অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारंपरिककडून आधुनिक शेतीकडे

बाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रामचंद्र आणि विलास नागवडे या बंधूंचा पारंपरिक शेतीपासून सुरू झालेला प्रवास आधुनिक शेतीपर्यंत येऊन ठेपला आहे. ठिबक सिंचन, सबसरफेस ठिबक, पॉलिमल्चिंग, जैविक कीडनियंत्रण यासारख्या आधुनिक बाबींचा शेतात वापर वाढवला असून, ऊस या मुख्य पिकात फ्लॉवरचे आंतरपीक घेत उत्पादन खर्चात बचत केली आहे. संदीप नवले
बाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे) हे भीमा काठावरील सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील रामचंद्र व विलास नागवडे यांची वडिलोपार्जित 55 एकर शेती आहे. त्यामध्ये मुख्यत्वे ऊस, गहू, खरबूज, काकडी, दोडका, फ्लॉवर ही पिके घेतली जातात. परिसरातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

व्याख्यान ठरले आधुनिक तंत्रज्ञानासाठी निमित्त

रामचंद्र नागवडे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. मात्र, लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. ज्येष्ठ असल्याने एकत्रित कुटुंबाची जबाबदारी शिरावर आली. आता एकोणीस माणसांचे एकत्रित कुटुंब आहे. सुरवातीला बहुतांश शेती ही जिरायती होती. साधारण एक एकरपर्यंत ऊस असे. त्याचे उत्पादनही 30 ते 40 टनांपर्यंत मिळत असे. उत्पादनवाढीसाठी रामचंद्र यांनी प्रयत्न सुरू केले. विविध कृषी प्रदर्शने, कृषी मेळावे यांना उपस्थित राहून अधिक उत्पादन कसे मिळेल, यासाठी माहिती मिळवत गेले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातून मिळणारी शास्त्रीय माहिती अत्यंत उपयुक्त ठरली. त्याच काळात अप्पासाहेब पवार यांचे व्याख्यान ऐकण्यात आले. त्यातून त्यांना चांगली शेती करण्याची प्रेरणा मिळाली. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावाचून पर्याय नसल्याचे मनावर बिंबले. मग मोहोळ येथील दादासाहेब बोडखे, पुण्यातील केशव म्हस्के यांच्यासारख्या प्रगतिशील शेतकऱ्यांना भेट देत अधिक माहिती जाणून घेतली. हळूहळू आपल्या शेतातील पिकात बदल करत ऊस, केळी, कलिंगड, ढोबळी मिरची, काकडी अशी विविध पिके घेण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे ऊस 20 एकर, काकडी एक एकर, फ्लॉवर एक एकर आहे. चार एकर ऊस पिकामध्ये फ्लॉवरचे आंतरपीक घेतले आहे. शेतीचे नियोजन करण्यामध्ये बंधू विलास व पुतणे किशोर यांचा मोलाचा सहभाग असतो.

उसामध्ये फ्लॉवरची लागवड 

- शेतात आडसाली उसाची चार एकरावर जुलै-ऑगस्टमध्ये लागवड 
- उसाच्या को. 86032 वाणाची लागवड केली असून, मधे 5 ते 8 फुटांचे पट्टे ठेवले आहेत. या पट्ट्यांमध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवरची सप्टेंबरमध्ये एक एकरावर लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चार एकरांवर फ्लॉवरची लागवड केली.

उसामध्ये सबसरफेस प्रणालीचा अवलंब

- त्यांच्याकडे 20 एकरांपैकी 12 एकर ऊस क्षेत्राला ठिबक सिंचन पद्धत वापरली आहे, तर सबसरफेस पद्धतीने अडीच एकर उसाचे पीक घेतले आहे. या पद्धतीत थेट मुळांना पाणी मिळून जमिनीत ओलही चांगली राहण्यात मदत होते. बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन मुळांची चांगली वाढ होत असून, उत्पादनात सुमारे 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होत असल्याचे रामचंद्र यांनी सांगितले. 
चार एकरांवरील फ्लॉवरसाठीही ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. 
पिकांना ठिबकद्वारे खते दिली जातात. 19-19-19, 13-40-13, 0-52-34, 0-0-50 ही खते साधारणपणे चार ते पाच दिवसांतून एकदा दिली जातात.

उत्पादनाचा ताळेबंद

ऊस
ऊस पिकाचे आडसालीचे उत्पादन एकरी 80 ते 90 टनांपर्यंत येते. खोडव्याचे उत्पादन एकरी 45 टनांपर्यंत येते. मागील वर्षी आडसाली व खोडवा दोन्हींचे मिळून 17 एकरांतून 1100 टन ऊस कारखान्याला गेला. एकरी सरासरी 65 टन होते. 
उसाचा एकरी उत्पादन खर्च - नांगरट - 4 हजार रु., बेणे 8 हजार रु., लागवडीची मजुरी 3 हजार रु., खुरपणी 2 हजार रु., शेणखत, गांडूळखत 10 हजार रु., रासायनिक खते 25 हजार रु., कीडनियंत्रण 4 हजार रु. असा एकूण 56 हजार रुपये उत्पादन खर्च होतो. ठिबक सिंचन यंत्रणेसाठी एकरी 40 हजार रु.पर्यंत खर्च आला आहे.

आंतरपीक फ्लॉवर 

दोन ते तीन दिवसाला फ्लॉवरची काढणी केली जाते. आत्तापर्यंत चार तोडण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातून एकरी 4 टन उत्पादन मिळाले आहे. त्याला प्रति किलो 10 रुपये सरासरी दर मिळाला आहे. एकरी साधारणपणे 5 ते 6 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन खर्च एकरी 22 ते 25 हजार रु. होतो.

आधुनिक अवजारांचा वापर

- आच्छादन म्हणून खरबूज, काकडी, कलिंगड या पिकांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतात. 
  • पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन व सबसरफेस ठिबक प्रणालीचा वापर.
  • जैविक कीडनियंत्रण यंत्रणेमध्ये चिकट सापळे, गंध सापळे यांच्यासह व्हीएसआयच्या विविध जैविक संवर्धकांचा वापर केला जातो.
  • शेतीसाठी सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी 40 बाय 20 फूट आकाराचा गांडूळखत प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी 20 लहान-मोठ्या देशी जनावरांच्या शेणांचा वापर केला जातो.
  • शेतातील आंतरमशागत व तणनिर्मूलनासाठी छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करतात. सोबतच बियाणे आणि खताची एकावेळी पेरणी करणाऱ्या यंत्राचाही वापर ते करतात. कीडनाशकांच्या फवारणीसाठी एचटीपी पंप व टाक्‍या ट्रॅक्‍टरवर बसवून घेतल्या आहेत.

मिळालेले पुरस्कार

  • पुणे जिल्हा परिषदेचा स्व. अप्पासाहेब पवार पुरस्कार - 2011-12
  • महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार - 2012-13

पुढील पिढीही होतेय तरबेज

रामचंद्र नागवडे यांनी सांगितले, की आम्ही स्वतः अधिक शिकू शकलो नसलो तरी पुढच्या पिढीने अधिक शिकावे, शेतीत लक्ष द्यावे, ही आमची दोघा भावांची इच्छा होती. त्याला मुला-पुतण्यांनी मान दिला असून, पुतण्याने इंग्लंड येथून एमएस्सी ऍग्री (फूड टेक्‍नॉलॉजी) या विषयातील शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे इंग्लंडला भेट देण्याचा योग आला. तसेच मे महिन्यात युरोपातील फ्रान्स, हॉलंड, स्पेन, जर्मनीला भेट दिली. तेथील शेती पद्धतीविषयी अधिक माहिती मिळवली. त्यातील काही बाबींचा वापरही आपल्या शेतीत सुरू केला आहे. मुलानेही बी. ई. (कॉम्प्युटर) व एम.बी.ए असे शिक्षण घेतले आहे. सर्व मुले पदवीपर्यंत शिकलेली असून, पुतण्या किशोर पूर्ण वेळ शेतीमध्ये लक्ष देतो.

नागवडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • टरबूज व कलिंगड पीक दरवर्षी घेतात.
  • अधिकाधिक शेती ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील. सध्या 12 एकर ऊस ठिबक व चार एकर ऊस सबसरफेस पद्धतीवर घेतला आहे.
  • नवनवीन बदल करून पीक घेणे.
  • काकडीसाठी पॉलिमल्चिंग व ठिबकचा वापर.
  • मजुरांच्या कमतरतेवर यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे.


रामचंद्र नागवडे, 9423532383.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate