शेतीतून समृद्धीचे स्वप्न पाहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना बळ आणि दिशा देण्याचे काम राहाता तालुका आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकरी गट निर्मिती, गट बांधणी, शेतकरी अभ्यास दौरे, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, हरितगृह प्रशिक्षण, क्षेत्रीय किसान गोष्टी, शेती शाळा, मत्स्यपालन, रेशीम शेती, सेंद्रीय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, ऊस- बटाटा आंतरपीक, पाचट अच्छादन, तूर लागवड, ऊस रोपे लागवड तंत्रज्ञान, क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क प्रकल्प, मुरघास निर्मिती, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती या महत्त्वपूर्ण बाबींवर यशस्वी काम करत आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा मिळू लागली असून या माध्यमातून शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.
राहाता तालुक्यात शेतकरी एकत्र येत आधुनिक शेती करू लागले आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नंदकुमार घोडके, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राजदत्त गोरे यांच्या प्रयत्नातून राहाता तालुक्यात आत्मा अंतर्गत कामाचा विस्तार वाढतो आहे.
आत्माच्या माध्यमातून 2010 पासून राहाता तालुक्यात विविध तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, पशुपालन, रेशीमशेती यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी 305 शेतकरी गट स्थापन झाले आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 62 शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे काम सुलभ झाले आहे.
आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजना व इतर सबंधित विभागाच्या योजना व प्रश्नासंदर्भात शेतकरी सल्ला व माहिती केंद्राच्या माध्यमातून माहिती देण्यात येत असल्याने शेतकरी प्रत्येक प्रश्नासंदर्भात या यंत्रणेच्या संपर्कात असतात.
राहाता तालुक्यात दोन गावांसाठी एक कृषीमित्र याप्रमाणे तालुक्यात विविध गावचे एकूण 30 शेतकरी मित्र आत्माच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या माध्यमातून आत्मा सोबतच कृषी विभागाच्या योजनांचा प्रचार प्रसार होण्यास मदत होते आहे.
शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शासकीय व खाजगी संस्थेमध्ये सविस्तर प्रशिक्षण देण्यात येते. पिकांची लागवड, काढणी ते थेट बाजारपेठेतील विक्री कौशल्याबाबत मार्गदर्शन राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते आहे. यामध्ये महिलांना फळे व भाजीपाला प्रक्रिया, आवळा कॅंडी, जॅम, ज्युस, पेरु बर्फी, टोमॅटो सॉस, केचप यासंदर्भात प्रात्याक्षिकांसोबतच मार्गदर्शनही करण्यात आले आहे. भोपाळ येथे सोयाबीनपासून सोयादूध, सोयापनीर, सोयाआम्रखंड याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राहाता तालुक्यामध्ये आत्माच्या माध्यमातून 290 शेतकऱ्यांना पॉलीहाऊस व शेडनेट तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर व तळेगाव दाभाडे येथे देण्यात आले आहे. राहाता तालुक्यात 46 पॉलीहाऊस व शेडनेटची उभारणी करुन शेतकरी यशस्वी नियंत्रित शेती करू लागले आहेत.
राहाता तालुक्यांमध्ये 450 शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले असून शेतकरी पशुधनासाठी व खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी मुरघास निर्मिती करत आहेत. यासंदर्भातील प्रशिक्षण घेतलेले निर्मळपिंपरी येथील शेतकरी संतोष निर्मळ जनावरांसाठी मुरघास तयार करतात शिवाय इतर शेतकऱ्यांनाही मुरघास बॅगांची माफक दरात विक्री करतात अशी माहिती आत्माचे व्यवस्थापक नंदकुमार घोडके देतात. श्री.निर्मळ एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी अनेक शेतकरी या माध्यमातून प्रशिक्षण घेत यशस्वीपणे दुग्धव्यवसाय करू लागले आहेत.
उन्हाळ्यात व दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना पशुधनासाठी चारा व्यवस्थापन करताना हिरव्या चाऱ्यांची कमतरता भासते. त्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे नऊ दिवसात कमी वेळेत, कमी जागेत, कमी पाण्यात, कमी मनुष्यबळावर सकस हिरवा चारा निर्मितीचे प्रशिक्षण व हायड्रोपोनिक्स रथ तालुक्यात आठवडे बाजारमध्ये फिरऊन 2000 शेतकऱ्यांना प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली. यामुळे राहाता तालुक्यामध्ये 36 हायड्रोपोनिक्स युनिट उभारुन शेतकरी हिरव्या चाऱ्यांचे उत्पादन घेत आहेत.
शेतकऱ्यांनी वैयक्तिक व कृषी विभागाअंतर्गत तयार केलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 30 ते 35 हजार बीज शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये सोडलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कटला, मृगळ, राहु व शेततळ्यातील शेवाळ नियंत्रण करणेसाठी सिप्रीनस मत्स्यबीज शेततळ्यात सोडण्यात आले, यामाध्यमातून शेतीसोबतच मत्स्यव्यवसाय करण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.
ऊस-खोडावा पाचट अच्छादन प्रात्यक्षिकांमध्ये शेतकऱ्यांना पाचट कुजविणारे जिवाणु देण्यात आले व त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पाचट अच्छादनाकडे वळाले आहेत. ऊस-बटाटा आंतरपीक प्रात्यक्षिकामध्ये 120 शेतकऱ्यांना ऊस रोपे तयार करणे व लागवडीचे प्रशिक्षण देऊन 40 प्रात्याक्षिके 60 एकरावर घेण्यात आली. सदर प्रात्यक्षिकामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोपाद्वारे ऊस लागवड करण्यात येते. ऊस रोपे निर्मिती व लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस रोपे तयार करणे व लागवडीचे प्रशिक्षण देऊन 40 प्रात्यक्षिके 60 एकरावर घेण्यात आली. सदर प्रात्यक्षिकामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोपाद्वारे ऊस लागवड करण्यात येते.
शेतकऱ्यांना डाळींब, पेरु, ढोबळी मिरची तंत्रज्ञान, मुक्ता गोठा या विषयावर 6 ते 7 सत्रामध्ये शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे उत्पादन, उत्पादकता व निर्यातक्षम माल उत्पादनावर मार्गदर्शन करण्यात येते.
शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व यशस्वी विक्री करणारे शेतकरी, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, खाजगी संस्था इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात येते. या माध्यमातून त्याठिकाणी असलेले प्रयोग पाहून शेतकरी या पद्धतीने प्रयोग करू लागले आहेत.
आत्माच्या माध्यमातून शेतकरी त ग्राहक थेट विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी दरवर्षी धान्य व फळे महोत्सव आयोजित करण्यात येतो. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या मालाचे विपणन करण्यासाठी पुढाकार घेत शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन व ग्राहकांना चांगल्या प्रतीचे उत्पादन योग्य दरात मिळवून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरतो.
आत्मा अंतर्गत राहाता तालुक्यासह व जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करुन शेतकऱ्यांचे उत्कृष्ट नमुने प्रदर्शनात ठेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. तसेच सदर प्रशिक्षणात शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी केली जाते. राहाता येथे स्वयंसिद्धा प्रदर्शन, शेतीदिन, जागतिक मृदा दिन, या कार्यक्रमाध्ये प्रदर्शन भरविण्यात येते.
राष्ट्रीय शाश्वत शेती, परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रीय शेती अंतर्गत राहाता तालुक्यात 100 शेतकऱ्यांचे दोन शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. नेताजी सेंद्रीय शेती समुह हसनापूर व राजेश्वरी सेंद्रीय समुह गट राजुरी या गटाच्या माध्यमातून 100 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती सुरु आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाची नोंदणी करुन विक्री व्यवस्थेत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आत्मा व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत पुणतांबा गावात 400 एकराचे संघटन करुन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. शेतीमाल ग्रेडींग, पॅकिंग व विक्री या माध्यमातून करण्यात येणार आहे. नव्याने 7 शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करण्याचे काम सुरु असून लवकरच नोंदणी करण्यात येणार आहेत.
भारत सरकार व जर्मन सरकार यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र, ओरीसा व झारखंड या राज्यात क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क प्रकल्प सुरु केला आहे. महाराष्ट्रातील नगर, राहाता, वेल्हा व जुन्नर तालुक्यातील प्रत्येकी सहा गावात प्रकल्प सुरु आहे. राहाता तालुक्यात गोगलगाव, पिंप्रिलोकाई, खडकेवाके, केलवड, कोऱ्हाळे व वाकळी गावात प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये हवामान आधारित शेतकऱ्यांना पिकांची, पशुधनाची, कुक्कुटपालनाची माहिती संदेश व वन पेजर नोटाद्वारे गावामध्ये बोर्डवर लावण्यात येते. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व त्वरित मागणीनुसार कृषी सहायकाद्वारे माहिती देण्यात येते.
मौजे चंद्रपुर येथे आत्मा अंतर्गत 40 शेतकऱ्यांचा शेतकरी गट स्थापन करण्यात आला आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असुन 40 शेतकरी रेशीम शेती करतात. आत्मा अंतर्गत विविध माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते.
लेखक - गणेश फुंदे
उप माहिती कार्यालय, शिर्डी
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...