वन शेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्चित पाऊसमानात हलक्या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बऱ्याच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.
1) कृषी वनरोपण ः या पद्धतीत झाडे व पिके एकत्रितरीत्या घेतली जातात. जमिनीच्या प्रकारानुसार आणि झाडांच्या उपयोगानुसार उदा. तटरक्षक, फळझाडे, लाकूडफाटा, चारा इ. झाडांची निवड करून ती योग्य त्या अंतरावर ओळीमध्ये लावून त्यामध्ये योग्य पद्धतीने पिके घेतात.
2) वनीय कुरण ः हलक्या व उथळ जमिनीत चारा देणारे वृक्ष व कुरण उपयोगी गवताची लागवड करण्यात येते.
3) कृषी वनीय कुरण ः हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर पिके, वृक्ष व गवतांची लागवड करतात.
4) उद्यान कुरण पद्धत ः हलक्या जमिनीवर सीताफळ, बोर, आवळा आणि कवठ यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करून मधल्या जागेत सुधारित गवतांची लागवड करतात.
5) उद्यान कृषी ः फळझाडांच्या पिकाबरोबर धान्याची पिके घेतली जातात.
6) कृषी-उद्यान - कुरण ः मध्यम प्रतीच्या जमिनीत फळझाडे, पिके व सुधारित गवतांची लागवड करतात.
7) वृक्ष शेती पद्धत ः या पद्धतीत वृक्षांची लागवड करून फायदा मिळवता येतो.
वन शेतीचे फायदे
1) वन शेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो व वाढीव उत्पन्न मिळविणे शक्य होते. 2) वृक्षामुळे शेतात आर्द्रता टिकवली जाते व वादळवारे यापासून पिकांचे संरक्षण होते. पर्यावरण संतुलनास मदत होते. 3) जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. 4) हलक्या, मुरमाड अशा जमिनीत नेहमीच्या पीक पद्धतीऐवजी वन शेती लाभदायक ठरते. 5) नापिक अशा जमिनीत थोडी काळजी घेतल्यास वृक्षापासून फायदे मिळविता येतात, तसेच जमिनीचा मगदूर सुधारता येतो. 6) वन शेतीस मजूर कमी लागतात व या पद्धतीपासून दीर्घकाळ उत्पन्न मिळत राहते. 7) महुआ या झाडापासून मिळणारी फुले, फळे आणि बिया खाद्यान्न म्हणून वापरतात. बाभळीच्या सिनेगल या जातीपासून तयार होणारा डिंक परदेशात भरपूर भावाने विकला जातो. लिंब वृक्षाचा औषधी उपयोगासाठी अवलंब होतो. तसेच लिंबोळ्यांचा खत म्हणून उपयोग होतो. साग, सिसम, कडुनिंब यांसारखी झाडे इमारती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत.
पाऊसमानाप्रमाणे व जमिनीनुसार वृक्षांची निवड
ः
1) भरपूर पावसाचा प्रदेश (1200 मि.मी. पेक्षा जास्त) ः साग, बांबू, मोहा, बाभूळ, शेवगा, हादगा, काशीद.
2) मध्यम पाऊसमान (750-1200 मि.मी.) ः कडुलिंब, करंज, बाभूळ, सिसू, शिवण, बकाण.
3) कमी पावसाचा प्रदेश (750 मि.मी. पेक्षा कमी) ः नीम, बाभूळ, सुबाभूळ, बोर, चिंच, आवळा, खैर सीताफळ.
4) क्षारयुक्त जमीन ः खैर, विलायती, बाभूळ, सुरू, सिसू, नीम.
5) आम्लयुक्त जमीन ः करंज, शिवण, चिंच, ग्लिरिसिडीया, शिरस.
6) दलदलीची जमीन ः बाभूळ, ग्लिरिसिडीया, भेंडी, शेवरी, शिरस.
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड
ः
1) हिरवा चारा ः सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर आपटा, कांचन, पांगारा, धावडा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.
2) जळणासाठी लाकूड ः निलगिरी, बाभूळ, वेडीबाभूळ, सुरू, पळस, साग, नीम, आवळा, करंज, हादगा, शेवरी.
3) फळझाडे ः आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.
4) औद्योगिक उत्पादनाकरिता ः नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, पॉपलर, वन, एरंड महुआ.
5) लाकडासाठी झाडे ः साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.
6) जैविक इंधनाकरिता ः करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.
विविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष
ः
1) हलक्या व उथळ जमिनी ः अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.
2) पाणथळ जमिनी ः गिरिपुष्पास सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.
3) क्षारयुक्त जमिनी ः वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.
4) डोंगराळ जमिनी ः निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.
संपर्क ः 02426-243252
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन