অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाल साहित्य निधि (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट)

बाल साहित्य निधि (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट)

बालसाहित्याचे प्रकाशन करणारी तसेच मुलांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन-चित्रकलास्पर्धा आयोजित करणारी प्रसिद्ध भारतीय संस्था. आयत्या वेळची चित्रकलास्पर्धा, बालसाहित्यिक व चित्रकार यांची शिबिरे, बालसाहित्य लेखन-स्पर्धा, बाहुल्यांची निर्मिती व संग्रह, नियतकालिकांचे प्रकाशन यांसारखे उपक्रमही संस्था करीत असते. शंकर्स वीकलीचे संपादक विख्यात व्यंगचित्रकार शंभर पिळ्ळै यांनी दिल्ली येथे १९६५ साली पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रोत्साहनाने ही संस्था स्थापन केली. शंकर्स वीकलीतर्फे १९४९ साली भारतीय मुलांसाठी लेखन व चित्रकलास्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे १९५० पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या संस्थेचा हा पूर्वेतिहास म्हणता येईल. सध्या १३५ देशांतील ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुले या स्पर्धामध्ये भाग घेतात. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची संख्या ८०० असून उत्कृष्ट बालचित्रकाराला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, उत्कृष्ट बाललेखकाला संस्थेचे सुवर्णपदक आणि लेखन व चित्रकला या दोहोंना मिळून पं. जवाहरलाल नेहरूंच्या नावे दिली जाणारी २४ सुवर्णपदके यांचा समावेश आहे. बक्षिसपात्र ठरलेल्या चित्रांचे व लेखनाचे शंकर्स अँन्युअल आर्ट नंबर नावाचे वार्षिकही काढण्यात येते.

संस्थेतर्फे आयत्या वेळची चित्रकलास्पर्धाही दरवर्षी दिल्ली येथे घेण्यात येते. शंकर्स वीकलीतर्फेच तिचा प्रारंभ झाला (१९५३). १९५४ मध्ये भारतीय लोककथा-स्पर्धा या साप्ताहिकाने जाहीर केली. स्पर्धेसाठी ५,००० हस्तलिखिते आली. त्यातूनच बालोपयोगी पुस्तकांचे प्रकाशन करण्याची योजना पुढे आली.

जी पुस्तके मुलांना सहज सुलभतेने वाचता येतील व ज्यांमुळे त्यांना भारतीय संस्कृति-परंपरांचे आकलन होऊन त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना पोसली जाईल, अशाच पुस्तकांची निवड करण्याचे संस्थेचे धोरण आहे; ही रंगीत सचित्र पुस्तके वेधक-बोधक ठरावी, ती किंमतीने अल्प असावी आणि त्यांतील पुराणकथा, लोककथा, दंतकथा, ऐतिहासिक वर्णने वाचून मुलांमध्ये शौर्यधैर्यादी गुणांचा परिपोष व्हावा, तसेच पशुपक्ष्यांविषयी व विज्ञानासंबंधीची त्यांची जिज्ञासा जोपासली जावी, अशी संस्थेची अपेक्षा आहे. या पुस्तकांची तसेच अन्य नियतकालिकादीकांचीही छपाई संस्थेच्या इंद्रप्रस्थ मुद्राणालयातच होते. तेथे खिळामुद्रण व प्रतिरूप मुद्रणाची उत्तम सोय आहे. १९८१ पर्यंत संस्थेने १५० पुस्तके इंग्रजी व हिंदीमध्ये प्रसिद्ध केली आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या १०,००० इंग्रजी प्रती व ५,००० हिंदी प्रती प्रसिद्ध केल्या असून अन्य भारतीय भाषांतूनही मागणीनुसार त्या पुस्तकांपैकी काहींची भाषांतरे प्रसिद्ध केली जातात. अशा मराठी अनुवादांची संख्या दोन होती (१९८१). पुस्तकांशिवाय मुलांसाठी चिल्ड्रन्स वर्ल्डनामक एक सचित्र मासिक ही संस्था प्रसिद्ध करते. त्यात मुलांशी संबंधित तसेच बालकांनी लिहिलेले साहित्य असते. जगातील बालकांमध्ये भावनात्मक ऐक्य व परस्पर सामंजस्य निर्माण व्हावे, हा यामागील उद्देश आहे. या मासिकाच्या २२,५०० प्रती खपतात.

संस्थेचे स्वत:चे असे डॉ. बी. सी. रॉय ग्रंथालय व वाचनालय आहे. ग्रंथालयात ३०,००० पुस्तके असून ५ ते १६ वर्षे वयोगटातील सदस्यांना त्यांचा लाभ होतो. या ग्रंथालयाला जोडूनच एक शिशुविभाग आहे. तेथे मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी ठेवलेली असतात. मुलांसाठी दर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी येथे चित्रपटही दाखविण्यात येतो.

या संस्थेचे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय बाहुली-संग्रहालयही आहे. १९६५ साली यासाठी एक खास इमारत उभारण्यात आली. येथे जवळजवळ ९० देशांतल्या विविध प्रकारच्या ६,००० बाहुल्या आहेत. बाहुल्या तयार करण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आलेला आहे.

उत्तम बालसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून बालसाहित्यलेखक व चित्रकार यांच्यासाठी संस्थेची १९७९ पासून शिबिरे भरविण्यात येतात. त्याचप्रमाणे बालसाहित्यलेखकांच्या साहित्यकृतींचीही एक वर्षिक स्पर्धा आयोजण्यात येते. यात कथात्मक साहित्य, इतर साहित्य व सचित्र पुस्तके असे विभाग असून प्रत्येक विभागातील यशस्वी साहित्यकृतीला रु.२,००० ते रु.५,००० पर्यंतची बक्षिसे देण्यात येतात. या संस्थेने एक जागतिक बालकेंद्रभवन काढण्याची योजना आखली आहे. या बालकेंद्रभवनात एक भव्य सभागृह, एक विस्तृत कलादालन, परदेशी पाहुण्यांकरिता निवासगृह इ. सोयी असतील.

लेखक/ लेखिका: चंद्रहास जोशी; सविता जाजोदिया

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate