पाने - या वनस्पतीला जमिनीलगत अनेक पाने गोलाकार गुच्छात येतात. पानांची लांबी १० ते ३० सें.मी. तर रुंदी १५ ते २० सें.मी. असते. मुळे व पाने थोडथोड्या अंतरावर असतात. पाने एकवट गुच्छाने येतात. पाने लांबट आकाराची असून, त्यांची कडा जरा नागमोडी असते. त्यावर पांढरट दातेरी खाचा असतात. पाने देठरहित असून, थोडीशी जाडसर असतात. मूळ ः पाथरीचे मूळ मांसल १५ ते २० सें.मी. लांब, थोडेसे जाड असते. मूळ ताजे असताना हे पिवळट-पांढरे असते.
खोड - पसरट पानांच्या मध्यातून लहान, नाजूक खोड तयार होते. खोडावर पाने साधी, एका आड एक. खोडावरील पाने पेरास अर्धा विळखा घालतात. पाथरीच्या पानांत व खोडात पांढरा दुधी द्रव्य असतो.
फुले - खोडाच्या शेंड्याजवळ फुलांचे गोंडे तयार होतात. ते १२ ते १४ मि.मी. लांब असतात. फुले पिवळसर, द्विलिंगी व नियमित, संदले ५, संपिच्छरुप. प्रदले पाकळ्या ५. प्रदल मंडळ नळीच्या आकाराचे असते. पुंकेसर ५, एकमेकास चिकटलेले. बीजांड कोश लंबगोलाकार द्विभागी, एक कप्पी. बीजांड एक. परागवाहिनी एक. परागधारिणी द्विविभागी. पाथरीला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फुले येतात.
फळात संपिच्छ झालेली संदले असून, ती सर्व पांढरी असतात, त्यांच्या मदतीने फळे वाऱ्याबरोबर उडून प्रसारित होतात. ही वनस्पती बियांमार्फत वेगाने फैलावते.
पाथरीच्या पानांची भाजी करतात. पाथरीची भाजीही औषधी गुणधर्माची आहे.
या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो.
याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात.
कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे.
या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते.
ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
१. पाथरीची सुकी भाजी
साहित्य - पाथरीची पाने, कांदा, लसूण, तिखट, मीठ, तेल, शेंगदाणा कूट, डाळीचे पीठ इ.
कृती - पाथरीची पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. पातेल्यात पाणी घेऊन त्यात पाने उकडावीत. पाणी गार झाल्यानंतर पाने पिळून घ्यावीत व पाणी टाकून द्यावे. तेलात कांदा परतून घ्यावा, नंतर त्यात वाटलेला लसूण, तिखट, दाण्याचे कूट व भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. नंतर गरजेपुरते मीठ घालावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी परतवून वाफेवर शिजवावी. दाण्याचे कूट ऐवजी डाळीचे पीठ लावूनही भाजी तयार करता येते.
२. पाथरीची पातळ भाजी
साहित्य - पाथरीची चिरलेली भाजी, ताक, मीठ, हिरवी मिरची, लाल मिरची, साखर, चणाडाळ, शेंगदाणे, बेसन, तेल, मेथी, मोहरी, हिंग, हळद, जिरे इ.
कृती - पाथरीची चिरलेली भाजी उकडून घ्यावी व पाणी टाकून द्यावे. डाळ, दाणे भिजवून तासाभराने दाणे, डाळ वेगवेगळे शिजवावे. पाथरीची भाजी शिजवून घोटून घ्यावी. तेव्हाच मीठ, साखर, बेसन व ताक घालून एकजीव करावे. डाळ, दाणे घालावे. फोडणीत दोन्ही मिरच्या व इतर साहित्य घालून त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी व ढवळत राहून उकळावे. ताकाऐवजी चिंचेचा कोळ व गूळ घालूनही भाजी करता येईल. नारळाचे दूध व थोडा चिंचेचा कोळ घालूनही भाजी छान होते.
- डॉ. मधुकर बाचूळकर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...