অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विशेष लेख : इंदिरा संत : दुःखानुभूतीतून प्रगल्भ होत गेलेली कविता

विशेष लेख : इंदिरा संत : दुःखानुभूतीतून प्रगल्भ होत गेलेली कविता

विसाव्या शतकातील एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे इंदिरा संत. साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादलय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये. रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते. २०१३-१४ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्ताने त्यांच्या काव्यप्रवासावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

थंड गुलाबी कार्तिकातली, धूसर धूसर धुके तरंगणारी सकाळ, अशा निर्मल निर्भर वातावरणावर झगमगणारी सोनेरी किरणांची सुंदर नक्षी, त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूचफुलांचा सुगंध!
चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलुन तो हृदयाशी धरला!
इतका सुंदर सौंदर्यानुभव देणारी शेला ही आपली आवडती कला. अशाच एकापेक्षा एक सुंदर कविता लिहून रसिक वाचकांच्या मनावर दीर्घकाळ मोहिनी घालणार्‍या कवी इंदिरा संतांचे हे जन्मशताब्दी वर्ष ! ‘अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे’ असं म्हणणार्‍या इंदिराबाईंच्या कवितेचं नातं शिल्पकलेबरोबर अभिजात रसिकतेशी कायमचं जुळलं आहे. म्हणूनच साठ, सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कविता आजही वाचताना ताज्या टवटवीत फुलासारखा आनंद वाटत जातात.
२० व्या शतकातील शेवटच्या सहा दशकांमध्ये सातत्याने काव्यलेखन करणार्‍या मराठी कवितेच्या परंपरेमध्ये स्वतःचे एक वैशिष्ट्यपूर्ण सन्माननीय स्थान निर्माण करणार्‍या प्रतिभासंपन्न कवी इंदिरा संत यांचे २०१३-१४ हे जन्मशताब्दी वर्ष.

४ जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्या कविता करत होत्या आणि त्या ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा वगैरे मासिकातून प्रसिध्द होऊ लागल्या होत्या. १९४१ मध्ये ‘सहवास’ हा उभय पतीपत्नींचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर शेला (१९५१) मेंदी(१९५५) मृगजळ (१९५७) रंगबावरी (१९६४) बाहुल्या (१९७२) गर्भरेशीम (१९८२) चित्कळा (१९८९) वंश कुसुम (१९९४) व निराकार (२०००) असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले. शामली (१९५२) कदली (१९५५) चैतू (१९५७) हे तीन कथासंग्रह, मृद्गंध (१९८६) मालनगाथा (१९९६) फुलवेश (१९९७) हे तीन ललितलेख संग्रह, गवतफुला, अंगतपंगत, मामाचा बंगला हे बालसाहित्य- असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांच्या गद्यलेखनाचे स्वरूपही कवितेसारखे नितळ, सहजसुंदर व काव्यात्मक आहे, त्यामुळे साहजिकच कवी म्हणून इंदिराबाईंचा ठसा साहित्यक्षेत्रावर अधिक उमटला.

‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.

‘स्वत्वाने सुंदर ठरलेली विशुध्द भावकविता’ असे इंदिराबाईंच्या कवितेचे वर्णन केले जाते. आत्मनिष्ठ भावानुभवांची अत्यंत प्रत्ययकारी चित्रणे,त्यांच्या कवितेत सहजपणे रेखाटली जातात. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातल्या कविता रविकिरण मंडळाचे संस्कार घेऊन आलेल्या अनुकरणातून लिहिलेल्या, प्रेमात पडलेल्या तरुण स्त्रीच्या व साहजिकच नवख्या अपरिपक्वतेच्या आहेत. या नंतरच्या पुढच्या काळातील दहा वर्षात त्यांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ झाली. उण्यापुर्‍या आठ, दहा वर्षांच्या सोबतीनंतर ना.मा. संतांचे अकाली निधन झाले. ऐन तारूण्यात तीन लहान मुले पदरी असताना आकस्मिक झालेला हा घाव इतका तीव्र होता की, त्याच्या जखमा पुढच्या दीर्घ आयुष्यात कधीही भरून आल्या नाहीत. प्रियकराचा चिरविरह हाच त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू बनला. निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या त्यांच्या कवितेतल्या चार अनुभवसूत्रांना या विशिष्ट प्रकारच्या दुःखाने व्यापून टाकल्याने त्यांची कविता विरहाच्या अधिकच गडद छटा घेऊन व्यक्त झाली. दुःखाच्या ताजेपणातील प्रतिक्रियात्मक उत्कटता सर्वाधिक जाणवते ती ‘शेला’ मधल्या कवितांवर
अजूनही जागा आहे
स्पर्श तुझा कायेवरी
आणि अंगाचा सुगंध
खेळतसे श्‍वासावरी (अजूनही)

मनावरची चांदण्यांची झिरझिरी धुंदी अजून ओसरली नाही तोच चंदेरी वर्तमानाचे रूपांतर एकाएकी भीषण भूतकाळाच्या जळत्या आठवणीत व्हावे हे एक संवेदनाशील कवीमन मानूच शकत नाही. शेलानंतर चारच वर्षांनी प्रसिध्द झालेल्या मेंदीतील कविता अधिक तरल, अथर्र्घन आणि सुजाण वाटतात. अभावरूप बनलेल्या एका व्यक्तित्वाशी एकात्म भावजीवनाचे एक अजोड नाते इथे निर्माण होते. इथे शारीरिक आकर्षणाला अवसर नाही. इथे उरते ती मनाची तगमग, जीवघेणेपणा आणि स्मृतींना भावजीवनात मिळणारे एक अनोखे स्थान.
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला घ्यावे तुजला घ्यावेे (मृण्मयी - मेंदी)

या दुःखातून, खचलेपणातून जीवन जगण्यासाठी लागणारी एक उभारी मिळाल्याची जाणीव नकळतपणे ‘मेंदी’मधून उगवू लागली असे दिसते.

आरसेमहाल, तळ्यात वगैरे कवितांमधून हे कठोर व्रत ओठ मिटवून चालवण्याचा निर्धार आहे. वाट्याला आलेले दुःख समंजसपणे स्वीकारून त्याचे विश्‍लेषण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ‘नाहीस तू ने भरले अंबर’ अशा जाणीवेने व्यापलेले दुःख ‘मृगजळ’मध्ये अधिक गडद झाल्याचे, एकवटत चालल्याचे जाणवते. थोड्या अलिप्तपणे दुःखाच्या नजरेला नजर देण्याचे सामर्थ्य त्या गोळा करताना इथे दिसतात. ‘उभे दुःख हे उभेे पुढ्यातच ..... स्तब्ध स्वयंभू पहाडापरी’ - दुःखाचं असं पुढे ठाकणं जणू सवयीचं झाल्यासारखं स्वीकारार्ह आहे. त्या दुःखाला स्त्रीच्या म्हणून असलेल्या अनुभवाचा हळुवार जीवनस्पर्शी वास आहे.
कारण येतो वास तयाला
तान्ह्या ओठावरूनी
ओघळणार्‍या गोड दुधाचा

जुन्या अनुभवांना सामोरे जाणारे कवीमन आता अधिक चिंतनशील, तटस्थ आणि प्रतिमांच्या भाषेत बोलू लागलेले दिसते. या पार्श्‍वभूमीवर आठ वर्षांनी प्रसिध्द झालेल्या रंगबावरीत दुःखाचा कढ निमाला आहे, दुःखाच्या दाहकतेतून पोळून निघाल्यावर कवीमन शांत झाले आहे, बाहेरच्या जगाची सोनेरी चाहूल होऊन बघते आहे.
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळाळेल मन
केंव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात (किती उबावे उबावे)

असा प्रश्‍न त्या स्वतःला विचारू लागल्या आहेत. जागं होण्याचं नाकारणार्‍या स्वतःच्या मनाला त्या प्रतिप्रश्‍न विचारू लागल्या आहेत.
काय असे वेडेपण
मी न दुजी तूहि मीच (कात)
एकाकी जीवन जगताना सोसाव्या लागणार्‍या व्यवहाराच्या असंख्य काचण्या, ‘कुणी न पुरते आधाराला’ असे निराश करणारे अनुभव, ‘हाती आली अन्यायाची माती-मातीचे जहर’ असे उफराटे, जगण्याची उमेद खच्ची करणारे अनुभव, यातून येणारी एक निरवानिरवीची भाषा, जीवनाबद्दलची चिंतनशीलता, कटुपणा गिळून येणारी क्षमाशील वृत्ती, प्रौढ वयाबरोबर येणारी मृत्यूची आस ‘रंगबावरी’मध्ये डोकावू लागलेली दिसते. ‘आज एकटेपणाने मला शेवटी जिंकले.’ अशी अगतिकतेची, पराभूततेची जाणीव आणि ‘मन सुटून चालले शरीराच्या मिठीतून’ अशी निर्लेप वृत्ती, एका दृष्टीने परस्पर विरोधी अनुभूतींच्या टोकांमधल्या कविता रंगबावरीत दिसतात.

निसर्गाच्या संवेद्य वर्णनाबरोबर शिणलेल्या देहाला आलेेले विश्रब्धपण, ‘कोमल काळोखात’ संथ निवांत झुलणारे मन, मनात उगवणारी सतेज पहाट, समर्पण वृत्तीने स्वत्वाचे दान करून ‘शून्या’ झालेली भरतीची लाट, या प्रतिमा दुःखाशी संघर्ष संपल्याची साक्ष देतात. निर्गुण, निराकार जगाला व्यापणार्‍या प्रेमाची, विशुध्द निसर्गसौंदर्याची, जगण्यातल्या एका अबोध आनंदाची जाणीव कवीमनाला झालेली दिसते. तटस्थपणे प्रेमानुभवाचे विश्‍लेषण करण्याची प्रक्रिया जीवनातील ताणांसकट व्यक्त होते. दुःखाचा सातत्याने शोध घेताना भोवतालच्या विश्‍वातील दुःखाचे आतले हुंकार त्यांना जाणवू लागतात. उच्चभ्रू श्रीमंत घरात असलेल्या स्त्रीच्या जीवनातील पोकळी, प्रौढ स्त्रीला आपण घरात अडगळ होत असल्याची भावना, आदर्शासाठी आयुष्याचे व्रत करणार्‍या स्त्रीला येणारे वैफल्य, मुलांच्या वागणुकीने घुसमटलेली आई अशा व्यक्तिरेखांमधून त्यांच्या संवेदना रुंदावल्याचे जाणवते.

इंदिराबाईंच्या सुरवातीच्या कवितांमधली स्त्री असंयमी, समर्पिता, जीवनाचा धूप करून प्रियकराभोवती घमघमणारी रातराणी, धूळफुलांचा वास लेवून होणारी पाऊलवाट आहे. परिपूर्णता म्हणजे पुरूष आणि अपूर्णता, चंचलता म्हणजे स्त्री. ही स्त्री पन्नास, साठच्या दशकातील स्त्री-प्रतिमेला साजेशीच होती. पण काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते. गेल्या तीस, चाळीस वर्षात बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न त्या ‘बाहुल्या’ मध्ये करतात, ही त्यांच्या जाणिवांच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या त्याचीच खूण आहे. ‘ही अशी ती तशी’ मध्ये विविध परिस्थितीतून आलेल्या व शिक्षकीपेशा पत्करलेल्या स्त्रियांची रेखाटने येतात. ‘कुटुंबातील नीटस पोर’ मध्ये पैशासाठी नोकरी करणार्‍या स्त्रीचे वर्णन येते. आखीव रेखीव आयुष्यात कसरत करून (कसातरी) तोल सांभाळताना अचानक तोल जातो (बंदिस्त) स्त्रीचं घरातलं दुय्यम, दुर्लक्षित स्थान, आयुष्यातला कंटाळवाणेपणा आणि घरकामाचं तेच तेचपण ‘फॉसिल’ कवितेत व्यक्त होतं.
मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी
मी म्हणजे आवकजावक बिलेपावत्या
मी म्हणजेे बौद्धिकाची रतीब-गाळणी
मी म्हणजे हेच काही
चैतन्याची चमक नाही

चालत्या बोलत्या पाषाणाला सुख नाही, दुःख नाही. स्त्रीला दिलेली चालत्या बोलत्या पाषाणाची उपमा संसारातलं तिचं गोठलेलं स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते. घरासाठी कष्ट करणारी, नोकरी करणारी, घर सांभाळणारी ‘गृहलक्ष्मी’ ही घरासाठी आयुष्य वेचताना स्वतःच सारं काही गमावून बसते याचं उपरोधिक चित्र ‘मध्यमवर्गीय गार्गी’ या कवितेतील ‘शिजवणारी तीच - शिजणारी तीच’ या प्रतिमेतून घरादारासाठी भरडून निघालेल्या स्त्रीमध्ये प्रभावीपणे व्यक्त होते.

पुढच्या ‘चित्कळा’ या काव्यसंग्रहात प्रौढ स्त्रीला उत्तर आयुष्यात येणारा एकाकीपणा (आपले ओझे आपणच वहायचे असते - आपले ओझे) एकूण जीवनाचा, घराचा, सजलेल्या दालनांचा आलेला कंटाळा (कंटाळा आला आहे) वृध्दावस्थेत मन पंख पसरतं, तरी शरीर नाकारतं (पाळणा) घरात एकटं असताना निवांतपणाच्या कोषात गुरफटल्यावर जिन्याचा रस्ताच सापडत नाही (घरची सगळी) प्रौढ वयात प्रत्येकाने आपल्याला कुशलतेने दूर सारल्याची जाणीव रहदारीच्या चौकातील वाहनांसारखी अंगाला लगटून जाते. (उगीचच हो) असे विषय स्त्रीजीवनातील एका विशिष्ट अवस्थेतील मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या सर्वच कवितांमधून एक शांत संयत, प्रौढ अलिप्तता जाणवते. समर्पिता प्रेयसी ते एकाकी व्यक्ती हा स्त्रीच्या व्यक्तिजीवनाचा त्यांचा प्रवास पुढील काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी कविता प्रवाहाला दिशादर्शक आहे.

त्यांची कविता दुःखाच्या आत्म्याचा शोध घेताना वैयक्तिक दुःखाकडून विश्‍वात्मक दुःखाकडे विस्तारत जाते. या संपूर्ण प्रवासात त्यांचा सच्चा साथी प्रियकर आहे तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाला स्वतःचा रंग, रूप, स्वभाव, स्पर्श, रस सगळं माणसांसारखं आहे. कार्तिकाचा थंड गुलाबी स्पर्श आणि उमलत्या बूच फुलांचा मादक सुगंध असणारं धुकं म्हणजे वसंतसेना वसुंधरेला चारुदत्ताकडून मिळालेला शेला आहे (शेला) धूळभरू रुक्ष विरागी सडक, लाल कोवळ्या पानांचा पिसारा फुलवून उभ्या असणार्‍या पिंपळाच्या दर्शनानं त्याच्यावर लोभावून जाते. वेळूचे बन एक मुग्ध मन असते. ते वादळवार्‍याने थरारते. गोड ‘हारहुरा’ होते. माळावरती पडून असणार्‍या काळया फत्तराला ‘कळते...... त्याला सगळे कळते.’ निसर्ग आणि त्याचे भावबंध कित्येकदा कवी आणि त्याचे भावबंध यांच्याशी समांतर जाताना परस्परांशी एकरूप होतात, त्यामुळे दुःखातील उत्कटता शतगुणित होऊन निसर्गाच्या वेगवेगळया रूपात विखुरते. एरवी मोहक शीतल वाटणारे चांदणे मग कडूजहर होते.
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन (मृण्मयी)
आपल्या रक्ताला मातीची ओढ आहे, मनाला मातीचे ताजेपण आहे असे सांगताना
दंवात भिजल्या प्राजक्तापरी
ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताच्या शेल्याने अंग टिपावे, वसंतातील फुलांचे वस्त्र ल्यावे, ग्रीष्माने कचभार उदवावा आणि जर्द विजेचा मत्त केवडा वेणीवर तिरकस माळावा अशी सुंदर रोमँटिक कल्पनाचित्रे उभी करताना त्या निसर्गकन्या होतात. निसर्गरूपातून फिरणार्‍या कालचक्राच्या गतीचा क्षण पकडताना निसर्ग प्रतिमारूपाने येतो, आणि त्याचे त्यांच्या भाववृत्तीशी नाते जुळते. निसर्गातील रंगांची मुक्त उधळणही त्यांच्या कवितेत वेधक रूप घेऊन येते गाण्यामधला पोपटी भाव, मनातील हिरवा गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके अशा रंगप्रतिमा निसर्ग आणि माणसाची एकरूपता दर्शवतात.
ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)

स्त्री जीवनातल्या प्रतिमा निसर्गजीवनात अशा चपखल बसून जातात. कवितेतून जाणवणारे आत्ममग्न, एकाकीपणाचा वसा निष्ठेने जपणारे, अत्यंत तरल, संपन्न, निसर्गजाणीव असलेले, दुःखाला धैर्याने तोंड देणारे आपले स्त्रीत्व विलक्षण मनस्वीपणे त्या आपल्या कवितेतून जपत आल्या आहेत. अनुभवाला कलात्मक रूप देताना एक फसवा सोपेपणा त्यांच्या कवितेत वरवर दिसतो, पण इंदिराबाईंची कविता घट्ट आशयघन आणि वरवरच्या अर्थापेक्षा अधिक काही खोल जाणवून देणारी असते. कवितेचे सर्व घटक सेंद्रिय एकात्मतेने इतके चपखल बसलेेले असतात की त्यातला कानामात्रेचा फरकही कवितेची जान आणि शान बिघडवून टाकील. शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात. त्यांची कविता व्यामिश्र आहे, पण जटिल, दुर्बोध नाही, दुःख आहे, पण कटुता वा विखार नाही. अत्यंत तरल अबोध, अमूर्त अशा भावानुभूतींना नेमक्या तपशीलांनी तंतोतंत साकारण्याची कुशल चितार्‍याची कला त्यांच्यात जात्याच आहे.

‘शेला’च्या दुसर्‍या आवृत्तीला (१९६१) लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी स्वतःच्या कवितेचे परीक्षण केले आहे, ‘माझी कविता माझ्याबरोबर वाढली. माझ्या सुखानं रंगली, दुःखानं कोसळली. .... ती माझ्या भावनात्मक आयुष्याशी निगडित आहे. पण माझी सखी वा प्रतिकृती नव्हे. जीवनातील स्वास्थ्यापेक्षा (कदाचित ते न मिळाल्याने) संघर्षावर माझी श्रध्दा आहे. संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ज्या ठिणग्या उडतात, त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजे माझी कविता आहे.’ असे त्या म्हणत असल्या तरी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या जातीचे अग्निफुलांचे धगधगतेपण त्यांच्या कवितेत नाही. स्त्रीत्वातून येणार्‍या अंगभूत स्नेहार्दतेमुळे या ठिणग्या ओंजळीत येताना त्यांची सौम्य सुंदर फुले होण्याची किमया त्यंाच्या कवितेत घडते.
धगधगते जीवन हे
धरून असे ओंजळीत
आले मी कुठून कशी
आले मी हेच फक्त (आले मी)

हे त्याचे सुंदर उदाहरण आहे.साठ वर्षे सातत्याने लेखन करणार्‍या इंदिराबाईंची कविता त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच प्रगल्भ होत गेली. आयुष्यातील स्वतः पलिकडची अनुभूती उत्कटपणे कवेत घेत गेली. भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे.
----
अश्‍विनी धोंगडे
ashwinid2012@gmail.काम

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

 

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate