हवामानबदलाच्या समस्येमुळे किडी-रोगांच्या समस्या वाढल्या आहेत, साहजिकच कीडनाशकांचा वापर व त्यावरील खर्च वाढला आहे. कीडनाशकांच्या वापराबाबत आपल्या देशात जागृती न झाल्यास त्यातून वैद्यकीय समस्या उद्भवतील. त्याचबरोबर पर्यावरण सुधारण्यावरही भर देणे गरजेचे राहणार आहे.
बदलत्या हवामानामुळे रोग आणि किडींचा फैलाव होत आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी विविध कीडनाशकांचा वापर करीत आहेत, तरीही हवामानबदलामुळे किडी-रोग आटोक्यात येत नाहीत असे चित्र दिसत आहे. द्राक्षासारख्या पिकामध्ये एकरी दोन लाखांपर्यंत फवारणी खर्च होत आहे. भाजीपाला पिकांवरील फवारण्यांमध्येही वाढ होत आहे.
नवीन अधिक उत्पादन देणारे वाण काही वर्षे चांगले चालतात, मात्र त्यानंतर ते किडी-रोगांना मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत. त्यामुळे बदलत्या हवामानात प्रतिकूल आणि रोग-किडींना बळी न पडणाऱ्या जाती निर्मितीवर भर देण्याची नितांत गरज आहे. कीड आणि रोग निवारण्यासाठी भरमसाट खर्च करून पीक वाया गेल्यास शेतकरीवर्गाचे अर्थशास्त्र बिघडून जात असल्याचे चित्र एका बाजूस दिसत आहे. एकूणच शेती उत्पादकता आणि उत्पादनात त्यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते.
भारतात या वर्षी कापूस उत्पादनाचा अंदाज 329 लाख गाठींचा होता. तो आता प्रत्यक्षात 309 गाठींचा झाला आहे. चीनमधील कापसाचे उत्पादनही घसरल्याने सर्वत्र कापसाचे भाव वाढत असल्याचे चित्र आहे. या वर्षी महाराष्ट्रातील कपाशी काढणीवेळी झालेल्या अवकाळी, जोरदार अतिवृष्टीने कापसाची फुटलेली बोंडे जमिनीवर कोसळली. या नैसर्गिक आपत्तीने शेतकरीवर्ग हतबल होताना दिसत आहे. थंडी वाढल्याने कपाशीची पाने लाल्या विकृतीस बळी पडल्याचे चित्र प्रकर्षाने जाणवले आहे. गहू पिकास सहसा मावा किडीचा प्रादुर्भाव होत नव्हता, तो या वर्षी काही भागात प्रकर्षाने जाणवला असल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होईल आणि अपेक्षित उत्पादनापेक्षा कमी उत्पादन मिळेल.
फ्लॉवर आणि कोबी या दोन्ही पिकांमधील फवारण्यांचा खर्च वाढत आहे. प्रत्यक्ष शेतकरीवर्गास बाजारात माल नेल्यानंतर कमी भाव मिळत आहे. प्रत्यक्ष कीडनाशकांवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादन आणि प्रत्यक्ष बाजारात भाजीपाला विकल्यानंतर मिळणारा बाजारभाव याचा ताळमेळ घालणे जिकिरीचे झाले आहे.
हवामानबदलाने किडींची आणि रोगांची झपाट्याने वाढ होते, त्याचे नियंत्रण व्हावे म्हणून कीडनाशकांच्या फवारण्या वाढत आहेत. त्यांचे अंश वातावरणात मिसळत आहेत, तसेच भाजीपाला आणि फळांवर अवशेषांच्या (रेसिड्यू) स्वरूपात काही प्रमाणात शिल्लक राहात आहेत, असे घातक घटक मानवी आहारात येत असून ते शरीरास बाधक ठरत आहेत. हवामानबदलाचा परिणाम कधी कडाक्याची थंडी ते तीव्र उन्हाळा असह्य झाल्याने दुभत्या जनावरांपासून दूध उत्पादन घटत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे दुधाच्या भावात वाढ अपरिहार्य आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्यास भाववाढ अनिवार्य ठरते. त्याचा फटका उत्पादकांना आणि ग्राहकांना बसतो. डीडीटी कीटकनाशकाचा वापर सुरू झाल्यानंतर किडींचे नियंत्रण होऊ लागले. त्याचा वापर पुढे अनियंत्रित झाला. त्याचा वापर चारा पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी होऊ लागला. त्याचे रेसिड्यू जनावरांच्या दुधात चाऱ्यामधून पोटात जाऊ लागले. त्यातून दुभत्या जनावरांच्या दुधात त्याचे अंश मोठ्या प्रमाणात उतरत असल्याचे लेडी रॅचेल कार्सन यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्व अमेरिकेला ही बाब ओरडून लक्षात आणून दिली. त्यामुळे 1965 नंतर डीडीटीवर बंदी आणण्यात आली.
द्राक्ष निर्यात सुकर होण्यासाठी पुणे येथे कीडनाशकांचे अंश तपासण्यासाठी रेफरल प्रयोगशाळा उभारली असून, त्यात फळे आणि भाजीपाल्यावरींल कीडनाशकांचे प्रमाण किती आहे ते समजते. युरोपीय देशात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत क्लोरमेक्वाट क्लोराईडचे अंश एमआरएलपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्याने गेल्या वर्षी निर्यातीवर निर्बंध आले. याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला. कीडनाशकांच्या वापराबाबत आपल्या देशात जागृती न झाल्यास त्यातून वैद्यकीय समस्या उद्भवतील.
हवामानबदलाने किडी आणि रोगांचा प्रश्न जटिल होत असताना त्यावरील खर्च वाढून मानवी जीवनात वैद्यकीय समस्यांना सामोरे जाण्याचे प्रश्न 21व्या शतकात येऊ घातले आहेत. कीटकनाशकांच्या वापरासंबंधीच्या समस्यांना आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. मुळात पर्यावरण सुधारल्याशिवाय हवामानबदलावर नियंत्रण आणणे कठीण असल्याने या सर्व बाबींचा वापर वाढतच राहील आणि मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी जगामध्ये जागृती निर्माण करणे आणि पर्यावरण सुधारणे आवश्यक ठरणार आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...