दुष्काळाशी कायम झुंज देणाऱ्या पांगरीतील गावतलावात जून उलटून गेला व पावसाने हजेरी लावली नसली तरी मुबलक पाणी आहे. गावातील ओढा पाण्याने भरून वाहत आहे. विहिरींत पाणीपातळी चांगली आहे. हा सर्व बदल घडला लोकसहभाग व ट्रस्टने राबवलेल्या सामूहिक प्रकल्पातून. आजूबाजूची गावे पाण्याअभावी कोरडी असताना पिंगोरीचे शेतशिवार मात्र त्यामुळेच हिरवेगार दिसत आहे.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कायम दुष्काळी पुरंदर तालुक्यात जेजुरीपासून 15 किलोमीटरवर पिंगोरी हे तीनही बाजूंनी असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. पावसाचे प्रमाण कमी. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठीही टॅंकर सुरू करावा लागायचा. सन 1992 च्या दुष्काळात गावात तलाव बांधण्यात आला खरा, मात्र वर्षानुवर्षे तलावात साचत गेलेल्या गाळामुळे पाणी पातळी कमी झाली. तलाव आटल्यानंतर पाण्याची टंचाई जाणवायला सुरवात झाली. बाजरी, ज्वारी, कडधान्ये ही इथली प्रमुख पिके. काही शेतकऱ्यांनी सीताफळ, अंजिराच्या बागा घेतल्या, पण पाण्याअभावी काही काढून टाकाव्या लागल्या. पाणी नसल्याने पिंगोरीकरांना उदरनिर्वाहासाठी बाहेरही पडावे लागे.
गावात मागील वर्षी तीव्र दुष्काळ पडला. पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. विहिरी आटून गेल्याने टॅंकरने पाणी द्यावे लागले. ग्रामस्थ या समस्येवर मार्ग काढायचाच, या जिद्दीने हिरिरीने कामाला लागले. लोकवर्गणीतून तलावाचा गाळ काढण्याचा निर्णय झाला. याच कालावधीत पुण्यातील 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट'च्या जय गणेश आपत्ती निवारण अभियानातून गावतलावात साठलेला गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे दीड महिना सुरू असलेल्या या कामातून सुमारे 70 हजार ब्रास गाळ काढण्यात आला. त्यातून तलावाची पाणी साठवण क्षमता 51 कोटी लिटर झाली. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या पावसाने दहा दिवसांत तलाव पूर्ण भरला. यंदा जून महिना उलटूनही या "जय गणेश जलसागराची' पाणीपातळी 20 फुटांपर्यंत टिकून आहे.
पाणी झिरपण्याचा वेगही वाढला. भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. गावातील ओढ्यातून पाणी वाहत असून, जागोजागीचे डोह पाण्याने भरले आहेत. गावातील विहिरींत मुबलक पाणी आहे. गावात सुमारे 300 एकरांहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य झाले. त्यात टोमॅटो, वांगी, भुईमूग, शेवंती, पालेभाज्या, चारा पिकांचा समावेश आहे. सीताफळाच्या नव्या बागा फुलत आहेत. तलावाच्या पाणलोटात सुमारे दोन किलोमीटर डोंगरात असलेल्या हातपंपाला चांगले पाणी आहे. परिसरातील लोकांची, तसेच डोंगरावर चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांच्या पाण्याची सोय झाली आहे.
पिंगोरीच्या तलावात पाणी असताना गावाबाहेरील लोक त्यात मत्स्यबीजाची वाढ करून मासेमारीतून नफा कमवायचे. पाण्याअभावी व्यवसाय बंद पडला. गेल्या वर्षी तलावात साठलेल्या पाण्यामध्ये गावातील नऊ युवकांनी हडपसरच्या ( पुणे) मत्स्य बीज गुणन केंद्रातून सुमारे सव्वा दोन लाख मत्स्य बीज आणून सोडले. त्यांनी 'गंगासागर सोसायटी'ची स्थापना केली आहे. आता मासे सुमारे एक किलो वजनाचे झाले आहेत. पाणी असल्याने माशांची आणखी वाढ होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातर्फे सभोवतालच्या डोंगरावर खोल सलग समपातळी चर (डीप सीसीटी) घेण्यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र कृषी विभागाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबई शहरांत असलेल्या गावांतील तरुणांनी स्वनिधी गोळा केला. त्यातून डोंगरउतारावर एक मीटर खोलीचे "डीप सीसीटी' घेण्यात आले. जलसंधारणाबरोबर मृद्संधारणासही आता हातभार लागत आहे. पुढील काळात अन्य ठिकाणी "सीसीटी' करण्याचे नियोजन आहे. डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली असून, वनराई वाढविण्यात येत आहे.
पाण्याची टंचाई दूर झाल्यामुळे गावात दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. गावातील सागर धुमाळ या युवकाने गोशाळा सुरू केली आहे. त्यात 17 गीर गाई आहेत. दुधापासून तूपनिर्मिती, गोमूत्रापासून अर्क, काढा बनविण्यात येत आहे. शेणाचा उपयोग गांडूळ खतनिर्मितीसाठी होत आहे. दूध व अन्य उत्पादनांना मागणी असल्याने चांगले उत्पन्न मिळत असल्याने धुमाळ समाधानी आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध प्रकल्पांद्वारा पिंगोरी गावाला स्वयंपूर्ण करणार असल्याचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले. जलसंधारणाबरोबर वृक्षारोपण, कृषी पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड, सौर ऊर्जा, पवनचक्की, आधुनिक गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, शैक्षणिक गुणवत्ता सुधार आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
उन्हाळा सुरू झाला की गावात टॅंकर सुरू होई. या वर्षी तलावातील गाळ काढल्याने पाणी मुबलक झाले आहे. आजूबाजूच्या बारा गावांत पाणीटंचाई असताना आमच्या गावचे शिवार हिरवेगार झाले आहे.
दूरवरून डोक्यावरून पाणी वाहून आणण्याची गरज आता गावातील महिलांना भासणार नाही. गावची पीक पद्धती बदलत असून, आर्थिक विकास सुरू झाला आहे.
- पल्लवी अनिल भोसले - 9673324807 सरपंच, पिंगोरी
पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गावात दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालनासारख्या व्यवसायांना चालना मिळाली आहे.
- धनंजय शिंदे, उपसरपंच
बरीच वर्षे उन्हाळ्यात पडीक राहणारे रान यंदा हिरवेगार दिसत आहे. पावसाच्या पाण्यावर ज्वारी, बाजरी ही पिके घेणारा शेतकरी उन्हाळ्यात टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिके घेऊ लागला आहे. भुईमुगाचे क्षेत्रही वाढले आहे.
- राजेंद्र मनोहर भोसले, शेतकरी
धरणामध्ये आमची शेती गेली. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मजुरी करावी लागे. मी मत्स्यसंवर्धन प्रशिक्षण घेतले आहे. तलावात पाणी असताना बाहेरगावचे लोक टेंडर घेऊन मासेमारी करायचे. या वर्षी आम्ही नऊ जणांनी सोसायटी सुरू करून टेंडर घेतले. मत्स्यव्यवसायाला चालना दिली आहे.
- पोपट भगवान भोसले, मस्य व्यावसायिक
घरच्या नळाला उन्हाळ्यात पाणी येत नसे. दूर अंतरावरून डोक्यावरून वाहून पाणी आणावे लागे. आता पाण्याची काळजी राहिली नाही. गावात तीन महिला बचत गट असून, महिलांना त्याचा फायदा होत आहे.
- नंदा वसंत शिंदे, संचालिका, वाघेश्वर महिला बचत गट
गावात एकोपा निर्माण झाल्याने विकासाला वेग आला आहे. युवकांच्या सहभागातून डोंगरावर माथा ते पायथा जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. वृक्षारोपणाच्या माध्यमातून मृद्संधारणाच्या कामांवर भर देणार आहोत.
-बाबासाहेब शिंदे, 9881191351 - ग्रामस्थ
स्त्रोत: अॅग्रोवन ६ जुलै २०१४
अंतिम सुधारित : 10/7/2020
एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा ...
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्य...
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...
सन 1971 पासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मेहकर ताल...