অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजीर बागेतील समस्या

अंजीर बागेतील समस्या जाणून करा उपाययोजना

अंजीर बागेस दोन वेळा फळबहर येतो. पावसाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराचा ‘खट्टा बहर’ आणि उन्हाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला ‘मीठा बहर’ असे म्हणतात. सध्या मीठा बहराच्या बागांचा फळांचा हंगाम सुरू आहे. बदलत्या हवामानाचा अंजीरबागांवर प्रचंड परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस व जोरदार वारा या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये असलेल्या अंजीर बागांची पाहणी केली असता व अंजीर उत्पादकासोबत चर्चा केली असता, अंजीर बागांमध्ये पुढील समस्या अंजीर अगारात दिसून येत आहेत.
  • त्यामध्ये दोडी गवळ (कच्ची फळे किंवा अपक्व फळे) व पानगळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्याचबरोबर अंजिराची अपक्व फळे पूर्ण वाढ न होता अकाली पिकत आहे व गळून पडत आहेत. ३५ ते ४५ टक्के फळांना इजा दिसून आली.
  • पक्वतेकडे आलेली फळे, गारांच्या मारामुळे उभी-आडवी फाटली आहेत व सदरची फळे बागेतच सडू लागली आहेत.
  • गारांचा मार खोडांना व फांद्यांना बसला असून, त्यामुळे अंजिराचे सुप्त डोळे व फुटलेले डोळे यांना गंभीर इजा पोचली आहे.
  • अनेक अंजीर बागांमध्ये सुत्रकृमी (नीमॅटोड) व मर (विल्ट) रोगाचा उपद्रव वाढलेला दिसून आला.
  • अंजीर बागांवर ‘फळमाशी’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अंजिराची १० ते १५ टक्के फळे तोंडाजवळ सडत आहेत.
  • तांबेरा रोगाचे प्रमाण वाढले असून, फळसड रोगाचे प्रमाण अधिक दिसून आले.
  • पांढरे ढेकूण, फुलकिडे, फळमाशी, खवले कीड, तुडतुडे इत्यादी हानीकारक किडींचा उपद्रव अधिक प्रमाणात दिसून आला.
  • अति गारपीट व प्रचंड वारा असलेल्या गावांमध्ये अंजीर बागा जमिनीवर मोडून पडलेल्या आढळून आल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्‍यकता आहे.

असे करा अंजीर बागेचे व्यवस्थापन


  • अंजीर बागेस बहर घेताना स्थानिक हवामान जसे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, धुके, अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस यांचा अभ्यास करावा.
  • हवामानातील बदलामुळे कमाल व किमान तापमानातील मोठी तफावत दिसून येत आहे. त्याचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होऊ शकली नाही. यावर उपाय म्हणून अंजीर बहाराचे महिने बदलण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी अधिक संशोधनाची आवश्‍यकता आहे.
  • बागेचे थंडी, अवकाळी पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा थोपवणाऱ्या झाडांची दाट झाडी लावणे गरजेचे आहे. सुरू, सिल्व्हर ओक, निरगुडी, टिकोमा स्टँन्स, बाबू, मोगली एरंड, साग, सिसम, फायकस, शेवरी, चिल्हार इ. स्थानिक उपलब्ध झाडांची रांग लावावी.
  • अवकाळी पावसाच्या व गारांचा मारा बसलेल्या बागांवर १ टक्का बोर्डोमिश्रण (१ कि. मोरचूद + १ कि. चुनकळी + १०० लि. पाणी) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३०० ग्रॅम प्रति ५०० लि. पाणी. १० दिवसांचे अंतराने दोन वेळा फवारावे.

६) अंजीर फळे खोडाजवळ सडली आहेत, त्यांच्या नियंत्रणासाठी डायक्लोरोव्हास (७६ ई.सी.) २०० मि.लि. अधिक थायोफिनाईट मिथाईल (७०% w/w) २०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यातून फवारावे.
७) फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ गंधसापळ्यांचा वापर करावा. गंधसापळ्यात मिथाईल युजेनॉल हे ल्यूर वापरावे. या द्वारा किडीचे सर्वेक्षण करणे सोपे जाते. ८) तांबेरा नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा क्लोरोथॅलोनील (७५%), २०० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम (५०%) १०० ग्रॅम प्रती १०० लिटरप्रमाणे फवारावे किंवा मॅन्कोझेब (७५%), ३०० ग्रॅम अधिक कार्बेन्डॅझीम (५०%) १०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यातून फवारावे. रोगाची तीव्रता पाहून ८ ते १० दिवसांनी परत फवारणी करावी.
९) किडीच्या नियंत्रणाकरिता ॲसिफेट ( ७५%), १०० ग्रॅम किंवा अॅबामेक्टीन (१.९% इसी) ५० मि.लि. किंवा डायकोफॉल (१८.५ ई.सी.) २०० मि.लि. किंवा ईमिडाक्लोप्रिड (१७.८ ), ५०मि.लि. किंवा फिप्रोनील (०.३%), १०० मि.लि. प्रती १०० लिटर पाण्यातून किडीची तीव्रता पाहून ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
१०) कोलमडलेली झाडे सरळ करून त्यांना मातीचा व बांबू किंवा लाकडाचा अधार द्यावा. मोडलेल्या फांद्या छाटून काढाव्यात व झाडांना योग्य आकार द्यावा. छाटणी झाल्याबरोबर त्वरित १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यातून फवारावे.
११) संजीवकांचा वापर गरजेपुरताच करावा. अंजीर बागेचे सुप्त डोळे फुटून येण्याकरिता व अधिक उत्पादन मिळवण्याकरिता हायड्रोजन सामनामाईड (५०% एस.एल.) प्रति लिटर २०मि.लि या प्रमाणात फवारावे किंवा फांद्यांना व खोडांना चोळावे. त्याच दिवशी बागेस पाणी देणे गरजेचे असते.
१२) अंजीर बागेस नवीन फूट १ ते दीड फुटांपर्यंत आल्यानंतर त्वरित संजीवक सायकोसील किंवा लिहोसीन---- २ मि.लि.प्रति लिटर पाण्यातून दोन वेळा ५ दिवसांच्या अंतराने फवारावे. त्यामुळे वाढ नियंत्रित राहून दर्जेदार फळे घेता येतात.
१३) अंजीर फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी किंवा खांदणी करण्याची पद्धत आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करावा व बागेस पाणी घ्यावे. यामुळे झाडे जोमदार वाढू लागतात व फळांचे आकारमान सुधारते.
१४) अंजीर फळांची काढणी वेळेत करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत फळांची तोडणी करतात. त्यामुळे बागेस पक्ष्यांपासून होणारा उपद्रव सहज टाळता येतो.
१५) अवकाळी पिकून गळणाऱ्या अंजिर फळांसाठी झाडास २०० ते २५० ग्रॅम पोटॅश मात्रा देणे गरजेचे असते.
शिवाय फवारणीद्वारा ०-०-५० हे खत ३ ग्रॅम/ लिटरप्रमाणे फवारावे.

डॉ. विकास खैरे, ९३७१०१५९२७
(लेखक कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate