साधारण ०.६ ते १.५ मी. उंचीच्या या तृणधान्याची पाने लांब, सपाट व अरुंद असतात. खोड पोकळ असते. फुले स्तबकांत येतात. तृणफलावर आतील तुषांचे वेष्टन असते आणि या तुषांवरचे कुसळ सरळ व नाजूक असते. ओटच्या बियांत प्रथिने ८ ते १४ %, कर्बोदके ६३ ते ६५ %, मेद २ ते ३% आणि क्षार २ ते ३% असतात. ओट या तृणधान्यात अॅव्हेनार्लिन नावाचे प्रथिन जास्त प्रमाणात असते. ग्लोब्युलीन प्रकारचे हे प्रथिन पाण्यात सहज विरघळते.
दाण्यात तंतुमय भाग जास्त प्रमाणात असतो. दाण्याचा भरडा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इ. जनावरांना खायला घालतात. याचा परिणाम त्यांच्या मांसोत्पादनावर व मांसाच्या प्रतीवर चांगला होतो. चविष्ट व पौष्टिक हिरवा चारा घोडा व दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त असतो. दाण्यांपासून तयार केलेले पोहे, तसेच पिठापासून बनविलेली भाकरी यांचा समावेश माणसे आहारात करतात. दाण्यांची दुधातील खीर पौष्टिक असते. तुषांपासून रेझीन, रासायनिक द्रव्ये व जंतुनाशक द्रव्ये बनवितात. बी रेचक, उत्तेजक व मज्जातंतूस पोषक असते. ओटच्या कोंड्याच्या सेवनाने रक्तातील निम्न घनता लिपोप्रथिनांचे (एलडीएल्) व कोलेस्टेरॉलांचे प्रमाण कमी होते. यामुळे हृदयविकारावर ओट गुणकारी ठरू शकते.
लेखक: राजा ढेपे
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
शेतमालामध्ये काडीकचरा, दगड, इ. नसल्यास अशा शेतमाला...
भारतातील हे एक महत्त्वाचे बारीक तृणधान्याचे पीक आह...
पिकांचे नुकसान करणे, साठविलेल्या धान्यादी वस्तूंचा...
पिकामध्ये प्रत सुधारण्याच्या दृष्टीने पालाश महत्त्...