आवळ्याचा उपयोग सर्व आयुर्वेद औषधात करतात. आवळ्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात. त्यादृष्टीने भविष्यात आवळ्याला मोठी मागणी राहणार असून, प्रक्रिया उद्योगांनाही आवळा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांमध्येही आता आवळ्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यास सुरुवात झाली आहे...
आवळा हे औषधी फळ असून, त्यात ‘क’ जीवनसत्त्व असते. आवळ्याच्या झाडाला महाराष्ट्रात पोषक हवामान असल्याने हे झाड कोणत्याही भागात येऊ शकते. शिवाय हे झाड अत्यंत काटक असल्याने त्याची लागवड कोरडवाहू अथवा जिरायती जमिनीत होते. म्हणून महाराष्ट्रात आवळ्याची लागवड करताना ती घराच्या परसात करावी. त्याद्वारे आपणास ‘पोषण सुरक्षा’ प्राप्त होईल. महाराष्ट्रात कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या मेळघाटासारख्या भागांमध्ये आवळ्याची लागवड करणे खूप महत्त्वाचे ठरते.
आवळ्याचे बीज कठीण कवचाचे असल्याने ते लवकर फुटत नाही. त्यामुळे आवळ्याचे बी ८ ते १० दिवस उन्हात वाळवल्यास त्यावरील कवच आपोआप फुटते व त्यातून तपकिरी रंगाच्या दोन बिया बाहेर येतात. या बिया पुन्हा आठवडाभर उन्हात वाळवून घ्याव्यात. प्लास्टिकच्या लहान पिशव्या घेऊन त्यांना छिद्रे पाडावीत. त्यात वाळलेली माती व शेणखत भरावे. या पिशवीत प्रत्येकी एक याप्रमाणे आवळ्याचे बी पेरावे व त्याला पाणी घालावे. पिशव्या थोड्या सावलीत ठेवाव्यात आणि दिवसाआड पाणी घालावे. १० ते १२ दिवसांत बिया उगवून येतील. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही रोपे घराच्या परसात किंवा शेतजमिनीत लावावीत. आवळ्याच्या दोन झाडांतील अंतर १५ फूट इतके असावे.
पावसाळा संपल्यानंतर रोपे एक वर्षाची होईपर्यंत या रोपांना दर ७ ते ८ दिवसाआड पाणी घालावे. त्यानंतर या झाडांना पाणी घालण्याची गरज राहत नाही. सुमारे ५ ते ६ वर्षांनंतर या झाडांना आवळे लागतात. आवळ्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागत असल्याने आवळ्याची झाडे अशा रीतीने घरोघरी लावली पाहिजेत, ज्यामुळे आवळ्याच्या रूपात प्रत्येक घरात एक औषधी फळ मिळेल. त्यापासून मोरावळा व इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतील. महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीने मोरावळा बनविण्याचे कौशल्य शिकून घेतले पाहिजे.
उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही व्हावी आवळा लागवड
भारताच्या योजना आयोगात असताना मला नेहमी उत्तर प्रदेशात जावे लागत असे. उत्तर प्रदेशातील शेतकर्यांच्या घरी गेलो म्हणजे ते मला सकाळी न्याहारीला पोळी व मोरावळा देत असत. तसेच ते शेतकरी वर्षभर पुरेल इतका मोरावळा बनवून ठेवत असल्याचे सांगत असत. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा ही पद्धती येणे फार आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड हा जिल्हा ‘आवळ्याचा जिल्हा’ म्हणून गणला जातो. तेथील गावागावांत आवळ्याच्या रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकेतून देशभरातील विविध राज्यांमधील फळरोपवाटिकांना आवळ्याची रोपे पुरविली जातात. एक दिवस मी प्रतापगडला गेलो होतो. त्या दिवशी तामिळनाडूमधील फळरोपवाटिकाधारक आले होते. ते म्हणाले की, “येथील रोपे आम्ही घेऊन जातो आणि त्यांची लागवड आमच्या राज्यात करतो. कारण भविष्यात आवळा या फळाला मोठी मागणी राहणार आहे.” महाराष्ट्रातही काही शेतकर्यांनी आवळ्यांची लागवड केली आहे; परंतु ती फार तुरळक आहे. त्यात वाढ होणे गरजेचे आहे.
प्रक्रिया उद्योगांच्या दृष्टीनेही आवळा खूप महत्त्वाचा आहे. आवळ्याच्या संदर्भात उत्तर प्रदेशाची एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे येथे प्रत्येक घराशेजारी आवळ्याचे झाड असते. हे झाड बियांपासून तयार केलेले असते. या आवळ्याच्या लागवडीसंदर्भात शेतकर्यांशी चर्चा केली असता ते मला म्हणाले की, “आता आवळ्याची कलमे मिळतात. मात्र, पूर्वी ती मिळत नसत. म्हणून आम्ही प्रथम बी पेरून रोपे तयार केली व नंतर त्यांची लागवड केली. आज आमच्याकडे ८० ते १०० वर्षांची झाडे आहेत व त्यांना हजारो आवळे लागतात. उत्तर प्रदेशात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा आवळ्यांचा हंगाम असतो. या हंगामातील आवळ्यांचा आम्ही मोरावळा तयार करतो.” मोरावळा तयार करणारे प्रक्रिया उद्योग उत्तर प्रदेशात सर्वत्र पसरले आहेत व हा मोरावळा सर्व भारतात विकला जातो. इतकेच नव्हे तर तो निर्यातही केला जातो. महाराष्ट्रातील काही शेतकर्यांनी आवळ्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केले असले, तरी त्यांना आधिक चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात मिळणारे बनारसी जातींचे आवळे विकत आणावेत, ते किसावेत आणि त्याची आवळा सुपारी अगर आवळाकुटी करावी.
आवळ्याचा उपयोग सर्व आयुर्वेद औषधात करतात. आवळ्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात. त्यादृष्टीने भविष्यात आवळ्याला मोठी मागणी राहणार असून, प्रक्रिया उद्योगांनाही आवळा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांमध्येही आता आवळ्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आवळ्याची लागवड करण्यासाठी बाजारात मिळणारे आवळे विकत आणून त्यातील बी काढावे व ते पेरून रोपे तयार करावीत. ही रोपे घराच्या परसात अगर शेतजमिनीवर लावावीत. या झाडांपासून मिळणार्या आवळ्याद्वारे मोरावळा व आवळायुक्त इतर विविध पदार्थ घराघरांत तयार होतील. आवळा हे औषधी फळ असल्याने त्याचे सेवन केल्यास आपले आरोग्य चांगले राहील. आज देशात जी कुपोषणाची समस्या आहे ती दूर करण्यात आवळा हे अत्यंत महत्त्वाचे फळ आहे.
डॉ. जयंत पाटील
नियोजन आयोगाचे माजी सदस्य
व ज्येष्ठ फळशेतीतज्ज्ञ, ठाणे
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 1/24/2020
आवळा कॅन्डी
पदवीधर असणाऱ्या मिथुन गायकवाड यांनी पुणे येथील नोक...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
आवळ्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्च आहे. प्राचीन क...