অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुस्ती फडासोबतच शेतशिवारही

जिल्हा व विदर्भस्तरीय कुस्त्यांचे फड अनेक वर्षे गाजविणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील ज्ञानेश्‍वर गावंडे यांनी व्यावसायिक पीकपद्धतीच्या बळावर शेतीतही नावलौकिक मिळविला आहे. सोयाबीनसारख्या पीकपद्धतीच्या जोडीला हळद व लिंबू पिकातून त्यांना आर्थिक स्थैर्य गाठणे शक्‍य झाले. कृषी विभागानेही या प्रयत्नशील शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
ज्ञानेश्‍वर मारोती गावंडे यांची वडिलोपार्जित 22 एकर शेती. त्यातील पंधरा एकर क्षेत्रावर सोयाबीन, अर्धा एकरावर लिंबू, तर उर्वरित क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, ज्वारीसोबत एक हेक्‍टर क्षेत्रावर हळदीची लागवड ते करतात. सिंचनाकरिता दोन विहिरी, तसेच एका बोअरवेलचा पर्याय त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कुटुंबात इंदूबाई, मुले राहुल, सुनील, अनिल, उमेश, दीपाली यांचा समावेश असून, शेतीत सारे कुटुंब राबते. त्यामुळे मजुरी खर्चात आपसूकच बचत होते. कुस्तीचे फड गाजविण्याच्या मानसिकतेतून सुरवातीची अनेक वर्षं ज्ञानेश्‍वर यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायामाला प्राधान्य दिले. त्यानंतर तब्बल सहा वर्षे पहेलवानकीच्या क्षेत्रात नशीब अजमावले. कुस्त्यांचे अनेक फड त्यांनी गाजविले; मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढीस लागल्याच्या परिणामी त्यांना कुस्तीकडे पाहिजे तेवढा वेळ देणे शक्‍य झाले नाही. सन 1991 च्या सुमारास त्यांनी शेतीत राबण्यास सुरवात केली. कुस्त्यांसोबतच त्यांच्या कुटुंबाने राजकीय वारसाही जपला आहे. त्यांचे वडील मारोती गावंडे 1972 ते 77 या काळात शिरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच होते.
गावंडे यांच्याकडे दोन विहिरी आणि बोअरवेलचा पर्याय आहे. सिंचनाचा भक्‍कम स्रोत असल्याने त्यांनी मागील दहा वर्षे केळी लागवडीत सातत्य ठेवले. मात्र अनियमित पावसाच्या परिणामी जलपुनर्भरण होत नसल्याने, विहिरी तळ गाठू लागल्या. त्यामुळे घड लागण्याच्या अवस्थेतच पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागल्याने, त्याचा परिणाम पीक उत्पादकतेवर होऊ लागला. त्यामुळे सध्या केळीचे पीक कमी करण्यावर लक्ष दिले आहे. या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने, विहिरीत पाणी मुबलक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या हंगामात केळी लागवडीचा त्यांचा मानस आहे.

सोयाबीन पिकाचा ताळेबंद

एकूण जमीनधारणेपैकी पंधरा एकरांवर ते सोयाबीनची लागवड करतात. सन 2009-10 मध्ये त्यांना एकरी 11 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. सुमारे 3600 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. सन 2010-11 मध्येही उत्पादन जवळपास तेवढेच मिळाले, दर चार हजार रुपयांच्या दरम्यान मिळाला. सन 2011-12 मध्ये एकरी 10 क्विंटलसह उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बियाणे क्षेत्रातील सरकारी कंपनीसाठी ते बीजोत्पादन करतात. यामध्ये सोयाबीनच्या प्रतिएकरी व्यवस्थापनासाठी सुमारे 11 हजार रुपये खर्च होतो.

हळदीचे अर्थशास्त्र

अडीच एकरावर हळदीची लागवड केली जाते.

सन 2009-10 मध्ये त्यांना एकरी 22 क्‍विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळाले. त्यास 12 हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. सन 2010-11 मध्ये हेच उत्पादन 25 क्‍विंटल मिळाले. सहा हजार रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे दर मिळाला. सन 2011-12 मध्ये 24 क्‍विंटल उत्पादन मिळाले. हळदीची विक्री हिंगोली बाजारपेठेत व्यापाऱ्याकडे केली जाते. हळदीसाठी सरी-वरंबा पद्धतीचा वापर केला जातो.

लिंबू व्यवस्थापन

सन 2001 मध्ये अर्धा एकरावर लिंबू लागवड केली. निवड पद्धतीने रोपांची निवड करण्यात आली. या पिकापासून वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. घरातील व्यक्‍तींमार्फतच तोडणीची कामे केली जातात. त्यामुळे मजुरांवरील खर्च वाचतो. लिंबू फळांना उन्हाळ्यात मागणी असल्याने दरही वधारतात. मालेगावचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह शिरपूरचे कृषी सहायक ए. बी. वाघमारे यांनी त्यांच्या शेताला भेट देत ज्ञानेश्‍वर यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले आहे. डाळिंबाप्रमाणेच गुटी कलमाचा प्रयोग त्यांनी लिंबू कलमाच्या लागवडीसाठी केला आहे.

ज्ञानेश्‍वर यांच्याकडून आत्मसात करण्याजोग्या गोष्टी

1) सहयोग स्वयंसहायता समूहाचे अध्यक्ष असल्याने त्याद्वारा सामूहिक चर्चेतून पीक व्यवस्थापनाविषयी गटातील सदस्य एकमेकांशी चर्चेची देवाणघेवाण करतात. 2) बाजारपेठेत मागणी असलेल्या हळदीच्या वाणाची निवड 
3) शेणखताच्या वापरावर भर. एकरी चार ट्रॉली याप्रमाणे ते दिले जाते. शेणखतासाठी दोन म्हशी, दोन बैल, एक गाय आदी जनावरे आहेत. 
4) सरी-वरंबा पद्धतीने हळदीची लागवड 
5) सोयाबीन बीजोत्पादनावर भर 
6) लिंबू बागेतून मिळतो अतिरिक्त उत्पन्नाचा बोनस 
7) दोन एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली 
8) ठिबकसोबतच तुषार सिंचन पद्धतीचाही अवलंब
वसमत, लातूर, सांगली, हिंगोली येथील हळद व्यापाऱ्यांशी दूरध्वनीद्वारा संपर्क साधत बाजारातील दराचा आढावा घेत, त्यानंतर विक्रीचा निर्णय घेतला जातो. लिंबू रिसोड, मेहकर, मालेगाव, शिरपूर या बाजारात विक्री करण्यावर भर राहतो.

शेतीतील समस्या

निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश आहे. या वर्षी तीन एकरांवरील सोयाबीनला फटका बसला. साहजिकच या क्षेत्रातून उत्पादकता कमी होईल. त्यामुळे शासनाने कोरडवाहू शेतीला शाश्‍वत करण्यासाठी विदर्भात धडक सिंचनाचे कार्यक्रम हाती घेणे अपेक्षित आहे, असे ज्ञानेश्‍वर म्हणतात.


संपर्क- ज्ञानेश्‍वर गावंडे- 9975220476

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate