विषेशतः विदर्भातील शेतीकडे शेतकरी तोट्याचा व्यवसाय म्हणुन पाहतो व आधुनिक शेती करण्याचे धाडस करण्यासही मागेपुढे पाहतो. शेती परवडत नाही, त्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्तच आहे. मात्र अपवाद असलेल्याआणि शासकीय सेवेतुन सेवानिवृती घेऊन शेती विकत घेणा-या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथिल शेतकरी श्रीमती सावी थंगवेल यांनी खडकाळ जमिनीत डोंगराच्या कुशीत नंदनवन फुलविले व शेतीसोबत जोडधंदा तोट्याचा नाहीतर फायद्यांचा व्यावसाय असल्याचे सिध्द करुन दाखविले. बहुतांशी वाळवंटी प्रदेशात केल्या जाणा-या खजुर शेतीचा विदर्भातील मातीत विषेशत: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग श्रीमती थांगवेल यांनी यशस्वी करुन दाखवला आणि लाखो रुपये कमवण्याचा मार्ग आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना दाखवला.
खजुराच्या शेतीतुन कमीतकमी पैशातुन जास्तीतजास्त पैसा कसा कमवायचा हे खजुर शेतीतुन त्यांनी दाखवुन दिले. रोपे लागवाडीपासुन ४ वर्षात झाडाला फळे येणे सुरु होते. एका झाडाला कमीतकमी १oo व जास्तीतजास्त २५० फळे लागतात व खजुर फळे रु. २०० ते ३०० प्रती किलो भावाने विकली जातात. या फळास देशाबरोबरच विदेशातही विशेषतः अरब देशात भरपुर मागणी आहे.
एका एकरात ७५ झाडे बसतात. श्री. व श्रीमती थंगवेल यांनी दोन एकरात खजुराची लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे १४o झाडे असुन यंदाच्या वर्षात विक्रमी पीक आले आहे. त्यांच्या या शेतीमुळे परिसरातील ५० लोकांना रोजगार मिळाला आहे. सध्या झाडे ६ वर्षांची असल्यामुळे एका एकरात रू. ३.१८ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. खजुराचे झाड १oo ते १५0 वर्षे फळे देऊ शकते तर १0 वर्षांनंतर १ एकरामध्ये कमीतकमी १० लाखाचे उत्पन्न मिळू शकते.
या पिकाचा देखरेख खर्चही कमी असुन ऊन, वारा, पाऊस यांचा कुठलाही परिणाम या पिकावर होत नाही. उलट विदर्भातील कडक उन्हामुळे खजुराच्या फळाचे माधुर्य व गोडी अधिकच वाढते. भारतात गुजराथ व राजस्थानच्या काही भागात खजुराची शेती केली जाते. तथापी तेथील हवेतील आद्रतेमुळे फळांना हवा तेवढा गोडवा मिळत नाही परंतु नागपुरातील खजुराची चव ही आंतरराष्ट्रीय ब्रेडशी तंतोतंत मिळते.
खजुराचे झाड इंग्लडमधिल प्रयोगशाळेव्दारे विकसित केले जाते. जगात खजुराच्या १७५ जाती आहेत. त्यातील बन्ही जातीची त्यांनी लागवड केली आहे. इंग्लडहुन आणलेली रोपे राजस्थानातील प्रयोगशाळेत आणुन भारतीय वातावरणकुल केली जातात. त्यानंतर ही रोपे मागणीनुसार देशभर पाठविली जातात. या रोपट्याची जगण्याची व फळावर येण्याचे १00 टक्के खात्री असुन प्रत्येक झाड ४ वर्षात फळाला येतेच, असेही श्री. व श्रीमती थंगवेल ठासुन सांगतात. एका झाडाचा कमाईचा अंदाज बांधता येईल. एक झाड वर्षाला १५ ते २० हजाराची कमाई करुन देते. तसेच व्यावसायिक पध्दतीने शेती केली तर उत्पादन दुप्पटीने मिळते. केवळ गायीच्या शेणाने रोपट्याचे पोषण केले जाऊ शकते व सुपीक जमिनीची या पिकाला गरज नसते. खजुराचे फळ अतिशय पौष्टीक असते. १ किलो खजुरातुन २९७o कॅलरीज मिळतात. खजुरामध्ये साखर, प्रोटिन्स, लिपीडस, फायबर्स, व्हिटामिन आणि कार्बोहायड्रेटस देखील मिळतात.
श्री. व श्रीमती थंगवेल यांनी त्यांच्या शेतीतील लागवडीनुसार खजुरांचे उत्पादन कसे घ्यावयाचे, शेती कशी करायची, पिकाची काळजी कशी घ्यायची इत्यादि बाबींचे शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना ते या पिकाचा पर्याय निवडावा, असे आवाहन करतात.
खजुर शेतीबरोबरच ते सेंद्रियशेती सुध्दा उत्तम पध्दतीने करतात. त्याचप्रमाणे जवळपास २४ ते २५ प्रकारची विविध फळपिके, रोपांची नर्सरी, कुक्कुटपालन, बटेरपालन, मधुमक्षिकापालन, स्ट्रॉबेरीची खुली व शेडनेटमध्ये लागवड, सरी-वरंबे आच्छादनासहित विविध पिकाची शेती तसेच शेडनेटमध्ये भाजीपाला, काकडी व इतर पिकाची लागवड, द्राक्ष शेती, हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञान, गांडूळखत प्रकल्प, मध उत्पादन इत्यादी शेतावरुनच भाजीपाला व फळांची खरेदी करतात. त्यांच्या शेतीला एक प्रकारे अॅग्रो टुरीझमचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. परिसरातील हजारो शेतक-यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले असुन अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी सुध्दा त्यांच्या शेतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. श्री. व श्रीमती थांगवेल यांना मी तसेच कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी श्री. संजय भगत, कृषि पर्यवेक्षक श्री. बाबासाहेब शिंदे, कृषि सहाय्यक श्री. सुरेश कवनपुरे हे सतत मार्गदर्शन करत असतात. सदरच्या खजूर शेती प्रमाणेच इतर शेतक-यांनी सुध्दा खजूर लागवड करण्यास हरकत नाही.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेद्रिय श...
रासायनिक पद्धतीवर भर देऊन हायब्रीड भात पिकांचे उत्...
किफायतशीर शेतीसाठी सेंद्रिय शेती करा, असा सल्ला म...