पीक विमाविषयक अडचणींतून सुटण्यासाठी व पीक कापणी प्रयोगावर विसंबून राहणे लागू नये असा नवा निकष लक्षात घेऊन, म्हणजेच प्रत्यक्ष पडणारा पाऊस लक्षात घेऊन त्यावर पीक विमा योजना कार्यवाहीत आणली जात आहे, तरीही ती योजनाही पुरेशी विश्वासार्ह नाही, कारण फक्त पावसाचे मोजमाप पुरेसे नाही. कारण पाऊस वेळेवर होणे, तसेच पाऊसपाण्याशिवाय अन्य अनेक गोष्टीही उदा. शेतकऱ्याने वापरलेले बियाणे, अन्य निविदा इत्यादी पीक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून पीक विमा योजनेसाठी उत्पादकता जास्त विश्वासार्ह पद्धतीने आणि अपेक्षित पारदर्शकतेने अचूकपणे काढता येईल, अशी पद्धत हवी. त्याशिवाय त्यामध्ये प्रत्येक शेतागणिक उत्पादन काढता आले पाहिजे.
आता उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमाकरणातून प्रत्येक शेतातील पिकांच्या स्वच्छ प्रतिमा गूगल वा तत्सम यंत्रणेवरून मिळू शकतात. या प्रतिमा नवीन तंत्रज्ञानामुळे त्रिमितीमध्येही व्हर्च्युअल शेताच्या प्रतिमा स्वच्छपणे मिळू शकतील. त्याचा उपयोग करून गंगेच्या खोऱ्यातील काही राज्यांमध्ये पीक विमा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयोग करण्यात आल्याचे समजते. कारण त्या प्रदेशात सलग सपाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचे पीक मोठ्या क्षेत्रात उपलब्ध असते.
पूर्वीही व आजही नजर अंदाजाची पद्धत अस्तित्वात आहे. त्याशिवाय व्यापारी जेव्हा बागा ंच्या बागांतील संपूर्ण फळांची आगावू खरेदी करतात, तेव्हा ते अशा फळबागांतील अंदाजित पिकाचा अं दाज घेऊनच खरेदी करीत असतात. शेतकऱ्यालाही अपेक्षित पिकाचा अंदाज असतोच व तो लक्षात घेऊन शेतकरीही आपले फळबागेतील पीक विकत असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारांना एक प्रकारे अंदा जित पिकाची विश्वासार्हता आतादेखील लाभलेली आहेच. तृणधाया बाबतीत तर लोंब्या, कणसे आ णि दाणे हे सदर पिकाच्या वरच्या बाजूस असल्याने, उपग्रहावरून घेतलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. इतर कडधान्ये व अन्य पिकांच्या बाबतीत झाडांची वाढ, पानांचा आकार, पसारा, झाडाचे आरोग्य इत्यादी दृश्यभागावरून उत्पादनाशी या गोष्टीचा ताळमेळ घालून बसवून नजर अंदाजाने सरासरी हेक्टरी उत्पादन बऱ्याचशा प्रमाणात निश्चितपणे अचूकपणे काढता येणे शक्य वाटते. यादृष्टीने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्त विश्वासार्ह पद्धतीने उत्पादनाचे अंदाज बांधता येतील. त्याला पूरक म्हणून अशा संशोधन यंत्रणेमार्फत पीक कापणी प्रयोग करून पडताळा पाहता येईल.
पिकाच्या उत्पादनाचे प्रमाणित पैसेवारीच्या प्रतिमांशी पडताळून उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमा पाहून उत्पादकता ठरविता येऊ शकेल. एकदा का अशा स्टॅण्डर्ड फोटोग्राफची पीकवार जातवार पैसेवारी कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये टाकली, की ज्या ज्या वेळी एखाद्या शेतातील उत्पादन कापणीच्या वेळी कमी आहे अशी तक्रार असेल, त्या त्या शेताचा गूगलवरील फोटो घेऊन व तो कॉ म्प्युटरला फीड करून त्या शेताचे उपेक्षित उत्पादन कॉम्प्युटरमधील फोटोतील पैसेवारीशी तुलना करून ठरविता येऊ शकेल. त्यासाठी प्रमाणित उत्पादनाच्या प्रतिमा प्रत्यक्ष सर्वांसमक्ष पीक कापणी प्रयोग करून पारदर्शकपणे तयार करता येतील. यामुळे पीक विमाधारक व विमा कंपनी यांना पीक विमा योजना जास्त चांगल्या प्रकारे, पीकवार व त्यातील जातवार व प्रत्येक शेतागणिक उत्पादकता उपग्रहावरून घेतलेल्या फ ोटोद्वारे पडताळून ठरविता येऊ शकेल. शेतकरी आणि विमा कंपनी यातील वादही त्याआधारे मिटविता येतील.
पीक विमा कंपन्यांशी ज्या वेळी छोटे छोटे शेतकरी एकत्र येऊन एकाच जातीचे पीक विस्तृत क्षेत्रात घेतील, त्यांना मोठ्या प्रमाणात विम्याच्या हप्त्यामध्ये सूट देण्याचा विचार करावा. कारण त्यामध्ये विमा कंपनीची लिखापडी व अन्य कामेही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतील.
कृषी खाते महाराष्ट्र शासन सर्वंकष पीक विमा योजनेचे स्वरूप ठरविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. तेव्हा वरील उपग्रह प्रतिमेच्या आधारे पीक विमा योजना कार्यान्वित करता येईल, यावर चर्चा व्हावी. हे शक्य झाल्यास शेती उत्पादनांचे तुलनात्मकदृष्ट्या अचूक अंदाज शीघ्रतेने शासनाला प्राप्त होऊन आज जे आयात - निर्यात धोरणासाठी निर्णय करण्यात काही वेळा वराती मागून घोडे या न्यायाने विलंब लागतो, तो टाळून वेळीच योग्य ते निर्णय शेतकरी व ग्राहक या दोहोंचेही हित लक्षात घेऊन शासनाला घेता येऊ शकेल. एकदा का या उपग्रह प्रतिमांवरून अचूक उत्पादकता काढण्यात नैपुण्य प्राप्त झाले, की त्याचा उपयोग इतर देशांनाही हे तंत्रज्ञान उपलब्ध करून परस्परांना लाभदायक व्यापारवृद्धी करणे शक्य होईल.
शं. त्रिं. भिडे
संपर्क : 020 - 24332676
(लेखक, कृषी व सहकार व्यासपीठाचे संयोजक आहेत.)
---------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020