धुळे शहरातून पारोळ्याकडे जाताना राष्ट्रीय महामार्गावरुन नगावबारीकडे (शिरपूरकडे) वळून पांझरा नदीच्या काठावर महाराष्ट्र शासनाचा सेंद्रीय कृषी भूषण पुरस्कारप्राप्त प्रभाकर भिलाजी चौधरी यांचे हिरवेगार शेत लक्ष वेधून घेते. श्री.चौधरी यांचे 19 एकर क्षेत्र आहे. या शेतात कोणते पीक नाही, असा प्रश्न पडतो. या शेतात मिश्र फळपिके, मोगरा, कपाशी, गिलके, भोपळा, मिरची, बटाट्यापासून ते भोपळ्यापर्यंत. आणि हे सर्व सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले. त्यामुळे चौधरींच्या शेतातील भाजीपाला म्हटला की दोन पैसे जास्तच मिळतात, असे प्रभाकर व मधुकर चौधरी हे अभिमानाने सांगतात…
जुने धुळ्यातील वरखेडी रोडवर चौधरी कुटुंबांचे वास्तव्य आहे. सात भावांपैकी प्रभाकर चौधरी व मधुकर चौधरी हे नोकरी, व्यवसायात न रमता शेतीत रमले. प्रभाकर चौधरी यांचे प्रथम वर्ष कला शाखेपर्यंत, तर मधुकर चौधरी यांनी राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. या दोन्ही भावांकडे एकूण 19 एकर क्षेत्र असून ते सर्व बागायती आहे. शेतातील विहिरीच्या मदतीने सिंचन केले जाते. साधारणत: चाळीस वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे.
चौधरी बंधू काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्वारी, बाजरी, मका, कपाशी आदी पिके घेत असत. त्यानंतर त्यांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. त्याच्या जोडीला कपाशी आणि मोगरा सारखी फूलशेती करण्यास सुरुवात केली आहे. शेती करताना त्यांनी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला नाही. सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यावरच चौधरी बंधूंचा भर राहिला आहे. त्यासाठी त्यांना श्री श्री रविशंकरजी यांची प्रेरणा मिळाली, असे ते नमूद करतात. शेतात पडणारा पालापाचोळा शेतातच जिरविण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो. सेंद्रीय पद्धतीने शेतीसाठी त्यांनी गांडूळ खताचे डेपो लावले आहेत, तर बांधावर गिरीपुष्पाची लागवड केली आहे. याशिवाय निंबोळी अर्क, गोमूत्र, जीवामृत, दशपर्णा अमृतचा वेळोवेळी वापर करतात. गांडुळ खताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने जाळी उपलब्ध करुन दिली असून गांडूळ खताच्या प्रत्येक युनिटला दोन हजार रुपयांचे अनुदान चौधरी बंधूंना मिळते. गांडुळांच्या संवर्धनासाठी विहिरींच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करुन घेतला आहे. त्याची सुरुवात प्रभाकर चौधरी यांनी अवघ्या पाचशे गांडुळांपासून केली.
पुणे येथून श्री.चौधरी यांनी पाचशे गांडूळ विकत आणले होते. शेतातील कचरा, पालापाचोळा, शेण, माती आदी पदार्थ पुरवून गांडुळांना विहिरीजवळील झाडाच्या सावलीत सोडून दिले. गांडुळांची प्रजनन क्षमता मोठी असते. तीन महिन्यात त्यांची पूर्ण वाढ होते. गांडुळांचे सरासरी आयुर्मान 15 वर्षे असते. ते टाकाऊ पदार्थ खाऊन विष्ठेद्वारे सुपिक खताची निर्मिती करतात. अवघ्या वर्षभरात गांडूळ खताचे लाभ मिळू लागले. शेतजमीन सुपीक झाली, तसेच कीडनाशके, खतांचा खर्च कमी झाला. अनेकजण गांडूळ खत घेऊन जातात. शेतातील माल बाजारात विक्रीला गेल्यावर दोन पैसे जास्तच मिळतात, असे श्री.चौधरी सांगतात. शेतीला पूरक म्हणून श्री.चौधरी यांच्याकडे दोन गायी व बैलजोडी आहे. त्यांच्या शेणखताचाही लाभ शेतीसाठी होतो.
श्री.चौधरी यांनी द्राक्षांचेही पीक सलग सात वर्षे घेतले होते. याच द्राक्षाच्या मांडवावर ते वेलवर्गीय फळभाज्यांची पिके घेतात. सध्या या मांडवावर गिलक्यांचे उत्पादन घेतले जात आहे. केवळ गिलक्यांचे उत्पादन घेऊन ते थांबत नाहीत, तर त्याचे वर्गीकरण केले जाते. त्याचाही दर जास्त मिळण्यासाठी लाभ होतो. चौधरी कुटुंब करीत असलेल्या सेंद्रीय शेतीची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्यासह कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी वेळोवेळी या शेताला भेट देतात. ते त्यांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच जवळच असलेल्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी शेतीची पाहणी करण्यासाठी येत असतात. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या झिंग चिंग झिंग या मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण या शेतात झाले आहे.
धुळे जिल्ह्यात फुलशेतीचे प्रमाण कमी आहे. हे लक्षात घेऊन श्री.चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी गुलाबाची शेती केली. सध्या ते मोगराचे उत्पन्न घेत आहेत. दोन एकर क्षेत्रात त्यांनी मोगराची लागवड केली आहे. मोगऱ्याचे रोज सरासरी 20 ते 30 किलो उत्पादन निघते. त्याला सरासरी 200 ते 300 रुपये प्रति किलो दर मिळतो. हाच दर लगीनसराईच्या काळात वाढतो, असेही श्री.चौधरी आवर्जून नमूद करतात. आपल्या शेतात चौधरी बंधूंनी सध्या कपाशी, भेंडी, गिलकी, दुधी भोपळा, मोगरा, मिरची, बटाट्यांची लागवड केली आहे, तर सीताफळ, चिकू, आंबे, नारळासह विविध फळझाडे दिसून येतात.
प्रभाकर चौधरी यांचे चिरंजीव राकेश हे वकील असून त्यांची नुकतीच भुसावळ, जि.जळगाव येथे सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच मधुकर चौधरी यांचे चिरंजीव सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनाही शेतीची आवड असून ते सुट्टीवर आले, तर शेतीत हमखास रमतात, असे चौधरी बंधू सांगतात. सेंद्रीय पद्धतीने शेती करणे, रासायनिक खते, कीडनाशक मुक्त अन्न तयार करणे शाश्वत शेती करताना उत्पादन खर्च कमी करुन जमिनीची सुपिकता वाढविणे हेच आपले ध्येय असल्याचे चौधरी बंधू सांगतात.
- गोपाळ साळुंखे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/14/2020