आफ्रिकान्स भाषेतील साहित्यनिर्मिती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाली. या भाषेतील काव्यनिर्मिती विशेष उल्लेखनीय आहे. अगदी आरंभीचे आफ्रिकान्स काव्य बोधवादी स्वरूपाचे असले, तरी दक्षिण आफ्रिकेतील युद्धानंतरच्या काव्यात भावनेची सखोलता आढळते. एलिझाबेथ आयबर्स (१९२५ – १९३९), डिर्क ऑपरमन (१९१४ – १९४२) हे काही नामवंत कवी होत. एलिझाबेथ आयब्र्सवर एमिली डिकिन्सनचा काहीसा प्रभाव जाणवतो. तिच्या भावकवितांतून स्त्रीचे भावविश्व, मातृत्व यांसारखे विषय येतात. ऑपरमनच्या काव्यावर टी. एस्. एलियटचा परिणाम झालेला दिसतो. त्याच्या काव्यातील प्रतिमा आधुनिक जीवनातून सहजपणे आलेल्या दिसतात. धार्मिक व नैतिक मूल्यांची तीव्र जाणिव असलेल्या ह्या कवीचे काव्य आध्यात्मिकतेकडे झुकलेले आहे.
साध्या बोधवादी गोष्टींपासून वैशिष्ट्यपूर्ण कथा-कादंबऱ्यांपर्यंतचा आफ्रिकान्स गद्यलेखनाचा विकास अल्पावधीत घडून आलेला आहे. कथा-कादंबऱ्यांतून दक्षिण आफ्रिकेतील जीवनाचे विविध प्रकारे दर्शन घडते. तथापि कल्पनाशक्तीची चमक गद्यलेखनात फारशी आढळत नाही. निसर्ग व मानव यांतील झगडा, वन्य प्राणिजीवन, वर्णविद्वेष इ. विषय कथा-कादंबऱ्यांतून हाताळलेले आहेत. डी. एफ्. मालेर्ब, सी. एम्. व्हान डेन हीव्हर, मायक्रो, पी. जे. शमन हे या क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक. लेपोल्ट आणि ग्रॉसकॉफ यांनी यशस्वी नाट्यलेखन केले आहे. या भाषेतील अनेक ग्रंथांचे यूरोपीय भाषांत अनुवाद झालेले आहेत.
लेखक: अ. र. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/24/2020
पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषे...
अमेरिकन साहित्य विषयक माहिती.
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.
अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.