पाचव्या शतकात आर्मेनियन लिपी निश्चित झाली. तत्पूर्वीच्या काळात आर्मेनियन लोकसाहित्य निर्माण होत होते. वाहाग्न या देवाची व अर्तवझ्द या राजाची स्तुतिपर गीते पाचव्या-सहाव्या शतकांपर्यत गायिली जात असल्याचा उल्लेख आढळतो. राजदरबारात ग्रीक नाटकांचे प्रयोग होत. शिवाय स्थानिक नाटकांचेही प्रयोग होत. त्यांत स्त्रीपुरुष, गायक व नर्तक (गुसान व व्हर्दसाक) भाग घेत. सासुंत्सी डेव्हिथ हे मौखिक परंपरेने चालत आलेले राष्ट्रीय महाकाव्य होय. भाषाशास्त्रज्ञांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याचे संकलन केले. सासून राजवंशातील वीरपुरुषांच्या साहसकथा त्यात वर्णन केल्या आहेत. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस आर्मेनियन लिपी तयार झाल्यानंतर भाषांतरांची लाट उसळळी. बायबलादी धर्मग्रंथांची भाषांतरे करण्यात आली. याच शतकात दहा थोर लेखक होऊन गेले. त्यांनी आर्मेनियन भाषा प्रतिष्ठित केली व विविध प्रकारच्या साहित्यनिर्मितीला चालना दिली. त्यांपैकी आगाथांगेगॉस, बुझांड, झेनब, ग्लाक, मोझेझ, पारपेकी या लेखकांनी इतिहासग्रंथ लिहिले. सेंट ग्रिगोर व मंडाकुनी यांनी ईश्वरविद्या व नीतिशास्त्र या विषयांवर लेखन केले. एझ्निक हा तत्त्वज्ञानी आणि कोरिऊन हा चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होता.
पुढे दहाव्या शतकापर्यंत नावाजण्याजोगे आर्मेनियम ग्रंथलेखन फारसे झाले नाही. सेंट ग्रेगरी नारेकात्सी हा दहाव्या शतकातील प्रमुख कवी. त्याची गूढ अनुभूतींची गीते व स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. जुन्या करारातील ‘साँग ऑफ साँग्ज’ या प्रतीकात्मक मानलेल्या प्रेमगीतांवरील त्याची गद्य टीकाही उल्लेखनीय आहे. इतिहासलेखनात आर्मेनिया अग्रेसर असल्यामुळे या काळातही इतिहासलेखन होत राहिले. त्यापैकी स्टीफनॉस असोधिक याचा जागतिक इतिहासावरील ग्रंथ उल्लेखनीय आहे. तसेच अरिस्टेकस लास्टिव्हर्ट्झी याचा आर्मेनियाचा इतिहास म्हणजे गद्यातील एक विलापिकाच होय.
अकराव्या शतकाच्या अखेरीला सायली शियन आर्मेनिया हा विभाग सांस्कृतिक केंद्र बनला. बाराव्या शतकातील सर्वांत थोर कवी म्हणजे नेर्सिझ श्नोर्हाली (११०२–११७२) हा होय. कॉकेशियन अल्बेनियात कायद्याचे पहिले पुस्तक एम्. गोश (११३३–१२१३) याने रचले. याच पुस्तकाच्या आधारे पुढील काळात आर्मेनियन कायदे करण्यात आले.
तेराव्या शतकातील बहुतेक लिखाण धर्मपंडितांचे आहे. इतिहासलेखनाची परंपरा याही शतकात पुढे चालू राहिली. सोळाव्या शतकापर्यंत नाव घेण्याजोगे साहित्य आढळत नाही. सोळावे ते अठरावे शतक या काळात ‘आशुध’ (आशिक किंवा प्रेमिक) कवींचे काव्य लोकप्रिय होते. नहापेट कुचक व आरुथिन सायादिन हे त्या काळचे दोन प्रसिद्ध कवी.
एकोणिसाव्या शतकात साहित्यनिर्मितीला पुन्हा एकदा उधाण आले. या शतकापर्यंत आर्मेनियन भाषेत अनेक प्रकारचे दोष व शैथिल्य निर्माण झाले होते. प्राचीन ग्रांथिक भाषा व आधुनिक बोलभाषा यांपैकी कोणती भाषा वापरावी, याविषयी वाद चालू होता. शेवटी बोलभाषेच्या बाजूने कौल पडला व पूर्वेकडील साहित्य आराराट बोलीत व पश्चिमेकडील इस्तंबूलच्या बोलीत लिहिले गेले. आर्मेनियन लेखकांचे स्फूर्तिस्थान यूरोप आहे. कुणाचे फ्रान्स, तर कुणाचे रशिया एवढाच फरक.
आधुनिक काळात आर्मेनियन साहित्य विविध लेखकांनी समृद्ध केले. त्यांपैकी टोव्हमा टेर्झिअन (१८४०–१९०९), एम्.पेशिक्थाश्लिअन (१८२८–१८६८), पेट्रॉस डुरिअन (१८५१–१८७२), वाहान टाकेयान (१८७७–१९४४) हे भावकवी प्रसिद्ध आहेत. हाकोब पारोनिअन (१८४२–१८९१) व एरूआंड ओटिअन (१८६९–१९२६) हे कादंबरीकार आणि पारोनिअन हा नाटककार हे उल्लेखनीय आहेत.
रशियन आर्मेनियात कादंबरीचा उपयोग राजकीय प्रचारासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी करण्यात आला. या भागातील खाचातुर अबोव्हियन (१८०५–१८४८) व हकोब मलिक-हकोबिअन ऊर्फ रफी हे कादंबरीकार उल्लेखनीय आहेत.
पूर्वेकडील कवींत होझनीझ धुमानियन (१८६९–१९२३) या कवीची भावगीते त्याचप्रमाणे आनुश हे छोटे महाकाव्य प्रसिद्ध आहे. नाटककारांपैकी गॅब्रिएल सुंदुक्यान (१८२५–१९१२) हा प्रसिद्ध आहे.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात राजकीय कारणांनी इस्तंबूलचे आर्मेनियन साहित्यकेंद्र मागे पडले. १९३६ मध्ये आर्मेनियन सोव्हिएट समाजवादी प्रजासत्ताक स्थापन झाल्यापासून आर्मेनियन साहित्याच्या अभिवृद्धीचे प्रयत्न सरकारी नियंत्रणाखाली करण्यात येत आहेत.
संदर्भ :1. Meillet, Antoine, Esqulose d’une grammaire compare’e de I’armenien classique, Paris, 1903.
2. Meillet Antoione; Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.
लेखक: द. स. शिरोडकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2019
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.
पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषे...
अमेरिकन साहित्य विषयक माहिती.
अपभ्रंश भाषेतील वाङ्मयनिर्मिती.