मराठी भाषा व संस्कृतिसंवर्धक एक शासकीय संस्था. मराठी भाषा व साहित्य यांचा सर्वांगीण विकास करुन साहित्याबरोबरच इतिहास व कला या क्षेत्रांतील महाराष्ट्राचा थोर वारसा जतन करणे, हा या मंडळाचा उद्देश आहे. याची स्थापना महाराष्ट्र राज्य शासनाने १९ नोव्हेंबर १९६० रोजी केली. महाराष्ट्र राज्य-स्थापनेच्या वेळी (१ मे १९६०) तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जी धोरणविषयक सूत्रे जाहीर केली होती; त्यानुसार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ स्थापन करण्यात आले. प्रारंभी पाच वर्षांची मुदत असलेले हे मंडळ, १९८० पर्यंत पाच वेळा पुनर्रचित करण्यात आले. तोपर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मंडळाचे अध्यक्ष होते. डिसेंबर १९८० मध्ये या मंडळाचे विभाजन करण्यात आले व त्यातून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वेगळे करण्यात आले. तेव्हापासून सुरेंद्र बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्या अध्यक्षांची व इतर सदस्यांची नियुक्ती राज्य शासनातर्फे दर ३ वर्षांनी करण्यात येते.
या मंडळाने काही महत्त्वाचे प्रकल्प आणि उपक्रम सुरू केले व त्यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या वेगवेगळ्या समित्याही नेमण्यात आल्या. त्यांपैकी मराठी विश्वकोशाचा प्रकल्प १९८० पर्यंत या मंडळामार्फतच कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे पंचखंडात्मक प्रकाशन करणे, मराठी बोलभाषांचा अभ्यास व प्रकाशन करणे, आधुनिक ज्ञानविज्ञानांचा शास्त्रीय ग्रंथमालेच्या रूपाने मराठीतून परिचय करून देणे, ललित कलांविषयीचे संशोधन व प्रकाशने पुरस्कृत करणे व मराठी महाशब्दकोशाची रचना करणे यांसारखे महत्त्वाचे उपक्रम तज्ञांच्या मदतीने हाती घेण्यात आले. आंतरभारती व विश्वभारती योजनेखाली द्वैभाषिक शब्दकोश, भाषाप्रवेश व साहित्यपरिचय यांसारखी पुस्तके प्रकाशित करणे, हा मंडळाचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प म्हणता येईल. भारतीय व परदेशी भाषांतील अभिजात व मौलिक ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी मंडळाने खास भाषांतर विभाग निर्माण केला. याखेरीज मराठी वाङ्मयकोशाचे संपादन, तसेच एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत प्रसिद्ध झालेल्या पण सध्या अनुपलब्ध असलेल्या अशा महत्त्वाच्या मराठी साहित्याचे पुनर्प्रकाशन यांसारखे उपक्रमही मंडळाने सुरू केले. महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण अशा मराठी ग्रंथांच्या प्रकाशनास, तसेच नवोदित लेखकांच्या लेखन-प्रकाशनासाठी मंडळातर्फे अनुदानही दिले जाते. नवोदित लेखकांसाठी शिबिरे भरवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रमही मंडळाने सुरू केला आहे. मंडळातर्फे अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांना, तसेच महत्त्वाच्या संदर्भग्रंथांना अनुदान दिले जाते. महादेवशास्त्री जोशी यांचा भारतीय संस्कृतिकोश, दे. द. वाडेकर यांचा मराठी तत्वज्ञान महाकोश, सरोजिनी बाबर यांची ‘समाजशिक्षण माला’, विद्वद्रत्न डॉ. दप्तरी-लेखसंग्रह (तीन खंड) यांसारख्या मौलिक प्रकाशनांना मंडळाने अनुदान दिले आहे.
मंडळातर्फे आणि मंडळाच्या अनुदानामुळे प्रकाशित झालेले वाङ्मयधन संख्येने आणि गुणवत्तेने मोठे आहे. शास्त्रीय ग्रंथमालेत वेगवेगळ्या वैज्ञानिक व तंत्रविद्येवरील शंभरांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत,तर ऐंशीहून अधिक ग्रंथ भाषांतरयोजनेखाली प्रकाशित झाले आहेत. आंतरभारती योजनेखाली सु. तीस पुस्तके प्रसिद्ध झाली असून ती अत्यंत उपयुक्त आहेत. मंडळाच्या अनुदानामुळे सु. सहाशेपेक्षा अधिक प्रसिद्ध झालेले, विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकणारे आहेत. मराठीतील नामवंत साहित्यिक-संशोधकांना गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथाही मंडळाने सुरु केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात या मंडळाने हाती घेतलेले प्रकल्प व त्या कामी मराठी तज्ञांचे मिळवलेले सहकार्य यांना विशेष महत्त्व आहे.
लेखक: रा. ग. जाधव
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2020