जळगाव जिल्ह्यातील पाथरी व सामनेर या गावांचे शेतीशिवार सुमारे 1500 हेक्टर. मात्र त्यातील 10 टक्के क्षेत्र निव्वळ डोंगरमाथ्याचे व खडकांनी व्यापलेले. पेरणीलायक क्षेत्रातही माती कमी, दगडगोटेच जास्त. पावसाच्या भरवशावर पिके घ्यायची तरी जेमतेम उत्पन्नावर उदरनिर्वाह चालणे कठीण. एके दिवशी "इक्रीसॅट' व "जलश्री' संस्था व लोकसहभागातून शिवारातील पाणी शिवारातच जिरविण्याची कामे सुरू झाली. पाण्यासाठी आसुसलेल्या दोन्ही गावांत जलसंधारण कामांतून जणू "जलश्री' अवतरली.
जळगाव येथील खानदेश एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (एम. जे.) महाविद्यालयाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून "जलश्री वॉटरशेड सर्व्हेलन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट'ची स्थापना केली आहे. या संस्थेने हैदराबादस्थित इक्रिसॅट, कृषी विभागाच्या सहकार्यातून 2008 पासून पाथरी (ता. जळगाव) व सामनेर (ता. पाचोरा) या दोन शेजारी असलेल्या गावांमध्ये आदर्श पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. खानदेश एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, एम. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल राव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या जलसंधारण कार्यक्रमातून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न झाला. त्यातून दोन्ही गावांच्या परिसरात सुमारे पंधराशे हेक्टर शेती ओलिताखाली आली. अनियमित पाऊस व खालावलेल्या भूजल पातळीमुळे जिरायती शेतीत वर्षानुवर्षे खस्ता खाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात यशश्री खेचून आणण्याचे काम यातून झाले.
"इक्रिसॅट' व "जलश्री' संस्थेने पाणलोट विकास कार्यक्रमासाठी सर्वेक्षणाअंती पाथरी व सामनेर गावांची निवड केली. लोकसहभाग वाढविण्यासह पाणलोट विकासाची चळवळ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी दोन्ही गावांची सद्यःस्थिती जाणून घेतली. अस्तित्वात असलेले शिवारातील बंधारे, पाण्याची पातळी, पावसाचे प्रमाण आदी निरीक्षणे नोंदविण्यात आली. काहींच्या शेतात माती परीक्षण केले. अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, सुधारित वाणांचा पुरवठा, अवजारे, बांधबंदिस्तीसाठी रोपे पुरविण्यात आली.
शेती उत्पादनात अपेक्षित वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यावर उत्साहित झालेले शेतकरी पुढील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतःहून पुढे आले. त्यातूनच पाथरी व सामनेर गावांचा कायापलट करणारी "पद्मालय पाणलोट विकास समिती' अस्तित्वात आली. सर्वसंमतीने शेतीशिवारातून वाहणाऱ्या नाल्यांवर माथा ते पायथा पद्धतीने बंधारे घालून पाणी अडविण्यासह जिरविण्यासाठीचा "ऍक्शन प्लॅन' तयार करण्यात आला. समितीच्या सदस्यांना इक्रिसॅटने कोथापल्ली (आंध्र प्रदेश) येथे साकारलेल्या आदर्श पाणलोट प्रकल्पाची भेट घडवण्यात आली.
पाथरी व सामनेर गावांना भेट देण्याबरोबरच "जलश्री'च्या समन्वयक प्रा. डॉ. गौरी राणे व "इक्रिसॅट'चे वरिष्ठ अधिकारी सुहास वाणी, राघवेंद्रराव सुदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शिवारातून वाहणाऱ्या नाल्यांवर सिमेंटचे बांध घालणे, रुंदीकरण- खोलीकरण, नादुरुस्त बंधारे दुरुस्त करणे, नवीन बंधारे घालणे, डोंगराळ भागात खोल सलग समतल चर (सीसीटी), शेततळे, वृक्षारोपण मोहीम आदी कामे आगामी पाच वर्षांच्या कालखंडात हाती घेण्याचे ठरले. विविध नाल्यांचा प्रवाह, उताराची दिशा, पाणीवहन क्षमता, स्रोत आदी घटकांची माहिती शेतकऱ्यांनी पुरविली. त्यातून पाणलोट कामांना गती मिळाली. विशेष म्हणजे नाला खोदकामासह बंधाऱ्याच्या कामाची कंत्राटे बाहेरील कंत्राटदारांना देण्याऐवजी गावातील व्यक्तींना देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक कामात पारदर्शकता राहिली. कमी खर्चात दर्जेदार कामे झाल्याने त्याचे चांगले परिणाम समोर येऊ लागले आहेत.
संपर्क - प्रा. डॉ. गौरी राणे - 9850824370,
सावकाश पाटील - 9421866158
"पाथरी व सामनेर शिवारांतील नाले पूर्वी पावसाळ्यातील चार महिनेही मोठ्या मुश्किलीने वाहत होते. जलसंधारणाच्या कामांमुळे नाल्यांमध्ये उन्हाळ्यातही पाणी दिसू लागले. जिरायती शेतकऱ्यांना विहिरींच्या पाण्यावर बागायती पिके घेणे शक्य झाले.
प्रा. डॉ. गौरी राणे, समन्वयक - "जलश्री' वॉटरशेड सर्वेलन्स व रिसर्च इन्स्टिट्यूट, जळगाव.
पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कामांची निवड गावातील शेतकरी करीत. अनुभवी अभियंत्यांकडून रीतसर आराखडा तयार करून घेतल्यानंतर दहा टक्के लोकसहभागातून स्थानिक पातळीवर कामांचे कंत्राट देण्यात येते. प्रत्येक व्यवहार धनादेशाद्वारा केला जातो. कामांच्या दर्जात तडजोड केली जात नाही.
सावकाश पाटील, सचिव, पद्मालय पाणलोट विकास समिती
आठ एकरांवरील जिरायती शेतीत अतोनात कष्ट उपसूनही काहीच हाती लागत नव्हते. पाणलोट विकासकामांतून अन्य शेतकऱ्यांकडील विहिरींना चांगले पाणी लागल्यानंतर मीही शेतात विहीर खोदली. उपलब्ध पाण्यावर बागायती पिके घेण्याचे स्वप्न साकारले. निराशेच्या गर्तेतून एकदाचा बाहेर पडलो.
यशवंत बाविस्कर, शेतकरी, पाथरी, ता. जळगाव
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमा...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...