अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव हे रेशीम शेती उत्पादकांचे गाव म्हणून लौकीकास आले आहे. गावातील एका व्यक्तीने रेशीम शेतीची कास धरली आणि या व्यावसायिक शेतीचे फायदे कळाल्यानंतर तब्बल पाच जणांनी त्यासाठी पुढाकार घेतला. केशव मासोदकर हा युवक देखील त्यापैकीच एक. गेल्या तीन वर्षांपासून केशव यांनी रेशीम शेतीत सातत्य ठेवले आहे.
नांदगाव खंडेश्वर या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या आठ किलोमीटरवर सातरगाव आहे. येथील केशव मासोदकर यांची दिड एकर शेती आहे. या संपूर्ण क्षेत्रावर त्यांच्याद्वारे तुतीची लागवड करण्यात येते. त्यांनी रेशीम संचालनालयाच्या वतीने आयोजित अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून या पीकपद्धतीची माहिती घेतली. वर्षभरात सरासरी सहा बॅचेस निघतात. रेशीम शेती व्यवस्थापनात तापमान हा महत्वाचा घटक आहे. तापमानात वाढ झाल्यास तापमान नियंत्रित करताना चांगलीच दमछाक होते. विदर्भातील उन्हाळा सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे रेशीम किडीचे अस्तीत्व राखण्यासाठी अनेक उपाय योजना कराव्या लागतात, असे केशव यांनी सांगितले.
2001 साली त्यांनी पहिल्यांदा रेशीम शेतीचा प्रयोग केला. त्यावेळी पाण्याचे दुर्भीक्ष भासल्याने त्यांनी पहिल्याच प्रयोगानंतर या व्यावसायिक शेतीपासून फारकत घेतली. त्यानंतर 2014-15 या वर्षात ते पुन्हा या व्यावसायिक शेतीकडे वळले. त्याकरीता 23 बाय 50 फुट आकाराचे शेड उभारण्यात आले. शेड उभारणीवर दोन लाख रुपयांचा खर्च झाल्याचे ते सांगतात. याकरीता 63 हजार रुपयांचे अनुदान रेशीम संचालनालयाकडून मिळाले.
तूती लागवड एकदाच करावी लागते. त्यानंतर कापणी करुन पुन्हा त्याला पालवी फुटते. त्यामुळे 25 वर्षापर्यंत सातत्याने तुतीची पाने उपयोगी पडतात. त्याच्या पुनर्लागवडीची गरज भासत नसल्याचे त्यांनी सांगीतले. रेशीम संचालनालयाकडून 50 अंडीपूंजाचे पाकीट दिले जाते. यामध्ये 1 लाख 30 हजार अंडी राहतात. त्यांच्यावर नंतर ब्लॅकबॉक्सींग प्रक्रीया केली जाते. ट्रे मध्ये पेपर टाकून त्यावर अंडीपूज टाकून द्यायची आणि त्यावर काळा कपडा टाकायचे. या प्रक्रीयेत सर्व अंडी एकाचवेळी फुटतात व अळ्या बाहेर पडतात.
एकाचवेळी अंडी फुटत असल्याने रेशीम कोश परिपक्व होण्यास एकाचवेळी सुरवात होते. अंडी एकाच दिवशी न फुटल्यास पुढील क्रिया देखील टप्याटप्याने होतात. त्याचा परिणाम मग उत्पादनावर देखील होऊ शकतो आणि बाजारात विक्रीसाठी नेताना कोश एकाचवेळी मिळत नाही, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंडी फुटण्यासाठी ब्लॅक बॉक्सींग प्रक्रीयेवर भर देणे यामुळेच क्रमप्राप्त ठरते, असे त्यांनी सांगितले. अंडी फुटण्यापासून तर कोश तयार होण्यासाठी एकूण 28 दिवसाचा कालावधी लागतो. या काळात वारंवार निरीक्षण करावे लागते.
अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रावर दरवर्षी अस्टरची लागवड होते. अस्टरच्या फुलांना गेल्यावर्षी 35 ते 40 रुपये प्रती किलोचा दर मिळाला होता. यावर्षी अस्टरच्या फुलांची विक्री अवघ्या 20 ते 25 रुपये किलो दराने करावी लागली. अर्धा एकर झेंडू लागवड यावर्षी केली होती. गेल्यावर्षी 100 रुपये किलो दराने विकला गेलेला झेंडू यावर्षी अवघ्या 10 ते 15 रुपये किलो दराने विकावा लागला. फुलांच्या बाजारपेठेतील ही घसरण चिंताजनक ठरली. अस्टर लागवडीत रोपाची खरेदी दिड रुपये प्रती नगाप्रमाणे होते. अर्धा एकरात सुमारे 3 हजारावर रोपे बसतात. त्यातील काही बाद होत असल्याने त्या नियोजनानुसार रोपांची अधिक खरेदी करावी लागतरोपाची लागवड बेडवर करण्यावर भर दिला जातो. 3 बाय 2 फुट याप्रमाणे लागवड अंतर राहते. बेड तयार करण्याकरीता ट्रॅक्टरचा वापर होतो. अस्टरला खताची गरज कमी राहते. मात्र या पिकात तणनियंत्रणावर सातत्याने भर द्यावा लागतो. यावेळी तणनाशकाची दुसऱ्या पिकावर फवारणी करण्यात आली. त्याच दरम्यान अस्टर लागवड झाली आणि अस्टर पीक प्रादुर्भावग्रस्त झाले. यावेळी अस्टर लागवडीचा प्रयोग फसला असला तरी पुढीलवेळी मात्र योग्य ती खबरदारी घेण्याचा त्यांचा मानस आहे. शेती व्यवस्थापनात अशाप्रकारच्या बाबी घडतात, त्यातून संभाव्य धोके टाळण्याची शिकवण मिळते, असा प्रकारची सकारात्मकता त्यांना शेती व्यवस्थापनात जपली आहे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/10/2020
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कम...
टसर सोबतच तुती रेशीमची जिल्ह्यात जोमाने लागवड, ५० ...