অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आज्ञापत्र

आज्ञापत्र

शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ. राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४)त्याच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. या ग्रंथाचा कर्ता अन्य कोणी असावा, असे काहींचे मत आहे. हे आज्ञापत्र लिहिण्यामागील प्रमुख हेतू दोन :  “राजकुमार राजकार्यी सुशिक्षित व्हावेत” हा एक आणि “वरकड देशोदेशी ठेविले देशाधिकारी व पारपत्यागार यांणी नीतीने वर्तोन राज्य संरक्षण करावे” हा दुसरा.
आज्ञापत्रात एकूण नऊ प्रकरणे आहेत. पहिल्या दोन प्रकरणांत शिवाजीने स्वराज्यस्थापनेसाठी केलेल्या परिश्रमांचे आणि संभाजी व राजाराम यांनी ते टिकविण्याकरिता घेतलेल्या कष्टांचे वर्णन आलेले आहे. तीन ते नऊ ही प्रकरणे मुख्यत: राजनीतिविषयक असून त्यांत राजधर्म, प्रधानसंयोजन, सावकारी किंवा व्यापार, वतनदारांचे दायादत्व आणि त्यांचे नियंत्रण, वंशपरंपरागत सेवा-इनाम देण्यात प्रतिकूलत्व, सामाजिक वृत्तीविषयी अनुकूलत्व, गडकोटांचा बंदोबस्त, आरमाराचे महत्त्व आणि त्याची व्यवस्था असे विषय आले आहेत.
आज्ञापत्रातअष्टप्रधान संस्थेचा उल्लेख कोठेही नाही; सरकारकुनांचा आहे. प्रधानाची निवड करताना कोणते गुण ध्यानी घ्यावेत, या संबंधीचे विवेचन अत्यंत मार्मिक आहे. स्वराज्यात सावकारांचे व व्यापाऱ्यांचे स्थान काय आहे हे सांगून फिरंगी, इंग्रज, फ्रेंच वगैरे परकीय सावकारांच्या आक्रमक मनोवृत्तीचे वर्णन केले आहे. टोपीकरांस स्थललोभ कसा आहे, ती जात हट्टी कशी आहे, “हातास आले स्थळ मेलियाने” कसे सोडीत नाहीत, यांच्या “वखारेस जागा देणे आलेच ”, तर ती खाडीच्या तोंडाशी का देऊ नये इ. बाबींचे स्पष्टीकरण लक्षणीय आहे. गडकोटांविषयीचे प्रकरण विशेष महत्त्वाचे आहे. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्गे” असा आज्ञापत्रकारांचा निष्कर्ष आहे. गडकोटांसंबंधीचे विवेचन त्यांनी अत्यंत बारकाईने केले आहे. वतनदारांविषयी आज्ञापत्राततीव्र तिटकारा व्यक्त केलेला आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव जमिनी इनाम देऊ नयेत, हे स्पष्ट केले आहे. तथापि धर्मार्थ जमीन देणे असल्यास धर्माधर्माचा सूक्ष्म विचार करून ती द्यावी, असेही म्हटले आहे. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे, असे सांगून “ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र” असे मार्मिकपणे नमूद केले आहे.
आज्ञापत्राची लेखनशैली संस्कृतप्रचुर असली, तरी प्राय: अनलंकृत आहे.लेखनकाळानुसार आज्ञापत्रात फार्सी शब्दही आले आहेत. विषयाचा अचूक वेध घेणारी शब्दयोजना हे आज्ञापत्राचे एक वैशिष्ट्य आहे. पुष्कळदा विशेषणे लावताना शब्दांची माळ निर्माण केली जाते, तर अनेकवार राजनीतिविषयक सखोल आशय छोट्या छोट्या वाक्यांतून सहजपणे व्यक्तविला जातो. मराठेशाहीतील उत्तम गद्यलेखनाचा तो एक नमुना आहे.
लेखक : कमल गोखले
संदर्भ :  बनहट्टी, श्री. ना. संपा. आज्ञापत्र, नागपूर,१९६१.

 

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate