राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे रोजगार मिळण्याची संधी आहे. राज्यातील एकूण 417 शासकीय आणि 454 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण 79 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी आणि मशीन गट अशा गटातील व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
राज्यात सर्व स्तरावर तांत्रिक शिक्षण देण्याची जबाबदारी एकत्रितरित्या सोपविण्याच्या दृष्टीने 1948 साली तंत्रशिक्षण संचालनालयाची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच राज्याने औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेतली. औद्योगिक उत्पादनाच्या घटक रचनेत लक्षणीय बदल झाल्यामुळे या औद्योगिक घटकांना निरनिराळ्या स्तरावर लागणारे तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ व त्यांच्याकरीता पुर्नप्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्यांच्या दृष्टीने राज्यात प्रशिक्षणाच्या सोईमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. या विविध कार्यक्रमांचे संचालन व प्रशासन यांची सर्वांगीण प्रगती होण्यांच्या दृष्टीने तंत्र शिक्षण संचालनालयाचे 1984 साली विभाजन करुन तंत्रशिक्षण संचालनालय व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अशी दोन संचालनालये निर्माण करण्यात आली. यापैकी व्यवसाय शिक्षणातंर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम राबविले जातात व व्यवसाय प्रशिक्षणांतर्गत केंद्रशासन पुरस्कृत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजना या प्रमुख योजना राबविण्यात येतात.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार 359 तालुक्यात 417 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता जवळपास एक लाख आहे. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलांमुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा संस्थांचा समावेश आहे. याच बरोबर राज्यात एकूण 454 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून त्यांची प्रवेश क्षमता साधारणत: 40 हजार इतकी आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था
औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या अथवा शासन मान्यताप्राप्त खाजगी संस्थाद्वारे शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत येणाऱ्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) अथवा राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची (SCVT) संलग्नता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र अथवा राज्य व्यवसाय प्रशिक्षण परीषदेचे प्रमाणपत्र निर्गमित करणारी संस्था.
79 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम
राज्यातील एकूण 417 शासकीय व जवळपास तेवढ्याच संख्येच्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण 79 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात अभियांत्रिकी गटातील एक वर्ष कालावधीचे एकूण 23 व्यवसाय अभ्यासक्रम, दोन वर्ष कालावधीचे एकूण 32 व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्ष कालावधीचे 24 व्यवसाय अभ्यासक्रमांचा अंतर्भाव आहे. या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण डीजीटी, नवी दिल्ली ने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार दिले जाते. अभ्यासक्रम यशस्वारीत्या पूर्ण करुन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेवारास डीजीटी, नवी दिल्ली कडुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीषदेकडुन (NCVT) प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसाय अभ्याक्रमात प्रशिक्षण देतांना सदर प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा (Basic Infrastructure) चा महत्तम विनियोग व्हावा व कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे म्हणून राज्यात महापालिका क्षेत्रातंर्गत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तीन पाळीत व इतर संस्थामध्ये दोन पाळीत प्रशिक्षण दिले जाते.
प्रवेशाकरीता पात्रता
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ किंवा केंद्रीय परीक्षा मंडळा व्यतिरिक्त अन्य मंडळाकडून उत्तीर्ण झाला असेल तर त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून (MSBSHSE) तसे समकक्षता प्रमाणपत्र घेतलेले असावे.
- उमेदवाराचे निकालपत्र श्रेणीस्वरुपात (Grade System) असल्यास, अशा उमेदवारांनी श्रेणी व गुण यांची समकक्षता असलेले संबंधित मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय मुक्त शाळेतील विज्ञान व गणित हा विषय नसलेले उमेदवार व अपंग शाळेतील उमेदवार अभियांत्रिकी व्यवसायासाठी पात्र नाहीत.
- उमेदवाराने वयाची 14 वर्षे पूर्ण केलेली असावी. मेकॅनिक रीपेरींग ॲण्ड मेंटेनन्स ऑफ लाईट ॲण्ड हेवी मोटार व्हेहिकल, ड्रायव्हर कम मेकॅनिक, लाईट मोटर व्हेहिकल या व्यवसायांकरिता 31 जुलै रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- कोणत्याही व्यवसायाच्या प्रवेशाकरिता कमाल वयोमर्यादेची अट नाही.
- अनिवासी भारतीय उमेदवारांनीही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे (MSBSHSE) असे समकक्षता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्ट 2015 पासूनची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने राबविण्यात येत आहे. ऑनलाईन स्वरुपात प्रवेश प्रक्रिया राबविणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य ठरले आहे.
सेमिस्टर पद्धत
एक ते दोन वर्षे कालावधीचे विविध व्यवसायांचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी बनविलेला असून अभ्यासक्रम बनवितांना कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. प्रशिक्षण अधिक प्रभावी व समयोचित होण्यासाठी ऑगस्ट 2013 पासून सेमिस्टर पद्धत सुरु करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योग धंद्यातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणे, प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे यासारखे उपक्रम राज्यातील सर्वच संस्थामध्ये राबविले जातात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणत: 1 ऑगस्ट ते 31 जुलै या कालावधी दरम्यान प्रशिक्षण वर्ष असते.
शिकाऊ उमेदवारीसाठी जागांची उपलब्धता
विद्यार्थ्यांना पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना असून, शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजने अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 10,589 औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 98,270 जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारांस रोजगाराची संधी उपलब्ध आहे.
पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेअतंर्गत रोजगाराची संधी व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहेत.
दिव्यांग उमेदवारांना आरक्षण
केंद्रीय प्रवेश पद्धती अंतर्गत उपलब्ध जागांच्या 3% जागा प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अपंग उमेदवारांना आरक्षित असतील. अपंगाच्या आरक्षणाच्या दाव्यासाठी सादर केलेले अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात अपंगत्व कायम स्वरुपी असून त्याचे प्रमाण 40% पेक्षा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. अपंगाच्या आरक्षणाकरिता फक्त वैद्यकीय मंडळाकडून दिलेले प्रमाणपत्र विचारात घेतले जाते.
माजी सैनिकांच्या मुला/ मुलींकरिता आरक्षण
संरक्षण सेवेत कार्यरत असलेल्या अथवा संरक्षण सेवेतील माजी कर्मचारी / कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरिता केंद्रीय प्रवेश पद्धती अंतर्गत प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 1% जागा त्याची कमाल 10 जागेच्या मर्यादेपर्यंत असतील. सर्व संरक्षण श्रेणी उमेदवारांचा गुणवत्तेनुसार एकत्रितरित्या विचार करुन संरक्षण सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पात्रता धारक मुलांकरिता या 1% जागा (कमाल 10% जागेच्या मर्यादेत) देण्यात येतात. या जागा राज्य स्तरावरील जागा म्हणून उपलब्ध असतात.
अल्पसंख्याकाकरिता आरक्षित जागा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक उमेदवाराकरिता आरक्षित निवडक तुकड्यामध्ये 70 टक्के जागा मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन धर्मातील विद्यार्थ्यांकरिता आणि 30 टक्के जागा खुल्या व मागासवर्ग श्रेणीमधील उमेदवारांकरिता राखून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाकरिता वर नमूद केलेल्या अल्पसंख्याक उमेदवाराकरिता 70 टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. (त्यापैकी प्रत्येक अल्पसंख्याक गटामध्ये 30 टक्के जागा महिलांकरिता राखून ठेवण्यात येतील) व 30 टक्के जागा सर्व अन्य खुल्या आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता उपलब्ध असतील.
आवश्यक कागदपत्रे
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची (SSC) गुणपत्रिका.
- शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र (अलिकडील शाळा / महाविद्यालय शिक्षण घेतलेले)
- उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)
- उमेदवार मागास अनुसुचित जाती/ अनुसुचित जमाती प्रवर्गात असल्यास जाती प्रमाणपत्र
- उमेदवार विमुक्त जाती /भटक्या जमाती (अ), (ब), (क), (ड) इ.मा.व./ वि.मा.व. (VJ/ DT/ NT(A)/ NT(B)/ NT(C) / NT(D)/OBC/ SBC) असल्यास जाती प्रमाणपत्र आणि पुढील वर्षी 31 मार्च पर्यंत वैधता असलेले नॉन-क्रिमी-लेयर प्रमाणपत्र
- माजी सैनिक आरक्षण घेत असाल तर संरक्षण सेवा प्रमाणपत्र/ उमेदवाराचे आई/वडील संरक्षण सेवेत कार्यरत होते व ते महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र
- अपंग उमेदवार असल्यास अपंगत्वाचा प्रकार (PWD 1/ PWD 2/ PWD 3), अपंगत्वाची टक्केवारी, कायम स्वरुपी अपंगत्व याबाबतचा स्पष्ट उल्लेख असलेल्या वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र
- तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थीनी तांत्रिक विषयाचा उल्लेख असलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC)
अतिरिक्त गुणासाठी आवश्यक कागदपत्रे
- इंटरमिडीएट चित्रकला श्रेणी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- एनसीसी/ एमसीसी/ स्काऊट गाईड/ सिव्हील डिफेन्स गाईडचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- जिल्हा/ राज्य / राष्ट्रीय स्तरावर क्रिडा प्रकारांमध्ये सहभाग घेतलेला असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे खेळाचे प्रमाणपत्र
- शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील बोल्स्टर स्कूलमधून उत्तीर्ण असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- शासनमान्य अशासकीय संस्थांच्या महाराष्ट्रातील अनाथ आश्रमात वास्तव्यास असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- 2011 च्या जनगणनेमध्ये ग्रामीण भाग म्हणून नमूद करण्यात आलेल्या भागातून उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) दिलेली असल्यास
गुणानुक्रम/गुणवत्ता यादी
महाराष्ट्रातील ज्या पात्र उमेदवारांची शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत येणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती मधून शेवटच्या दिनांकापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करुन प्रवेश निश्चित केले जातात. अशा प्रत्येक उमेदवाराला तात्पुरता गुणानुक्रम (Provisional Merit Number) देण्यात येतो. यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10वी) अथवा समतुल्य पात्रता परीक्षेत प्राप्त एकत्रित गुण हे गुणवत्ता ठरविण्यासाठी पायाभूत गुण मानण्यात येतात. वाढीव गुणासाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रानुसार अतिरिक्त मिळालेले गुणाधिक्य एकूण गुणांमध्ये मिळविण्यात येऊन राज्यातील उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते.
अतिरिक्त गुण पद्धत
इंटरमिडीएट चित्रकला श्रेणी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (10 गुण), एनसीसी/ एमसीसी/ स्काऊट गाईड/ सिव्हील डिफेन्स गाईडचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (10 गुण), जिल्हा/ राज्य / राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतलेला असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे खेळाचे प्रमाणपत्र असल्यास (10/15/25 गुण), शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील बोल्स्टर स्कूलमधून उत्तीर्ण असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (20 गुण), शासनमान्य अशासकीय संस्थांच्या महाराष्ट्रातील अनाथ आश्रमात वास्तव्यास असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असल्यास (20 गुण), 2011 च्या जनगणनेमध्ये ग्रामीण भाग म्हणून नमूद करण्यात आलेल्या भागातून उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) दिलेली असल्यास (10 गुण) अशा गुणांचा अतिरिक्त गुण म्हणून समावेश करण्यात येतो.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियाचे टप्पे
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण दहा टप्प्यांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने माहिती पुस्तिका, ऑनलाईन अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती केंद्रावर अर्ज निश्चित करणे, गुणवता यादी प्रसिद्ध करणे, प्रवेश फेरीसाठी पर्याय देणे, जागा वाटप करणे, संबधित औद्योगिक संस्थेत व्यक्तीश: हजर राहून प्रवेश निश्चित करणे, समुपदेशन फेरी, खाजगी औद्योगिक संस्था स्तरावरील प्रवेश, प्रवेशा नंतरची कार्यवाही आदी बाबींचा समावेश आहे.
एस.एस.सी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण असणाऱ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम, महिलांकरीता शासकीय संस्था, आदिवासी आणि अल्पसंख्याकासाठी असलेल्या प्रशिक्षण संस्था यांची माहिती पाहूया पुढील भागात...
लेखक - गजानन पाटील