অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओवा लागवड

ओवा लागवड तंत्रज्ञान

ओवा हे मुळात विदर्भातील उपलब्ध हवामान व जमिनीत फारसे रुळलेले पिक नाही. परंतु बदलते हवामान शेतकरी बंधूंची नवनवीन पिकांकडे आर्थिक फायद्याच्या दृष्टीकोनातून बघण्याची प्रवृत्ती यातून ओव्याची लागवड कशी करावी व त्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून या पिक लागवडीच्या पद्धती विषयी थोडक्यात ओळख करून घ्यायचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

ओव्याची शेती जगात मुख्यत्वे इराण,इराक, भारत आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये केल्या जाते. भारतात ह्या पिकाखाली ४०००० हेक्टर जमीन असून त्यापैकी सर्वात जास्त क्षेत्रफळ गुजरात आणि राजस्थान या विभागात आहे. कमी अधिक प्रमाणात हे पिक सर्व देशभर लागवड करण्यात येते.

ओव्याचे बियांचा अल्प प्रमाणात मसाल्यात उपयोग होतो. परंतु ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा पाचक,दीपक,उष्ण गुणांचा असून विकार, अपचन,कफ दमा, लहान मुलांचे पचनाचे विकारावर फार उपयुक्त असतो.

हवामान व जमीन

ह्या पिकास थंड हवामान मानवते. पिकाच्या कायिक आणि शाखीय वाढीच्या दृष्टीने हवामानातील बदल अतिशय महत्वाचे ठरतात. शाखीय वाढ हि झाडाची उंची, पानाची संख्या पानांचा तजेलदारपणा या बाबींवर अवलंबून आहे आणि त्यानंतर वातावरणातील वाढ २५ ते ३५ अंश से.पर्यंत झाल्यावर कायिक वाढीस पोषक ठरतात.

पाण्याचा उत्तम निचरा होणारी वाळू मिश्रित जमीन ओव्याच्या लागवडीस योग्य समजावी. खूप भारी किंवा हलक्या जमिनीत उत्पन्न अतिशय कमी येते.

जाती

 

 

 

 

 

ओवा या पिकाच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय मसाला बियाणे पिके संशोधन केंद्र, अजमेर राजस्थान यांनी खालील जाती शोधून त्या लागवडीकरिता प्रसारित केलेल्या आहेत. जातीनिहाय गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

१) लाम सिलेक्शन :- हि जात आन्द्रप्रदेशातून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली आहे.झाडाची सरासरी उंची ६० सेमी. असते. पिकाचा कालावधी १३५ ते १४५ दिवस एवढा असून साधारणपणे हेक्टरी ८ ते ९ क्किंटल एवढे उत्पादन मिळते.

२) आर-ए-१-८० :- हि जात बिहार राज्यातून विकसित करण्यात आली असून बियांचा आकार अतिशय लहान आहे परंतु स्वाद अतिशय मधुर आहे. १७० ते १८० दिवसात काढणीस तयार होते व १० ते ११ क्किंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.

३) ऐऐ-०१-१९ :- हि जात जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड ( गुजरात) यांनी विअक्सित केली असून हि लवकर तयार होणारी जात (१५० दिवस) असून हेक्टरी १० ते १२ क्किंटल पर्यंत उत्पादन मिळते. तसेच विदर्भातील हवामानात भुरी या रोगाच्या प्रादुर्भावपासून कमीत कमी नुकसान करणारी आहे. या जातीत ओवा बियाण्यामध्ये आढळणा-या तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्के आहे. वरील सर्व जाती या राष्टीय मसाला बियाणे पिके संशोधन संस्था ( भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली) संलग्नित, ताबिजी अजमेर( राजस्थान) फोन क्र. ०१४५-२६८०९५५  येथे तसेच मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला येथे उपलब्ध आहेत.

पूर्व मशागत

पूर्वीचे पिक काढल्यानंतर काही दिवसांनी शेत उभे व आडवे नांगरून घ्यावे नंतर कुळवाने  मातीची ढेकळे फोडून घ्यावीत. कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. सर्व तण, काडीकचरा व धसकटे वेचून घ्यावीत.

बियाण्याचे प्रमाण,पेरणीची वेळ,मात्रा व पद्धत

विदर्भातील हवामानात ओंवा हे पीक ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी बांधव ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचे सुरवातीस पेरतात. एक हेक्टर क्षेत्राकरिता २.५ ते ५ किलो बियाणे पुरेशे होते. कोरडवाहू पिक घ्यावयाचे असल्यास बी शेतात पेरून पेरतात. दोन आळीत ४५ से.मी.ते ६० से. मी. अंतर ठेऊन पेरतात. बियाणे २.५ ते ३ से.मी. पेक्षा जास्त खोलीत पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओलिताखाली ओवा लागवडी करिता सारी वरंबा पद्धतीने (६० से.मी ते ७५ से.मी. अंतरावर) ३x२ मीटर लांबी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत व त्यामध्ये ३० से.मी. ते ४० से.मी. अंतरावर वरंब्याच्या मधोमध टोकून पेरावे. ओव्याचे बी आकारमानाने व वजनाने हलके असल्यामुळे बियाण्याइतक्याच वजनाची बारीक रेती मिसळून बियाणे टोकावे. बियाणे जमिनीपासून २ ते २.५ से.मी. खोलीवर पडेल याची काळजी घ्यावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

मुलत: ओवा या पिकाला इंग्रजीमध्ये बिशॉपस वीड असे संबोधले जाते. म्हणून नैसर्गिकरीत्या हे पिक तानासारखे जमिनीतील पाणी अन्नद्रव्ये व इतर बाबीकरिता स्पर्धा करून जीवनक्रम पूर्ण करते. करिता लागवडीचे वेळेस १० ते १५ टन कुजलेले सेंद्रिय खात प्रति हेक्टरी मिसळून घ्यावे. हे पिक रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते असे आढळून आल्यामुळे विदर्भातील जमीन व हवामानाचा विचार करता हेक्टरी ४० किलो नत्र विभागून द्यावी. त्यासाठी नत्राची आर्धी मात्रा व स्फुरदाची पूर्ण मात्रा (२० कि.ग्रॅम) लागवडीच्या वेळेस व उर्वरित नत्राची मात्रा लागवड केलेल्या तारखेपासून ३० दिवसांनी द्यावे.

तण व्यवस्थापन व अंतर्गत मशागत

ओव्याच्या अधिक उत्पादनाकरीता दोन ते तीन निंदनी आणि एक डवरणी दिल्यास फायदेशीर ठरते. पहिले निंदनाची वेळ हि लागवडीपासून ३० दिवसांनी ठेवावी. तसेच सपाट वाफ्यामध्ये एका ठिकाणी ओव्याची दोन किंवा तीनच झाडे ठेऊन बाकीची झाडाची विरळणी करणे सुद्धा आवश्यक बाब आहे. यानंतरच्या निंदणा च्या पाळ्या साधारणपणे एक महिना एवढ्या अंतराने दिल्यास तणाची स्पर्धा कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन

ओव्याला त्याच्या जीवन चक्रामध्ये साधारणपणे ४-५ ओलिताची गरज असते. परंतु कोरडवाहू पिक पद्धतीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळयाच्या संख्येत बदल करता येऊ शकत नसला तरीही पिक फुलोरावस्थेत असताना म्हणजे लागवडीपासून ७० ते ८५ दिवसांपर्यंत एक संरक्षित ओळीत दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत मिळते.

काढणी

हे पिक साधारणपणे १६० ते १८० दिवस एवढ्या कालावधीत तयार होते. साधारणपणे फुलांचा किनवा बोन्डयाचा रंग तपकिरी व्हावयास सुरुवात झाली कि बिया तयार झाल्या असे समजावे. जमिनीपासून ४० से.मी. अंतर ठेऊन झाडे कापावी व त्याच्या पेंढया बांधाव्यात. खळ्यात नेऊन घ्यावे व स्वच्छ करून भरून ठेवावे.

उत्पादन

उपरोक्त काळजी घेऊन शास्त्रीय पद्धतीने ओव्याची शेती केल्यास ओळीत व्यवस्थापनांतर्गत हेक्टरी १०-१२ क्किंटल उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु कोरडवाहू पिक पद्धतीमध्ये ६ ते ८ क्किंटल प्रती हेक्टरी उत्पन्न विदर्भाच्या हवामानात अपेक्षित आहे.

किड व रोग व्यवस्थापन

किड :-

अ)मावा :- मावा हि किड ओव्याची नाजूक व रसदार भाग उदा. पाने,फुले,कोवळी शेंडे यातील रस शोषन करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात, वाळतात आणि बियाणांचा आकार लहान राहतो. याचे नियंत्रणाकरिता डायमेथोएट ३० ईसी, १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब)भुरी रोग :- सुरवातीस पानाच्या वरच्या बाजूस राहून पांढ-या रंगाच्या बुरशीची वाढ होते. कालांतराने पूर्ण झाड पांढरे होऊन वाढ खुंटते व वाळून जाते. नियंत्रणाकरिता गंधकाची भुकटी २० -२५ किलो प्रती हेक्टरी धुरळून घ्यावी किंवा कॅरेथॉन हे औषध ०.००५ टक्के तीव्रतेचे फवारून घ्यावे.

 

लेखक :-डॉ.प्रमोद यादगीरवार,

प्रमुख शास्त्रज्ञ :- कृषी विज्ञान केंद्र , यवतमाळ

संपर्क:- ९३७१४५९०६१

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate