जैनशौरसेनीतील मुनिधर्मविषयक ग्रंथ. या ग्रंथास भगवती आराधना, मूलाराधना अशा नावांनीही आदरपूर्वक संबोधिले जाते. दिगंबर जैन संप्रदायाचा हा एक प्राचीन ग्रंथ होय. त्याच्या रचनेचा काल निश्चित झालेला नाही. तथापि श्वेतांबरांच्या प्राचीन ग्रंथांतून आराधनेतील गाथा (श्लोक) मिळतात, यावरून हा ग्रंथ किती प्राचीन आहे, याची कल्पना येते. त्यात २,१६६ गाथा आहेत. काही प्रतींतून २,१७० गाथाही आढळतात. या गाथा चाळीस अधिकारांत विभागलेल्या आहेत. याची रचना ð शिवार्य अथवा शिवकोटी नामक ग्रंथकाराने केली. सम्यग् दर्शन, सम्यग् ज्ञान, सम्यक् चारित्र्य आणि सम्यक् तप अशा चार आराधनांचे त्यात विवेचन आहे. या ग्रंथात मुख्यतः मुनिधर्माचे निरूपण आहे. ग्रंथारंभी मरणाचे सतरा प्रकार सांगितले असून त्यांत पंडितपंडित मरण, पंडित मरण आणि बालपंडित मरण ही श्रेष्ठ मानली आहेत. केस का ठेवू नयेत, विविध प्रदेशांत विहार करून त्या त्या प्रदेशातील रीतिरिवाज, भाषा, शास्त्रे इ. बाबींत कुशलता कशी प्राप्त करून घ्यावी, हे सांगितले आहे. तपोभावना, श्रुतभावना, सत्यभावना, एकत्वभावना इ. भावनांविषयी विचार मांडले आहेत. साधूंना राहण्यास योग्य ठिकाण कोणते, यासंबंधी सूचना आहेत. भोजनाच्या शुद्धतेचा सविस्तर परामर्श घेण्यात आला आहे. स्त्रीची संगत, दुर्जनांची संगत यांतील धोके, पंचनमस्कारांचे माहात्म्य, अहिंसादी पाच महाव्रते, चार प्रकारची ध्याने, मुनीचा अंत्यसंस्कार इ. विषय यात आले आहेत.
या ग्रंथावर अनेक संस्कृत व प्राकृत टीका लिहिल्या गेल्या आहेत. अपराजित सूरीची (श्रीविजयाचार्याची) विजयोदया, आशाधराची मूलाराधनादर्पण आणि एका अज्ञात लेखकाची आराधनापंजिका या काही उल्लेखनीय टीका. अमितगतीने या ग्रंथाचा संस्कृत पद्यानुवाद केला आहे.
लेखक: ग. वा. तगारे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 11/17/2019