डहाणू व घोलवड (जि. ठाणे) या चिकूच्या आगारात पूर्वी प्रति झाड 300 किलोपर्यंत चिकूचे उत्पादन घेतले जायचे. अलीकडील वर्षांत विविध समस्यांमुळे ते 100 ते 60 किलोपर्यंत खाली आले होते. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने चिकू पुनरुज्जीवन तंत्रज्ञान चिकू उत्पादकांच्या बागेपर्यंत यशस्वीरीत्या पोचवले. त्यातून केवळ उत्पादनच नव्हे, तर फळाची गुणवत्ताही वाढली, शेतकऱ्यांचा हुरूप वाढीस लागला.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू आणि घोलवड हा पट्टा म्हणजे चिकूचे आगारच आहे. सन 1980 ते 85 च्या कालावधीपर्यंत या भागांत प्रति झाड सरासरी 250 ते 300 किलोपर्यंत चिकू उत्पादन मिळायचे. कालांतराने झाडाची उत्पादन क्षमता विविध समस्यांमुळे कमी होत गेली. सन 1998 ते 2000 कालावधीत प्रति झाडापासून 100 किलो फळे मिळणेही कठीण झाले.
आजही काही जुन्या बागांमधून सारासरी 60 ते 70 किलो इतकीच फळे मिळतात. कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) विषय विशेषज्ञ (उद्यान विद्याशास्त्र) जगन्नाथ सावे चिकू उत्पादन घटण्याची कारणे शोधण्यासाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन चर्चा करायचे. सन 2000 च्या सुमारास चिंचणी येथील प्रगतिशील शेतकरी तसेच कृषी पदवीधर महेंद्र श्रॉफ यांच्या सहभागातून सावे यांनी त्यांच्या चिकू बागेत काही प्रयोग करण्यास सुरवात केली.
सलग तीन वर्षे छाटणी पद्धती, खतांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन यासंबंधी प्रयोग घेतल्यानंतर काही चांगले निष्कर्ष समोर आले.
राज्य सरकारने सुचवल्यानुसार सन 2005 मध्ये केव्हीकेने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फलोद्यानाचा एकात्मिक विकास कार्यक्रम अभ्यास प्रकल्प राबवला, त्यात चिकू पिकाबाबत काही शिफारशी होत्या. केंद्र सरकारकडून त्यास मान्यता मिळून कृषी विभागामार्फत 2006 मध्ये ठाणे जिल्ह्यासाठी चिकू पुनरुज्जीवन ही योजना लागू झाली. यासाठी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दादासाहेब सप्रे, केव्हीकेचे तत्कालीन कार्यक्रम समन्वयक प्रा. घनश्याम कोल्हे, डहाणूचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दीपक कुटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सुरवातीला चिकू बागायतदारांना चिकू पुनरुज्जीवन तंत्रज्ञान समजावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सुरवातीला शेतकरी चिकू झाडाच्या जुन्या फांद्या कापायला तयार होत नसत, काही शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करायचे; मात्र पुढे छाटलेल्या बागा ज्याप्रमाणे फुलल्या व त्यांना फळे आली, ते पाहून नंतर शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानावर विश्वास बसू लागला, त्यांनी ते आत्मसात करण्यास सुरवात केली.
छाटणी व अन्य प्रकारांनी झाडांचे पुनरुज्जीवन करून 25 वर्षांहून अधिक वयाच्या चिकू बागांची उत्पादकता वाढविता येते. यासाठी जमिनीपासून दीड ते तीन मीटर उंचीपर्यंत झाडाच्या खोडावरील फांद्या कापून टाकाव्यात. बागेतील झाडांच्या रोगग्रस्त तसेच एकमेकांत गुंतलेल्या फांद्या काढाव्यात. उंच झाडांचे शेंडे 25 फुटांवर कापून टाकावेत. छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. छाटणी केल्यानंतर प्रत्येक झाड वेगळे दिसायला हवे. छाटणी करण्याची योग्य वेळ म्हणजे सप्टेंबर ते मे महिना.
जुन्या रोगग्रस्त वा मृत झाडांच्या ठिकाणी सुधारित वाणाची शिफारशीनुसार लागवड करावी. अनुत्पादित किंवा कमी उत्पादन देणाऱ्या झाडांची छाटणी करून त्यावर खुंटी कलम करावे.
कमी उत्पादित झाडांना एकात्मिक खत व्यवस्थापन करावे. बागेतील रोग-किडींचे एकात्मिक नियंत्रण करावे. बागेत ताग, धैंचा, ग्लिरिसिडीया आदी हिरवळीची पिके घेऊन पुढे ती आळ्यात पसरावीत. माती, पाणी व पानांतील अन्नद्रव्य तपासणी करून योग्य व्यवस्थापन करावे.
केव्हीकेच्या प्रक्षेत्रातही 2012 च्या जानेवारी महिन्यात चिकू पुरुज्जीवनचे प्रयोग घेण्यात आले. यात कालीपत्ती जातीची 53 वर्षे वयाची 485 झाडे निवडून 10 बाय 10 मीटर अंतरावर ती लावण्यात आली. त्यांची छाटणी करण्यात आली. झाडांच्या बुंध्याजवळ आच्छादनासाठी भाताचा पेंढा टाकण्यात आला. पावसाळ्यात ताग लावून पुढे तेथेच पसरवला. ग्लिरीसिडीयाच्या पाल्याचे आळ्यात आच्छादन केले. झाडाच्या छाटणीनंतर त्यावर बोर्डो पेस्ट लावण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पीक संरक्षण, अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला.
छाटणीपूर्वी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2011 दरम्यान एका वर्षाच्या झाडाची सरासरी उत्पादकता 65 किलो प्रति झाड होती. दुसऱ्या वर्षी ती 105 किलोपर्यंत, त्यापुढील वर्षी ती वर्षाला सरासरी 200 किलो प्रति झाड एवढी वाढली. चालू वर्षी बागेतून जाने. ते मार्च या कालावधीत उत्पादन 60 किलो प्रति झाड असे मिळाले. फळांच्या गुणवत्तेत वाढ झाली. नेहमी आढळणाऱ्या बी पोखरणाऱ्या अळीचे प्रमाण 30 टक्क्यांहून पाच टक्क्यांपर्यंत खाली आले. पूर्वी "सी ग्रेड'चा माल जास्त म्हणजे 70 टक्क्यांपर्यंत मिळायचा, तो आता 20 टक्क्यांपर्यंत खाली आला. "ए ग्रेड'चा माल 55 टक्के, तर "बी ग्रेड'चा माल 25 टक्के मिळाला. मागील वर्षीचा प्रति किलो चिकूला मिळालेला सरासरी दर (रुपये) असा होता.
ए ग्रेड - 25 ते 30
बी ग्रेड - 15 ते 20
सी ग्रेड - 4 ते 8
जुन्या बागांमध्ये उत्पादन कमी यायचे. झाडे उंच गेल्याने चिकू तोडणीसाठी मजुरांना त्रास व्हायचा. छाटणी तंत्रज्ञान आणि पुनरुज्जीवन पद्धतीमुळे उत्पादनात सुमारे 30 टक्के वाढ झाली. मजुरांनाही फळांची काढणी करणे सुलभ होत आहे.
विनायक बारी - 9226484228
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ
जुन्या फांद्याची व्यवस्थित छाटणी, खत- पाण्याचे योग्य नियोजन यातून पूर्वी प्रति झाड प्रति वर्ष 175 ते 185 किलो मिळणारे चिकू उत्पादन सरासरी 225 किलोपर्यंत पोचले.
देवेंद्र राऊत - 9029573924
प्रगतिशील शेतकरी, नरपड, ता. डहाणू
मी चार वर्षांपूर्वी चिकूच्या 400 झाडांचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर दर तीन वर्षांनी आलेल्या अनावश्यक फांद्या काढत असतो. तंत्रज्ञानातील सर्व गोष्टींचे पालन करतो.
देवजी कडू - 8806168201
कंकाडी, ता. डहाणू
मागील काही वर्षांत चिकूच्या शेतीतून खास उत्पादन मिळेनासे झाले होते; परंतु झाडांचे पुनरुज्जीवन केल्याने उत्पादनाची शाश्वती मिळू लागली. जुन्या फांद्या छाटल्यामुळे नवीन फांद्यांना बहर येऊन चिकू चांगले पोसतात, त्यामुळे प्रतवारीत पहिल्या क्रमांकाचा माल जास्त मिळतो.
प्रशांत शाह - 9226044270
वाकी, ता. डहाणू
जुनी झाडे, उंच आणि खूप दाटीच्या फांद्या झाल्याने उत्पादन घटले होते. झाडांमधील दाटीच्या आणि सावलीत असलेल्या फांद्या काढून विरळणी केली, त्यामुळे फळांचा आकार वाढला, फळांची काढणी करणे सोपे झाले. मला प्रति झाडापासून 225 ते 250 किलोपर्यंत फळे वर्षाकाठी मिळतात.
सतीश म्हात्रे - 9422484262
प्रगतिशील शेतकरी, बोरीगाव
माझ्या 28 वर्षांच्या जुन्या चिकूच्या बागेत झाडांची दाटी व्हायची. आता सुधारित तंत्र वापरून झाडांची संख्या आटोक्यात ठेवली. त्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो. किडी-रोगांचे प्रमाण कमी झाले. प्रति झाड प्रति वर्ष पूर्वी 175 ते 200 किलो मिळणारे उत्पादन 250 ते 300 किलोपर्यंत पोचले आहे. विशेष म्हणजे ए व बी ग्रेडचा माल अधिक मिळत असल्याने दरही चांगला मिळत आहे.
प्रदीप सावे - 9422673739
प्रगतिशील शेतकरी, बोर्डी
जुन्या चिकूच्या झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान आम्ही परिसरात 300 च्या आसपास शेतकऱ्यांपर्यंत पोचवले आहे, त्याचा उपयोग करून शेतकरी आपले चिकू उत्पादन वाढवीत आहेत.
प्रा. जगन्नाथ सावे - 922647046
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ठाणे जिल्ह्यातील मुकेश कडू यांनी आपली चिकू बाग व अ...
नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची ...
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावा...