महाराष्ट्र राज्य शासनाने १ डिसेंबर १९८० रोजी स्थापना केलेले मंडळ. १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ स्थापन झाले होते; त्याचे विभाजन करण्यात येऊन हे मंडळ एक राज्यस्तरीय मंडळ म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आले. तेव्हापासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मंडळाचे अध्यक्ष व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक आहेत. मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक राज्यशासनातर्फे दर तीन वर्षांनी करण्यात येते. विश्वकोशाचे संपादन कार्यालय वाई येथे आहे. विश्वकोश कार्यालयात विज्ञान व तंत्रविद्या, मानव्य, कला व प्रशासन अशा चार शाखा असून त्यात सु. ५० संपादकीय कार्यकर्ते काम करतात. विश्वकोशाचे ग्रंथालय अद्ययावत असून त्यात ३६ हजारांहून अधिक संदर्भग्रथ आहेत. विश्वकोशाच्या छपाईसाठी राज्य शासनातर्फे वाई येथेच एक खास मुद्रणालय स्थापन करण्यात आले आहे.
विश्वकोशाचे पहिले १७ खंड हे संहिताखंड असून (प्रत्येकी सु. १,२०० पृष्ठे) पुढील १८, १९ व २० या क्रमांकांचे खंड अनुक्रमे परिभाषाखंड, नकाशाखंड व सूचिखंड असे आहेत. संहिताखंडांपैकी पहिल्या १२ खंडांची छपाई पूर्ण झालेली आहे. विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक असून, त्यात सु. १०० विषयोपविषयांच्या महत्त्वाच्या अंगोपांगांची माहिती लहानमोठ्या नोंदी करून दिली आहे. आधुनिक ज्ञानविज्ञानक्षेत्र सारभूतपणे पण संक्षेपाने त्यात सामावलेले आहे. नोंदींची रचना मराठी वर्णक्रमानुसार अकारविल्हे केली आहे. १९६५ मध्ये मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ प्रकाशित करून विश्वकोशाच्या अंतर्बाह्य स्वरूपाची कल्पना काही नोंदी, चित्रे व नकाशे देऊन स्पष्ट करण्यात आली; तर १९७३ साली परिभाषासंग्रहाचा १८ वा खंड प्रकाशित करण्यात आला संहिताखंडाच्या म्हणजे पहिल्या १७ खंडाच्या छपाईनंतर सुधारित परिभाषासंग्रहाचा हा खंड प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचे स्वरूप व्याख्याकोशासारखे राहील. १९ वा नकाशा खंड हा एका स्वतंत्र विभागातर्फे तयार करण्यात येत असून मराठीतील सर्वांगीण असा तो पहिलाच नकाशासंग्रह ठरेल.
या विश्वकोशासाठी अनेक विषयांतील तज्ञ लेखन-समीक्षणाचे काम करीत आहेत. मानव्यविद्यांइतकीच म्हणजे सु. १०,००० पृष्ठे विज्ञान व तंत्रविद्या या शाखेतील विषयांसाठी दिलेली असल्याने सर्वविषयसंग्राहक अशा कोशसाहित्यात मराठी विश्वकोश वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मुख्यतः उच्च शिक्षण घेणारा आजउद्याचा विद्यार्थिवर्ग, शिक्षित प्रौढ, शिक्षक व इतर अभ्यासक यांसारख्या वाचकवर्गासाठी विश्वकोशाची रचना करण्यात आली आहे. आधुनिक ज्ञानविज्ञाने जनतेला तिच्या भाषेतून सुलभपणे व सुबोधपणे परिचित करून देणे, ही स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजाची ऐतिहासिक गरज होती व आहे. मराठी विश्वकोश निर्मितीमागे जनतेच्या भाषेत ज्ञानसंक्रमण करणे हीच सांस्कृतिक भूमिका आहे.
मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम वेगाने वाटचाल करीत आहे. मराठी भाषेतून आधुनिक ज्ञानविज्ञानांची माहिती देणारा अनन्यसाधारण संदर्भग्रंथ म्हणून मंडळाच्या या विश्वकोशरचनेची उपयुक्तता फार मोठी आहे. या मंडळाने बाल विश्वकोश व कुमार विश्वकोश तयार करण्याचीही योजना आखलेली आहे.
लेखक: रा. ग. जाधव
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/1/2020