शास्त्रीय नाव - Bambusa arundinacea (बाम्बुसा एरुन्डिनेशिया)
कूळ - pooceae (पोएसी)
स्थानिक नाव - कासेट, काष्ठी, कळक
संस्कृत नाव - वंश, शतपर्वा, तृणध्वज.
हिंदी नाव - बांस
गुजराती नाव - वान्स
इंग्रजी नाव - स्पाईनी थॉनी बाम्बू
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.
बांबूचे बहूवर्षायू सरळसोट वाढणारे उंच वृक्ष, समूहाने वाढतात. त्यांची बने किंवा बेटे तयार होतात. ओढ्यांच्या व नद्यांच्या काठांवर बांबू वाढतात.
बांबू या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या वृक्षांवर येतात.
स्त्री जातीच्या बांबूमध्ये, बांबू पक्व होऊ लागल्यानंतर त्यांच्या खोडांच्या पेरात घनस्राव जमा होऊ लागतो, त्यास "वंशलोचन' म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. वंशलोचन बाजारात भेसळ करून विकतात, त्यामध्ये चुन्याचे खडे मिसळतात.
बांबूचे इमारती व कागदनिर्मितीसाठी व्यापारी मूल्य आहे. सोबतच ही वनस्पती औषधी गुणधर्माचीही आहे.
बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक पाळी साफ होते.
पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात, तेव्हा ते कोवळे असतात. हेच कोंब भाजी करण्यासाठी योग्य असतात. हे कोंब सोलून त्यावरील टणक आवरणे काढून टाकावीत. आपले नख खुपसता येईल, असा आतला कोवळा भाग काढून घ्यावा, तो पाण्याने धुवावा. बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावा. त्याला असणारा उग्र वास यामुळे कमी होता. तो मऊदेखील होतो. यासाठी आदल्या रात्री कोंब चिरून ठेवून, दुसऱ्या दिवशी भाजी करावी.
साहित्य
चिरलेला कोंब, कांदा, भिजवलेली मसूरडाळ किंवा हरभराडाळ, तिखट, ओले खोबरे, तेल हळद, मीठ, मोहरी, हिंग इ.
कृती
चिरलेला कोंब कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावा. भांड्यात तेल तापवून मोहरी, हिंग घालून फोडणी करावी, त्यावर चिरलेला कांदा टाकून परतावा. मग शिजवून घेतलेला कोंब व भिजवलेली डाळ घालावी. नंतर हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतावे. भाजी वाफवून शिजवावी. नंतर किसलेले ओले खोबरे वरून पसरावे व सुकी भाजी बनवावी. पातळ भाजी करायची असेल तर भाजीत थोडे पाणी घालावे. ओले खोबरे बारीक वाटून घालावे व भाजी परतून शिजवून घ्यावी.
साहित्य
बांबूचे कोवळे कोंब, भिजवलेली हरभळाडाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे, दूध, तेल, फोडणीचे साहित्य इ.
कृती
बांबूचे कोंब सोलून घ्यावेत. कोंब किसणीवर किसावा. थोडा वेळ तो पाण्यात टाकावा. नंतर कीस चांगला वाफवून घ्यावा. फोडणी करून घ्यावी. भिजवलेली डाळ फोडणीत परतून घ्यावी. त्यावर वाफवलेला कीस, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून भाजी शिजवावी. शिजवताना भाजीत पाणी घालू नये, दूध घालावे. ही अतिशय चविष्ट अशी भाजी आहे.
लेखक - डॉ. मधुकर बाचूळकर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...