सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी सेंद्रिय शेती
सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकवण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील जितेंद्र कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे. त्यांचा "निसर्गप्रेम' फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीची खुली प्रयोगशाळाच झाली आहे.
मालेगाव ते धुळे रस्त्याने मालेगावपासून दहा किलोमीटरवर "निसर्गप्रेम फार्म' वसला आहे. स्थानिक लाकडांचा वापर असलेल्या प्रवेशद्वारातून शेताच्या मधोमध जाईपर्यंत दुतर्फा ग्लिरिसिडिया, फळझाडांच्या रांगांनी उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव येतो. शेवगा, आंबा, लिंबू, पपई, नीम, पिंपळ, चेरी आदी सात हजारांहून अधिक झाडे... भर दुपारीही त्यावर पाखरांचा किलबिलाट. अमृतजल तयार करण्यासाठी टाकी, वैशिष्टपूर्ण गोठे, "सहकाऱ्यां'साठी निवासखोल्या... (इथे मजुरांना "सहकारी' म्हणतात.) निसर्गाच्या सहवासात परस्परांशी अनोखे सहजीवन निर्माण केलेले. जितेंद्र कुटुमुटिया यांनी आपली 19 एकरची ही शेती विकसित केली आहे.
मालेगाव येथे जितेंद्र यांचे "ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर' आहे. आता ते पूर्णवेळ शेतीच पाहतात. त्यांची पुढची पिढी तो व्यवसाय सांभाळते. सेंद्रिय शेतीचे जितेंद्र यांचे हे पाचवे वर्षं. सेंद्रिय शेतीत त्यांनी कसे झोकून दिले याची पार्श्वभूमी म्हणजे त्यांनी अभ्यासले, की वस्तुसंग्रहालयात शिवकालीन योद्ध्याच्या अंगाखांद्यावर 50 ते 60 किलोचे चिलखत, ढाल, तलवार, टोप आदी जामानिमा असायचा. हे वजन पेलण्याची प्रचंड शारीरिक क्षमता काळाच्या ओघात कशी कमी होत गेली असावी या प्रश्नाने कुटुमुटिया यांना अस्वस्थ केले. अभ्यासाअंती लक्षात आले, की याचे उत्तर निकस होत गेलेल्या मानवी आहारात आहे. लोकांना विविध शारीरिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. शेतीत रसायनांचा बेसुमार वापर झाल्याने मातीची सुपीकता घटली आहे. सर्व विचार करता सेंद्रिय, सकस अन्नाची गरज पुढे आली आहे, त्या हेतूनेच आपण सेंद्रिय शेतीकडे वळल्याचे जितेंद्र म्हणतात.
एक किलो शेण, एक लिटर गोमूत्र, 50 ग्रॅम काळा गूळ व 10 लिटर पाणी हे मिश्रण एकत्र करून 72 तास आंबविले जाते. दरम्यान, दिवसांतून तीन वेळा काठीने चांगले ढवळून घेतले जाते. त्यानंतर 100 लिटर पाण्यात
त्याचे द्रावण तयार करून हे मिश्रण महिन्यातून एकदा झाडांना प्रति झाड 5 ते 10 लिटर प्रमाणात दिले जाते.
जितेंद्र म्हणतात, की हे मातीचे वस्त्र आहे. पिकांचे अवशेष, पालापाचोळा, गाजरगवत, तराटा आदी तणांचे जैविक मल्चिंग केले जाते, त्यामुळे झाडांच्या मुळाजवळ कायम वाफसा स्थिती असते. याच वातावरणात गांडुळांची संख्या वाढते. मातीचा सेंद्रिय कर्ब उंचावतो.
प्रयोग परिवाराचे संस्थापक प्र. अ. दाभोळकर यांची ही संकल्पना जितेंद्र यांनी प्रत्यक्षात आणली. कुटुंबाला लागणाऱ्या अन्नाची गरज तेवढ्या क्षेत्रातून भागू शकेल असा त्यामागे उद्देश आहे. यातून मिळणाऱ्या उत्पादनाचे पोषणमूल्य (न्युट्रीशनल व्हॅल्यू) उत्तम असते असे जितेंद्र म्हणाले.
या पद्धतीत 10 गुंठ्यांत 180 बेड तयार केले जातात. 10 फूट लांब, तीन फूट रुंद व एक फूट उंच असा बेड असतो. माती, जैविक वस्तुमान व अमृतजल यांचा वापर त्यात होतो. एक फुटापर्यंत उंचीचा हा थर होतो. सहा विविध रसांचे बियाणे (तिखट, आंबट, गोड, तुरट, खारट इ.) बेडवर घेतले जाते. विविध पिके त्यात घेता येतात.
जितेंद्र यांनी त्यात पपई घेऊन प्रति झाड 150 किलोपर्यंत उत्पादन घेतले. पपईचे वजन तीनपासून सहा किलोपर्यंत मिळाले होते. दुधीभोपळा, भाजीपाला, कांदा, कडीपत्ता, गवती चहा, कडधान्ये यांचेही उत्पादन घेतले आहे.
यात दररोज दोन हजार लिटर पाण्याची गरज भासते. या शेती पद्धतीतून घराची गरज भागवून वार्षिक अतिरिक्त उत्पन्नही मिळते.
महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सुमारे एक हजार शेतकऱ्यांना जितेंद्र यांनी नाबार्ड, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. आपले शेती व्यवस्थापक जयेश शेलार यांच्यासह राज्यात तसेच गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा आदी राज्यांत सेंद्रिय शेतीची प्रशिक्षणे स्वत: पदरमोड खर्च करून दिली आहेत. यातून असंख्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. शेलार एम. बी. ए. (ह्यूमन रिलेशन्स) आहेत. जितेंद्र यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीने भारावून नामांकित बॅंकेतील नोकरी सोडून त्यांनीही सेंद्रिय शेतीच्या कार्याला वाहून घेतले आहे.
संपर्क
- जितेंद्र कुटुमुटीया- 9421289650
- जयेश शेलार- 9421289677
स्त्रोत- अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...