल्या होत्या. तात्त्विकदृष्ट्या त्याचा कोलरिज किंवा वर्ड्‌स्वर्थशी संबंध नसला, तरी भावनात्मकता, कल्पनाविलास, भूतकालीन जीवनाविषयी आकर्षण, निसर्गाविषयी प्रेम इ. स्वच्छंदतावादी काव्याची वैशिष्ट्ये त्याच्या कवितांत आहेत.

बायरन, शेली व कीट्स फ्रेंच राज्यक्रांतीच्या हत्याकांडाच्या वेळी शैशवावस्थेत होते. त्यामुळे वर्ड्‌स्वर्थ, कोलरिज वगैरे कवींसारखा त्यांचा भम्रनिरास झाला नाही. नव-अभिजात वाङ्‍मयीन परंपरेचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यामुळे त्यांच्या काव्यात-विशेषत: शेली व कीट्सच्या-स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा मुक्त विकास झाला; पण त्यांचा स्वच्छंदतावाद वेगळा आहे आणि त्यांचे व त्यांच्यापैकी प्रत्येकाचे वेगळेपण विशेष नजरेत भरण्यासारखे आहे. आणखी योगायोग म्हणजे तिघांनाही वेगवेगळ्या कारणांनी इंग्‍लंडबाहेर जावे लागले व तिघांनाही इंग्‍लंडबाहेर आयुष्याच्या ऐन उमेदीतच मृत्यू आला.

१८१५ पर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या होत्या. फ्रान्समधील राज्यक्रांती संपलीच होती; पण नंतर फ्रान्समध्ये सर्वसत्ताधीश होऊन सबंध यूरोप पादाक्रांत करणाऱ्या नेपोलियनचाही इंग्‍लंडने पराभव केला होता आणि त्याला हद्दपार केले होते. इंग्‍लंडमध्ये आणि यूरोपमध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित झाली होती. इंग्‍लंडचा प्रभाव सर्वत्र वाढला होता आणि त्याच्या वैभवाचा मार्ग निर्विघ्‍न झाला होता; पण खुद्द इंग्‍लंडात अंतर्गत असंतोष धुमसू लागला होता. फ्रान्सशी झालेल्या युद्धामुळे व्यापारी आणि जमीनदार गबर झाले होते. गरीब जनतेची आणि कामगारांची अवस्था मात्र फारच वाईट झाली होती. बकाल आणि घाणेरड्या वस्त्या वाढल्या होत्या. अन्न महागले होते. कामगारांची निर्घृण पिळवणूक चालली होती. धार्मिक मतभेद तीव्र होत चालले होते. सामान्य जनता मताधिकाराची मागणी करीत होती. सगळी प्रचलित व्यवस्था मोडून काढल्याखेरीज माणूस सुखी होणार नाही, असे विचारी आणि संवेदनशील लोकांना वाटू लागले होते. ह्या पार्श्वभूमीवर बायरन, शेली आणि कीट्स ह्यांची प्रस्थापित समाजाविरुद्ध बंडखोरीची कविता निर्माण झाली.

बायरनच्या वृत्तीतील सामाजिक, राजकीय आणि नैतिक बंडखोरी स्वच्छंदतावादाला जवळ आहे; पण त्याची काव्यरचना, वृत्तांची निवड, काव्यप्रकार हे नवअभिजाततावादाला अधिक जवळ आहेत. वर्ड्‌स्वर्थ वगैरे कवींचा त्याने उपहास केलेला आहे. पोपला तो सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी मानतो. शेलीच्या काव्यात उत्तुंग कल्पनाविलास, प्रतिभेची भरारी, विलक्षण तरलता, सर्व प्रकारच्या बंधनांविरुद्ध बंडखोरी, तसेच विशाल सहानुभूती आणि व्यापक मानवतावादाची भावना आहे.

संवेदनानुभवाचा आनंद उपभोगणे, मध्ययुगीन आणि प्राचीन ग्रीक वस्तू आणि विषय ह्यांबद्दल ओढ, इंद्रियसंवेद्य अनुभवांतून निर्माण होणाऱ्या भावना आणि भावावस्था व त्यांच्या साहाय्याने सौंदर्याचा आणि सौंदर्याच्या द्वारा चिरंतन सत्याचा साक्षात्कार घडविणे, ही कीट्सच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील. त्याचीही विचारसरणी स्वातंत्र्यवादी आणि सुधारणावादी आहे.

दोन्ही पिढ्यांतील कवींनी विविध वृत्तांत दीर्घकाव्ये रचिली. उदा., वर्ड्‌स्वर्थचे (द प्रिल्यूड १८०५, प्रकाशित, १८५०), कोलरिजचे द एन्शंट मरिनर, (लिरिकल बॅलड्समध्ये १७९८ मध्ये प्रसिद्ध), बायरनची चाइल्ड हॅरल्ड्स पिल्‌ग्रिमेज (४ सर्ग, १८१२–१८१८) व डॉन जूअन (१६ सर्ग, १८१९–१८२४) ही काव्ये आणि जॉन कीट्सची ईव्ह ऑफ सेंट अ‍ॅग्‍नेस (१८१९) आणि एंडिमीयन (१८१८) ही काव्ये तसेच शेलीचे अ‍ॅडोनिस (१८२१). यांखेरीज ह्या सर्व कवींनी स्फुट भावकविता, सुनीते व उद्देशिका लिहिल्या. स्वच्छंदतावादी काव्याने अठराव्या शतकातील नवअभिजात काव्याची नावनिशाणी जवळजवळ पुसून टाकली.

गद्य : नव-अभिजात युगातील गद्य साधे, सोपे, सुटसुटीत व अर्थवाही होते. त्यात बेबंद कल्पनाशक्तीला स्थान नव्हते. या युगात मात्र गद्याची धाटणी काव्यात्म झाली. प्रत्येकाने स्वत:ची गद्यशैली निर्माण केली. गद्यात प्रतिभाविलासाला अवसर मिळाला. असे असूनही हे गद्य अर्थवाहीच राहील ह्याची शक्य तेवढी काळजी घेतली गेली. त्यामुळे काव्यमय भाषेत असावी तेवढी सहजता या गद्यात आली.

निबंध, कादंबरी व समीक्षा हे या युगातले भरघोस विस्तारलेले गद्यप्रकार. निबंधलेखनाला इंग्रजीमध्ये बेकनपासूनच सुरुवात झाली होती; पण त्याचे निबंध गंभीर, विषयविवेचनपर, उपदेशपर असत. अ‍ॅडिसन, स्टील, जॉन्सन, गोल्डस्मिथ ह्यांच्या निबंधांतील सौम्य उपहास, खेळकर विनोद, काही प्रमाणातील आत्मनिष्ठ दृष्टिकोण ह्यांमुळे अठराव्या शतकातच इंग्रजी निबंधाचे स्वरूप बदलू लागले होते. त्यातूनच एकोणिसाव्या शतकाच्या स्वच्छंदतावादी वातावरणात निबंधाचा एक स्वतंत्र प्रकार अस्तित्वात आला. हाच ललित निबंध.

या युगातील श्रेष्ठ ललित निबंधकार चार्ल्स लँब (१७७५–१८३४) हा होय. त्याच्या निबंधांतील कलात्मकता, उत्स्फूर्त आत्मनिवेदन आणि अनौपचारिकतेचा आभास हे गुण लक्षणीय आहेत. टॉमस डे क्‍विन्सी (१७८५–१८५९), विल्यम हॅझ्‌लिट (१७७८–१८३०), ली हंट (१७८४–१८५९) व वॉल्टर सॅव्हिज लँडॉर (१७७५–१८६४) हे आणखी काही प्रसिद्ध निबंधकार.

स्वच्छंदतावादी युगात कादंबरीच्या विकासाचे दुसरे पर्व सुरू झाले. नव-अभिजात युगात कादंबरी हा स्वतंत्र वाङ्‍मयप्रकार म्हणून विकसित झाला. तिचे एक तंत्र निर्माण झाले. व्यक्तिरेखाटन, रचना, कथनपद्धती वगैरे तिच्या अंगोपांगांमध्ये विविधता आली. ही कादंबरी वास्तवादी व बोधपर होती. अठराव्या शतकात हॉरिस वॉल्पोलने कादंबरीला स्वच्छंदतेची दिशा दाखविली होती.

या युगातील कादंबरीकारांनी कादंबरीला जास्त कलात्मक स्वरूप प्राप्त करून दिले. यात प्रमुख वाटा वॉल्टर स्कॉटचा. त्याने ऐतिहासिक कादंबरी हा कादंबरीचा एक प्रकार निर्माण केला. त्याच्या कादंबऱ्या सर्वच ठिकाणी ऐतिहासिक सत्याला धरून लिहिलेल्या नसल्या आणि त्यांत इतरही काही दोष असले, तरी पात्रे, प्रसंग आणि स्थळे ह्यांच्या चित्रणात जिवंतपणा आहे आणि त्यांत स्वच्छंदतावादाची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भूतकाळाची कल्पनेच्या साहाय्याने केलेली जिवंत पुननिर्मिती, वाचकाला वर्तमानातून भूतकाळात नेण्याची शक्ती, निसर्गदृश्यांचे जिवंत चित्रण, सुखदु:खात्मक अनुभवांशी निगडित असलेल्या भावनांचे दर्शन, अलौकिक आणि गूढ वातावरणाची निर्मिती ह्या गुणांमुळे आजदेखील त्याच्या कादंबऱ्या आपले स्थान टिकवून आहेत. ह्या काळातील आणखी एक श्रेष्ठ कादंबरीलेखिका जेन ऑस्टेन ही होय. मात्र हिच्या कादंबऱ्या ह्या कालखंडात लिहिल्या गेल्या असल्या, तरी प्रकृतीने त्या अभिजात आहेत. नव-अभिजाततावादाचा काटेकोरपणा, सूक्ष्मता, अलिप्तता आणि संयम ही तिच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्राइड अँड प्रेज्युडिससारख्या (१८१३) कादंबऱ्यांत आपल्या मर्यादित अशा सुखवस्तू मध्यमवर्गीय विश्वाच्या लक्ष्मणरेषेबाहेर लेखिका कधीही जात नाही; परंतु ह्या विश्वाबद्दलच्या अत्यंत सूक्ष्म ज्ञानाने त्यातील व्यक्तिव्यक्तींच्या संबंधांचे नाट्य ती मोठ्या कौशल्याने दाखविते. ह्या चित्रणात भावविवशता अजिबात नाही, तर कमालीचा संयम आहे. ह्या कादंबऱ्या अनन्यसाधारण विनोदबुद्धिने आणि आगळ्या संवेदनाक्षम व्याजोक्तीने नटल्या आहेत. कथाशिल्पाच्या दृष्टीने त्यांत मोठे रचनाचातुर्य आहे, अनुरूप स्वभावदर्शन आहे. लहानशा हस्तिंदती तुकड्यावर केलेली कलाकुसर, हे ह्या कादंबऱ्यांचे केलेले वर्णन त्यामुळे सार्थ वाटते.

साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातही नव-अभिजाततावादी समीक्षा आणि स्वच्छंदतावादी समीक्षा ह्यांतील फरक दिसून येतो. साहित्यविषयक दृष्टिकोणांतील फरकांवर तो आधारलेला आहे. कलेचा हेतू उपदेश हा नाही; उच्च तऱ्हेचे मनोरंजन करणे, जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडविणे व त्यांतून उद्‌बोधन करणे हे कलाकृतीचे उद्दिष्ट आहे व ते समीक्षेने ओळखावे, अशी अपेक्षा निर्माण झाली.

यावेळचे प्रसिद्ध समीक्षक म्हणजे, कोलरिज, हॅझ्‌लिट, वर्ड्‌स्वर्थ, शेली आणि कीट्स. ह्यांनी काव्याचे प्रयोजन आणि स्वरूप ह्यांविषयी लिहिले आहे. यावेळच्या समीक्षेचे विषय काव्याचे स्वरूप, भाषा, विषय व कार्य, सर्जनशक्तीचे स्वरूप, काव्याचा हेतू, शेक्सपिअरची व त्याच्या समकालीन नाटककारांची नाटके वगैरे होते. या सर्वांवर प्रत्येकाने स्वतंत्र मते मांडली. या समीक्षेने साहित्य ही स्वतंत्र ललित कला असून तिचे माध्यम शब्द आहे, ही गोष्ट प्रस्थापित केली व साहित्येतर दृष्टिकोणातून साहित्याचे परीक्षण करणे गैर आहे, असे दाखवून दिले. त्याचप्रमाणे एडिंबरो रिव्ह्यू (१८०२), क्‍वार्टर्ली रिव्ह्यू (१८०९) आणि ब्‍लॅकवुड्ज एडिंबरो मॅगझीन (१८१७) ह्या नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या परीक्षणलेखांनी साहित्यसमीक्षेत चैतन्य आणले. ह्यांतील लेख काही वेळा राजकीय पक्षदृष्टीने लिहिलेले किंवा पूर्वग्रहदूषित असले, तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही.

याही युगात डॉ. जॉन्सनच्या नव-अभिजात परंपरेचे अनुयायी होतेच. एडिंबरो रिव्ह्यूचा फ्रान्सिस जेफ्री हा अशा समीक्षकांमध्ये अग्रगण्य होता. त्याने स्वच्छंदतावाद्यांवर नेहमी कडाडून टीका केली.

स्वच्छंदतावादी व नव-अभिजाततावादी प्रवृत्तींचे परस्परविरोधी स्वरूप या युगाच्या शेवटी स्पष्ट झाले, तसेच दोहोंपैकी केवळ एकाच वृत्तीचा ऐकांतिक परिपोष करणारी कलाकृती असू शकत नाही, याची जाणीव झाली. यानंतरच्या म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या युगात या दोन्ही प्रवृत्तींचा शक्य तो मिलाफ व्हावा,अशी इच्छा निर्माण झाली व तसे प्रयत्‍न इंग्रजी साहित्यात झाले.

व्हिक्टोरियन कालखंड (१८३७–१९०१) : व्हिक्टोरिया राणीच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील वाङ्‍मयाचे तीन कालखंड पडतात : पहिला १८३७ ते १८४८, दुसरा १८४८ ते १८७० व तिसरा १८७० ते १९०१. ह्यांतील पहिला कालखंड अत्यंत अवस्थतेचा व अनिश्चिततेचा होता, दुसरा वैज्ञानिक शोधांमुळे व विज्ञानप्रणीत यंत्रसंस्कृतीमुळे विश्वविषयक दृष्टिकोणात घडून आलेल्या बदलाचा आणि तिसरा आत्मसामर्थ्याच्या जाणीवेमुळे आणि स्थैर्यामुळे आलेल्या आत्मतुष्टीचा. ऐकोणिसाव्या शतकाचे शेवटचे दशक आधीच्या उत्साहाला उतरती कळा लागल्यासारखे काहीसे क्षीण प्रवृत्तींचे होते.

पहिल्या कालखंडाची सुरुवातीची वर्षे अस्वस्थतेची व अनिश्चिततेची होती; कारण सामाजिक व आर्थिक विषमतेची देशात पराकाष्ठा झालेली होती. कनिष्ठ मध्यम वर्ग व गरीब जनता ह्यांच्या हालाखीला पारावार नव्हता. इंग्‍लंड अद्याप प्रामुख्याने कृषिप्रधान देश होता. दळणवळणाची साधने अत्यल्प व अप्रगत होती; परंतु ह्या काळातच विल्यम कॉबेट (१७६३–१८३५), रॉबर्ट ओएन (१७७१–१८५८), एलिझाबेथ फ्राय (१७८०–१८४५) व फ्रान्सिस प्लेस (१७७१–१८५४) ह्या समाजसुधारकांनी सुधारणांचा पाया घातला. १८३२ च्या पहिल्या सुधारणा कायद्याने कनिष्ठ मध्यम वर्गाला राजकीय मताचा हक्क मिळाला. १८६७, १८८४, १८८५ मधील कायद्यांनी हे हक्क अधिक व्यापक व दृढ केले. मध्यम वर्गाचे समाजातील स्थान निश्चित झाले. सरंजामदार वर्गाची अधिसत्ता नष्ट होत चालली. व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारसरणी अर्थक्षेत्रात, सामाजिक जीवनात आणि तत्त्वज्ञानात प्रभावी ठरू लागली.

ह्याच सुमारास विज्ञानातील शोधांनी अत्यंत महत्त्वाचा पल्ला गाठला व त्यामुळे अवलोकनाची क्षेत्रे विस्तारली व पर्यायाने विचारांना नवी क्षेत्रे व नव्या दिशा मिळाल्या. रेलगाड्या, वाफेवर चालणारी जहाजे विद्युत् संदेशयंत्रे, समुद्रातून घातलेल्या दूरध्वनिवाहक तारा ह्या शोधांनी दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. नव्या यंत्रयुगाचा व उद्योगप्रधानतेचा पाया घातला गेला. एका नव्या सामर्थ्याच्या जाणिवेने आणि विजिगीषू वृत्तीने मध्यम वर्ग भारावला. ह्याच कालखंडात इंग्रजी साम्राज्याच्या कक्षा विस्तृत व पक्या झाल्या. विचारांत आणि देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत उदारमतवाद व स्वातंत्र्य, तर वसाहतीत अत्यंत निर्घृण व्यवस्थेत असा स्वातंत्र्याचा संकोच व पिळवणूक असा परस्परविरोधही दिसू लागला; पण त्याचबरोबर उदारमतवाद सर्वत्र लागू करावा, असे म्हणणारेही इंग्रज विचारवंत होते.

विचारक्षेत्रात, तसेच भौतिकी व जीवविज्ञान ह्या क्षेत्रांत चार्ल्स लायेल (१७९७–१८७५) आणि चार्ल्स डार्विन (१८०९–१८८२) यांसारख्यांच्या शोधांमुळे नवी दालने उघडली गेली. मानव हा ईश्वरनिर्मित, ईश्वराची प्रतिकृती म्हणून पूर्णावस्थेत अवतरला नसून त्याचे जीवसृष्टीशी अविभाज्य नाते आहे, हे प्रस्थापित झाले. काल व अवकाश ह्या दोन्ही दृष्टींनी त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ह्यामुळे धर्मश्रद्धेला फार मोठा तडा गेला व एक तऱ्हेचा संशयवाद, अश्रद्धा. अज्ञेयवाद यांचा प्रभाव वाढू लागला. बारीकसारीक तपशीलांत मानवी प्रज्ञा रमू लागली व ह्या तपशीलांचे वैज्ञानिक पद्धतीने पृथक्करण, विश्लेषण करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली. हे विशेष सर्व वाङ्‍मयप्रकारांत व कलाप्रकारांत आढळून येतात. ह्याच्या पाठीमागे एक तऱ्हेचा समन्वय साधण्याचा, स्थिरता आणण्याचा प्रयत्‍न दिसतो.

मध्य व्हिक्टोरियन काळात ह्या स्थिरतेच्या प्रयत्‍नांना सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत यश आलेले दिसते. मध्यम वर्गाला स्थैर्य येऊन त्याची सुबत्तेची स्वप्ने प्रत्यक्षात आली. राणी व्हिक्टोरिया व तिचे कौटुंबिक जीवन हे मध्यमवर्गीय संसाराचे आदर्श बनले. स्थिरतेबरोबरच संकुचितता आणि आत्मसंतुष्टपणा ह्या वृत्ती बळावल्या. १८५१ मध्ये लंडनमध्ये जे मोठे प्रदर्शन भरले, त्यामुळे इंग्रजी तंत्रविज्ञानाची प्रतिष्ठा जगजाहीर झाली. ह्या सुमारास टेनिसनसारख्या कवींनी अथवा मेकॉलेसारख्यांनी इंग्रजी सामर्थ्याचे पोवाडे गद्यपद्यात गायिले. उपयुक्ततवादासारख्या विचारसारणीने विज्ञानाला सामाजिक व्यवहारात आणण्यास मदत केली; परंतु खऱ्याखुऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठेचा जीवनाच्या अंगोपांगांत सखोल प्रवेश झाला, असे दिसत नाही. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने उदयाला आलेल्या मध्यम वर्गाने बुद्धिवादाऐवजी व्यवहारवाद स्वीकारला, क्रांतिकारक बदलांऐवजी तडजोडीचा आश्रय केला, मूल्यांना एक तऱ्हेची सवंग क्षुद्रता आणली. नीतिक्षेत्रात सोवळेपणा, सामाजिक क्षेत्रात सभ्यताधिष्ठित अहंता, वर्गनिष्ठा व संकुचितता बळावली. ह्या तडजोडीपासून ह्या काळातील श्रेष्ठ लेखकही अलिप्त नाहीत. ह्यामुळे ‘व्हिक्टोरियन’ ही संज्ञा संकुचितता, स्वार्थ, ढोंगी वृत्ती, आत्मसंतुष्टपणा ह्यांना लागू पडू लागली व ह्या वृत्तींचा अत्यंत कडवट उपहास विसाव्या शतकात होऊ लागला.

वास्तविक व्हिक्टोरियन जीवनाची ही एक बाजू आहे. ह्याबरोबरच संशोधनवृत्ती, चिकित्सा, सूक्ष्मता हे गुण ह्या काळात दिसतात. व्यवहारवादी तडजोडवृत्तीवर ध्येयवादाच्या व सांस्कृतिक मूल्यकल्पनांच्या आधारे हल्ले चढवलेले दिसतात. लॉर्ड अ‍ॅल्फ्रेड टेनिसन (१८०९–१८९२), रॉबर्ट ब्राउनिंग (१८१२–१८८९), मॅथ्यू आर्नल्ड (१८२२–१८८८) यांसारख्या कवींनी अथवा चार्ल्स डिकिन्झ (१८१२–१८७०), विल्यम मेकपीस थॅकरी (१८११–१८६३), जॉर्ज एलियट (१८१९–१८८०), शार्लट ब्राँटी (१८१६–१८५५), एमिली ब्राँटी (१८१८–१८४८) यांसारख्या कादंबरीकारांनी किंवा कार्लाइल (१७९५–१८८१), रस्किन (१८१९–१९००), जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–१८७३) यांसारख्या विचारवंतांनी नव्या मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. ह्या प्रयत्‍नांमागे स्वच्छंदतावादातील सहानुभूतीचे सातत्य दिसते व म्हणून हा काळ स्वच्छंदतावादाचे एक परिणत स्वरूप मानला जातो. फरक एवढाच, की स्वच्छंदतावादी कवी मानवाला निसर्गाचा एक घटक मानीत, तर आता मानव व निसर्ग यांचे नाते अधिक मूलभूत आणि अविभाज्य एकतेचे वाटू लागले. सहानुभूतीने मानवामानवांतील संबंध नव्या पायावर आधारावे, अशी जाणीव कधी बुद्धिवादी दृष्टिकोणातून तर कधी भावनेने ओथंबलेल्या ललित पद्धतीने प्रकट होऊ लागली. आरंभीच्या आत्यंतिक व्यक्तिवादावर तोडगा म्हणून समूहवादी, समाजवादी विचारप्रणालीही निर्माण झाल्या.

ह्या युगातील तिसऱ्या कालखंडात आधीच्या अस्वस्थतेला विरोधी असे प्रशांत वातावरण दिसते. एक प्रकारच्या कार्यतत्परतेने, नवे निर्माण करण्याच्या ईर्ष्येने मध्यम वर्ग भारावलेला दिसतो. नव्या सुधारणा अंमलात येऊन गुलामगिरीसारख्या प्रथा नष्ट झालेल्या दिसतात. सामाजिक व नैतिक प्रश्नांकडे पाहण्यात गांभीर्य दिसते. नव्या प्रेषिताच्या आवेशाने रस्किन, कार्लाइल, आर्नल्ड यांचे लिखाण प्रकट होताना आढळते. आपणाला मार्गदर्शन करावे, अशी वाचकवर्गाची अपेक्षा पुरी करण्यात यश आलेले दिसते. हा वाचकवर्ग नवशिक्षित असून त्याची वाचनाची भूक फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या प्रसारामुळे ही भूक शमण्यास मदत होत होती. कनिष्ठ मध्यम वर्गाला व काही प्रमाणात श्रमिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्कामुळे केवळ भूतदयेपेक्षा हक्कांवर आधारलेली समतेची मागणी पुढे आली व राजकारणात श्रमिकांच्या मजूरपक्षाचा (लेबर पार्टी) उदय झाला. विविधता, वैचित्र्य व वैपुल्य ह्या तिन्ही लक्षणांनी युक्त अशा साहित्याची निपज हा ह्या सर्व काळाचा विशेष ह्या कालखंडात अधिक प्रकर्षाने दिसतो.

गद्य : विज्ञानक्षेत्रातील कल्पना, संशोधनाचे फलित व निष्कर्ष यांचा दैनंदिन सामान्य समाजजीवनाशी अतूट संबंध व्हिक्टोरियन काळात जोडला गेला. बुद्धिवादी प्रवृत्तींना व्यवहारात उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाचा आश्रय घेऊन अधिकांचे अधिक सुख, ह्या तत्त्वावर समाज, शासन व कायदा यांची पुनर्रचना करण्याचे प्रयत्‍न केले. प्रत्येक सामाजिक संस्था ह्या दृष्टीने उपयुक्त आहे किंवा नाही हे तपासून तिची योग्यायोग्यता निश्चित केली गेली. उपयुक्ततावादावर आधारलेले व्यक्तिस्वातंत्र्य व उदारमतवाद यांचा मध्यम वर्गाने स्वीकार केला व अनेक सामाजिक संस्थांमध्ये आणि सरकारी कायद्यांमध्ये इष्ट परिवर्तन घडवून आणले.

विचारांच्या क्षेत्रात जीवनाचा, विश्वसंसाराचा अर्थ उलगडून त्यातून काहीतरी सोपे, सरळ तत्त्व शोधून काढण्याची वृत्ती ह्यातूनच निर्माण झाली. डार्विनच्या उत्क्रांतितत्त्वाने केवळ विज्ञानातच क्रांती केली असे नव्हे, तर विचाराची सर्व दिशाच बदलून टाकली. जीवविज्ञानात डार्विनने जे केले, ते आखिल विश्वाला व सर्व मानवी व्यवहारांना लागू करण्याचा विशाल यत्‍न हर्बर्ट स्पेन्सरने (१८२०–१९०३) केला. डार्विन, स्पेन्सर, जॉन स्ट्यूअर्ट मिल यांनी ज्ञानाची एकात्मता प्रस्थापित करण्याचे यत्‍न केले. हे कार्य क्लिष्ट, गुंतागुंतीचे आणि अतिश्रमाचे आहे, ते काळजीपूर्वक विगमनपद्धतीच्या तर्कशास्त्राचा अवलंब करून केले पाहिजे, हे मिलने प्रस्थापित करण्याचा यत्‍न केला.

ह्या सर्व नवविचारांचे मूळ म्हणजे चार्ल्स डार्विन याचा ओरिजन ऑफ स्पिशीज (१८५९) हा ग्रंथ होय. परिस्थितिभिन्नता आणि समर्थपणे जगण्याची गरज ह्यांतून प्राणिमात्राची उत्क्रांती होत गेली. ही उपपत्ती क्रांतिकारक होती. सृष्टीतील उत्पत्ती, धर्म नीती ह्यांसंबंधीच्या परंपरागत श्रद्धांना धक्का देणारी होती. ह्या सिद्धांताच्या कसोटीवर सर्वच राजकीय-सामाजिक संस्था, सामाजिक व्यवहार आणि त्यांतील भिन्नता पारखून घेणे शक्य झाले आणि त्यानंतरच्या काळात तसे पद्धतशीर प्रयत्‍न करण्यात आले.

ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा, त्यांमागील एक तत्त्व शोधून काढण्याचा सर्वांत मोठा प्रयत्‍न हर्बर्ट स्पेन्सरने केला. बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर ज्ञात विश्व पादाक्रांत करता करता ज्ञाताच्या पलीकडे एक अज्ञेयाचा प्रांत लागतो व तो तसा मानणे अपरिहार्य ठरते, हा त्याचा निष्कर्ष आहे. बुद्धिनिष्ठ आणि व्यवहारी उपयुक्ततावादाला माणसामधल्या उपजत कर्तव्यबुद्धीची जोड देऊन आणि माणसाच्या जबाबदारीच्या क्षेत्राचा विस्तार करून त्याने एका व्यापक आणि आदर्श नीतितत्त्वाचा पाया घातला. त्याची सगळी विचारसरणी किंवा सिद्धांत जरी आज स्वीकारले जात नसले, तरी विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांचा समन्वय घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्‍न मान्य झाला.

बुद्धिवाद व उपयुक्ततावाद यांचा कुलगुरू, असे ज्याचे सार्थ वर्णन केले जाते तो जॉन स्ट्यूअर्ट मिल याचे विचारवंत व तत्त्वज्ञ म्हणून असाधारण महत्त्व आहे. वडील जेम्स मिल (१७७३–१८३६) तसेच जेरेम बेंथॅम (१७४८–१८३२) यांजकडून त्याला उपयुक्ततावादाचा वारसा मिळाला होता. व्यक्तिवादावर त्याची दृढ श्रद्धा होती. बुद्धिनिष्ठा आणि व्यावहारिक गरज ह्यांतच सर्व मानवी जीवन सामावलेले नाही. कल्पनाशक्ती, अंत:प्रेरणा, सहानुभूती, भावनांचा जिव्हाळा, सौंदर्यदर्शनापासून होणारा आनंद, व्यवहाराच्या बंधनापासून दूर जाण्याची इच्छा अशा मानवी मनाच्या अनेक इतर शक्ती आणि प्रवृत्ती असतात, हे त्याने ओळखले. सुखाचे मोजमाप करता येत नाही. सुखकल्पनेत गुणवत्तेला महत्त्व आहे, हे त्याने जाणले आणि उपयुक्ततावादाला आवश्यक ते वळण दिले. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्त्व असले, तरी व्यक्ती समाजाशी संबद्ध असते. ह्या संबंधामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला पडणाऱ्या मर्यादा लक्षात घेण्याची आवश्यकता त्याने ओळखली. पूर्वग्रह, परंपरा, संस्थात्मक जीवन हे मानवी स्वातंत्र्याचे शत्रू ठरतात व ह्या निर्बंधांतून पार पडण्यासाठी व्यक्तिगत सदसद्‌‌विवेकबुद्धीवर आधारलेला सविनय कायदेभंग तो मान्य करतो. हे त्याचे विचार ऑन लिबर्टी (१८५९) ह्या त्याच्या ग्रंथात आले असून ह्या ग्रंथाचे महत्त्व आजपर्यंत टिकून राहिले आहे व भिन्नभिन्न देशांतील विचारवंतांना तो स्फूर्तिप्रद ठरला आहे.

बुद्धिवाद आणि उपयुक्ततावाद हे व्यापार कारखानदारीत संपत्ती मिळविणाऱ्यांना फायद्याचे होते. बुद्धिवादातील तर्ककर्कशता, उपयुक्ततावादातील व्यावहारिकता, डार्विनच्या उत्क्रांतिवादातील जीवनार्थ कलहाचे तत्त्व आणि लायक असेल तो टिकेल हा सिद्धांत, हे सर्व त्यांना इष्ट असेच होते; कारण अर्थसंपादन ही त्यांची प्रेरणा होती आणि स्पर्धा हे त्यांच्या व्यवहाराचे मूलतत्त्व होते. पण ह्या वादांचे किंवा त्यांना मिळालेल्या वळणाचे समाजावर आणि व्यक्तिमनावर जे परिणाम होत होते, त्यांनी ह्या शतकातील विचारी मनांना अस्वस्थ केले होते.

सामाजिक व्यवहारात रुक्षता आणि सहानुभूतिशून्यता येत चालली होती. धनिकांची भरभराट होत होती; पण गरीब कामगारांचे हाल होत होते. यंत्रनिर्मित वस्तूंत सौंदर्याचा अभाव होता. कला आणि साहित्य ह्यांचा आस्वाद उपयुक्ततावादाच्या चौकटीत बसत नव्हता. अंत:प्रेरणा, उदात्त भावना, कल्पनाशक्ती ह्यांना त्यात स्थान नव्हते. नीतिमत्ता हा एक आध्यात्मिक गुण असण्याऐवजी ती एक व्यवहाराची रीत झाली होती. त्यामुळे ढोंगाला उत्तेजन मिळत होते. १८३० पासून पुढची तीसचाळीस वर्षे ह्या घातक आणि कोंदट परिस्थितीविरुद्ध अनेक विचारवंतांनी अनेक प्रकारांनी प्रचार केला.

ह्या विचारवंतांत टॉमस कार्लाइल, जॉन हेन्‍री न्यूमन (१८०१–१८९०), जॉन रस्किन आणि मॅथ्यू आर्नल्ड ह्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. ह्यांच्या लेखनात विचारांचा जोमदारपणा, आवेश आणि वाङ्‍मयीन गुणही आहेत. प्रचलित विचारसरणीचा आणि प्रवृत्तींचा पाठपुरावा करणारा म्हणून टॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८००–१८५९) ह्याचाही उल्लेख केला पाहिजे. मेकॉले मुख्यत: शैलीसाठी प्रसिद्ध असून त्याच्या बॉरन हेस्टिंग्ज, जॉन्सन अथवा मिल्टन यांवरील निबंधांतून व हिस्टरी ऑफ इंग्‍लंड (४ खंड, १८४८–१८५५) ह्या इतिहासग्रंथातून त्याचा मध्यमवर्गीय आशावाद व इंग्रजी उदारमतावरचा गाढा विश्वास सुगम, सुश्लिष्ट, नागर अशा शैलीत स्पष्ट झाला आहे. त्यामध्ये साम्राज्यवादाचे गोडवे गायलेले दिसतात व आत्मसंतुष्टतेने आलेल्या संकुचिततेची भावनाही दिसते.

कार्लाइलवर जर्मन चिद्‌वादी तत्त्वज्ञान व कोलरिजची परंपरा यांचा प्रभाव दिसतो. त्याच्या Sartor Resartus (१८३६, इं. शी. द टेलर रीपॅच्‌ड) ह्या ग्रंथातील विचारांना बायबलमधील प्रेषिताच्या उद्‌गारांचे स्वरूप आले आहे. ह्या आत्मकथनपर ग्रंथात नास्तिवाची भूमिकेपासून अस्तिवाची श्रद्धेपर्यंत झालेला लेखकाचा वैचारिक प्रवास भावनाविष्काराने ओथंबलेल्या लालित्य-पूर्ण शैलीत वर्णिलेला दिसतो. ह्यात एक आकर्षक गूढवादी वृत्ती दिसते. ह्या गूढवादातून इतिहासाकडे पाहताना मानवाच्या सर्व इष्ट, आदर्श सत्प्रवृत्तींचा परिपाक कार्लाइलला धीरोदात्त नायकांत व विभूतींमध्ये दिसून आला. इतिहास म्हणजे ह्या विभूतींची चरित्रे, असे त्याचे प्रतिपादन ऑन हीरोज, हीरो वर्‌शिप अँड हिरोइक इन हिस्टरी (१८४१) ह्या ग्रंथात दिसते. स्वत:चा आत्मा गमावलेल्या समाजाचे अध:पतन, द फ्रेंच रेव्होल्यूशन (१८३७) ह्या ग्रंथात भावपूर्ण, व्यक्तिवादी, विक्षिप्त शैलीत केलेले आढळते. तत्कालीन परिस्थितीसंबंधीचे असमाधान आणि चीड त्याच्या साहित्यात दिसते. आवेश, काव्यात्मकता, कल्पनासामर्थ्य आणि आदर्शवाद ह्या कार्लाइलच्या गुणांनी त्याच्या वाङ्‍मयाला वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप दिले आहे.

जॉन हेन्‍री न्यूमनचे कार्य मुख्यत: धार्मिक क्षेत्रात असले, तरी परंपरानिष्ठ कॅथलिक पंथाचा त्याने घेतलेला आश्रय व ऑक्सफर्ड मूव्हमेंट ह्या धार्मिक आंदोलनात त्याने घेतलेला भाग उपयुक्ततावादाच्या विरुद्ध प्रतिक्रिया दर्शवितो. द आयडिया ऑफ अ युनिव्हर्सिटी (१८५२) ह्या त्याच्या विश्वविद्यालयीन शिक्षणासंबंधीच्या व्याख्यानात शुद्ध ज्ञानसाधना आणि बुद्धी व भावना यांचा समतोल साधलेला सभ्य गृहस्थ घडविणे ही विश्वविद्यालयीन शिक्षणाची उद्दिष्टे आहेत, असे त्याने प्रतिपादन केले. ह्या कल्पना उच्च शिक्षणाला पायाभूत ठरतील, इतक्या महत्त्वाच्या आहेत.

जॉन रस्किनवर कार्लाइलच्या विचारसरणीचा काही अंशी परिणाम झालेला होता. औद्योगिक क्रांतीच्या आरंभाच्या काळातील स्वार्थी, सहानुभूतिशून्य प्रवृत्तींवर; कलाहीन, असुंदर वातावरणावर आणि बाजारी मूल्यांवर त्याने अन्‌‌टू धिस लास्ट (१८६०–१८६२) व सेसमी अँड लिलीज (१८६५) यांमधून टीका केली. हस्तव्यवसायावर आणि शरीरश्रमावर आधारलेल्या सहकारी समाजवादाचा त्याने पुरस्कार केला. कार्यतत्परतेवर त्याचा विश्वास कार्लाइलइतकाच दृढ होता; परंतु हे काम सुंदर, सर्जनशील व फलदायी असावे, असा त्याचा आग्रह होता. यांत्रिक जडतेमुळे हरपलेली जीवन जगण्याची कला पुन्हा जोपासण्याची त्याला तळमळ होती. ह्या दृष्टीने चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला इ. कलांचे महत्त्व त्याने जाणले. द सेव्हन लँप्स ऑफ आर्किटेक्चर (१८४९), द स्टोन्स ऑफ व्हेनिस (३ खंड, १८५१–१८५३), मॉडर्न पेंटर्स (५ खंड, १८४३–१८६०) हे ग्रंथ लिहून त्याने चित्रकला व मूर्तिकला ह्यांच्या रसग्रहणाला नवे वळण लावले.

मॅथ्यू आर्नल्डची कवी म्हणून कामगिरी महत्त्वाची असली, तरी वाङ्‍मयसमीक्षक व संस्कृतिमूल्यांचा भाष्यकार म्हणून त्याचे अधिक महत्त्व आहे. असंस्कृतपणा, रासवटपणा, बाजारी मूल्यांची सवंग लोकप्रियता यांनी समाज कसा अवनतीपर्यंत जाऊन पोचतो, ह्याचे चित्रण त्याने कल्चर अँड अ‍ॅनर्की (१८६९) या ग्रंथात केले व सौंदर्य आणि ज्ञान (स्वीटनेस अँड लाइट) ह्यांचा पुरस्कार केला.

काव्य : व्हिक्टोरियन काळातील प्रत्येक नामवंत कवीचा स्वच्छंदतावादाशी आणि स्वच्छंदतावादी कवींशी संबंध आहे. टेनिसनच्या काव्यातील इंद्रियगोचर अनुभूतींच्या कलात्मक, सौंदर्यपूर्ण गौरवाचे स्फूर्तिस्थान कीट्स आहे, तर रॉबर्ट ब्राउनिंगच्या प्रणयकाव्यातील बारकाव्यांचा आणि त्याच्या कलाध्येयाचा शैलीशी संबंध पोचतो. मॅथ्यू आर्नल्डने गटे व बायरन यांच्याकडून स्फूर्ती घेतली, तर डँटी गेब्रिएल रोसेटी (१८२८–१८८२) व त्याच्या समूहातील ‘प्री-रॅफेएलाइट’ कवी ह्यांना कीट्सचा सौंदर्यवाद आकर्षक वाटला.

तत्कालीन तत्त्वविचार, वैज्ञानिक संशोधन व निष्कर्ष ह्यांचा व्हिक्टोरियन काळातील काव्यात आकर्षक समावेश झाला आहे. अ‍ॅल्फ्रेड टेनिसन हा ह्या युगातील प्रातिनिधिक कवी. त्याची लोकप्रियता आज ओसरलेली असली, तरी विज्ञानामुळे मानवी जीवनात आलेली विफलता, उत्क्रांतितत्त्वामुळे धर्मश्रद्धेला गेलेले तडे, जीवनातील दु:खांचा तसेच सुखासीनतेचा उबग आल्यावर स्वत:च्या कल्पनाविश्वात दंग होण्याची चिंतनशील अथवा पलायनवादी प्रवृत्ती यांचे अंत्यत कलात्मक चित्रण त्याच्या प्रमुख काव्यांत दिसते (उदा., इन मेमोरिअम ए. एच्. एच्, आयडिल्स ऑफ द किंग, लोटस इटर्स, लेडी ऑफ शॅलट). त्याच्या कवितांतील निसर्गचित्रे व त्यांत कोंदणासारख्या बसविलेल्या मानवी भावावस्था आजही आकर्षक वाटतात. मॉड आणि यूलिसिझ ह्या भावकाव्यांत नादमाधुर्य, शब्दसंगीत, चिंतनशीलता या टेनिसनच्या गुणांना मनोज्ञ स्वरूप आलेले दिसते.

रॉबर्ट ब्राउनिंगने केलेल्या मानवी भावानस्थांच्या चित्रणात व्यापक सहानुभूती व कल्पनाशक्ती ह्यांचा प्रत्यय येतो. त्याने काव्यात चित्रत केलेली भावावस्थांची आणि मानसिक प्रवृत्तींची अभिव्यक्ती स्वगताचे नाट्यमय रूप येऊन अवतरली. त्या दृष्टीने त्याची नाट्यत्मक एकभाषिते संस्मरणीय आहेत. संशयाशी, निराशेशी, विफलतेशी मुकाबला देत देत आस्तिक्यबुद्धी आणि आशावाद टिकविला पाहिजे, ह्या मनोभूमिकेतून ब्राउनिंगची दीर्घकविता अवतरली. त्याच्या काव्यात मूर्तिकला, संगीत, चित्रकला ह्या ललित कलांचा निकटचा संबंध दिसतो. ह्या कलाक्षेत्रांतील कलावंतांनी त्याला विषय पुरविले व एक व्यापक चिंतनशीलता दिली (मेन अँड विमेन, १८५५ आणि पिपा पासेस). ब्राउनिंगप्रमाणेच त्याची पत्‍नी एलिझाबेथ बाउनिंग (१८०६–१८६१) हिची भावपूर्ण प्रणयकविता सॉनेट्स फ्रॉम द पोर्तुगीजमध्ये (१८५०) आहे. ऑरोरा लीमध्ये (१८५६) तिने सामाजिक प्रश्न हाताळले. तिच्या काव्यात स्त्रीचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोण दिसतो.

ब्राउनिंगपेक्षाही अधिक प्रकर्षाने यूरोपमधील चित्रकलेची स्फूर्ती घेऊन प्री-रॅफेएलाइट कवींची कविता प्रकटली. अ‍ॅल्जर्नन चार्ल्स स्विन्‌‌बर्न (१८३७–१९०९), डँटी गेब्रिएल रोसेटी, विल्यम होलमन हंट (१८२७–१९१०), जॉन मिले, विल्यम मॉरिस (१८३४–१८९६) हे कवी व चित्रकार ह्या कविसमूहातील प्रमुख. उत्कट निसर्गप्रेम व सहजसुंदरता हे रॅफेएल ह्या इटालियन चित्रकारापूर्वी चित्रकलेत असलेले गुण काव्यात आणण्याचा ह्यांचा प्रयत्‍न. त्याचे मनोहर रूप तपशीलाने, सूक्ष्म बारकाव्याने आणि सौंदर्यवृत्तीने नटलेल्या 'ब्‍लेस्ड डॅम्सेल' सारख्या रोसेटीच्या काव्यात दिसते. क्रिस्टीना रोसेटी (१८३०–१८९४) व विल्यम मॉरिस यांच्या काव्यात दलितांबद्दलचा कळवळा व सहानुभूती दिसते. हे काव्य टॉमस हूडसारख्या (१७९९–१८४५) कवीच्या उघड प्रचारकी काव्यापेक्षा अधिक कलात्मक व स्फूर्तिप्रद आहे.

मॅथ्यू आर्नल्ड व आर्थर ह्यू क्लफ (१८१९–१८६१) ह्यांनी विज्ञानाच्या प्रगतीने जो संशयवाद बळावला, त्याचे मनोज्ञ चित्रण केले. बौद्धिक कल्पना, निराशेची छटा, जीवनाची क्षणभंगुरता आणि अस्थिरता ह्यांना आर्नल्डने दिलेले काव्यरूप मोठे आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटते. क्लफच्या काव्यात ह्या सर्व छटांबरोबरच शेवटी आशावादी निष्कर्ष काढलेले दिसतात.

जीवनातील विफलता, क्षणभंगुरता, मानवी मूल्यांची अस्थिरता ह्यांचा उबग येऊन क्षणाक्षणातील जीवनानंद लुटण्याची सुखवादी वृत्ती एडवर्ड फिट्सजेरल्डने (१८०९–१८८३) अनुवादिलेल्या उमर खय्यामच्या रूबायात मोठे सौंदर्यपूर्ण आणि लयबद्ध काव्यरूप घेऊन अवतरलेली दिसते. टॉमस हार्डी (१८४०–१९२८) व जेरार्ड मॅन्‌‌ली हॉपकिन्झ (१८४४–१८८९) हे कवी व्हिक्टोरियन काळातले; परंतु वृत्तीने विसाव्या शतकातील प्रवृत्तींशी अधिक जवळचे. हार्डीचे काव्य दैनंदिन जीवनातील साध्या प्रसंगांशी निगडित आहे. त्याचे निसर्गप्रेम अत्यंत विशुद्ध व खरेखुरे भासते. हॉपकिन्झ ह्या रोमन कॅथलिक भिक्षूचे काव्य तत्कालीन प्रवृत्तीपेक्षा अत्यंत भिन्न प्रवृत्तीचे असून त्यातील कल्पनांची भरारी आणि अध्यात्मवादी किंवा मेटॅफिजिकल वातावरण ह्यांचे डनसारख्या कवींशी साधर्म्य आहे. वृत्तरचनेत व नादमाधुर्यात त्याचे काव्य एलिझाबेथकालीन स्वच्छंदतावादी काव्याच्या परंपरेशी अधिक जुळते. आत्यंतिक धर्मभावनेला इंद्रियगोचर अनुभूतींची जोड देऊन भावपूर्ण, आवेशमय काव्यरचना करण्यात ह्या कवीला मोठे यश प्राप्त झालेले दिसते. टेनिसन, आर्नल्ड व रोसेटी ह्यांच्यापासून स्फूर्ती घेतलेले अनेक लहानमोठे कवी ह्या सबंध काळात दिसतात.

एडवर्ड लीअरने (१८१२–१८८८) लिहिलेल्या बुक ऑफ नॉन्‌‌सेन्स (१८४६), नॉन्‌‌सेन्स साँग्ज... (१८७१), मोअर नॉन्‌‌सेन्स साँग्ज (१८७२) इत्यादींमधील वैचित्र्यपूर्ण आणि विक्षिप्त काव्यरचनेने निरर्थिका आणि वात्रटिका ह्यांसारखे काव्यप्रकार लोकप्रिय केले. लीअर हा चित्रकारही होता.

कादंबरी : कादंबरीवाङ्‍मयाला अठराव्या शतकात चांगला बहर आला होता. त्याने विविध रूपे धारण केली होती पण शतकाच्या अखेरीअखेरीला त्याचा भर ओसरू लागला होता आणि एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकाळात तर नाव घेण्यासारखे एकदोनच कांदबरीकार दिसतात. व्हिक्टोरियन युगात कादंबरीवाङ्‍मयाला पुन्हा बहर आला. विविधता, विपुलता, वैचित्र्य व कलागुण ह्या सर्व दृष्टींनी व्हिक्टोरियन युगातील कादंबरी संपन्न आहे. लोकशाही स्थिरावल्यावर व मध्यम वर्गाला निश्चित स्थान मिळाल्यावर कादंबरीने गद्यमहाकाव्याचे रूप घ्यावे, हे साहजिकच होते. ह्या काळातील भूतदयावाद, उत्क्रांतितत्त्वासारखे विज्ञानप्रणीत प्रवाह, नीतिपर अथवा धर्मपर भूमिकेवरून केलेले तत्त्वचिंतन, समाजसुधारणेच्या प्रवृत्ती, ढोंग, संकुचितता, स्वार्थ ह्यांचा उपहास, विडंबन व नवी मूल्ये प्रस्थापित करण्याचा ध्येयवाद ह्या सर्व प्रेरणा व प्रवृत्ती ह्या काळातील कादंबरीत दिसतात. आरंभी आरंभी नियतकालिकांतून कादंबऱ्या प्रसिद्ध होत. त्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभला; परंतु हप्तेबंदीने लिहिण्याच्या पद्धतीमुळे विस्कळीतपणा, रचनाशैथिल्य हे दोषही कादंबरीत शिरले. चार्ल्स डिकिन्झ, विल्यम मेकपीस थॅकरी, शार्लट ब्राँटी व एमिली ब्राँटी, एलिझाबेथ गॅस्केल (१८१०–१८६५), जॉर्ज एलियट ऊर्फ मेरी अ‍ॅन एव्हान्स, जॉर्ज मेरेडिथ (१८२८–१९०९), टॉमस हार्डी हे ह्या काळातील प्रमुख कादंबरीकार, यांशिवाय रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन (१८५०–१८९४), चार्ल्स रीड (१८१४–१८८४), विल्यम विल्की कॉलिंझ (१८२४–१८८९), अँटोनी ट्रॉलप (१८१५–१८८२), जॉर्ज गिसिंग (१८५७–१९०३), सॅम्युएल टॉमस बटलर (१८३५–१९०२) आणि विल्यम मॉरिस ह्यांनीही कादंबरीवाङ्‍मयात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. विशेषत: ह्या काळात नौकानयन, प्रवास, प्रादेशिकता व व्यवसाय ह्यांवर आधारलेल्या भिन्न थरांतील लोकांचे रंजन करणाऱ्या कादंबऱ्या विपुल प्रमाणात निर्माण झाल्या. अत्यंत प्रगल्भ जीवनदर्शनापासून सामान्य, सवंग जनरंजनापर्यंत अनेकविध नमुने कादंबरीक्षेत्रात बघण्यास मिळू लागले.

डिकिन्झच्या द पिक्‌विक पेपर्स (१८३७), ऑलिव्हर ट्विस्ट (१८३८), डेव्हिड कॉपरफील्डसारख्या (१८५०) कादंबऱ्यांनी आपली लोकप्रियता अद्यापि टिकविली आहे, ती त्यांतील चमकदार विनोदाने, मानवतेने ओथंबलेल्या भावपूर्ण व अत्यंत विदारक अशा समाजदर्शनाने. जीवनातील वैचित्र्य आणि विविधता व सामान्यांचे असामान्य जग कलात्मकतेने चित्रित करण्यात डिकिन्झला मोठे यश मिळाले व त्यामुळे त्याच्या रचनाकौशल्याच्या अभावाचा दोष झाकून गेला. थॅकरीने व्हॅनिटी फेअर (क्रमश: प्रसिद्ध १८४७–४८), हेन्‍री एझ्मंड (१८५२) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून उच्च मध्यमवर्गीयांच्या अहंमन्यतेचा उपहास केला व बुद्धिवादी दृष्टिकोणातून त्या वर्गाचे सांस्कृतिक वातावरण चित्रित केले. त्याच्या चित्रणात डिकिन्झचा जिव्हाळा नसला, तरी त्याची सामाजिक टीका प्रखर व प्रभावी आहे.

ब्राँटी भगिनींपैकी शार्लटची जेन एअर (१८४७), एमिलीची वदरिंग हाइट्स (१८४८), एलिझाबेथ गॅस्केलच्या मेरी बार्टन (१८४८) आणि क्रॅनफर्ड (१८५३) ह्या कादंबऱ्या स्त्रीच्या प्रबळ परंतु अस्फुट आशाआकांक्षांचे आणि भावनांचे वेधक चित्रण करतात. अस्वस्थ, बंडखोर, चिंतनशील, कमालीची आत्मकेंद्रित अशी नवी स्त्री कादंबऱ्यात दिसते. जॉर्ज एलियट ही बहुश्रुत, तत्त्वचिंतक कादंबरीकर्ती नैतिक वा धार्मिक मूल्यांना मानवी रूप देण्यात यशस्वी झाली आहे. सत्यान्वेषी ऋजुता, काव्यमयता, सूक्ष्म मनोव्यापारदर्शन आणि प्रभावी स्वभावचित्रण इ. विशेष अ‍ॅडम बीड (१८५९), द मिल ऑन द फ्‍लॉस (१८६०), सायलस मार्नर (१८६१), मिड्लमार्च (१८७१–७२) ह्या तिच्या कादंबऱ्यांत प्रकट होते.

जॉर्ज मेरेडिथ हा ह्या कालखंडातील लोकप्रिय न झालेला, पण महत्त्वाचा कांदबरीकार, ढोंगी आणि पोकळ अंहकारी व्यक्ती, तत्कालीन समाजात येत चाललेला यांत्रिकपणा ह्यांवर त्याने टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान असावे, ह्यावर भर दिला. अत्यंत बुद्धिनिष्ठ भूमिका, पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे व मनोव्यापारांचे सूक्ष्म विश्लेषण आणि उपहास ही त्याच्या कादंबरीलेखनाची वैशिष्ट्ये आहेत; पण अत्यंत सूत्रमय भाषा, अलंकारांचा-विशेषत: रूपकांचा-अतिरिक्त उपयोग आणि बांधेसूद रचनेचा अभाव ह्यांमुळे त्याच्या कादंबऱ्यांना लोकप्रियता किंवा उच्च कलात्मक पातळी लाभली नाही. टॉमस हार्डीची कादंबरी अधिक अर्थघन आहे. उत्क्रांतिवादामुळे आणि नवीन शास्त्रीय शोधांमुळे ईश्वर आणि सृष्टी ह्यांच्या परस्परसंबंधांविषयीच्या परंपरागत कल्पनांना धक्का बसला होता. ईश्वर असलाच तर माणासाच्या सुखदु:खांविषयी उदासीन असला पाहिजे, अशी विचारसारणी हार्डीच्या कादंबऱ्यांत दिसते. निसर्ग, नागर सभ्यता आणि मानव स्वभाव ह्यांचे परस्परसंबंध, त्यांतून निर्माण होणारे ताण व संघर्ष आणि माणसाची असहायता हा त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांचा गाभा आहे. निसर्ग हा त्याच्या कादंबऱ्यांतील एक जिवंत पात्र बनतो. हार्डीच्या कादंबऱ्यांची रचनाही वास्तुशिल्पांसारखी बांधेसूद आहे.ज्यूड द ऑब्स्क्युअरसारख्या (१८९६) आपल्या कादंबऱ्यांत त्याने सामान्य, परंतु प्रबळ भावनांच्या आहारी गेलेली माणसे आणि त्यांचे शोकमय जीवन यांचे अत्यंत मनोज्ञ चित्रण केले. हार्डीच्या दृष्टिकोणाचे गांभीर्य व मानवी जीवनाच्या अंतिम विफलतेबरोबरच त्यातील उदात्ततेला त्याने दिलेले महत्त्व ह्यांमुळे त्याच्या महत्त्वाच्या कलाकृतींना श्रेष्ठ शोकात्मिकेची भव्यता आणि खोली प्राप्त झाली आहे. रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन याच्या डॉ. जेकिल अँड मिस्टर हाइडसारख्या (१८८६) रोमांचकारी कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्यांतील साहसमय, रहस्यपूर्ण कथानकांची मोहिनी सर्व दर्जाच्या व सर्व काळातील वाचकांवर पडली आहे. विल्यम मॉरिससारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फारच थोड्यांचे असेल. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी त्याने कथा, कविता, कादंबऱ्या आणि प्रबंध लिहिले. आरंभी त्याच्यावर धार्मिक पुनरुत्थानाच्या चळवळीचा प्रभाव पडला होता; नंतर कार्लाइलचा आणि मुख्यत: रस्किनचा, यंत्रयुगाने जीवनात जी अमानुषता, असुंदरता, घाणेरडेपणा, बकालपणा आणला होता, त्याबद्दल त्याला रस्किनप्रमाणेच चीड होती आणि कलेच्या साहाय्याने जीवन अधिक सुंदर व सामाजिक संबंध अधिक जिव्हाळ्याचे करता येतील असे वाटल्यामुळे तशा प्रयत्‍नाला तो लागला. पुस्तकांची छपाई सुधारावी म्हणून त्याने मुद्रणाचे खिळे तयार केले, छापखाना काढला, घरे सुशोभित व्हावी म्हणून नवनवीन नमुन्यांचे फर्निचर बनविले, पडद्यांच्या, गाद्यागिरद्यांच्या कापडावर नव्या नमुन्यांचे छापांचे काम केले. मध्ययुगात जीवन अधिक साधे, सुखाचे, सरळ होते, असे वाटून मध्ययुगीन कथांतून आणि काव्यातून आख्याने घेऊन रचना केली. त्याच्याही मागे जाऊन प्राचीन स्कँडिनेव्हियन, ग्रीक आणि लॅटिन वीरगाथांची, महाकाव्यांची भाषांतरे केली. शेवटी त्याला वाटले, की सर्वांना समान संधी देणारा समाजवाद अस्तित्वात आल्याखेरीज समाज खरोखर सुखी होणार नाही, म्हणून त्याने समाजादी चळवळ चालू केली. जॉर्ज बर्नार्ड शॉ याच्यावरही त्याचा परिणाम झाला. असा हा कर्मयोगी कलावंत आणि साहित्यिक होता.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात व्हिक्टोरियन युगातील स्थिर मूल्यांबद्दल, बाजारी वृत्तीबद्दल आणि सामान्यतेला मिळालेल्या महत्त्वाबद्दल साशंकता निर्माण होऊन समाजाऐवजी व्यक्तीवर व तत्त्वज्ञान अथवा सामाजिक सुधारणा ह्यांऐवजी कलामूल्यांवर काही प्रतिभाशाली लेखकांनी शक्ती केंद्रित केलेली दिसते. हा काळ मूल्यविषयक अवनतीचा मानला जातो; परंतु त्यात पुढील प्रवृत्तींची चाहूल लागते. फ्रान्समधील विमुक्त वातावरण, सुखासीनता व शुद्ध कलावादी संप्रदाय यांचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसतो; तर सामान्य, अभिरुचिशून्य वाचक व कलावंत ह्यांच्यामधील दरी रुंदावताना दिसते. कलावंत स्वत:च्या कलेची जपणूक करण्याचा प्रयत्‍न करतो. यात वॉल्टर पेटरचे (१८३९–१८९४) वैचारिक व टीकात्मक लेखन व ऑस्कर वाईल्ड (१८५४–१९००) ह्याची नाटके, टीका, काव्य, कथा आदी लेखन वादग्रस्त पण महत्त्वाचे ठरले. व्हिक्टोरियन काळातील मूल्यांच्या विरुद्ध बंडखोरी करून मूल्यकल्पनांपासून मुक्त अशा दृष्टिकोणाचा वाईल्डने स्वीकार केला. निखळ कलामूल्यांचा पाठपुरावा करणारी काही मोलाची समीक्षणे लिहिली. हलक्याफुलक्या, विनोदी, उपहासगर्भ नाटकांनी त्याने नाट्यक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. ह्या बाबतीत त्याची तुलना रेस्टोरेशन काळातील नाटककार काँग्रीव्ह ह्याच्याशी केली जाते. काव्य, कथा, निबंध ह्यांत त्याने प्रयोगशील, कलात्मक दृष्टी ठेवली; परंतु एक प्रकारच्या रोगट, आत्मकेंद्रित वृत्तीचे व विकृतींचे समर्थन करण्याची प्रवृत्तीही जोपासली.

नियतकालिकांचे कार्य : एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी जशी नियतकालिकांनी वाङ्‍मयीन कामगिरी बजावली, तशीच ती पुढेही बजावत राहिली. इतकेच नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. पुस्तकपरीक्षणे, गंभीर चर्चात्मक निबंध ह्यांबरोबरच कादंबऱ्याही नियतकालिकांतून क्रमश: प्रसिद्ध होऊ लागल्या. डिकिन्झच्या कादंबऱ्या नियतकालिकांतूनच प्रथम प्रसिद्ध झाल्या. १८५९ मध्ये स्थापन झालेल्या मॅक्‌मिलन्स मॅगझिनमध्ये टेनिसन, आर्नल्ड, हार्डी आणि हेन्‍री जेम्स ह्यांसारख्या लेखकांचे लेखन प्रसिद्ध होत असे. १८६० साली निघालेल्या कॉर्नहिल मॅगझिनमध्ये थॅकरी, ट्रॉलप, जॉर्ज एलियट, एलिझाबेथ गॅस्केल, हार्डी, हेन्‍री जेम्स ह्यांच्याप्रमाणेच विल्की कॉलिंझ आणि चार्ल्स रीड ह्यांच्या कादंबऱ्या क्रमश: प्रसिद्ध झाल्या. कॉर्नहिलमध्ये गंभीर स्वरूपाचे लेखन करणाऱ्यांत आर्नल्ड, रस्किन, जार्ज मेरेडिथ हे होते. १८६५ मध्ये स्थापन झालेल्या फोर्टनाइटली रिव्ह्यूमध्ये गंभीर समीक्षालेख प्रसिद्ध होत. त्यात लिहिणाऱ्यांमध्ये टी. एच्. हक्सली, लेस्ली स्टीव्हन, वॉल्टर पेटर, विल्यम मॉरिस, स्विन्‌‌बर्न व मेरिडिथ हे होते. ह्या नियतकालिकांपैकी काहींचा खप लाखाच्याही वर होता. ह्यावरून त्यांचे महत्त्व व त्यांचा प्रसार ह्याची कल्पना येऊ शकेल.

एकंदरीने पाहता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीचे इंग्‍लंडमधील दृश्य संकीर्ण स्वरूपाचे दिसते. पूर्वीच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हती आणि नवीन प्रश्न उपस्थित झाले होते. १८७१ मध्ये जर्मनीकडून फ्रान्सचा पराभव झाला. जर्मनीचे सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या आणि यूरोपमधील सत्तासमतोल ढळला. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात इंग्‍लंडला धक्का बसला. हिंदुस्थानात काँग्रेसची (राष्ट्रसभेची) स्थापना होऊन राजकीय हक्क मागण्यात येऊ लागले. आयर्लंडमध्ये स्वराज्याच्या मागणीचा जोर वाढत चालला आणि इंग्‍लंडात टोरी आणि व्हिग ह्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देणारा तिसरा एक पक्ष-मजूर पक्ष-अस्तित्वात आला. समाजवादाच्या प्रचारासाठी ‘फेबियन सोसायटी’ स्थापन करण्यात आली.

वॉल्टर पेटर, ऑस्कर वाईल्ड ह्यांचा सौंदर्यवाद हा ह्या परिस्थितीच्या संदर्भात वागण्याचा एक मार्ग होता. किपलिंग, हेन्ली ह्यांचा ब्रिटिश साम्राज्यवाद हा दुसरा मार्ग होता आणि बदलत्या परिस्थितीची, वास्तवाची आणि विज्ञानाची दखल घेणारा वेल्स, शॉ ह्यांचा तिसरा मार्ग होता, विसावे शतक उजाडले, तेव्हा अशी परिस्थिती होती.

संदर्भ- एकोणिसावे शतक :

1. Allen, W. The English Novel, London, 1954.

2. Baker, E. A. The History of the English Novel, Vols. V-VI, London, 1929-1935.

3. Chesterton, G. K. The Victorian Age in Literature, New York, 1913.

4. Grierson, Sir H. J. C. The Background of English Literature: Classical and Romantic, Lonon, 1934.

5. Herford, C. H. The Age of Wordsworth, London, 1897.

6. Hough, R. The Romantic Poets, London, 1953.

7. Houtchens, C. W.; Houtchens, L. H. Ed. The English Romantic Poets and Essayists. New York, 1958.

8. Kettle, A. An Introduction to the English Novel I, London, 1951.

9. Lucas, F. L. The Decline and Fall of the Romantic Ideal, Cambridge, 1936.

10. Omond, T. S. The Romantic Triumph, Edingburgh, 1900.

11. Read, H. The True Voice of Feeling : Studies in English Romantic Poetry, London, 1953.

12. Saintsbury, G. E. A History of Nineteenth Century Literature 1780-1895, London, 1896.

13. Saintsbury, G. E. Essays in English Literature, 1780-1860, London, 1890-1895.

14. Wellek, R. A History of Modern Criticism, 2. The Romantic Age, New Haven, 1955.

15. Willey, B. Nineteenth Century Studies, London, 1949.

लेखक: रा. भि. जोशी ; वा. चिं. देवधर ; अ. के. भागवत

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate