प्रस्तावना
महाराष्ट्रात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पिक आहे. राज्यात १० ते ११ लाख हेक्टरवर या पिकाची लागवड केली जाते. उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. या डाळवर्गीय पिकांवार पेरणीपासून पिक निघेपर्यंत जवळजवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच साठवणूकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण करतात. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे.
कधी कधी साठीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्क्यापेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. तूर पिकावर मुख्यत: हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी व शेंगावरील माशीची अळी अशा तीन प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या किडी आढळतात. शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तुरीचे पिक कळी अवस्थेत आल्यावर होत असतो. त्यामुळे तूर पिक काळी धारणा अवस्थेपासूनच या किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
शेंगा पोखरणारी हिरवी अळी:
तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी अळी अर्थात घाटे अळी हि भयंकर नुकसानकारक कीड आहे. या किडीस हिरवी अमेरीकन बोंडअळी, घाटे अळी इत्यादी नावांनी संबोधण्यात येते. हि कीड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटणा, सोयाबीन, चावली इत्यादी कडधान्यावर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, तमाते, तंबाखू, सुर्यफुल, करडई इत्यादी पिकांवरही आढळून येते.
या किडीचा पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबी सुमारे ३७ मि.मी. असते. पुढील तपकिरी पंख जोडीवर काळे असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३७-५० मि.मी. लांब असून पोपटी रंगाची असली तर विविध रंग छटा असलेल्या अळ्याही दृष्टीस पडतात. अळीच्या शरीराच्या बाजूवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो. त्यांच्या पृष्ठभागावर उभ्या कडा असतात. कोष गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका असतो.
या किडीची मादी सरासरी २०० ते ५०० अंडी तुरीच्या कोवळी पाने, देठ, कळ्या, फुले तसेच शेंगावर वेगवेगळ्या ठिकाणी घालते. अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतडून खातात. नंतर शेंगांना अनियमित आकाराची छिद्रे पाडून आत शिरतात व दाणे खातात. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आभाळ आभ्राच्छदित असल्यास ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. हि अळी सहा अवस्थांमधून जाऊन १८-२५ दिवसांची असते. या किडीचा जीवनक्रम ४-५ आठवड्यात पूर्ण होतो.
पिसारी पतंग:
ह्या किडीचा पतंग नाजूक, निमुळता, १०-१२ मि.मी. लांब करड्या भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असून त्यांच्या कडावर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूपच लांब असतात. अळी हिरव्या रंगाची, मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असते. तिचे शरीर केस व लहान काट्यांनी आच्छादलेले असते. कोष लालसर, तपकिरी रंगाचे असून अळीसारखे दिसतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पडून खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेच्या बाहेर राहून शेंगा खाते.
समागमानंतर मादी कोवळी देठे, पाने, कळ्या, फुले व लहान शेंगावर रात्रीच्या वेळी वेगवेगळी अंडी घालते. अंडी ३ ते ५ दिवसात उबून त्यातून बाहेर पडलेली अळी शेंगेची साल खरडून तिला छिद्रे पडते व बाहेर राहून आतील दाणे खाते. अळी अवस्था ११ ते १६ दिवसांची असते. त्यानंतर पूर्ण वाढलेली अळी शेंगेवर अथवा शेंगेवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोषावस्था ४ ते ७ दिवसांची असून ह्या किडीची एक पिढी १८ ते २८ दिवसात पूर्ण होते. कीड पावसाळा संपल्यानंतर तुरीवर मोठ्या प्रमाणात क्रियाशील असते.
शेंग माशी:
शेंगमाशी आकाराने फारच लहान १.५ मि.मी. लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. पुढील पंखाची लांबी ४ मि.मी. असते. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. अंडी पांढऱ्या रंगाची, लंबगोलाकार असतात. कोषावरण तपकिरी रंगाचे असून लंबगोलाकृती असते. कोषावरणाच्या आत कोष असून सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असून नंतर तपकिरी रंगाचा होतो.
सुरुवातीला ह्या किडीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. परंतु जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पडते व त्या छिद्रातून माशी बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. अपाद अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. हे दाणे खावयास व बियाणे म्हणून उपयोगी पडत नाहीत.
मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. ही अंडी ३-८ दिवसात उबवून त्यातून निघणारी अपाद अळी सुरुवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. एक अळी एका दाण्यावरच उदरभरण करून जीवनक्रम पूर्ण करते. जीवनक्रम पूर्ण होईपर्यंत अळी शेंगेतच राहते. अळी अवस्था १०-१८ दिवसांची असून पूर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच जाण्यापूर्वी तिने तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडून कोषामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंगमाशीचा जीवनक्रम ३-४ आठवड्यात पूर्ण होतो.
किडींची आर्थिक नुकसानीची पातळी:
घाटे अळी (हेलीकोवर्पा): ८-१० पतंग प्रती सापळा २-३ दिवसात किंवा १ अळी प्रती १-२ झाड किंवा ५-१० टक्के नुकसान झालेल्या शेंगा.
पिसारी पतंग: ५ अळ्या/१० झाडे.
सद्यस्थितीत तूर पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन:
वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी.
पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
हेक्टरी १० कामगंध सापळे पिकात उभारावेत त्यानुळे शेंगा पोखरणारी हिरवी अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते.
पक्षांसाठी हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत.
वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर: तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
जैविक नियंत्रण: घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता त्या अळीचा विषाणू (एच.ए.एन.पी.व्ही.) प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा.
वरील सर्व तंत्रांचा अवलंब करून सुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तसेच किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास शेवटचा पर्याय म्हणून खालीलपैकी एका कीटकनाशाकाची फवारणी करावी.
स्रोत- कृषी जागरण
अंतिम सुधारित : 4/26/2020