অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आले पिकाची काढणी करताना...

गतवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आले पिकाखालील क्षेत्र 15 ते 20 टक्के अधिक होते. परिणामी उत्पादन वाढले असून, दरामध्ये घसरण दिसून येत आहे. आले पिकामध्ये बाजारभाव पाहून कधी काढणी करायची, हे शेतकरी ठरवू शकतो. तसेच खोडवा ठेवण्यासंदर्भात अधिक माहिती घेऊ.

सध्या आल्याचा पाला पूर्णतः सुकण्याच्या स्थितीत असून, आले परिपक्व होऊ लागले आहे. मात्र सध्या आल्याला दर नाहीत. ज्या आल्यांना कंदकूज या रोगाचा प्रादुर्भाव झाला नसेल, त्यांनी 18 ते 20 महिन्यांपर्यंत आले ठेवण्यास हरकत नाही. त्यास आल्याचा खोडवा, असेही म्हणतात.

आले पिकाचा खोडवा ठेवताना घ्यावयाची काळजी

  1. आले पिकास पाने सुकली तरी पाणी चालू ठेवावे, परंतु पाण्याचे प्रमाण मात्र कमी करावे.
  2. आल्याचा पाला कुजणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  3. आल्याचे कंद उघडे असल्यास कंद झाकून घ्यावेत.
  4. शक्‍य झाल्यास सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने उसाचा पाला, भाताचे काड, सुकलेले गवत इत्यादींचा समावेश असावा.
  5. आले पिकास आठवड्यातून एकदा पोटॅशयुक्त खत द्यावे.
  6. आले पिकाच्या गादीवाफ्याच्या बाजूला वेलवर्गीय भाज्या जसे काकडी, कलिंगड, खरबूज इत्यादींच्या बिया टोकाव्यात जेणेकरून वाढणाऱ्या वेलींची सावली गादीवाफ्यावर पडेल आणि आले सुकणार नाही.
  7. साधारणतः 3 ते 4 आठवड्यांनी आले फुटण्यास/ उगवण्यास सुरवात होते.
  8. आंतरप्रवाही कीटकनाशक व बुरशीनाशकाची आळवणी करावी.

काढणी करताना...

  1. आले पिकाची काढणी करावयाची असल्यास आठ महिने पूर्ण झाल्यानंतर या पिकाचे पाणी कमी करत जाऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी बंद करावे.
  2. 70 ते 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित "ब्रश कटर'चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आल्याची काढणी करावी.
  3. पुढील वर्षी बियाण्यासाठी वापरावयाचे असल्यास आल्याची काढणी करून बियाणे सावलीमध्ये किंवा हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवावे.
  4. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आले काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते.
  5. प्रक्रियेसाठी आले वापरावयाचे असल्यास नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय आल्याची काढणी करू नये.
  6. आल्याची काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि आले सावलीत सुकवावे.
  7. आल्याची प्रतवारी करून कुजलेले किंवा सडलेले आले वेगळे करावे. आले गोणपाटाच्या पोत्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये भरून विक्री करावी.


डॉ. जितेंद्र कदम, 9822449789 
(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate