उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ. हरद्वार या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद यांनी १९०० मध्ये हे स्थापन केले. विश्वविद्यालयाचा मूळ हेतू भारतीय संस्कृतीचे अध्ययन व संशोधन करणे, हा होता. विद्यापीठीय अनुदान आयोगाच्या १९५६ च्या कायद्यानुसार त्यास विद्यापीठीय दर्जा प्राप्त झाला.
विद्यापीठाच्या संविधानानुसार कुलपती, कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन उच्चपदाधिकारी असून सर्व प्रशासकीय व्यवस्था ते पाहतात. येथे पदवीपूर्व शिक्षण विनामूल्य असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. १० शुल्क पडते. विद्यापीठात वेद आणि तत्संबंधीचे साहित्य, संस्कृत, आर्यसिद्धांत व तुलनात्मक धर्मांचा अभ्यास वगैरे काही महत्त्वाच्या विषयांच्या शाखोपशाखा असून इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, गणित, चित्रकला, मानसशास्त्र, हिंदी, इंग्रजी वगैरे विषयांबरोबर रसायनशास्त्र, गणित, भौतिकी, वनस्पतिविज्ञान हे विषयही विज्ञान-महाविद्यालयात शिकविले जातात; मात्र संगीत व गृहविज्ञान हे विषय फक्त स्त्रियांकरिताच आहेत. विद्याधिकारी, विद्याविनोद व अलंकार अशी अनुक्रमे मॅट्रिक, इंटरमिजिएट व बी.ए. या तत्सम पाठ्यक्रमांना नावे आहेत. विश्वविद्यालयात कला, विज्ञान व वेद अशी तीन महाविद्यालये आणि तीन वसतिगृहे आहेत. यांतून १९७२ मध्ये ५६६ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात १९७२ मध्ये ७९,३९५ पुस्तके व १८६ नियतकालिके येत होती. विद्यापीठाचा १९७१-७२ चा वार्षिक अर्थसंकल्प ७·९१ लाख रुपयांचा होता.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/6/2020
मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
पश्चिम बंगालमधील कृषी विद्यापीठ.
बिहार राज्यातील प्राचीन पारंपरिक विद्याध्ययनास आधु...
मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ.