तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथील आई तुळजाभवानी सेवाभावी महिला बचतगटाने अल्पावधीत मोठी प्रगती साधली आहे. बचतगटाने लघु अंडी उबवणूक यंत्राच्या माध्यमातून आपली उन्नती साधली. गटाच्या अध्यक्ष सौ. सुनिता प्रभाकर उळेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत अधिक जाणून घेतले.
अध्यक्ष सौ. सुनिता उळेकर म्हणाल्या की, आम्ही महिलांनी बचतगटाचे महत्व ओळखून काही वर्षांपूर्वी महिला बचतगटाची स्थापना केली. आमच्या बचतगटातील महिला या सर्व शेतीवर अवलंबून आहेत. शेतीमध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे शेत मालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले. घरचा वाढलेला खर्च यामुळे आम्ही कोणता पूरक व्यवसाय करायचा या विवंचनेत असताना आम्हाला लघु अंडी उबवणूक यंत्राच्या योजनेबद्दल माहिती मिळाली. आम्ही यासाठी अर्ज केला व आमचा अर्ज मंजूर झाला. लोकवाटा भरण्यासाठी मी माझ्या अंगावरील सोने, गंठन व बोरमाळ बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा उस्मानाबाद यांच्याकडे गहाण ठेवून कर्ज घेतले व लघु अंडी उबवणूक यंत्र घेतले.
या यंत्राची अंडी ठेवण्यासाठीची क्षमता ही 400 आहे. सुरुवातीला आम्ही 100 अंडी घेतली. त्यातून 21 दिवसानंतर 87 पिल्ले निघाली. यानंतर आम्ही यंत्रामध्ये 400 अंडी ठेवण्यास सुरुवात केली. यातून आम्हाला 350 पक्षी मिळाले.
काही दिवसानंतर आम्हाला एक कल्पना सुचली व याच यंत्रामध्ये जास्त अंडी ठेवण्याची क्षमता वाढवता येऊ शकते हे लक्षात आल्यानंतर आमच्या स्वत:च्या तंत्राने या यंत्राची क्षमता 1200 केली. यातून आम्हाला 925 पक्षी मिळाले. त्यामुळे आमच्या मासिक उत्पन्नात वाढ झाली. यानंतर शासनाने दोन हजार अंडी दिली व तर सधन कुक्कुट विकास गट, उस्मानाबाद येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.स्वामी यांनी आम्हाला मशीनसाठी लागणारी अंडी घरीच कोंबड्यांपासून अंडी उत्पादन करण्याचा सल्ला दिला व तो आम्हाला पटला.
आम्ही आमच्या मशीन मधून शेतकऱ्यांना विक्री केलेले पक्षी पाच महिन्याचे झाले, नंतर त्या शेतकऱ्यांकडून 150 पक्षी खरेदी केले. यामध्ये 135 माद्या व 15 नर खरेदी केले. यातून आम्हाला मशीनला लागणारी अंडी वापरुन झाल्यानंतर आम्ही उरलेली अंडी बाहेर विक्री करतो व त्यातून कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याचा खर्च निघतो. या कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य आम्ही स्वत: तयार करतो. त्यामुळे खाद्याचा खर्च कमी येऊन आमच्या नफ्यात वाढ झाली. आमच्या मशीनमधून निघालेल्या पिल्लांना लसीकरण आम्ही स्वत: करतो. पिल्ले विक्रीसाठी पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कामुळे पिल्ले विक्रीची अडचण भासत नाही.
आम्ही एका पक्षाची किंमत रु. 20/- ठेवली असून आमच्या मशीनमधून दर महिन्याला सरासरी 900 ते 950 पक्षी निघतात. यातून आम्हाला 18 ते 19 हजाराची विक्री होऊन निव्वळ नफा रुपये 8 ते 9 हजार मिळत आहेत. आजपर्यंत आमच्या मशीनमधून 15 बॅच निघाल्या आहेत. यानंतर भविष्यात आम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवावयाचा असल्याचेही सौ. उळेकर यांनी विश्वासाने सांगितले.
लेखक - विलास माळी
आंतरवासिता, जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद
स्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 5/30/2020
आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापास...
स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या...
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकड...
द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची- चित्रपट-परिच...