शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती करणे हा या अभियानाच्या अनेक उद्देशापैकी एक उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठिबक संच बसविण्यास उद्युक्त करणे व प्रोत्साहित करण्याचे काम कृषी विभाग करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली नुकताच जिल्ह्यात ठिबक दिन साजरा करण्यात आला. याविषयी...'सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र- 2019 'अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यभरात 'जलयुक्त शिवार अभियान' राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला. सातारा जिल्ह्यात यापूर्वी साखळी पद्धतीने सिमेंट बंधाऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला आहे. आता नवीन सिमेंट बंधाऱ्यांच्या निर्मितीसोबतच कृषी, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, जलसंपदा, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण आदी विविध विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 215 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासह टंचाई परिस्थितीत सकारात्मक बदल होण्यास निश्चितच मदत होणार आहे. परंतु, उपलब्ध पाण्याचा पिकांसाठी अनियंत्रित व बेसुमार वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अभियानातच शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देण्याअंतर्गत सूक्ष्म सिंचनाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात ठिबक व तुषार सिंचनाची प्रचार व प्रसिद्धीकरिता जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जीतेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने नुकताच 16 मे 2015 रोजी प्रत्येक गावात ठिबक दिन साजरा करण्यात आला.जिल्ह्यात यादिवशी सर्व गावांमध्ये ठिबक दिनानिमित्त कृषी विभागाने कार्यक्रम घेऊन ठिबक संच वितरक तसेच सूक्ष्म सिंचनामधील तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठिबक सिंचन, तुषार सिंचनामुळे होणारे फायदे, पाणी व खताची होणारी बचत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे ठिबक संच बसविण्यासाठी शेतकरी प्रोत्साहित होणार असून जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली येईल व जलयुक्त शिवार अभियानाचा दृश्य परिणाम या गावांमध्ये दिसेल.
जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात 38 हजार 817 इतक्या शेतकऱ्यांना 23 हजार 953 हेक्टर क्षेत्राकरिता 42 कोटी 31 लाखाहून अधिक रक्कमेचा ठिबक सिंचन अनुदान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014-15 मध्ये 5 हजार 210 लाभार्थ्यांना 3 हजार 135 हे. क्षेत्राकरिता 11 कोटी 45 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले. 2015-16 चा 19 कोटी 50 लाखाचा नियोजित आराखडा असून त्यातून 8 हजार 650 हे. क्षेत्रावर संच बसतील.
ठिबक संचाच्या वापरामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळे जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते. उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ होते. तणाच्या नियंत्रणावरील खर्चात बचत होते. संचातून द्रव्यस्वरुपात रासायनिक खताचा वापर करता येतो. त्यामुळे खताच्या खर्चामध्ये 20 ते 25 टक्के बचत होते. ठिबक व तुषार सिंचनामुळे जमिनीमध्ये सतत वाफसा परिस्थिती टिकून राहते. त्यामुळे पिकाची वाढ उत्तम होते.
कोरेगाव, खटाव, माण व खंडाळा तालुक्यातील अत्यल्प व अल्पभुधारक (2 हेक्टर पेक्षा कमी धारणा क्षेत्र) शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान. उर्वरित इतर 2 हेक्टर पेक्षा जास्त धारणा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान. सातारा, कराड, पाटण, फलटण, वाई, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील अत्यल्प व अल्पभुधारक (2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र) शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान व उर्वरित इतर 2 हेक्टर पेक्षा जास्त धारणा क्षेत्र असणाऱ्या 35 टक्के अनुदान. अनुदानाची रक्कम पिकामधील अंतर व खर्च प्रमाणकांच्या मर्यादेवर अवलंबून असते.
7/12, 8 अ, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, शेती सामूहिक असल्यास संमती पत्र, पाणी व मृदा तपासणी अहवाल, चतु:सिमा नकाशा, सिंचन संचाचा आलेख पेपरवरील आराखडा, उत्पादक व शेतकऱ्यांचा करारनामा, बील इनव्हाईस, या पूर्वी अनुदान न घेतल्याचा दाखला, शेतकऱ्याचे सिंचन संचासह छायाचित्र.चालू वर्षापासून ई-ठिबकवरऑनलाईन नोंदणी : सन 2015-16 या वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांनी शासकीय अनुदान लाभ घेण्याकरिता कृषी विभागाच्या ऑनलाईन सॉफ्टवेअर (ई-ठिबक) या संगणक आज्ञावलीमध्ये नोंदणी करण्याकरिता आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ही सुविधा http://mahaethibak.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुदानासाठी अर्ज या सदराखाली शेतकरीअर्ज करु शकतो. जिल्ह्यासाठी लागू होणारे सिंचन प्रकल्प, नोंदणीकृत कंपन्या व वितरण (डिलर), अनुदानासाठी पात्र घटक व त्यांचे दर, ठिबक व तुषार संच बसविण्याचा मार्गदर्शक खर्च तसेच कृषी अधिकाऱ्यांचे संपर्क आदी तपशीलाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपल्या प्रस्तावावरील कार्यवाहीची व अनुदानाबाबतची अद्यावत माहिती मिळेल.
जलयुक्त गाव विशेष अभियान म्हणून ठिबक व तुषार सिंचनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावावा. ऊसासोबतच फळबागा व इतर पिकांनाही ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा अवलंब केल्यास निश्चितच पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासह पाण्याच्या उपलब्धतेच्या कालावधीमध्येही वाढ होऊ शकेल. गरज आहे ती फक्त शेतकरी बांधवांनी पुढाकार घेण्याची.
''ऊस हे सर्वाधिक पाणी घेणारे पीक असल्याने त्यासाठी 100 टक्के ठिबकचा अवलंब व्हावा यासाठी साखर कारखान्यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरु आहेतच; त्याशिवाय जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट गावांपैकी काही गावे प्राधान्याने 100 टक्के ठिबक सिंचनयुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पाणी बचतीच्या या अभियानात सक्रिय व्हावे, असे आवाहन मी करीत आहे.''- अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, सातारा ''तणाचे नियंत्रण, खतांचा कार्यक्षमतेने वापर आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने उपयोग हे फक्त ठिबक सिंचनानेच साध्य होऊ शकते. जिल्ह्यातील डाळींब, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी या पिकांना ठिबक सिंचनामुळे लक्षणीय फायदा झाला आहे. सर्व पिकांसाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करुन जिल्ह्याच्या कृषी उत्पादनात भर घालूया आणि जमिनीला देखील अतिसिंचनापासून वाचवूया.''- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा- सचिन गाढवे माहिती सहायक, सातारा
माहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, ०५ जून, २०१५
अंतिम सुधारित : 7/11/2020
आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदार...
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बह...
राज्य शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना र...
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना...